No products in the cart.
रंग उमलत्या बाल मनांंचे !
लहान मुलांच्या भावविश्वात रंगांना खूप महत्वपूर्ण स्थान असतं. रंग आणि बालमानस यावर अनेक शास्त्रज्ञांनी संशोधनही केलंय. मुलं आपल्या चित्रात कोणता रंग वापरतात त्यावरून त्यांच्या मनाची अवस्था सहज कळू शकते. त्यामुळे आईवडिलांनी मुलांना चित्र काढण्यास प्रवृत्त केलं पाहिजे. अनेक गोष्टी ज्या मुलं बोलू शकत नाहीत ते त्यांची चित्र पाहून आईवडिलांना सहज कळू शकतात. त्यामुळं चित्र ही नुसती आनंद देणारीच ठरतात असं नाही तर आईवडील आणि मुलं यांच्यातील संवादाचा तो महत्वाचा धागाही ठरतो. चित्रं, त्यातील रंग आणि मुलांचं मन यांचा परस्पर संबंध प्रतोद कर्णिक यांनी या लेखात उलगडून दाखवला आहे.
मी शाळेत असताना बहुतेक मराठी माध्यमांच्या शाळांना पांढरा हाफ शर्ट आणि खाकी हाफ पॅंट हाच गणवेश असे. मीही मराठी शाळेचा विद्यार्थी त्यामुळे माझाही गणवेश तोच असे. पण काही मोजक्या शाळांचे विद्यार्थी मात्र वेगळ्या म्हणजे लाईट क्रीम रंगाचा शर्ट आणि डार्क चॉकलेटी पॅन्ट तर काही शाळांचे विद्यार्थी लाईट आकाशी रंगाचा शर्ट आणि नेव्ही ब्ल्यू रंगाची पॅंट अशा गणवेशात शाळेत जाताना दिसायचे. तेव्हा माझ्या मनात पटकन एक विचार येई, ही मुलं, या गणवेशात खूप स्मार्ट दिसतायत. आणि नकळत आमच्या मनात गणवेशामुळे एक न्यूनगंड निर्माण होत असे. आता जी एक राज्य, एक गणवेश अशी संकल्पना आली आहे ती बहुदा बालमानस शास्त्रज्ञांच्या याच प्रदीर्घ अभ्यासातून पुढे आलेली असावी, हे नक्की.
लहान वयात मुलांच्या अवती भोवती घडणाऱ्या अनेक घटनांची स्पंदनं, नकळत त्यांच्या मनात उमटत असतात. त्यामुळे जेव्हा लहान मुलं व्यक्त होतात, ते त्यांच्या मनातल्या याच स्पदनांचं मूर्त रुप असतं. अगदी लहान वयात या लहान मुलांची शब्दसंपदाही फारच कमी असते. मग अशा वेळी आपल्या मनातले हेच तरंग ती मुलं कळत, नकळतं आपल्या चित्रांतूनच व्यक्त करतात. या प्रक्रियेत, रंग आणि रंगसंगती निवडताना, ते आपल्या मनातल्या विचारांच्या, भावनांच्या जवळ जाणाऱ्या रंगांचीच निवड करत असतात. हे त्यांच्या भाव भावनांच प्रतिकात्मक प्रकटीकरण, अगदी नैसर्गिकरीत्या, त्यांच्याही नकळत घडतं असतं. म्हणूनच आपल्या पाल्याच्या मनात काय चाललं आहे, हे जाणून घ्यायला, या लेखातील माहिती उपयुक्त ठरेल.
