No products in the cart.
चित्रकला आणि मध्यमवर्ग! (भाग ३)
या लेखाद्वारे चिन्ह आर्ट न्यूजचे संपादक सतीश नाईक यांनी मध्यमवर्गीयांच्या कलात्मक अभिरुचीचा विशेष संदर्भ घेऊन महाराष्ट्र आणि भारतातील बदलत्या कला परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ही माहितीपूर्ण लेखमालिका गेल्या अनेक दशकांपासून आजपर्यंतच्या कलाविश्वाच्या विविध परिवर्तनीय टप्प्यांची झलक दाखवते. लेखाच्या या तिसऱ्या भागात गेल्या काही दशकांमध्ये महाराष्ट्रातील कला संचालनालय आणि पर्यायाने कलाशिक्षणाचं जे अवमूल्यन झालं आहे, त्याचा आढावा घेतला आहे.
प्रा बाबुराव सडवेलकर यांच्यासारख्या विद्वान कलावंताची निवड महाराष्ट्राच्या कला संचालकपदी झाल्यावर कलाशिक्षणात खूप मोठा बदल होईल, कलाशिक्षणात लेखन, वाचन, कला रसास्वाद यासारख्या महत्वाच्या गोष्टींचा समावेश होईल अशी अपेक्षा होती. पण कला संचालनालयामधल्या राजकारणात सडवेलकर सर इतके गुरफटले गेले की त्यांना काही एक करायला अवसरच मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे. हा सर्वच प्रकार गलिच्छ आणि लांछनास्पद होता. याचा फायदा घेऊन अनेक समाजविघातक शक्ती कार्यरत झाल्या आणि कलाशिक्षणात प्रवेशल्या. परिणामी जे जे स्कूल ऑफ आर्टची कलासंस्कृती संपूर्ण रसातळाला गेली. ज्या गोष्टींची आठवण करायलादेखील आज लाज किंवा शरम वाटते अशा असंख्य गोष्टी त्या काळात घडल्या.
याचाच गैरफायदा उच्च व तंत्रशिक्षण खात्यातील मंत्र्यांपासून ते शिपायांपर्यंत प्रत्येकाने घेतला. (या संदर्भात प्रस्तुत लेखकानं त्या त्या वेळी मुंबईच्या बहुसंख्य वृत्तपत्रात पुराव्यानिशी लेखन केलं होतं. इतकंच नाही तर या संदर्भात ‘चिन्ह‘या कला वार्षिकाचा २००८ सालचा ३५० पानी ‘कालाबाजार‘ विशेष अंक देखील प्रसिद्ध केला होता. ज्यात सर्वांचा नावानिशीवार समाचार घेतला होता. हा अंक ‘चिन्ह‘च्या www.chinha.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.) आणि महाराष्ट्रातलं कलाशिक्षण अक्षरशः नामशेष केलं.
सडवेलकर यांच्या नंतरच्या काळात महाराष्ट्र सरकारनं कला संचालक म्हणून असे अधिकारी नेमले की ज्यांना भारतातल्या चार चित्रकारांची साधी नावं विचारली असती तरी त्यांना त्याचं उत्तर देता आलं नसतं. मी अतिशयोक्ती करतोय की काय असं वाटेल, पण जी वस्तुस्थिती होती तीच मी मांडतो आहे. राजकारण्यांचा भ्रष्टाचार, त्यांच्या खाजगी सचिवांचा आणि उच्च व तंत्रशिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार त्याला मिळालेली जातीय राजकारणाची साथ यामुळेच गेली दोन अडीच दशकं महाराष्ट्र शासनाला कला संचालक पदासारखं महत्वाचं पद देखील भरता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. या साऱ्यातून जे जे स्कूल ऑफ आर्टला बाहेर काढण्यासाठी माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि अन्य सचिवांनी केंद्र सरकारच्या साहाय्यानं जे यशस्वी प्रयत्न केले त्यामुळेच नुकताच जेजेच्या तीन महाविद्यालयांना डिनोव्हो दर्जा प्राप्त झाला. आता काही तरी निश्चितपणे चांगलं काहीतरी घडेल अशी आशा कलाक्षेत्रातील विचार करणाऱ्या कलावंतांना वाटते आहे. ज्यांना ‘विचार म्हणजे काय‘ असा मूलभूत प्रश्न पडतो ते मात्र या डिनोव्होला विरोध करताना दिसत आहेत.
१९७५ साली नवा अभ्यासक्रम म्हणून जो अभ्यासक्रम लागू केला गेला तोच अभ्यासक्रम आज २०२३ सालापर्यंत जसाच्या तसा चालू आहे. त्यात गुणात्मक बदल काहीच केला गेला नाही. केला गेला तो केवळ ऱ्हास. नांगरेंच्या काळात सुलभ शौचालयांप्रमाणे जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी जी विनाअनुदानित कला महाविद्यालये सुरु केली गेली त्या कला महाविद्यालयांच्या संचालक आणि शिक्षकांच्या मागण्यांनुसार अनेक विषय काढले गेले. आणि बाहाऊसमधून स्फूर्ती घेतलेल्या मूळ अभ्यासक्रमांचं अक्षरशः वाटोळं केलं गेलं. या नीच मनोवृत्तीच्या लोकांनी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षांना देखील नखं लावायला कमी केलं नाही. नेचर सारखा महत्वाचा विषय चित्रकलेतून काढून टाकून चित्रकला या विषयाची अक्षरशः गळचेपी केली. पाचवी सातवीतल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून पैसे घेऊन कला संचालनालयातल्या अधिकाऱ्यांनी चित्रकलेच्या A आणि B ग्रेड देखील धंद्याला लावायला मागे पुढं पाहिलं नाही. याचा परिणाम असा झाला की चित्रकला हा विषय प्राथमिक माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयातून उखडून टाकला गेला.
