No products in the cart.
ऐसा डिप्लोमा मिल भी जाये तो क्या है?
महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे कला शिक्षण सुजलाम सुफलाम व्हावे म्हणून कला संचालनालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. इथल्या विद्यार्थ्यांनी दृश्य कलेत पारंगत व्हावं, कला क्षेत्रात पॅरिसपार झेंडे रोवावेत, उत्कृष्ट दर्जाचे चित्रकार तयार व्हावे, समाज कलासक्त व्हावा, आणि कलेतूनच एक सुदृढ समाजमन तयार व्हावं म्हणून कला संचालनालयाची निर्मिती करण्यात आली. पण काळाची खेळीचं मोठी विपरीत ज्या राज्यात सशक्त कलाभान असणारा समाज तयार व्हावा यासाठी एक अख्ख शासकीय खात तयार करण्यात आलं त्याच महाराष्ट्रात अगदी गुंडापुंडांनीही पैसे कमावण्याचं साधन म्हणून कला महाविद्यालयं सुरु केली. अशा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिक्षण तरी काय मिळणार? एटीडी सारखे झटपट कला शिक्षकाची शासकीय नोकरी मिळवून देणारे कोर्सेस इथे सुरु करण्यात आले. पण त्याच काळाची दुसरी खेळी म्हणा किंवा अजून काही; शासकीय नोकऱ्याना जितकी वेगात भरती आली तेवढ्याच वेगात ओहोटीही लागली. आता शिक्षणाचा पूर्ण ढाचाच बदलणार आहे. तेव्हा या कुत्र्याच्या छत्रीसारख्या उगवलेल्या कला महाविद्यालयांनी काळाच्या हाका ऐकणे हिताचे आहे. अन्यथा त्यांची दुकाने लवकरच बंद होणार हे निश्चित.
यावर्षी महाराष्ट्रात उच्च कला शिक्षण घेणारे एकूण विद्यार्थी आहेत ५६००. त्यापैकी अनुदानित महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत १५०० तर विना अनुदानित महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत ४०००. (खरं तर अनेक महाविद्यालयात २ किंवा ३ विद्यार्थी शिक्षण घेत असताना हा एवढा मोठा ५६०० विद्यार्थ्यांचा आकडा आला कुठून ? हा मोठा संशोधनाचा विषय आहे. की यातही काही ‘अर्थ’पूर्ण व्यवहार आहेत?) यापैकी अनुदानित महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी सुरळीत परीक्षा देत आहेत. अर्थात तिथेही उत्तरपत्रिका न मिळणे असा गोंधळ आहेच. पण विना अनुदानित महाविद्यालयांनी आपला अनुदानाचा प्रश्न सुटत नाही म्हणून थेट परीक्षेवरच बहिष्कार घालून यात विद्यार्थ्यांच्या भविष्याचे नाहक नुकसान केलं आहे. खरं याला विद्यार्थ्यांचं नुकसान तरी कसं म्हणायचं कारण काही मोजकी महाविद्यालयं सोडली तर या महाविद्यालयांचा दर्जा काय? तेथील शिक्षक काय शिकवतात? हा संशोधनाचा विषय आहे. अनेक विना अनुदानित कला महाविद्यालयं ही प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षा पास करून देण्याचं पॅकेजच देतात. एवढी रक्कम भरली की थेट पास. अगदी वर्गकाम सबमिट करण्याचंही टेन्शन नाही. पोर्टफोलीओही महाविद्यालयंच तयार करून देणार. विद्यार्थ्याने फक्त ऍडमिशन घ्यायचं पैसे भरून. ऍडमिशनची ही रक्कम लाखातही असू शकते.
डिप्लोमा कॉलेजेसचे काय होणार?
कला वर्तुळात अशीही चर्चा आहे की कोरोना काळात परीक्षा सुरळीत होऊ शकल्या नाही. तेव्हा सोय म्हणून कॉलेज पातळीवरच परीक्षा घेण्यात आल्या. या काळात विद्यार्थ्यांना चक्क ९० ते ९५ टक्के मार्क देण्यात आले. आता कोरोनामध्ये विद्यार्थी जर कॉलेजलाच उपस्थित राहू शकले नाही तर इतके मार्क्स त्यांना पडले कसे? ही सोय कायम पुढे राहावी यासाठी हा बहिष्कार घालण्यात आला आहे. म्हणजे पेपर कॉलेज काढणार, परीक्षाही तेच घेणार, मार्क पण तेच देणार, कला संचालनालयाने फक्त सर्टिफिकेट द्यावे. या सोयीचा फायदा असा की ही महाविद्यालये काही आर्थिक फायदा घेऊन विद्यार्थ्यांना पास करू शकतात. वर म्हटल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना पॅकेज देणेही यामुळे सोयीचे होते.
आधीच विद्यार्थी संख्या रोडावलेल्या ( काही महाविद्यालयात चक्क २ ते ३ विद्यार्थी संख्या) महाविद्यालयांचे संस्थापक विना अनुदानित महाविद्यालयांच्या संघटनेच्या पदावर कार्यरत आहेत. काही पदाधिकाऱ्यांचे कॉलेजेस तर कोरोना काळात बंद पडली आहेत. तेही अनुदान मागत आहेत. आता विद्यार्थीच नाहीत तर अनुदान कोणासाठी मागत आहेत ही मंडळी? खरं तर ही विद्यार्थ्यांची शुद्ध फसवणूक आहे. वाईट वाटतं ते अशा विद्यार्थ्यांचं जे एवढी रक्कम भरून प्रवेश घेतात. एक काळ होता झटपट शासकीय नोकरी मिळण्याचा. पण या विद्यार्थ्यांना हे असे शिक्षण घेऊन नोकरी देणार तरी कोण? मग जर केवळ नोकरी मिळणे या उद्देशाने प्रवेश घेत असतील तर दुसरा काही अभ्यासक्रम निवडा. या कालबाह्य अभ्यासक्रमातून तुम्हाला कुठलीही नोकरी मिळणार नाही हे निश्चित आहे.