पिढी बदलली की नव्या पिढीच्या तोंडी नवीन शब्द येत असतात. आजकाल “यंग ऍंड व्हायब्रंट” हा शब्द तरुणाईबद्दल सर्रास, याच तरुण पिढी कडून वापरला जातो. पण आपल्या पैकी किती जणांना हे माहिती आहे? की हे केवळ शब्द नसून ही वस्तुस्थिती आहे. जी रंगांच्या दुनियेचा आणि बाल आणि तरुण मनाचा संबंध दाखवते. लहान मुलं आणि युवा हे व्हायब्रंट म्हणजेच रंगीबेरंगी आणि तेजस्वी रंग पसंत करतात. या वयोगटातील लोकं पिवळा, गुलाबी, निळा, जांभळा, हिरवा, पोपटी या रंगांकडे अधिक आकर्षित होतात. तर मध्यमवयीन आणि वृद्धत्वाकडे झुकलेले लोकं हे पांढरा, आकाशी, हलका पिवळा अशा रंगांकडे आपोआप वळतात. आजकालचे पंचाहत्तरी ओलांडलेलेही काही आजोबा ‘हम अभी भी जवां हैं’’ दाखवायला आणि मिरवायला, रंगीत झगमगीत कपडे घालताना दिसतात, तो भाग वेगळा. कारण आवड, मनाचा कौल या पेक्षा त्यात दिखावा हाच त्यांचा मुख्य हेतू असतो. ते असो.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील सॅन डीएगो स्टेट युनिव्हर्सिटी येथे एल्सा फेहेर कारेन आणि राइस मेयर यांनी यावर खूप सखोल संशोधन केलं आहे. त्यांनी एकाच वेळी लहान मुलं, तरुण आणि वृद्ध अशांचे विविध गट बनवून या रंगसंगतीचे त्यांच्यावर होणारे परिणाम आणि त्यांची पसंती यावर अभ्यास केला. त्यातूनही वर नमुद केलेले रंगांची आवड आणि वय यांचे नाते अधोरेखीत झाले.
हल्ली जेव्हा आपण नवीन घर घेतो, तेव्हा सगळ्या व्यवहाराच्या आणि कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या की आपल्या पैकी बरेच जणं कल्पक आणि परवडणाऱ्या इंटेरिअर डेकोरेटरची शोधाशोध करतात. आणि मग विषय येतो तो लहान मुलांची खोली कशी डेकोरेट करावी याचा. तेव्हा एखादं मुलांना आवडणारं, त्यांच्या विश्वातलं कार्टुन कॅरॅक्टर, फुलं आणि हसणारी खेळणारी लहान मुलं, तर काहीवेळा मुलांना कुतूहल आणि आकर्षण असणारे प्राणी, पक्षी, मासे यांचं एक तरी भित्तीचित्र कराच. असं आग्रहानी घरमालक इंटेरिअर डेकोरेटरला सांगतात. मग ब्राईट रंगसंगती आणि लहान मुलांच्या कॅडबरी जेम्सच्या गोळ्यांमधल्या रंगांची संगती मुलांच्या खोलीसाठी निवडली जाते. पण आपल्याला हे माहिती आहे का, नुसत्या त्या लहान चार, पाच वर्षांच्या बाळाच्या खोलीत असं सगळं केलं की ते बाळ खूश होतं, हे अर्धसत्य आहे. खरंतर लहान मुलांचा वावर असणाऱ्या सगळ्याच खोल्यांच्या भिंती, सभोवतालचं वातावरण हे पिवळा, केशरी, आकाशी, गुलाबी, हलका हिरवा किंवा हलका पोपटी, नीळा, जांभळा, हिरवा या रंगांच्या आकर्षक रंगसंगतीने सजवले, तर त्या बालमनावर त्याचा फार चांगला आणि सकारात्मक परिणाम होत असतो. उलट त्याची खोली त्याच्या आवडत्या रंगांनी रंगवून आपणं त्याच विश्व अजूनच लहान, त्या खोली पुरतं मर्यादीत करतं असतो. मी मुंबईत अशी काही घरं बघितली आहेत,जिथे मुलं लहान असताना सगळं घरच मुलांना आवडणाऱ्या रंगसंगतीने सजवलेलं होतं. हे प्रत्येकालाच शक्य होईल असं नाही. पण या मागचा उद्देश आणि मुलांच मानसशास्त्र ध्यानात घेतलं, तर आपल्याला शक्य ते बदल आपण नक्कीच करु शकतो. इराणमध्ये गेल्या दहा वर्षात बाल चित्रकला आणि रंगसंगतीवर विशेष संशोधन झाल आहे. आपल्याकडेही बाल मानसशास्त्रज्ञ हे संशोधन आणि अभ्यासातून अशा अनेक निष्कर्षांपर्यंत आले आहेत, जे आपल्याला समजून घेणं फार आवश्यक आहेत.
