Features

‘चिन्ह आणि मी’ – भाग २

अमोल पालेकर यांच्या चित्रांचं प्रदर्शन येत्या मंगळवारपासून जहांगीरमध्ये भरत आहे. त्या प्रदर्शनाची निमंत्रण पत्रिका पालेकरांकडून ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांना आल्यावर त्यांच्या मनात असंख्य जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कारण श्री नाईक हे जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत असताना काही काळ प्रायोगिक रंगभूमी चळवळीत सहभागी होते. त्या काळात कळत नकळत जे काही शिकावयास मिळालं त्यामुळे आपल्या जगण्याला दिशा मिळाली असं त्यांना प्रामाणिकपणे वाटतं. तेच मांडायचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या या दीर्घ लेखाद्वारे केला आहे. हा लेख ४ भागांमध्ये प्रस्तुत करत आहोत. चिन्ह आणि मीया संकल्पित आत्मकथनपर पुस्तकात त्यांचं हे लेखन प्रकाशित होणार आहे. या मालिकेतील आजचा हा दुसरा भाग. 

———-

भाग २

 

नाटकाच्या दुनियेत मी इतका गुंतलो होतो की दुपारी जेवणाच्या सुट्टीतदेखील मी फोर्टच्या हार्निमन सर्कलजवळच्या कॉफी हाऊसमध्ये जात असे. कशासाठी तर नाटकवाल्या मित्रांना भेटण्यासाठी. ते कॉफी हाऊस म्हणजे नाटकवाल्यांचा अड्डाच झाला होता. दिलीप कोल्हटकर हा जणू त्या अड्ड्याचा पदसिद्ध अध्यक्षच होता. कारण त्याच्या ऑफिसची इमारत रस्त्याच्या पलीकडं होती. राघू बंगेरादेखील त्याच ब्रांचमध्ये काम करत असे. साडेअकरा बारा वाजले म्हणजे एकएक जण तिथं येत असे. किती किती म्हणून नावं सांगू. जयराम हर्डीकरचं ऑफिसदेखील अगदी जवळ असल्यामुळं तोही तिथं सतत येत असे. अच्युत वझे, सुबोध गाडगीळ, विवेक लागू, जुईली देऊस्कर, अच्युत देशिंगकर, अरविंद भानू, विनय आपटे, विजय बोन्द्रे, विजय शिर्के, चंद्रकांत मेहेंदळे, दिलीप कुलकर्णी, मंगेश कुलकर्णी, ऍड. रवी कुलकर्णी, रेखा सबनीस, प्रभाकर पाटणकर, विक्रम गोखले, सुरेश भागवत, गिरीश वाझकर, जयंत करगुटकर, चित्रा पालेकर, अमोल पालेकर किती म्हणून नावं सांगू? कधीकधी दीपा श्रीराम, डॉ लागू देखील येत. कुमुद मेहतादेखील वरचेवर येत. समोरच्या एशियाटिक मधून दुर्गाबाई भागवतदेखील तिथं कॉफी प्यायला येत असत. अशोक शहाणे, रघु दंडवते, सतीश काळसेकर, सदानंद रेगे अशी लेखक मंडळी देखील तिथं गप्पा मारायला येत असत. आणि हो एक महत्वाचं नाव राहिलं ते म्हणजे प्रख्यात कवी अरुण कोलटकर यांचं. त्यांच्या सोबत किरण नगरकरदेखील हटकून येत असे.

उन्मेषचं आणि आणीबाणीच्या काळात सादर केलेलं एक धाडसी नाटक. त्याचीच ही निमंत्रण पत्रिका.
प्रसिद्धीसाठी त्या काळात अशी पॅम्प्लेट्स काढली जात..

