No products in the cart.
‘फोर्ब्स’ मानांकित फोटोग्राफर विकी राय
निवडुंगाची फुले या लेखमालेतील पाहिलं व्यक्तिमत्व आहे जगप्रसिद्ध फोटोग्राफर विकी राय. विकी राय अगदी लहान वयात घरातून पळून दिल्लीला आला. तिथं प्लँटफॉर्मवर भणंग आयुष्य जगताना तो ‘सलाम बालक’ या ट्रस्टच्या संपर्कात आला आणि त्याची जगण्याची शिकवणी सुरु झाली. आपल्याला काय आवडतं आणि आपलं कौशल्य काय आहे हे लक्षात घेतलं की माणूस यशाच्या भराऱ्या घेऊ शकतो. त्यानुसार विकी रायनी फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं आणि या कौशल्याच्या साहाय्यानं जग अक्षरशः पादाक्रांत केलं. या कलेच्या जोरावर तो फोर्ब्सच्या थर्टी अंडर थर्टी यादीत पोहोचलाच त्याचबरोबर जगातल्या सामर्थ्यवान लोकांच्या यादीत त्याची उठबस सुरु झाली. असं असलं तरी तो आपला भूतकाळ विसरला नाही. आपल्याला मिळणाऱ्या प्रसिद्धीचा वापर त्याने वंचितांच्या मदतीसाठी केला. त्याची ही कहाणी वाचूया या लेखमालेतून.
दिल्लीच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर आणि बाहेरच्या रस्त्यावरच्या इकडे तिकडे पडलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या उचलून गोणीत भरणं… त्यात थंड पाणी भरुन मग जनरल बोगीत पाच, पाच रुपयांना विकणं, प्रत्येक प्लॅटफॉर्मचा एक भाई, डॉन. तो दिवसभर हे काम करुन त्या बदल्यात शिव्यांची लाखोली देत असे पण एवढ्या सगळ्या यातना झेलल्यावर दोन वेळचं थोडं जेवणं किंवा काही खायला मिळे. जेमतेम अर्धपोटी राहून काम करताना जर कधी या साऱ्या जाचा विरुद्ध एक शब्द जरी उच्चारला, तरीही पाकीटमारीच्या छोट्या चाकूच्या पात्यानी वार केले जायचे, कधी तोंडावर, कधी मानेवर. हे विकी आजूबाजूला बघत होता, त्या सगळ्यानी तो भेदरुन जाई.
पाण्यात काम करुन करुन हाता – पायाला जखमा होत, त्यातून रक्त येई. इथून सुरु झालेल्या लहानग्या विकीच्या जीवन प्रवासानं आज आपल्या फोटोग्राफीच्या कलेतून शब्दश: उत्तुंग गरुडझेप घेत फोर्ब्सच्या आशिया खंडातील मानांकनात २०१६ ला “थर्टी अंडर धर्टी” मधे विकी रॉय यांनी स्थान पटकावलयं.
विकी रॉय यांची ही विलक्षण कहाणी, त्यांच्यातलं उपजत फोटोग्राफीचं वेड, त्यांची फोटोग्राफी, यशाच्या शिखरावर असतानाचे, जागतिक कीर्तीचे फोटोग्राफर विकी रॉय आज या टप्यावर नेमकं काय करतायत, या सगळ्या बद्दल त्यांच्याकडूनच प्रत्यक्ष जाणून घेतलं.
हा लेख लिहिताना दोन वेळा माझा त्यांच्याशी फोनवरुन दीर्घ संवाद झाला, तो केवळ त्यांचा सांभाळ करुन, त्यांचं शिक्षण आणि पुढच्या वाटचालीत खंबीरपणे त्यांना पाठबळ देणाऱ्या, सलाम बालक ट्रस्टच्या प्रयत्नांमुळेच. त्या नंतर त्यांच्याशी बोलल्यावर, सगळं जाणून घेतल्यानंतर माझी अवस्था थक्क होण्यापलीकडची झाली होती. आणि प्रकर्षानं एक गोष्ट जाणवली, ती ही की एका लेखाच्या शब्द मर्यादेत बसणारं हे आयुष्य, कर्तृत्व नाही. या असामान्य यशोगाथेला जर वाचकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचवायचं असेल, तर या एका व्यक्तिमत्वावर, कुठलंही पाल्हाळ न लावता देखील कमीत कमी पाच ते सहा भागात ते मांडता येईल.
जगातल्या मोठ्या नामांकित फोटोग्राफर्समधे आज ज्यांचं सन्मानानं नावं घेतलं जातं, त्या विकी रॉय या कलावंताच्या लोकविलक्षण जीवन प्रवासाची ही कहाणी.
प. बंगाल मधील पुरुलीया या गावात १९८८ साली विकीचा जन्म झाला. वडिलांची रोजंदारीतली दिवसाची कमाई जेमतेम १५ ते २० रुपये. आपण मुलाचं संगोपन करु शकत नाही, या जाणिवेनं कासावीस झालेल्या विकीच्या आईनं, तो अडीच वर्षांचा असताना त्याला त्याच्या आजोळी झारखंडला धाडलं. तिकडे त्याचे आजोबा आणि मामा बोकारो स्टील प्लांटमधे नोकरीला होते. नातवाच्या पालन पोषणाचा आणि शिक्षणाचा खर्च करायची आजोबांची आर्थिक क्षमता होती. विकीचं शालेय शिक्षण सुरु झालं. पण बाहेर कुठे फिरायचीही परवानगी नव्हती. आणि एवढ्या लहानग्याला शाळेतून घरी आलं की रोज घरातील कामाला जुंपलं जाई. छोट्या छोट्या गोष्टीतही त्याला खूप बोल ऐकावे लागतं, जाता येता मार पडे.
