No products in the cart.
सीईटी परीक्षा घाईत का?
मागील वर्षी सीईटीमध्ये झालेला गोंधळ हा विषय आम्ही नेटाने लावून धरला होता. त्यानांतर यावर्षी तरी या परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यात येतील अशी अपेक्षा होती. यावर्षी तर अगदी सुरुवातीपासूनच या परीक्षांमध्ये गोंधळ होतोय की काय असे दिसून येत आहे. दरवर्षी साधारण मे महिन्याच्या शेवटी होणाऱ्या बीएफए प्रवेश प्रक्रियेची सीईटी परीक्षा यंदा मात्र १६ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज नुकतेच २४ मार्चला भरून झाले असताना एवढ्या तातडीने परीक्षेचं आयोजन का केलं जात आहे असा प्रश्न विद्यार्थी आणि पालक विचारत आहेत.
दि 6 एप्रिल 2023 रोजी विद्यार्थ्यांना या परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक परीक्षेच्या वेबसाईटवर देण्यात आले होते. लक्षात घ्या हे तात्पुरते वेळापत्रक असते, अंतिम नाही. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना सीईटीसाठी प्रवेश पत्र (हॉल टीकीट) 10 ते 16 एप्रिल दरम्यान देण्यात येणार असे जाहीर केले गेले. आणि लगेचच 16 एप्रिलला परीक्षा होईल असे देण्यात आले. आता हे तात्पुरते वेळापत्रक कायम करून परीक्षा 16 एप्रिलला आयोजित करण्यात आल्या आहेत.
नुकत्याच 23 मार्च रोजी 12 वीच्या परीक्षा संपल्या आहेत. आणि सीईटी सेलने 16 एप्रिलला बीएफए सीईटी परीक्षा आयोजित केली म्हणजे मध्ये फक्त 22 दिवसांचा कालावधी जातोय. आता केवळ 15-20 दिवसात विद्यार्थी या परीक्षेची तयारी कसे करणार? जे विद्यार्थी फौंडेशन, एटीडी हे अभ्यासक्रम शिकत आहेत त्यांची उच्च कला परीक्षा 31 मार्च पासून सुरु आहे. यांच्या परीक्षांचे वेळापत्रक बीएफए सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकाशी जुळत नाहीये. मग अशा वेळी विद्यार्थ्यांनी एटीडी परीक्षा द्यायची की बीएफएची प्रवेश परीक्षा द्यायची? असा संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनात तयार होत आहे.
अनेक विद्यार्थी हे ग्रामीण भागातून सीईटी परीक्षेसाठी नाशिक, पुणे, मुंबई अशा परीक्षा केंद्रावर येतात. आता इतक्या कमी कालावधीत त्यांची रेल्वे प्रवासाची तिकिटे तरी आरक्षित होतील का?
सीईटी सेल प्रवेश परीक्षेसाठी दरवर्षी नवनवीन नियम लागू करते. यंदा बीएफए आणि बीडेस (B.Des) या कोर्ससाठी वेगवेगळे पेपर ठेवण्यात आले आहेत. बीएफए परीक्षेचा साचा ठरलेला असला तरी बीडेस परीक्षा कशी होणार याबद्दल विद्यार्थी संभ्रमात आहेत. याचा कुठलाही सॅम्पल पेपर सीईटी सेलच्या वेबसाईटवर उपलब्ध नाही. मग विद्यार्थ्यांनी तयारी कशी करायची?
जी परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्यात घेण्यात येते ती एवढ्या तातडीने का घेण्यात येत आहे? की परीक्षा उरकून टाकणे हा कला संचालनालय आणि सीईटी सेलचा उद्देश आहे. मागील वर्षी सीईटी परीक्षेचे प्रभारी सपकाळ होते. त्यांच्या आयोजनामध्ये भरपूर गोंधळ झाला. अनेक विद्यार्थ्यांचे काम वाईट असूनही त्य्यांना उत्तम गुण मिळाले आणि प्रवेश परीक्षेच्या गुणवत्ता यादीत ते चक्क पहिल्या 10-20 क्रमांकावर होते. तेच सपकाळ यावर्षीही सीईटी परीक्षेचे प्रभारी( incharge) आहेत. ‘चिन्ह’हा विषय इतक्या मोठ्या प्रमाणावर लावून धरत आहे तरी, जर तीच व्यक्ती परीक्षा प्रभारी म्हणून येत असेल तर खरच कला संचालनालय आणि सीईटी सेल यांना या परीक्षेचे गांभीर्य उरले आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतो.
आता ही परीक्षा १६ एप्रिल ला घाईघाईने न उरकता नेहमीप्रमाणे मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला घेण्यात यावी अशी मागणी पालक आणि परीक्षार्थींकडून करण्यात येत आहे. या सगळ्या बाबींचा योग्य तो विचार करून सीईटी सेल आणि कला संचालनालय योग्य तो निर्णय घेतील या प्रतीक्षेत कला वर्तुळ आहे.
******
(फिचर इमेजमधील फोटो प्रतीकात्मक.)
Related
Please login to join discussion