या सर्वाना भेटायला सत्यदेव दुबे तिथं येत असत. मुंबईत असले की महेश एलकुंचवारदेखील तिथं हटकून येत असत. झालंच तर अधनंमधनं पुष्पाबाई आणि अनंतराव भावेदेखील तिथं येत असत. पुष्पाबाईनी तर ‘माणूस’च्या दिवाळी अंकात या कॉफी हाऊसवर एक सुंदर लेखदेखील लिहिला होता. अनेकदा गोविंद निहलानीदेखील तिथं येत असत. (त्यावेळी निहलानी यांनी ‘आक्रोश’ हा सिनेमा पूर्ण केला होता. तो चित्रकार भास्कर कुळकर्णी यांच्या ‘वारली’ डायरीवर आधारित होता. नसरुद्दीनबरोबर नाना, स्मिता अशी मंडळी काम करत होती. आणि महेश एलकुंचवार यांनीदेखील त्यात भूमिका केली होती. गिरीधर मोरेसोबत अनेक नाटकवाले त्या चित्रपटात होते. तेव्हा मला भास्कर कुळकर्णी वगैरे कुणी ठाऊक नव्हतं. पण नंतर वीस-पंचवीस वर्षानं मात्र मी त्याच भास्कर कुळकर्णी यांच्यावर ‘चिन्ह’चा एक विशेष अंक प्रसिद्ध केला. जो अतिशय गाजला.) गोविंद निहलानी यांच्यासोबत भक्ती बर्वे अनेकदा तिथं येत असे. शफी इनामदारदेखील तिथं येत असे. विजय तेंडुलकरदेखील अधूनमधून येत असत. पुण्याचा आमचा प्रकाश योजनाकार मित्र बाळ मोघे डेक्कन क्वीनमधून उतरून थेट कॉफी हाऊसमध्ये येत असे. कलोपासकच्या ‘कालाय तस्मै नमः’ या खानोलकरांच्या नाटकातल्या होरा भूषणच्या भूमिकेमुळं गाजलेले अरुण गोडबोलेदेखील डेक्कन क्वीनमधून उतरून थेट कॉफी हाऊसमध्येच येत. अनेकदा राजाभाऊ नातूदेखील पुण्याहून येत. नाटककार चिं त्र्यं खानोलकर यांचं तर कॉफी हाऊस हे हक्काचं ठिकाण होतं. खरं सांगायचं तर प्रायोगिक रंगभूमीशी निगडित असलेले सारेच कलावंत त्या कॉफी हाऊसशी जोडले गेले होते.

एकांकिका सिद्धार्थची असणार सतीश पुळेकरनं बसवलेली. प्रदीप पटवर्धन विजय पाटकर जयवंत वाडकर सारेच त्या छायाचित्रात दिसत आहेत
अमोलच्या गाजलेल्या चल रे भोपळ्या या नाटकातील एक दृश्य. सुरेश भागवत आणि अरुंधती मुर्डेश्वर.

नुसता नाश्ता केला, चहा कॉफी घेतली का निघालं. असं तिथं कधी होत नसे. चहा कॉफीच्या आस्वादाबरोबर असंख्य चर्चा तिथं झडत असत. मग ती चर्चा नव्या नाटकावर असे किंवा एखाद्या नव्या पुस्तकावर. एखाद्या भूमिकेवर किंवा एखाद्या लेखावर सुद्धा. नव चित्रपट, नव साहित्य, नव कविता, नव चित्रकला असे कुठलेच विषय त्या चर्चेतून सुटत नसत. खूप अभ्यासपूर्ण चर्चा असत त्या. कधीकधी त्यातून वादही उद्भवत. पण चहा कॉफीच्या कपाबरोबर ते संपवले जात.

स्पर्धेच्या काळात अशी परीक्षकांसोबत चर्चासत्र देखील आयोजित केली जात. डावीकडे अनुया पालेकर त्यांच्या शेजारी विनय आपटे .चार खुर्च्या सोडून विनय धुमाळे आणि रमेश चौधरी.

या साऱ्यात मी कोण होतो. तर जेमतेम विशीतला सर्वसामान्य तरुण. मी असं काय कर्तृत्व घडवलं होतं त्या आधी. तर काहीही नाही. फक्त माझं वाचन अफाट होतं. मराठी साहित्यातले महत्वाचे सर्व प्रवाह मी तोपर्यंत वाचून काढले होते. सत्यकथा, अभिरुची, छंद आणि अनियतकालिक चळवळीतील सर्वच अंक मी अगदी कोळून प्यायलो होतो. याच काळात वर्षभर मी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या संदर्भ विभागात जाऊन दिवसभर वाचत बसत असे. संदर्भ विभागात कंटाळा आला की मी एशियाटिक लायब्ररीत जात असे. तिथं देशभरातली वृत्तपत्र मला वाचावयास मिळत. प्रायोगिक रंगभूमीत शिरलेला एक तरुण आणि तोही जे जे स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी आणि त्याचं मराठी साहित्याचं वाचन  बऱ्यापैकी. एवढ्याच गुणवत्तेवर मी या मंडळींमध्ये शिरलो होतो. आणि नुसता शिरलोच नव्हतो तर कालांतरानं त्यांच्यातलाच एक झालो होतो आणि त्यांनीही मला आपलंसं केलं होतं.

 

***

रात्री बारा एक किंवा दोन वाजता स्पर्धेचा बक्षीस समारंभ व्हायचा . अशाच एका समारंभाचे हे छायाचित्र. अध्यक्ष होते पुरुषोत्तम दारव्हेकर आणि अन्य पाहुण्यांसोबत उन्मेषचे कार्यकर्ते.

