No products in the cart.
‘चिन्ह आणि मी’ – भाग ४
अमोल पालेकर यांच्या चित्रांचं प्रदर्शन येत्या मंगळवारपासून जहांगीरमध्ये भरत आहे. त्या प्रदर्शनाची निमंत्रण पत्रिका पालेकरांकडून ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांना आल्यावर त्यांच्या मनात असंख्य जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कारण श्री नाईक हे जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत असताना काही काळ प्रायोगिक रंगभूमी चळवळीत सहभागी होते. त्या काळात कळत नकळत जे काही शिकावयास मिळालं त्यामुळे आपल्या जगण्याला दिशा मिळाली असं त्यांना प्रामाणिकपणे वाटतं. तेच मांडायचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या या दीर्घ लेखाद्वारे केला आहे. हा लेख ४ भागांमध्ये प्रस्तुत करत आहोत. ‘चिन्ह आणि मी‘ या संकल्पित आत्मकथनपर पुस्तकात त्यांचं हे लेखन प्रकाशित होणार आहे. या मालिकेतील हा चौथा आणि शेवटचा भाग.
———-
भाग ४
इंटेरियर पाठोपाठ मी जेजेत फाईन आर्टलाच प्रवेश घेतला. चार वर्षाचा कोर्स करून मी फाईन आर्ट केलं आणि १९८१ साली जहांगीर आर्ट गॅलरीत माझ्या चित्रांचं पहिलं प्रदर्शन भरवलं. त्याच वर्षी माझ्या चित्राला राज्य पुरस्कारदेखील मिळाला. परीक्षक होते चित्रकार प्रभाकर बरवे. हा माझ्या दृष्टीनं खूप मोठा सन्मान होता. नंतरच्या वर्षीदेखील मला राज्य पुरस्कार मिळाला त्यावेळी परीक्षक होते बेंद्रे आणि राम चॅटर्जी. पण तोपर्यंत मी पत्रकारितेत पूर्णपणे रुळलो होतो. जेजेला एडव्हान्समध्ये शिकत असताना मला इंडियन एक्सप्रेसच्या लोकप्रभा साप्ताहिकाकडून बोलावणं आलं. त्या काळात फोन वगैरे अतिशय दुर्मिळ होते. त्यामुळे वसुंधरा पेंडसे नाईक यांनी माझ्यासाठी तीन-चार ठिकाणी निरोप ठेवले होते. त्यातलं एक ठिकाण होतं साहित्य संघ. साहजिकच मी पण पत्रकारितेत शिरलो, कारण चरितार्थासाठी काहीतरी करणं आवश्यक होतं आणि लेखन, वाचन, संपादन हे माझं आवडीचं क्षेत्र होतं. साहजिकच हळूहळू नाटक सुटलं ते सुटलंच.
ते सुटण्यामागे आणखीन कारणं अशी होती की रात्रीअपरात्रीची जागरणं मला मानवेनात, त्यातून ऍसिडिटी सुरु झाली होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की हे माध्यम काही आपलं नव्हे. आपण घोळक्यामध्ये राहून सर्वांशी फारसा संवाद साधू शकत नाही. एकटेपणं काम करण्याचीच आपली वृत्ती आहे. त्यामुळे हळूहळू मी नाटकापासून दूर होत गेलो.
एकदा एखाद्या गोष्टीपासून दूर गेलो का पुन्हा तिथं वळून बघायचं नाही असा विचित्र खाक्या असल्यामुळं नाटकातल्या मंडळींशीदेखील संपूर्ण संपर्क सुटला तो सुटलाच. ‘छोटीसी बात’ पासून अमोल खूपच मोठा स्टार झाला असल्यामुळं आता तो आपल्याला कितपत ओळखेल म्हणून मीही बहुदा त्याला त्या प्रदर्शनासाठी किंवा नंतरच्या प्रदर्शनासाठीदेखील बोलावलं नसणार.
नंतर मात्र मी पूर्णपणे चित्रकलेसाठीच वेळ दिला. नाटकांच्या दिवसात जे काही मी शिकलो होतो, अनुभवलं होतं त्याचा वापर करून मी चित्रकला विषयक चळवळ उभारण्याचा प्रयत्न केला. आधी मी बॉम्बे आर्ट सोसायटीत शिरकाव केला मग आर्टिस्ट सेंटर ताब्यात घेतलं. दोन्ही ठिकाणी जवळजवळ नऊ-दहा वर्ष मी भरपूर चित्रकलाविषयक ऍक्टिव्हिटी केल्या. याच काळात ‘चिन्ह’ची निर्मितीदेखील मी केली. ‘चिन्ह’च्या पहिल्या अंकात दामू केंकरे, रघुवीर तळशिलकर, प्रमिला दंडवते, मोहन वाघ, मंगेश कुलकर्णी, नाना पाटेकर, पुरुषोत्तम बेर्डे यांची जेजेतल्या दिवसांविषयीची आत्मकथनं प्रकाशित केली. मीना नाईक हिनं ती शब्दांकित केली होती. कसा कुणास ठाऊक अमोलचा अंतर्भाव करायचा राहून गेला किंवा कदाचित अमोलही त्यावेळी उपलब्ध नसणार असंही असेल. पण कधीतरी आपण ते करू असं मनाशी पक्कं केलं होतं. पण तो योग काही आला नाही हेच खरं.
