Features

चित्रकला आणि मध्यमवर्ग! (भाग ७)

या लेखाद्वारे चिन्ह आर्ट न्यूजचे संपादक सतीश नाईक यांनी मध्यमवर्गीयांच्या कलात्मक अभिरुचीचा विशेष संदर्भ घेऊन महाराष्ट्र आणि भारतातील बदलत्या कला परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ही माहितीपूर्ण लेखमालिका गेल्या अनेक दशकांपासून आजपर्यंतच्या कलाविश्वाच्या विविध परिवर्तनीय टप्प्यांची झलक दाखवते. लेखाच्या या सातव्या व अंतिम भागात लेखकाने कला संस्कृतीसंबंधी काही निरीक्षणे मांडून महाराष्ट्रातील कलाशिक्षणाच्या भविष्याबद्दल भाष्य केले आहे.

पण यातलं सर्वात गंमतीदार निरीक्षण लेखाच्या शेवटी मी मांडू इच्छितो. ते म्हणजे आपण मध्यमवर्गासंदर्भात कुणी कितीही नाकं मुरडली तरी जे दिग्गज चित्रकार म्हणून प्रख्यात झाले, नावारूपाला आले इतकंच नाही तर आज जागतिक कीर्तीदेखील मिळवून राहिले आहेत, ते सारेच मध्यमवर्गीय घरातूनच जन्माला आले आहेत, हे आपल्याला विसरता येणार नाही. अकारविल्हे यादी करायची झाल्यास अंबादास, अहिवासी, अल्ताफ, आचरेकर, आठवले, आबालाल रहिमान, आरा, अलमेलकर, कदम, करमरकर, कुलकर्णी, गाडे, गायतोंडे, गुर्जर, गोंधळेकर, गोडसे, राशी गोसावी, चिमूलकर, चुडेकर, जांभळीकर, जोशी, तालीम, तासकर, दळवी, देऊस्कर, धुरंधर, धोंड, धोपेश्वरकर, नगरकर, नागेशकर, पंडित, परांडेकर, पळशीकर, पानसरे, पुरम, फडके, बडिगेर, बद्रीनारायण, बाकरे, बी प्रभा, बी विठ्ठल, बेंद्रे, मसोजी, माळी, रवींद्र मेस्त्री, मेहता, मात्रे, रझा, रायबा, लाजमी, वाघ, वानखेडे, सडवेलकर, साठे, सातवळेकर, सुझा, सुतार, सोनवडेकर, सोलेगावकर, हरकिशनलाल, हळदणकर, हुसैन, हेब्बर यांच्यापासून ते बरवे, गर्गे, श्रेष्ठा, पटवर्धन, कोलते यांच्यापर्यंतचे भारतीय कलाविश्व समृद्ध करणारे सारेच चित्रकार हे मध्यमवर्गातूनच काही तर निन्म मध्यमवर्गातूनदेखील खूप मोठा संघर्ष करून भारतीय चित्रकलेत नाव कमावून राहिले आहेत हे विसरता येणार नाही. आज त्यांच्याच कर्तृत्वावर मोठमोठाले लिलाव अगदी जागतिक पातळीवरदेखील पार पडत आहेत हे आपल्याला विसरता येणार नाही.

श्रीमंत वर्गातून किंवा उच्च मध्यमवर्गातून फारसे चित्रकार निर्माण झाले नाहीत त्याची सामाजिक करणे काही असोत ती या लेखाच्या व्याप्तीत येत नाहीत म्हणून त्याविषयी मी कोणतंही विधान करून इच्छित नाही पण या वर्गानं मध्यमवर्गातून आलेल्या भारतीय चित्रकारांची चित्रकला जपली, जोपासली, वाढवली ही वस्तुस्थिती आहे. ती कुणालाही नाकारता येणार नाही. तिथं सरकारनं हस्तक्षेप करून काहीतरी करावयास हवं होतं. राज्यकर्त्यांनी मोठी दूरदृष्टी दाखवून ललित कला अकादमी, कला संचालनालय यासारखे विभाग निर्माण केले. पण मला सांगायला अतिशय खेद वाटतो की नंतरच्या राज्यकर्त्यांनी, भ्रष्ट नोकरशाहांनी आणि कलाक्षेत्रातल्या गुंड प्रवृत्तीच्या कलावंतांनी संगनमतानं या साऱ्या अभिनव संकल्पनांचं मातेरं पाहणं आपल्या नशिबी आलं.