साधारण अकरा-साडेअकराला एकएक जण कॉफी हाऊसमध्ये यायला सुरुवात करीत. पहिली एन्ट्री असायची ती अर्थातच दिलीप कोल्हटकर यांची. मग जयराम हर्डीकर येत असे. मध्येच राघू बंगेरा डोकावून जात असे. कारण या तिघांच्या बँका कॉफीहाऊसच्या समोरच्याच इमारतीत होत्या. आणि मग एकएक जण यायला सुरुवात होई. अमोल आणि अनुया स्कुटरवरून येत असत. डिकीत बसलेली अनुया मला आजही आठवते. पाठोपाठ दिलीप कुलकर्णी मग रेखा सबनीस मग प्रभाकर पाटणकर असे सारे एकापाठोपाठ येत असे. आधी एका टेबलावर सारे बसत. मग एकाची दोन टेबलं होत. दोनाची तीन टेबलं होत. या टेबलावरून त्या टेबलावर जागा बदल होत. अखंड चहा कॉफीच्या ऑर्डरी सुटत. त्यातले बहुसंख्य सिगारेट ओढणारे होते त्यामुळे धुरांची वलयं सतत निघत. रेखा सबनीस मार्लबरो नावाच्या परदेशी सिगारेटचं कोरं पाकीट तिथंच उघडत असे. आणि मग भराभर साऱ्यांना वाटूनदेखील टाकत असे. त्या मार्लबरो सिगारेटचं अप्रतिम पॅकिंग आजही आठवतं. खरंतर या लिहायच्या गोष्टी नाहीत. पण अमोलच्या प्रदर्शनाचं निमंत्रण आलं आणि या निमित्तानं ते सारे मंतरलेले दिवस भराभर आठवत गेले. आणि ते सारं लिहावंसं वाटू लागलं.

दारव्हेकर मास्तरांकडून चषक स्वीकारताना शंकर नाग...

गप्पांचे विषय अर्थातच नाटक हाच प्रामुख्यानं असे. अनेकदा भूमिकांवर चर्चा चालत. नव्या चित्रपटांवर, पुस्तकांवर, नव्या रेकॉर्ड्सवरदेखील तिथं तासनतास चर्चा चालत. तीनतीन चारचार टेबलं तीनतीन चारचार तास भरलेली असली तरी त्या कॉफी हाऊसचा मालक काही आम्हाला उठवायला येत नसे. त्यामुळे वादविवाददेखील मस्त रंगत. या गप्पांच्या केंद्रस्थानी अर्थातच बहुतेक वेळा अमोल असे. अमोलचं शांतपणे विचार करून मुद्देसूद बोलणं बहुतेकांना खिळवून टाकत असे. दिलीप कोल्हटकर, अच्युत वझे हेदेखील कधीकधी चर्चेच्या केंद्रस्थानी असत. अशोक शहाणेदेखील काहीतरी तिरकसपणे बोलून वाद निर्माण करत. दुर्गाबाई कॉफी घ्यायला आल्या म्हणजे बहुसंख्य जण जरा दबकूनच असत. तेंडुलकर, डॉ लागू, महेश एलकुंचवार आले म्हणजे चालणाऱ्या चर्चा शांतपणे चालत. तीच गोष्ट गोविंद निहलानींची. पण सत्यदेव दुबे आले म्हणजे वातावरण थोडंसं तापलेलं असे. कारण दुबे कधी चिडतील, संतापतील याचा नेम नसे. अनेकदा अमरीश पुरीदेखील या चर्चात सहभागी होत. पण त्याचं खर्जातलं बोलणं ऐकून एक वेगळंच वातावरण तिथं निर्माण होई.

नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या हस्ते चषक स्वीकारताना चंद्रकांत मेहेंदळे. मीनल आपटे वगैरे(चंद्रकांत मेहेंदळे मागच्याच वर्षी गेला.)

सुरेश भागवत, मंगेश कुलकर्णी असले म्हणजे वात्रटपणा सुरु होई. मंगेश प्रत्येक वेळी कुठल्यातरी जाहिरात कंपनीतली नोकरी सोडून आलेला असे. त्याचं बोलणं नोकरी या विषयावरूनच सुरु होई. मध्येच तो त्याच्या कविता वाचून दाखवे. मंगेश गणपती अप्रतिम रेखाटत असे. नाचरा गणपती, हासरा गणपती अशी रेखाटनं तो कॉफी हाऊसमध्ये बसल्या बसल्या रेखाटत असे. त्यावेळी कॉफी हाऊसमध्ये येणारी ही सर्व मित्रमंडळी लग्नाची होती. एखाद्याचं लग्न ठरलं असलं म्हणजे त्या लग्नपत्रिकेच्या डिझाईनचं काम मंगेशला करावं लागत असे. बोलताबोलता तो सुंदर गणपती रेखाटे. जयराम हर्डीकर, सुरेश वैद्य, विनय आपटे, प्रभाकर पाटणकर बहुदा विक्रम गोखले अशा अनेक नाटकवाल्यांच्या लग्नपत्रिका मंगेशनं कॉफी हाऊसमध्ये बसल्याबसल्या तयार केल्या होत्या. कॉफी हाऊसमध्ये बसणाऱ्या साऱ्यांचाच मंगेश हा लाडका होता.