***
आता अलीकडं, म्हणजे तरी झाली त्याला सात आठ वर्ष. मी ‘गायतोंडे’ ग्रंथाची घोषणा केली. आणि एके दिवशी पुण्याहून माझ्याकडं ‘गायतोंडे’ ग्रंथाच्या दोन प्रती नोंदवल्या गेल्या. नाव पाहिलं तर अमोल पालेकर आणि संध्या गोखले. हा अमोलशी ऐंशी सालानंतर झालेला पहिला संपर्क. पण का कुणास ठाऊक मी काही त्याला फोन केला नाही. आळशीपणा म्हणा किंवा काहीही. २०१६ साली ‘गायतोंडे’ ग्रंथ प्रकाशित झाला आणि अमोल आणि संध्या यांना त्यांच्या दोन्ही प्रती पाठवल्यावर दुसऱ्याच दिवशी माझ्या मोबाईलवर फोन आला. मी आवाज ऐकला आणि समजलो हा फोन अमोलचा असावा. अभावितपणे मी बोलून गेलो ‘बोल’. खरं तर हा माझा भोचकपणा होता मी असं अरेतुरे करायला नको होतं. पण त्याला त्याचं काही वाटलं नसणार. सहजपणानं त्यानं मला विचारलं ‘ओळखलंस?’ मी म्हटलं तुझा आवाज कोण नाही ओळखणार? मग गायतोंडे ग्रंथाच्या निर्मितीबद्दल त्यानं माझं मनापासून अभिनंदन केलं. खूप मोठं काम केलंयस म्हणाला. ग्रंथ वाचतो आणि अभिप्राय कळवतो असंही म्हणाला. पुण्यात कधी आलास तर जरूर घरी ये. आपण बसू असंही त्यानं निमंत्रण दिलं. आणि मग आमच्यातला संवाद पुन्हा सुरु झाला. आताही त्याच्याकडून तसेच संध्याकडून वेगवेगळे व्हाट्सअप मेसेजेस येतच असतात. जमेल तशी मी उत्तरं देत असतो. माझेही फॉर्वर्डस पाठवत असतो.
‘गायतोंडे’ ग्रंथांनंतर लगेचच मी ‘जे जे जगी’चं काम सुरु केलं. या ग्रंथात जेजेच्या दिवसांविषयी तुझं आत्मकथन हवंच असंही मी त्याला म्हटलं त्यानंही ते मान्य केलं. मग आमच्या नितीन आरेकरांनी पुण्यात जाऊन त्याची सविस्तर मुलाखत घेतली आणि शब्दांकन तयार केलं. ते किंचित विस्कळीत झालंय किंवा काय असं अमोलला वाटलं. आणि तो मला म्हणाला की मी त्यावर थोडंसं काम करून देतो. मध्यंतरी तो आजारी होता. त्यामुळे मी काही त्याला त्रास दिला नाही. मग एकदा फोन केला तर म्हणाला खूप जोरात पेंटिंग चालू आहे. ते झाल्यावर देतो. बहुदा याच प्रदर्शनाचं त्याचं काम चालू असणार. आता प्रदर्शन झाल्यावर त्याच्याकडून कधी हे आत्मकथन येतंय याचीच मी वाट पाहतोय.
नितीननं जे शब्दांकन केलं होतं ते मी दोनतीन वेळा वाचलंय. जेजेच्या या ग्रंथात झालेल्या अमोलच्या या आत्मकथनाच्या समावेशामुळं ‘जे जे जगी जगले’ हा ग्रंथ एका वेगळ्याच उंचीवर गेला आहे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. त्यामुळेच त्याच्याकडून येणाऱ्या सुधारित लेखाची मी आतुरतेनं वाट पाहतो आहे. तो आला की हा ग्रंथ छपाईला जाईल. आणि माझ्या डोक्यावरचं एक ओझं उतरेल. ‘डिनोव्हो’ झाल्यामुळं मी अतिशय आनंदात आहे. ‘जे जे जगी’ हा ग्रंथ प्रकाशित होईल तेव्हा मी अत्यानंदात असेल.
अमोलच्या या प्रदर्शनाला माझ्या आणि ‘चिन्ह’च्या अगदी मनापासून शुभेच्छा! त्याच्या या प्रदर्शनामुळेच मला ते सारे जुने मंतरलेले दिवस आठवण्याची संधी मिळाली म्हणून अमोलचेदेखील मनापासून आभार! अमोलनं सत्तरी गाठल्यावर पुन्हा नव्यानं रंगविण्यास सुरुवात केली आहे. माझ्या बाबतीतदेखील तसंच काहीतरी घडतंय. मीही आता चित्रकला चळवळी, चिन्ह, प्रकाशन यापासून दूर होऊन पुन्हा चित्रकलेकडे वळलो आहे. पाहूया…….
सतीश नाईक
संपादक
‘चिन्ह आर्ट न्यूज’
Related
Please login to join discussion