लहान मुलांच्या मनात राग, संताप, एकटेपणा या भावना तर बळावत नाहीत ना? याची सहज कल्पना पालकांना आपल्या मुलांच्या चित्रातील रंग छटांचा वापर, रंगसंगती यावरुन येते. लहान वयात सगळ्यात जास्त मुलांच्या मनात नकारात्मकता पसरवत असते ती गोष्ट म्हणजे भिती. ही भिती कसलीही असू शकते. एखाद्या टिव्ही वर बघितलेल्या भयकथेची, एखाद्या व्यक्तीची, शाळेत शिकवलेला अभ्यास समजतं नाहीये याची. किंवा होमवर्कची किंवा आई- बाबा ओरडतात याची. आणि मग ही मुलं आतल्या आत कुढत रहातात. अशा मुलांची चित्र ही लाल, काळ्या, राखाडी अशा रंगात रंगवलेली आढळतात. आणि केवळ लाल, काळा रंग वापरला म्हणून त्या मुलांच्या मनात भिती आहे, असा अर्थ कृपया पालकांनी काढू नये. त्यासाठी वरील चित्र मुद्दाम देत आहे. यात अवकाशात झेपावणारे अग्नी बाणावरील रॉकेट दिसते आहे. एका लहान मुलाच्या कल्पना शक्तीची उत्तुंग झेपच या चित्रातून दिसते आहे. हे खूप सकारात्मक बालमनाचं प्रतिबिंब आहे. म्हणजेचं अशा रंगसंगतीतून जेव्हा उदासीनता, रितेपणा, भय या भावना प्रतिबिंबित होतात, तेव्हा मात्र नक्की समजावं, आपल्या लेकरांच्या मनातं खोलवर काहीतरी नकारात्मक, दुःखद भावनांच काहूर माजलं आहे.
आमच्या ओळखीतला एक मुलगा आहे. जवळचं रहायचा. त्याचं नाव परेश, तेव्हा वय सहा. म्हणजे आता तो मोठा होऊन त्याचं शिक्षणही पूर्ण होतं आलंय. तेही चित्रकलेत. आज तो एम एफ ए, फाईन आर्ट करतोय. लहानपणा पासून घरची गडगंज श्रीमंती. पण घरच्या वातावरणात मोकळेपणा, नात्यात आपलेपणाचा लवलेशही नसे. त्याला हवं ते घेण्याची, कितीही ऑनलाईन ऑर्डर करण्याची मुभा होती. अगदी पहिली पासून त्याच्यासाठी कार, ड्रायव्हर, घरात त्याला हवं नको बघायला एक मावशी ठेवल्या होत्या. पण तो कायम गप्प गप्प असे. त्याला चित्रकलेची फार आवडं होतीच, त्यामुळे मग तो एकटा बसून तासन तास चित्र काढे. चित्रात बघावं तेव्हा हा पठ्ठ्या भयावह राक्षस, भूतं म्हणजेच मॉंस्टर्स, डेव्हिल्स अशीच चित्र काढे. सगळीकडे काळा रंग, लाल, तांबड्या, राखाडी, गडद पण उदास रंगांनी चित्र भरलेलं असे. माझं त्यांच्या घरी बऱ्याच वेळा जाणं होई. तो मोठ्या कौतुकाने मला चित्र दाखवे. त्याच्या घरी वर्षातून एकदा घराला रंग दिला जाई. एकदा मी गेलो तर त्याला सांभाळणाऱ्या मावशींनी दार उघडलं. त्याही त्या परिवारातील एक असल्या सारख्या सगळं करत. पण त्या त्याच्या आईची जागा घेऊ शकत नव्हत्या. परेशची आणि त्याच्या आईची कधीतरी भेट होई. इतक्या त्या बिझी असतं. मावशी म्हणाल्या आत चित्र काढत बसलाय. मी त्याच्या खोलीत गेलो, आणि थबकलोच. तो नेहमी प्रमाणे खोलीत जमिनीवर पाठमोरा बसून चित्र रंगवण्यात रंगुन गेला होता. घराला रंग देताना त्याच्या खोलीला त्याने गडद लाल रंग हट्टानी द्यायला लावला होता. मी तर पाच मिनिटंसुद्धा त्या खोलीत बसू शकत नव्हतो.
