No products in the cart.
चित्रकला आणि मध्यमवर्ग! (भाग ५)
या लेखाद्वारे चिन्ह आर्ट न्यूजचे संपादक सतीश नाईक यांनी मध्यमवर्गीयांच्या कलात्मक अभिरुचीचा विशेष संदर्भ घेऊन महाराष्ट्र आणि भारतातील बदलत्या कला परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ही माहितीपूर्ण लेखमालिका गेल्या अनेक दशकांपासून आजपर्यंतच्या कलाविश्वाच्या विविध परिवर्तनीय टप्प्यांची झलक दाखवते. लेखाच्या या पाचव्या भागात कोल्हापूरमधील कला संस्कृती आणि महाराष्ट्राचे दोन महान चित्रकार गायतोंडे आणि बरवे यांविषयी सांगितले आहे.
कलासंचालक झाल्यावर एकदा बाबुराव कोल्हापुरात काही कामानिमित्तानं गेले होते. बहुदा राज्य कलाप्रदर्शनाच्या वेळी. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता आणि आपले केस वाढलेले आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. एका छोट्याशा सलूनमध्ये ते केस कापायला गेले. पाहतो तर काय तिथल्या भिंतीवर एक लँडस्केप लावलेलं. बाबुराव यांच्या लक्षात आलं की हे आपणच कधीतरी केलेलं काम आहे. बाबुराव यांनी त्या सलूनच्या मालकाशी गप्पा मारायला सुरुवात केली. बोलताबोलता बाबुरावांनी विषय चित्रकलेकडे नेला. तर तो सलूनचा मालक केस कापताकापता बाबुरावांना कोल्हापूरचा चित्रमहिमा सांगू लागला. बाबुराव तसे मूळचे कोल्हापुरातच राहिलेले त्यामुळे त्यांना त्या बोलण्याचं काही आश्चर्य वाटलं नाही. मग बाबुरावांनी हळूच त्याला विचारलं ‘तुझ्या सलूनमध्ये लावलेलं हे लँडस्केप कुणाचं आहे?’ तर त्यानं उत्तर दिलं बाबुराव सडवेलकर नावाचे कोल्हापूरचे एक मोठे चित्रकार आहेत, ते आता मुंबईला असतात. त्यांचं आहे. सलूनच्या मालकाचं हे उत्तर ऐकून बाबुराव खुश झाले. त्यांनी आपली ओळख दिली. त्यावर त्या सलून मालकाला अतिशय आनंद झाला. त्यानं बाबुरावांना आग्रहानं चहा तर पाजलाच. पण बाबुरावांकडून केस कापल्याचे पैसे मात्र अजिबात घेतले नाहीत.
बाबुरावांनी अतिशय रंगवून हा किस्सा मला सांगितला होता. कोल्हापूरची तीच कला परंपरा आजदेखील तिथं जिवंत आहे. चित्रकार, शिल्पकाराला आजदेखील तिथं तोच मान आहे. सर्वसाधारण माणसांच्या घरात आजदेखील तुम्हाला मूळ चित्रं पाहावयास मिळू शकतात. हे दृश्य इतरत्र मात्र दुर्मिळ आहे. कोकणातून खूप चित्रकार झाले. पण अठराविश्वे दारिद्रयामुळे ते सारेच मुंबईला आले. मुंबईतच त्यांनी मोठं नाव कमावलं. पण कोकणातला त्यांचा गाव मात्र तसाच दरिद्री राहिला. जे कोकणात घडले तेच गोव्यातदेखील घडले. तिथल्या चित्रकारांनीदेखील मुंबईतच नाव कमावलं. आजमितीला कोल्हापूर वगळता महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरात कलेचं वातावरण राहिलेलं नाही असं माझं निरीक्षण आहे.
कोरोनानंतर कदाचित परिस्थिती बदलली असेल. मी तिथं जाऊ न शकल्यामुळे मला फारसं ठाऊक नाही. पण कोल्हापुरात गेल्या दोनपाच वर्षात जे काही महाप्रचंड पूर आले. त्या पुरात ज्या चित्रकारांच्या स्टुडिओत किंवा घरात अगदी थेट छतापर्यंत पाणी शिरलं होतं त्यांचं आक्रन्दन किंवा आक्रोश अथवा त्यांचं कलाप्रेम मी व्हिडीओजद्वारा किंवा मोबाईलवरून संपर्क साधताना मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. तिथं असलेली कोपऱ्याकोपऱ्यावरची शिल्पं, बाबुराव पेंटर यांच्यासारख्या कलावंताचं स्मारक किंवा आजही तसाच जीवापाड जपलेला त्यांचा स्टुडिओ. झालंच तर ‘चिन्ह’च्या पन्नास-साठ रुपयांच्या एका अंकासाठी दर दिवाळीत कोल्हापूरहून एसटीनं फक्त अंक न्यायला पहाटे घरी येणारे आणि माझ्या घरून जहांगीरला प्रदर्शन बघायला जाऊन नंतर थेट कोल्हापूर गाठणारे कलारसिक हे फक्त कोल्हापुरातलेच असू शकतात हे मी स्वानुभवाने सांगेन.