वास्तविक पाहता प्रत्येक आई आपल्या मुलाला तो चार पाच वर्षाचा झाला की पाटी पेन्सिल किंवा रंगीत खडू हातात देते आणि चित्र काढावयास सांगते. गोल म्हणजे चंद्र किंवा सूर्य, त्याच्या पुढे चौकोन काढला की ते घर, चौकानावर त्रिकोण ठेवला की ते घराचं छप्पर, असा त्या मुलाचा किंवा मुलीचा चित्रकलेतूनच शिक्षणाकडचा प्रवास सुरु होतो. पण तीच आई मुलगा पाचवीत गेल्यावर चित्र काढणाऱ्या मुलाच्या किंवा मुलीच्या पाठीत धपाटे घालते. आणि म्हणते ‘चित्रं कसली काढताय अभ्यास करा‘ इथंच मुलांचा चित्रकले सोबतचा संबंध तुटतो. आणि जसं जसा तो मोठा होतो तसं तसा तुटतच जातो. ज्या घरात चित्रकलेचे चांगले संस्कार होत असतात तीच मुलं चित्रकलेत करियर करण्यासाठी पुढं येतात. बाकीची सारी मुलं चित्रकलेपासून कोसो दूर निघून जातात. ‘तुमच्या चित्रकलेतलं आम्हाला फारसं कळत नाही.‘ असं म्हणणारी हीच मुलं पुढं वेगवेगळ्या विषयांमध्ये पारंगत होऊन समाजात आपलं स्थान पटकावतात.
जागतिकीकरण आपल्याकडं आलं आणि त्यानंतरच म्हणजे नव्वदच्या दशकात आपल्याकडं संगणक आलं. हा हा म्हणता तो संगणक आपण आपलासा करुन टाकला. त्यात ‘तुमच्या चित्रकलेतलं आम्हाला काही कळत नाही म्हणणारा वर्ग देखील होताच.‘ संगणक काही आकाशातून पडले नव्हते. पण त्याचं महत्व लक्षात येताच साऱ्यांनीच त्याचा अभ्यास केला आणि तो आपलासा केला. अगदी संगणकाचा वापर करुन देखील लोकं चित्र काढू लागले. ‘तुमच्या चित्रकलेतलं आम्हाला काही कळत नाही‘ ही भाषा इथं कुणीही केली नाही. खरं तर चित्रकलेची भाषा ही संगणकाच्या भाषेपेक्षा खूप सोपी होती. अगदी बालपणापासून जवळची होती. पण चित्रकला मात्र आम्ही जीवनातून त्याज्य केली ती केलीच.
परिणामी आपण चित्रकलेसारख्या विषयापासून खूप दुरावले गेलो. खूप लांब फेकले गेलो. महाराष्ट्रात राजा रवी वर्मा, रघुवीर मुळगांवकर, दीनानाथ दलाल यांनी चित्रकला मध्यमवर्गीयांच्या घराघरात नेऊन ठेवली. असं एक घर नसायचं जिथं वर उल्लेखलेल्या चित्रकारांच्या तसबिरी लावल्या गेल्या नसतील. गावोगावच्या देवळातून त्या तसबिरींचे अवशेष आजही आपणास पाहावयास मिळतात. पण शिक्षणक्षेत्रात जे बदल झाले ते आपल्याला अतिशय घातक ठरले. मधुकरराव चौधरी यांच्या सारख्या शिक्षणात रुची असलेल्या, कलेत रुची असलेल्या सुसंस्कृत व्यक्तींच्या नेमणुका महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री पदावर होईनाशा झाल्या आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा डोलारा कोसळावयास सुरुवात झाली. गेल्या सुमारे तीन दशकभर ज्या राजकारण्यांच्या शिक्षणमंत्रीपदी नेमणूका झाल्या त्या नुसत्या पाहिल्या तरी या विधानाची प्रचिती येऊ शकेल.
मधुकरराव चौधरींच्या कर्तृत्वाविषयी अनेक ग्रंथांमधून, अनेक पुस्तकांमधून वाचावयास मिळते. खान्देशात त्यांनी उभारलेलं सप्तपुट ललित कला महाविद्यालय हे चित्रकलेचं उच्च शिक्षण देणारं कला महाविद्यालय ज्या पद्धतीनं चालवलं गेलं त्यावरूनही आपणांस त्याची प्रचिती येते. पण आज काय अवस्था आहे त्या कला महाविद्यालयाची? हेच कारण आहे दृश्यकलेपासून महाराष्ट्र दूर फेकला गेल्याचं. याचा शेवट काय? कुणास ठाऊक? पण राज्यकर्त्यांच्या वर्तनात बदल झाला नाही तर कलांचा शोध घ्यायला वस्तुसंग्रहालयातच जावे लागेल हे निश्चित.
(क्रमश:)
सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज‘
पूर्वप्रसिद्धी: ‘समतावादी मुक्त-संवाद पत्रिका’, ऑगस्ट २०२३
संपादकांच्या पूर्वपरवानगीने ‘चिन्ह आर्ट न्यूज’मध्ये पुन:प्रकाशित
*****
चिन्ह तर्फे आयोजित कलाशिक्षण महाचर्चा पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
कलाशिक्षण महाचर्चा | Panel Discussion About Art Education
Related
Please login to join discussion