या सगळ्याला कंटाळून आणि फिरायची, नवीन, नवीन ठिकाणं बघायची उपजत आवड पुरी करायला, वयाच्या अकराव्या वर्षी, एके दिवशी त्यानं मामाच्या शर्टाच्या खिशातून ९०० रुपये चोरुन तिकडून पळ काढला आणि थेट रेल्वेस्टेशन गाठलं. समोरच्या प्लॅटफॉर्मवर दिल्लीची गाडी लागली होती. त्यात जाऊन तो बसला. दिल्लीत उतरल्यावर मात्र तिकडे आजवर न पाहिलेली भयंकर गर्दी पाहून तो रडायलाच लागला. पण परतीचे मार्ग बंद झाले होते. मग हळू, हळू तिकडेच रहायचा निश्चय करुन त्यानं एक काम मिळवलं. कचऱ्यात पडलेल्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या उचलण्याचं. त्या कूलरवर भरुन पाच रुपयात विकण्याचं कामं. पाच, सहा महिने ते काम केलं. पण कधी पोटभर जेवण नाही. सततचा भाईलोकांचा जाच. त्यात पोलिसांचा ससेमिरा, कुठे चोरी झाली तरीही पब्लिक पहिलं या पोरांना धरुन बडवत. पोलीस कचऱ्याच्या ढिगाऱ्या जवळही फिरकतही नाहीत, म्हणून रात्री अपरात्री होणारा पोलिसांचा जाच टाळायला ही मुलं त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात रात्री जाऊन झोपत.
आणि या सगळ्या हलाहलात मुख्य म्हणजे बाहेर फिरायची विकीची हौस तर जराही पूर्ण झाली नव्हती. दिल्लीत असून लाल किल्लाही पाहता आला नव्हता अजून. मग विकीनं ठरवलं इकडून बाहेर पडायचं. स्टेशन बाहेरच्या अजमेरी गेटच्या रिक्षा स्टॅंडला लागून खाण्याचे ठेले आणि टपऱ्या होत्या. विकी तिकडे गेला नोकरी मागायला. एका ठेलेवाल्यानी त्याला भांडी घासायला ठेवलं. आता निदान पोटातला भूकेचा आगडोंब तरी शांत होणार होता. विकी हिरीरीने कामाला लागला. दिल्लीच्या थंडीत सतत पाण्यात काम करुन हातापायाला भेगा पडल्या. त्यातून रक्त येई. पण विकीनं नेटानं काम सुरु ठेवलं.
बघता बघता वर्ष होत आलं होतं दिल्लीला येऊन. एक दिवस ठेल्यावर एक तरुण मुलगा आला जेवायला. तो विकीला बराच वेळ काम करताना पहात होता. त्यानं जवळ बोलावून विकीला विचारलं, तू इकडे का काम करतोयस ? तुझं तर आत्ता शाळेत जायचं, शिकायचं वय आहे. हजरजबाबी आणि तल्लख बुद्धीच्या विकीने लगेच सांगितलं, पण मला शाळेत कसं जाता येणार. मी तर दिवस, रात्र इथं कामच करत असतो. तो तरुण मीरा नायर यांच्या ‘सलाम बालक ट्रस्ट’साठी काम करत होता. विकीच्या असहाय, यातनामय आयुष्याला सावरायला, जणू परमेश्वरानंच मदतीचा हात पुढे केला होता. तो तरुण विकीला ‘सलाम बालक ट्रस्ट’मधे घेऊन गेला. ड्रॉपिंग सेंटरमधे विकीची व्यवस्था केली गेली. वयानं थोड्या मोठ्या असलेल्या मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम, प्रशिक्षण इथं दिलं जाई. एक दिवस विकीने सेंटरमधल्या एका मुलाला शाळेत जाताना बघितलं. मग तो तिकडल्या सरांच्या मागेच लागला, मला पण शाळेत जायचंय. पण शाळेत शिकणाऱ्या मुलांची व्यवस्था दुसऱ्या केंद्रात होती. मग विकीला “अपना घर” या केंद्रात पाठवलं गेलं. पाचवी पास झाल्यावर घरातून पळून आलेल्या विकीचं परत अशा प्रकारे दीड वर्षानंतर शालेय शिक्षण सुरु झालं. पहिली काही वर्ष त्याला छान ऐंशी टक्क्यांहून जास्त मार्क मिळत. पण दहावीत विकीला अठ्ठेचाळीस टक्केच मिळाले. सेंटरमधल्या सरांनी सल्ला दिला की तू कुठलं तरी व्होकेशनल ट्रेनिंग म्हणजे टी व्ही रिपेअरिंग, शिलाईकामं असं काही शिक्षण घे आणि ओपन युनिव्हर्सिटीतून बारावी कर. पण विकी जेव्हा सेंटरमध्ये आला होता तेव्हा सेंटरमधल्या मुलांची एक फोटोग्राफीची स्पर्धा आयोजित केली होती. त्यातल्या उत्तम फोटोंना निवडून त्यांचे प्रदर्शन दिल्ली बरोबरच श्रीलंका आणि अजून काही देशात झालं होत. ती मुलं प्रदर्शनाबरोबर तिकडे जाऊन आली होती. विकीला तेव्हाच फोटोग्राफी बद्दल आवड निर्माण झाली होती. आणि फोटोग्राफीमुळे फिरायलाही मिळतं, हेही समजलं होतं. तो पटकन सरांना म्हणाला, मुझे फोटोग्राफी सिखनी है, फोटोग्राफर बनना है।
क्रमश:
– प्रतोद कर्णिक,
लेखक हे चित्रकार आणि जाहिरातकर्मी आहेत.
Related
Please login to join discussion