हा कलाप्रसार सांगली, सातारापर्यंत पोहोचला पण दुर्दैवानं त्यापुढं तो जाऊ शकला नाही. हे मराठी समाजाचं दुर्दैव. अन्यथा आज लंडन पॅरिसप्रमाणे मुंबईतदेखील तसंच चित्र दिसू शकलं असतं. पण महाराष्ट्राच्या नशिबी आला तो ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट बंद झालं तर कुणाचं काय बिघडणार आहे?’ असं म्हणणारा आचरट आणि बेअक्कल शिक्षणमंत्री. थोडाथोडका नाही तर असा इसम महाराष्ट्राला तब्बल दोन टर्म लाभला. परिणामी महाराष्ट्रातून चांगले चित्रकार निर्माण होण्याची प्रक्रियाच थांबली. त्यामुळेच कला लेखक, कला समीक्षक, कलारसिक या साऱ्यांचीच महाराष्ट्रातली उपज थांबली नसती तर ते नवलच ठरलं असतं. या साऱ्याच्या परिणामी सर्वसामान्य माणूस चित्रकला या विषयापासून दूर गेला तो गेलाच.
पण असं असतानादेखील गायतोंडे आणि बरवे ही भारतीय चित्रकलेत सर्वोच्चपदं मिळवलेली नावं ही केवळ मराठीच नव्हे तर अस्सल मध्यमवर्गीय मराठी समाजातूनच / संस्कृतीतूनच वर आलेली होती. हे विसरता येणार नाही. १९९५ साली चित्रकार प्रभाकर बरवे यांचं निधन झालं तेव्हा इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला प्रतिक्रिया देताना प्रख्यात चित्रकार हुसैन यांनी उभयतांचा ‘भारतातले खरेखुरे दोनच जिनियस चित्रकार’ असा उल्लेख केला होता. पण मराठी समाजाला त्यांचं मोठेपण कधीच समजलं नाही. किंबहुना मराठी समाजाला ही दोन नावं ठाऊकदेखील नव्हती.
२००० सालानंतर लिलावातील किंमतींमुळे लोकांना आधी गायतोंडे समजले (‘चिन्ह’च्या ‘गायतोंडे’ विशेष अंकामुळे आणि नंतर ‘गायतोंडे’ ग्रंथामुळे गायतोंडे यांचे कर्तृत्व महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवण्यात आम्ही मर्यादित अर्थानं का होईना आम्ही यशस्वी ठरलो. पण बारा कोटीच्या महाराष्ट्रात दोन तीन हजारांची आवृत्ती देखील गेल्या आठ वर्षात संपू नये. यावरून मराठी संस्कृतीची चित्रकलेच्या क्षेत्रात किती लाजिरवाणी अवस्था आहे याचं दर्शन घडावं.) आणि नंतर बरवे. (बरवे यांच्या बाबतीतही तेच त्यांचं ‘कोरा कॅनव्हास’ हे पुस्तक १९९० साली प्रसिद्ध झालं. पण हजार बाराशेची आवृत्ती संपायला तब्बल वीस वर्ष उलटावी लागली. ही वस्तुस्थिती आहे.) तोपर्यंत मराठी समाजाची कला जाणीव राजा रवी वर्मा, दीनानाथ दलाल आणि रघुवीर मुळगावकर यांच्या नावापुरतीच मर्यादित राहिली होती ही वस्तुस्थिती आहे.
(क्रमश:)
सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
पूर्वप्रसिद्धी: ‘समतावादी मुक्त-संवाद पत्रिका’, सप्टेंबर २०२३
संपादकांच्या पूर्वपरवानगीने ‘चिन्ह आर्ट न्यूज’मध्ये पुन:प्रकाशित
चिन्ह तर्फे आयोजित कलाशिक्षण महाचर्चा पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
कलाशिक्षण महाचर्चा | Panel Discussion About Art Education
Related
Please login to join discussion