विनय आपटेच्या लग्न पत्रिकेसाठी मंगेशने रेखाटलेला गणपती...

एकदा  अशीच ‘कोसला’ या नेमाडेंच्या पुस्तकावर चर्चा चालू होती. अमोलची ‘कोसला’ ही अतिशय आवडती कादंबरी. तो खूप छानपणे तिच्यावर बोलत होता. त्या काळात ‘कोसला’च्या प्रती उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनीच ती अमोलकडं वाचायला मागितली. पण अमोलनं शांतपणे ती धुडकावून लावली. म्हणाला पुस्तक वाचायचं असेल तर गावदेवीला माझ्या घरी या. माझ्याकडं एकच प्रत आहे. ती दुर्मिळ आहे. ती मी कुणालाही देणार नाही. घरी आलात तर खाऊ पिऊ घालीन. वाचा आणि निघून जा. वगैरे.

जयराम हर्डीकर च्या लग्नाची पत्रिका

कुठलाही विषय त्या चर्चांना वर्ज्य नव्हता. नाटकच नाही तर चित्रपट, शास्त्रीय संगीत, चित्रपट संगीत, मराठी नाट्य संगीत, मराठी भावगीतं, मराठी इंग्रजी साहित्य, सामाजिक चळवळी, राजकारण साऱ्याच विषयावर तिथं चर्चा चालत. मी जेमतेम विशीचा. मी त्या शांतपणे ऐकण्याचं काम करत असे. प्रायोगिक नाट्य चळवळीतल्या त्या चारपाच वर्षात मी अशा चर्चांमधून खूप काही शिकलो. नंतर मी जे चित्रकलेच्या क्षेत्रात थोडंबहुत काम केलं. त्याला या पाच वर्षातल्या चर्चा निश्चितपणे कारणीभूत आहेत असं मला आजही वाटतं. या सर्व मंडळींनी कधीही मला मी त्यांच्यापेक्षा वयानं लहान आहे हे कधीही जाणवून दिलं नाही. नाटकातले सर्वच जण एकमेकाला अरेतुरे करत असत. मीही तसाच त्यांना अरेतुरे करू लागलो पण त्यांनी कधीही मला हटकलं नाही. या संदर्भात अलीकडची एक आठवण सांगावीशी वाटते. उपयोजित चित्रकलेच्या क्षेत्रात ज्यांचं नाव होतं ते रत्नाकर सोवनी यांनी अलीकडंच एकदा मला हटकलं. तू वृन्दावन (दंडवते) किंवा सुरेश (भागवत) याना अरेतुरे कसं काय करतोस? हे बरोबर नाही. ते केव्हढे? तू केव्हडा? तेव्हा मी सोवनींना म्हटलं, अहो, सत्तरच्या दशकात या साऱ्यांसोबत मी काम केलं आहे, त्यांच्यात बराच काळ राहिलो आहे, वावरलो आहे. नाटकातले संबंध वेगळेच असतात. हे ऐकलं आणि मग सोवनी जरासे शांत झाले. सुरेश किंवा अरुण कोलटकरांसोबत तुम्हीदेखील कॉफीहाऊसमध्ये अनेकदा येत होता. पण तुमचं माझ्याकडे कधीच लक्ष  गेलं नाही. यावर ते काही बोलले नाहीत. अलीकडेच ते गेले.

जयरामचं जाणं सर्वांनाच अतिशय धक्का देऊन गेलं...

त्या चळवळीतले अनेकजण आता या जगात नाहीत. काहींच्या शोकांतिका झाल्या. उदाहरणार्थ जयराम हर्डीकर. तो तर ८० सालीच अपघातात गेला. दिलीप कोल्हटकरचा खून झाला किंवा विनय आपटे अकाली गेला. गिरीधर मोरे, नरेश नातू असेच अकाली गेले. दिलीप कुलकर्णीचा मृत्यू असाच धक्का देऊन गेला. त्या चळवळीतले सारेजण आता सत्तर पंच्याहत्तरच्या घरात पोहोचले आहेत. चल रे भोपळ्या मधला जयंत कोपरकर किंवा सुरेश भागवत आजही आवर्जून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला मला फोन करतात. तेव्हा मात्र मला अगदी लाजल्यासारखं होतं. मला मात्र ते कधीच जमलं नाही.

 

***

 

क्रमश:

 

सतीश नाईक 

संपादक

‘चिन्ह आर्ट न्यूज’

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.