No products in the cart.
चित्रकला आणि मध्यमवर्ग! (भाग ६)
या लेखाद्वारे चिन्ह आर्ट न्यूजचे संपादक सतीश नाईक यांनी मध्यमवर्गीयांच्या कलात्मक अभिरुचीचा विशेष संदर्भ घेऊन महाराष्ट्र आणि भारतातील बदलत्या कला परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ही माहितीपूर्ण लेखमालिका गेल्या अनेक दशकांपासून आजपर्यंतच्या कलाविश्वाच्या विविध परिवर्तनीय टप्प्यांची झलक दाखवते. लेखाच्या या सहाव्या भागात महाराष्ट्रातील कला शिक्षणविषयी तसेच महाराष्ट्रातील चित्र-संस्कृतीवर प्रभाव असलेल्या चित्रकारांविषयी उहापोह केला आहे.
आपल्या महाराष्ट्राच्या शैक्षणिक धोरणातील याच उणिवेचं प्रतिबिंब संपूर्ण शिक्षण प्रणालीवर पडलं. आणि कलेच्या जाणिवा बोथटल्या. त्यामुळेच महाराष्ट्रात आज एकेका संकुलातदेखील हजारोंच्यावर प्रमाणावर फ्लॅट्स तयार होत आहेत, बंगले तयार होत आहेत, पंचतारांकित कार्यालयं तयार होत आहेत, पण हे सजवण्यासाठी लागणाऱ्या सौन्दर्याच्या जाणिवेचाच अभाव असल्यामुळं तिसऱ्या किंवा चौथ्या दर्जाची पोस्टर्स लावून घराची सजावट करण्यातच धन्यता मानली जाते आहे ही वस्तुस्थिती आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसारख्या महानगरात हजारो टॉवर्स उभे राहिले. लाखो फ्लॅट्समधून नवश्रीमंत राहू लागले. पण याचा चित्रकलेवर किंवा कलावंतांवर काही परिणाम झाला असेल का? तर नाही! या प्रश्नाचं उत्तर संपूर्णपणे नकारार्थी आहे. या राक्षसी वाढीचा कुठलाच चांगला परिणाम चित्रकारांना अद्यापही अनुभवता आलेला नाही. याचं मूळ कारण हे आपल्या शिक्षण प्रणालीतच दडलेलं आहे.
परदेशात लहान मुलांना शाळेत असल्यापासूनच चित्र बघण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. अवकाश, आकार, रंग, पोत या साऱ्याची बालवयातच जाणीव करून दिली जाते. शिस्त हा तिथला अविभाज्य घटक. त्यामुळे रांगेत उभं राहून लहान मुलंदेखील शांतपणे कलेचा आस्वाद घेत जातात. आपल्याकडे मात्र गॅलरीतली किंवा म्युझियममधली शांतता ही भंग करण्यासाठीच असते असा समज करून दिला / घेतला जातो. त्यांना आवरावं शांतपणे पाहावं, अनुभवावं असं कधीही शिक्षकांना सांगावंसं वाटत नाही. हाच आपल्या आणि परदेशातल्या शिक्षण प्रणालीतला मूलभूत फरक आहे. त्यात जोपर्यंत बदल होणार नाही तोपर्यंत आपण हे असेच वर्षानुवर्षे कला विषयात मागासलेलेच राहणार.
सुदैवानं नव्यानं शिक्षण लागू होणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात चित्रकलेला खूपच मानाचं स्थान दिलं गेलेलं आहे. आता जे पाचवीतच चित्रकला शिक्षण बंद होतं ते तसं न होता शिक्षण संपण्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत ते विद्यार्थ्याला साथ देत राहणार आहे ही माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट आहे. पण हे नवीन धोरण कधीपासून लागू होणार? कसं होणार? सरकार बदललं तर काय होणार? या प्रश्नांची उत्तरं अद्यापही अनुत्तरित आहेत.
****
या संपूर्ण लेखनाचा सूर काहीसा नकारात्मक आहे मी पूर्णतः मान्य करतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी मी माझ्यापरीनं यथाशक्ती प्रयत्न केले. तेही थोडेथोडके नाही तर तब्बल चाळीस-बेचाळीस वर्ष. यंदाचं हे त्रेचाळिसावं वर्ष. मेनस्ट्रीम पत्रकारितेत शिरण्याची संधी जेजेमध्ये शिकत असतानाच मला मिळाली. तिचा उपयोग मी कलाविषयक व्यासंग करण्यासाठी तर केलाच पण हळूहळू मी कलाविषयक लेखनाकडे वळलो. सर्वसामान्य वाचकांना नाटक, चित्रपट, साहित्य, संगीत या विषयांसंदर्भात जशी सतत माहिती मिळत राहते तशीच माहिती चित्रकला विषयांबाबतदेखील सर्वसामान्य वाचकांना मिळावी हा माझा प्रयत्न होता. तो यशस्वी झाला किंवा नाही याविषयी सांगायचं झालं तर तो एका प्रदीर्घ लेखाचा विषय होईल. कदाचित त्यास आत्मस्तुतीचादेखील दोष येईल. त्यामुळे तो मोह मी कटाक्षानं टाळतो आहे. पण मी ‘चिन्ह’च्या रूपानं नवनवीन प्रयोग करण्याचे, विषय मांडण्याचे सातत्यानं प्रयत्न केले. आजही ‘Chinha Art News’ च्या रूपानं चालूच आहेत. ज्यांना त्याविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे त्यांनी लेखाच्या अखेरीस दिलेल्या chinha.in च्या लिंकवर संपर्क साधावा.