अनेक महाविद्यालयांनी तर थेट बीएफए, एमएफए डिग्री इतकंच नाही तर पीएचडीची सुद्धा दुकानं काढली आहेत. ज्या शासकीय नोकरीत असलेल्या प्राध्यापकांना बढतीसाठी डिग्री हवी असते ते ठरलेल्या पॅकेजचे पैसे भरून डिग्री चक्क विकत घेतात. ना कॉलेज, ना रिसर्च, ना परीक्षा, थेट डिग्री. याचा उपयोग वेतनवाढीसाठी होतो. महाविद्यालयाचे संस्थापक आणि विद्यार्थी दोघेही फायद्यात आणि कला शिक्षण खड्ड्यात. विदर्भातील एक महाविद्यालय तर यासाठी खूप प्रसिद्ध आहे. एका कला शिक्षकाला त्यांच्याकडेच वॉटरकलरचा क्लास करणाऱ्या विद्यार्थिनीनेच विदर्भातून पीएचडी पूर्ण करून देण्याची ‘गुरुदक्षिणा’ ऑफर केली होती असा किस्सा ऐकिवात आहे.
उच्च शिक्षण खातं, कला संचालनालय आणि विना अनुदानित कला महाविद्यालयं यांच्या भांडणात विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. विना अनुदानित महाविद्यालयांची स्थिती किती वाईट आहे हे ओपन सिक्रेट आहे. सगळ्यांना माहित आहे पण बोलतं फक्त ‘चिन्ह’. स्थिती इतकी वाईट असेल तर ही महाविद्यालयं बंद पडली तरी महाराष्ट्राच्या कला शिक्षणाचं कुठलंही नुकसान होणार नाही. कारण जे नुकसान व्हायचं आहे ते आधीच झालं आहे. उलट विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ तर थांबेल.
डिप्लोमा कॉलेजेस बंद पडणार या यु ट्यूब व्हिडिओची लिंक:
धोक्याचा इशारा
तमाम उच्च कला शिक्षण देणाऱ्या, घेणाऱ्या लोकांना ‘चिन्ह’चा एक धोक्याचा इशारा. ही सिस्टीम आता शेवटचे आचके देत आहे. ९०-९५ च्या दशकात जी भारंभार कला महाविद्यालयं महाराष्ट्रात सुरु झाली, त्यांचा उद्देश पैसे कमावणे हाच होता. (काही मोजके अपवाद सोडले तर) त्यांनी भरपूर पैसा कमावला. इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय नोकऱ्याही लागल्या. पण आता अंदाज असा आहे की काळाचं चक्र उलट फिरू लागलं आहे. संपूर्ण देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल होऊ लागले आहेत. लवकरच कदाचित पुढच्याच वर्षी सगळ्याच प्रकारचं डिप्लोमा शिक्षण बंद होणार आहे. काही बातम्यांनुसार तर देशभरात कला शिक्षण देण्यासाठी ‘कला गुरु’ ची निवड केली जाणार आहे. हे कला गुरु डिग्रीच्या नाही तर त्यांच्या कला शिक्षणातील योगदानावर निवडले जाणार आहेत. शालेय पातळीवर मोठ्या प्रमाणात कला शिक्षणाला जागा देण्यात आली आहे, पण तिथे शिक्षकांची निवडही नवीन अभ्यासक्रमानुसार डिग्री पूर्ण करणाऱ्यांचीच होणार आहे. या नव्या सिस्टीममध्ये एटीडी सारखे डिप्लोमा हे कुचकामी ठरणार आहेत. बारावी नंतर जीडी आर्टसारखा डिप्लोमा (तेही भरमसाठ फी भरून) करण्यापेक्षा थेट डिग्रीचे शिक्षण घेणे हे विद्यार्थ्यांच्या भल्याचे आहे. पालकांनीही आपल्या विद्यार्थ्यांना कला शिक्षण देताना वेगेवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करून त्यांना कुठल्याही कोर्सला प्रवेश द्यावा. मुळात आपला पाल्य कला शिक्षणाला लायक आहे का याचाही विचार करणे महत्वाचे आहे. (अधिक माहितीसाठी ‘चिन्ह’च्या यूट्यूब चैनल वरचा ‘चिन्ह’चा ‘डिप्लोमा कॉलेजेस बंद पडणार?’ हा व्हिडीओ बघा.)
(त्यामुळे विद्यार्थ्यांनो, या सगळ्याचा अभ्यास करूनच कुठल्याही कोर्सला ऍडमिशन घ्या. नाहीतर तुमचं भविष्य हे टांगणीला आहे हे निश्चित. ‘चिन्ह’चे व्हिडीओ, संपादकीय लेख आणि कालाबाजार अंक वाचा. ही जाहिरात नाही तर भारताचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांप्रती आमची तळमळ आहे. हे सगळं वाचून बघूनच पुढच्या वर्षी एटीडी, फौंडेशन आणि डिप्लोमाला प्रवेश घ्या.)
****
(फिचर इमेज मधील फोटो प्रतीकात्मक आहे.)
– कनक वाईकर
Related
Please login to join discussion