आपल्या कलाप्रसाराच्या कार्याला पन्नासच्या दशकात ललित कला अकादमीनं चांगली सुरुवात केली. कलावंतांवरच्या पुस्तिका, हिंदी – इंग्रजी कलाविषयक नियतकालिक, पुस्तकं, मोनोग्राम्स, नामवंत चित्रकारांच्या चित्रांच्या प्रिंट्स इत्यादी माध्यमातून त्यांनी हळूहळू कलाप्रसार करावयास सुरुवात केली. पण पुढं सरकारी संस्थांच्या नशिबात जे लिहिलेलं असतं तेच तिथंही घडलं. भ्रष्ट अधिकाऱ्यांनी तिथंही अनाचार घडवला. त्याचा फायदा घेऊन गुंड प्रवृत्तीच्या चित्रकारांनी अकादमीतच आपलं बस्तान बसवलं आणि अकादमीचा मूळ हेतू – उद्देश यांना अक्षरशः काळं फासलं. अकादमीनं राजा रवी वर्मा यांच्या चित्रांप्रमाणे नामवंत चित्रकारांच्या चित्रांच्या प्रिंट्स जरी भारतभरात घरोघरी पोहोचवल्या असत्या तरी कला अकादमीला कलाप्रसाराचं पुण्य लाभलं असतं. पण सध्या भारतात राजकारण्यांनी आपल्या वागणुकीनं जो काही उत्पात घडवला आहे त्याहीपेक्षा भयानक कृत्य अकादमीच्या नोकरदारांनी आणि भारतभरातून निवडून गेलेल्या चित्रकार प्रतिनिधींनी केली. आणि मूळ कलाप्रसाराच्या मूळ संकल्पेनेचं अक्षरशः मातेरं मातेरं केलं.

त्याचीच आवृत्ती महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालयात झाली. कलेचा आणि कलाशिक्षणाचा प्रसार करण्यासाठी स्थापन झालेला हा भारतातला पहिला आणि एकमेव विभाग भ्रष्ट राज्यकर्ते आणि गुंड अधिकारी यांच्या झालेल्या संगनमतामुळं मरणोन्मुख अवस्थेला पोहोचला आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्यांची भविष्यात काहीतरी चांगलं घडू शकेल असं वाटण्याची आशाशक्तीदेखील नष्ट झाली आहे.

सुदैवानं महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनानं वेळीच दखल घेऊन जे जे स्कूल ऑफ आर्टला डिनोव्हो दर्जा दिल्यामुळं १६६ वर्षांचं जे जे स्कूल ऑफ आर्ट आता निश्चितपणे वाचेल अशी आशा निर्माण झाली आहे. याच संस्थेतून भारतीय चित्रकलेला नामवंत चित्रकार मिळाले. त्यामुळे ही संस्था पुढंही आपलं कार्य जोमानं चालवू शकेल पण ललित कला अकादमी किंवा महाराष्ट्र राज्य कला संचालनालय यांच्या ऱ्हासामुळं कलाप्रसाराचं कार्य मात्र कितपत पुन्हा उभं राहू शकेल याविषयी माझ्या मनात असंख्य शंकाच शंका आहेत. चांगले, सुसंस्कृत, सुशिक्षित, सज्जन राज्यकर्ते लाभले आणि त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण, कलाशिक्षण आणि कलाप्रसार याकडे विशेष लक्ष पुरवलं तरच काहीतरी अपेक्षा करता येईल अन्यथा ‘कला आणि मध्यमवर्ग’ यासारखे लेख वारंवार लिहिण्याची वेळ माझ्यासारख्या पुढच्या असंख्य पिढीतल्या कलावंतांवर ओढवेल यात तीळमात्र शंका नाही.

(समाप्त)

सतीश नाईक

संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’

पूर्वप्रसिद्धी: ‘समतावादी मुक्त-संवाद पत्रिका’, सप्टेंबर २०२३

संपादकांच्या पूर्वपरवानगीने ‘चिन्ह आर्ट न्यूज’मध्ये पुन:प्रकाशित

चिन्ह तर्फे आयोजित कलाशिक्षण महाचर्चा पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

कलाशिक्षण महाचर्चा | Panel Discussion About Art Education

https://www.youtube.com/watch?v=wn16ME4hHtc

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.