***
माझ्या संपूर्ण लेखनाचा सूर हा नकारात्मक आहे असे मी वरील परिच्छेदात म्हटलं आहे खरं पण यातला सकारात्मक भाग लिहिल्याखेरीज हा लेख पूर्ण होणार नाही हे निश्चित. कोणे एके काळी महाराष्ट्रात राजा रवी वर्मा यांनी आपल्या धार्मिक चित्रांद्वारे कलाप्रसाराचं मोठं कार्य केलं. तेव्हा घरोघरी ती चित्रं लावली जात. ती लावण्यामागे धार्मिक भावनांचा भाग अधिक होता. कलेचा भाग कळतनकळत जोडला गेला होता. राजा रवी वर्मा यांच्यानंतर रघुवीर मुळगावकर आणि दीनानाथ दलाल यांनी महाराष्ट्रात कलाप्रसाराचं मोठं कार्य केलं. जागतिकीकरणानंतर मात्र या साऱ्याला एक प्रकारे ओहोटीच लागली. पण या साऱ्या पडझडीत राजा रवी वर्मा यांच्या पेंटिंग्जचे इतकंच नाही तर शिळाचित्रांचे (ओलिओग्राफ्स) भाव मात्र गगनाला भिडत गेले. राजा रवी वर्मा यांच्या पेंटिंग्जच्या भारतीय किंवा जागतिक लिलावांमधल्या किंमतीमध्ये सातत्यानं प्रचंड प्रमाणात वाढ होत गेली आहे. त्यांच्या प्रेसमध्ये तयार झालेल्या एकेक प्रिंट्स आजदेखील मोठ्या किंमतीला विकल्या जातात. भारतीय नव्हे तर पाश्चात्य कलारसिकांमध्येदेखील ते विकत घेण्यासाठी मोठी अहमहमिका लागलेली असते.
तसे मुळगावकर, दलाल यांच्याबाबतीत होऊ शकलं नाही ही वस्तुस्थिती आहे. याचं कारण हे दोघंही चित्रकार व्यावसायिक कामातच गुरफटले होते. दलाल यांनी काही प्रमाणात कॅनव्हास रंगवले नाही असं नाही पण राजा रवी वर्मा यांना जे सातत्य कॅनव्हास पेंटिंगमध्ये दाखवता आलं ते दलाल यांना दाखवता आलं नाही ही वस्तुस्थिती आहे. पण दलाल आणि मुळगावकरांनी मराठी समाजात कलाप्रसाराचं मोलाचं कार्य केलं असं निश्चित म्हणता येईल. दोघांनीही दिवाळी अंक प्रकाशित केले दलाल यांच्या ‘दीपावली’ तर मुळगावकर ‘रत्नदीप’ अंकानंदेखील कलाविश्वात मोठी जागृती आणली यात शंकाच नाही. या दोन्ही अंकात प्रसिद्ध झालेले नामवंत चित्रकारांचे लेख किंवा मुलाखती आजही अतिशय वाचनीय वाटतात. याचं कारण मुळगावकर आणि दलाल यांचं मोठं कलाप्रेम हेच म्हणायला हवं. प्रख्यात चित्रकार वासुदेव गायतोंडे यांचा नवकलेसंदर्भातला लेख जो १९६१ सालच्या ‘रत्नदीप’ दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला होता तो आजही आधुनिक चित्रकलेच्या अभ्यासकाला विचार करावयास भाग पाडतो ही वस्तुस्थिती आहे. यावरून मराठी मध्यमवर्गीय संस्कृती आणि चित्रकला यांच्यात कोणे एके काळी जवळीक होती हेच लक्षात येतं. कालांतरानं हळूहळू ती नष्ट झाली. त्याचेच परिणाम आज आपणास वेगवेगळ्या पद्धतीने घडलेले पाहावयास मिळत आहेत.
(क्रमश:)
सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
पूर्वप्रसिद्धी: ‘समतावादी मुक्त-संवाद पत्रिका’, सप्टेंबर २०२३
संपादकांच्या पूर्वपरवानगीने ‘चिन्ह आर्ट न्यूज’मध्ये पुन:प्रकाशित
चिन्ह तर्फे आयोजित कलाशिक्षण महाचर्चा पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
कलाशिक्षण महाचर्चा | Panel Discussion About Art Education
Related
Please login to join discussion