No products in the cart.
चित्र – विचार
सर्वसामान्य माणसाला चित्रकलेबद्दल आवड असते, कुतूहलसुद्धा असते. त्यामधून त्याला अनेक प्रश्न पडत असतात. त्यात चित्र म्हणजे काय? इथपासून थेट चित्रकलेचे मानवी जीवनातील प्रयोजन काय? इथपर्यंत अनेक प्रश्न त्यात असतात. पुणे येथील ज्येष्ठ चित्रकार शरद तरडे चित्र आणि चित्रकलेविषयी सतत विचार करत असतात आणि ते सोप्या भाषेत मांडत असतात. या लेखामध्ये त्यांचे काही विचार संकलित स्वरूपात दिले आहेत. त्यामधून अशाच काही प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील आणि चित्रकलेविषयी विचार कसा करायला हवा तेही लक्षात येईल.
———
“कला – यात्री!”
चित्रकलेची आवड असणे आणि चित्र काढताना त्याचा आनंद घेणे हे खऱ्या चित्रकाराचे लक्षण आहे.
चित्र कुठलेही, कसेही असले तरी ते काढतानाचा आनंद घेणारे खूप कला-यात्री आहेत.
त्यांना नव-चित्रकार किंवा हॉबी आर्टिस्ट म्हणणे बरोबर नाही. खरे तर प्रत्येक मोठा कलाकार प्रथम नव-चित्रकार किंवा हॉबी आर्टिस्ट असतातच!
ते स्वतःसाठी चित्र काढतात. तेच स्वतंत्र कलाकार असतात कारण त्यांना ते विकण्याची काळजी नसते किंवा ना ही कोणाला आवडण्याची!
यामध्ये डॉक्टर, आर्किटेक्ट, इंजिनिअर अश्या व्यवसायातील अनेक व्यक्ती, विद्यार्थी, गृहिणी यांचा समावेश आहेच शिवाय अनेक व्याधी, आजारी असलेल्या व्यक्तीही कलेचा वापर आनंद आणि मनःशांतीसाठी करतात.
ते सर्व व्यवसाय, नोकरी सांभाळून चित्रकलेची आवड जोपासत आहेत हे खूप महत्त्वाचे आहे.
अशा कला-यात्रींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ही चित्रकलेसाठी चांगली गोष्ट आहे कारण त्याने एक कुटुंब चित्राशी प्रेमाने जोडले जाते.
ते चित्र चांगले आहे का वाईट हे सर्व व्यक्तीगत आहे!
“चित्र “चित्र” म्हणून बघितले जावे हेच खरे!”
सर्व कलायात्रींना शुभेच्छा!
***
“अनावश्यक”
आपल्या मनात अनेक गोष्टी घर करून बसतात आणि त्यात अनावश्यक गोष्टींचा भरणा तर जास्तच असतो. चित्रकाराच्या, कलाकारांच्या मनात अशा गोष्टी तुडुंब भरलेल्या असतात. अशा गोष्टींनीच अस्वस्थता वाढत असते. ती पराकोटीला पोहोचली की मगच चित्राद्वारे, कलेद्वारे त्याचा निचरा होत असतो. अशा अनावश्यक गोष्टी बाहेर काढून टाकल्यावर नव्या गोष्टींना जागा मिळू शकते हे लक्षात घेतल्यावर चित्र काढण्याचे महत्त्व आणखीनच वाढते.
एखादे “अनावश्यक” चित्र पाहणे म्हणजे त्याबद्दल काही न वाटणे, त्यातून काहीही न समजणे, लक्षात न येणे असा होत असेल तर ते चित्र रसिकांसाठी आणि चित्रकारांसाठी एक प्रकारचे “मेडिटेशन” आहे असे वाटते.
असे चित्र झाले की ते “पलीकडचे चित्र झाले” असे पाथरे सर (चित्रकार अरुण पाथरे) नेहमी म्हणायचे आणि असे क्षण चित्रकाराने आणि प्रत्येकाने एकाच वेळी अनुभवणे ही तर मला खूप दुर्मिळ गोष्ट वाटते.
एखाद्या गोष्टीमध्ये वाहून जाणे, त्याच्या पलीकडचा तीर शोधणे हे चित्र काढताना होत असेल तर तो चित्रकार त्या गोष्टीतून मुक्त होत असतो आणि त्याचा “स्तब्ध” अनुभव रसिकाला आला तर तोच “चित्र” झाला असे म्हटले पाहिजे.
असे चित्र कधी होईल, कसे होईल असे कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे आवश्यक का अनावश्यक हेही माहीत नाही.
मी तरी प्रत्येकवेळी नव्याने ही प्रक्रिया समजून घ्यायचा प्रयत्न करीत असतो आणि त्यामुळेच त्यात नेहमी नावीन्य येणार हे मला माहीत असतं.
हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे परवाच माझ्या एका चित्राला एक रसिकाने “अनावश्यक चित्र” अशी प्रतिक्रिया दिली म्हणून हे सर्व सुचले ते मांडले!
***
“प्रेमाची साठवण!”
असाही कलेवर प्रेम करणारा रसिक!
एखादे चित्र जर आपल्याला आवडले असेल तर आपण ते घेण्यासाठी काय काय करू शकतो याचे हे उदाहरण बघून मी तर त्या रसिकाच्या प्रेमात पडलो!
झाले असे की माझ्या एका प्रदर्शनातले एक चित्र त्यांना मनापासून आवडले आणि ते वारंवार चित्र बघत होते.
काही दिवसांनी त्या रसिकाने मला फोन केला आणि ते चित्र मला कुठल्याही परिस्थितीत विकत घ्यायचे आहे आणि पैसे देण्यासाठी मी बँकेमध्ये रिकरींग अकाउंट उघडले आहे, तेव्हा ते चित्र माझ्यासाठी जमल्यास बाजूला ठेवावे. ज्यावेळेला माझ्याकडे पैसे पूर्ण जमा होतील त्यावेळेस पैसे देऊन चित्र घेऊन जाईन!
या त्याच्या “कला” प्रेमाने माझे डोळे ओलावले!
असा रसिक भेटणे हे चित्रकाराच्या दृष्टीने किती महत्त्वाचे असते हे सांगायची गरज नाही.
रसिक मायबापा तुला सलाम!
— शरद तरडे
Related
Please login to join discussion