No products in the cart.
चुकवू नये असे प्रदर्शन!
जहांगीर आर्ट गॅलरीत सध्या एक नितांत सुंदर प्रदर्शन भरलं आहे. हे प्रदर्शन आहे औरंगाबादचे चित्रकार दिनेश कुरेकर यांचं. दिनेश कुरेकर यांनी प्रारंभापासूनच वेगळं माध्यम निवडलं. त्यांचं शिक्षण झालं ते मुंबईच्या प्रख्यात जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये. तेही तिथल्या आर्ट एन्ड क्राफ्ट विभागातील टेक्स्टाईल डिझायनींगमध्ये. साहजिकच कॅनव्हासच्या चौकटीपेक्षा लूमची चौकट त्यांना आपलीशी वाटल्यास नवल नाही. जेजेमधून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर काही काळ त्यांनी मुंबईच्या प्रख्यात विव्हर्स सर्व्हिस सेन्टरमध्ये विशेष प्रशिक्षण घेतलं. त्या काळात चित्रकार प्रभाकर बरवे, गोपाळ आडिवरेकर, भूपेंद्र देसाई आणि असंख्य मोठ्या चित्रकारांचा सहवास मिळाला. विचारांना दिशा मिळाली. कलेच्या या क्षेत्रातदेखील वेगळं काहीतरी करता येतं याची जाणीव झाली आणि तिथूनच त्यांच्या कलाविषयक दृष्टिकोनात खूप मोठा बदल झाला.
त्याच सुमारास औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात टेक्स्टाईल डिझायनींगचा विभाग सुरु झाला आणि शिक्षणक्षेत्रात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. अधिव्याख्याता, प्राध्यापक, विभाग प्रमुख अशी पदं भूषवत ते नियत वयोमानानुसार ते काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. आपण शासकीय कला महाविद्यालयातल्या शिक्षकांच्या एकेका करामतीबाबत ऐकून असतो पण कुरेकर यांनी मात्र आपल्या संपूर्ण अध्यापनाच्या कारकिर्दीत अतिशय प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना तर शिकवलंच पण स्वतःचं स्वतंत्र कामदेखील सातत्यानं सुरूच ठेवलं.
स्वतःचं काम करताना ते इतके झपाटले की कालांतरानं त्यांनी स्वतःच्या घरातच स्टुडियो स्थापन केला आणि दिवसरात्र कला निर्मितीला वाहून घेतलं. चित्रकाराच्या स्टुडिओत जसा इझल असतो, कॅनवास असतो, रंग असतात तसे कुरेकरांच्या स्टुडिओत हातमाग किंवा लूम आणि विविध रंगाच्या लोकरीच्या गुंड्या, पांढरी लोकर रंगवण्यासाठी नाना प्रकारचे रंग पाहावयास मिळतात. धाग्यांच्या विविध प्रकारांविषयी त्यांना इतकी आसक्ती आणि वेड आहे की नवी दिल्लीसारख्या ठिकाणी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनं पाहावयास गेल्यावर प्रदर्शनं पाहून झाल्यावर उरलेला सारा वेळ ते दिल्लीच्या वेगवेगळ्या बाजारात जाऊन तिथं मिळणाऱ्या विविध प्रकारच्या धाग्यांच्या खरेदीतच घालवत असत असे त्यांचे मित्र सांगतात. त्यांच्या घरातल्या त्यांच्या स्टुडिओत गेल्यावर स्टुडिओतला हा त्यांचा प्रचंड पसारा पाहून कुणीही पाहुणा अक्षरश: थक्क होऊन जातो.
नियत वयोमानानुसार डोकावणारी आजारपणं आणि अलीकडेच लॉकडाउनच्या आधीमाधीच्या काळात अचानक अपघातानं झालेला तरुण मुलाचा अकाली मृत्यू या साऱ्याचं सावट जरी त्यांच्या जगण्यावर आलेलं असलं तरी हा गडी उमेद मात्र हरवून बसलेला नाही. नव्या जोमानं उभा राहून आपल्या स्टुडिओतल्या लूमवर नवेनवे धागे जुळवण्यात आणि नव्या नव्या रंगांच्या छटा तयार करण्यात किंवा त्या जुळवण्यात व्यग्र असतो. कलानिर्मिती संदर्भात असलेलं त्याचं हे झपाटलेपण खरोखरच थक्क करुन टाकणारं आहे.
जहांगीरमध्ये कालपासून सुरु झालेलं त्यांचं हे प्रदर्शन त्यांच्या आजवरच्या सर्व प्रदर्शनांना मागे टाकणारं आहे. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीमधले धाग्यांचे ताणेबाणे, नानाविध रंगाच्या अक्षरशः शेकडो छटा आणि मुख्य म्हणजे छायाप्रकाशाचा अजोड खेळ पाहणाऱ्याला अक्षरशः अवाक करुन टाकतो यात शंकाच नाही. जहांगीर गॅलरीतून बाहेर पडताना प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झालेला असतो. प्रत्येक कलारसिकानं हा अनुभव घेण्यासाठी वेळात वेळ काढून जहांगीर आर्ट गॅलरीला भेट द्यायलाच हवी!
हे वाचल्यानंतर जर तुम्हाला हे प्रदर्शन पाहावयाची इच्छा झाली परंतु ११ डिसेंबरपर्यंत मुंबईला येणं तुम्हाला शक्य नसेल तर पुढील लिंकवर क्लिक करून चिन्हच्या “ऑनलाईन आर्ट गॅलरी”वरदेखील पुढले १५ दिवस तुम्ही हे प्रदर्शन पाहू शकाल.
Chinha Online Gallery
“Wovenscapes” – Dinesh Kurekar
https://chinha.in/online-art-gallery/wovenscapes/
इतकंच नाही तर तुम्हाला आवडलेली कलाकृतीदेखील खरेदी करू शकाल.
त्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधा:
Insta https://www.instagram.com/wovenscapes_weavings/
Email dinesh.kurekar@gmail.com
Website https://dinesh-kurekar.com/
सतीश नाईक
संपादक, चिन्ह आर्ट न्यूज
Related
Please login to join discussion