मग मी त्याला एकदा त्याच्या घराजवळच्या बागेमधे घेऊन गेलो. त्याची कळी जरा खुलली. मग मला वेळ असला की त्याला घेऊन त्या बागेमधे जाई, तो हरखून तीथली रंगीबेरंगी फुलं, फुलपाखरं, खेळणारी लहान मुलं यांना पहाण्यात दंग असे. एकदा मी त्याला खरं तर ठरवून पण वरकरणी सहज गप्पा मारताना विचारलं, परेश, काय छान फुलं उमलली आहेत ना, सगळीकडे. पण चित्रात अशी फुलं काढण खूपच कठीण आहे रे. त्यासाठी एखाद्याची चित्रकला तेवढी भारी असायला पाहिजे. माझी ही मात्रा बरोब्बर काम करुन गेली. दोन दिवसांनी तो तीन चार चित्र घेऊन मला दाखवायला आला. त्यात मी पहिल्यांदा छान फ्रेश रंग, रंगीबेरंगी फुलं, फुलपाखरं, पक्षी, मासे चितारलेले बचितले. त्यानंतर हळूहळू त्याच्या चित्रांचे विषय, त्यातील रंगसंगती बदलत गेली.
जेव्हा लहान मुलं काहीतरी चित्र रंगवत असतात, त्यात भडक लाल, काळा, गडद छटा यांचा सतत वापर होत असेल, चित्रातून व्यक्त होणारे भावं कमालीचे उदास असतील, तर तो लहान मुलगा किंवा मुलगी मनातून खूप उदास, गोंधळलेले किंवा धास्तावलेले असतात. या उलट जर एखाद्या मुलाकडून खूप आल्हाददायक रंग, रंगछटा यांचा वापर त्यांच्या चित्रात होत असेल तर समजावं की त्याच्या मनातं खूप सकारात्मक भाव, तरंग उमटत आहेत. आजकाल एकतर हम दो, हमारा एक, असचं चित्र अनेक घरांत दिसत. बऱ्याच वेळा लहान मुलांना पालक फार वेळ देऊ शकत नाहीत. अशा वेळी एकटेपणातून त्या बालमनात नैराश्य आणि उदासीनता येत रहाते. ती त्याच्या चित्रांतून प्रतिबिंबित होत असते. पालकांमधले वाद, कुरबुरी, भांडणं यांचाही बालमनावर खूप सखोल आणि दूरगामी परिणाम होत असतो. यातून आलेला एकाकीपणा आणि दुःख या मुलांच्या चित्रातील रंगांमधून उमटताना दिसतं. म्हणूनच पालकांनी आपल्या लहान मुलांनी चित्र काढत असताना, त्यांच्या चित्रांवर लक्ष देणं, त्यांना चित्रांबद्दल सतत, ‘तू हे काय करुन ठेवलयसं, कागदं वाया घालवतं असतोस’, म्हणून ओरडण्या ऐवजी त्याच्या मनात उमटणार्या स्पंदनांच ते प्रतिबिंब आहे, हे ध्यानात घ्यायला हवं. आणि आपल्या मुलांच्या या चित्रामागच्या कारणांचा वेध घेत, वेळीच लक्ष घालून त्या कारणांचा निचरा करणं खूप गरजेचं असतं.
मुळातच, आपण या आधीच्याही भागांमध्ये पाहिलं आहे, चित्रकला ही कला आहेच, पण बाल मनांसाठी मनातल्या भाव भावनांच ते प्रकटीकरण आहे, हे पालकांनी समजून घेणं फार आवश्यक आहे.
जर मुलांच्या मनातली द्वंद्व, वादळं, तरंग, लहरी आपण त्यांच्या चित्रांतील रंगांमधून समजून घेतल्या, तर मोठी झाल्यावर ती मुलं सकारात्मक विचारांनी आणि खेळकर वृत्तीनी आणि प्रसन्न मनानी जगात वावरतील. स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाचा मागोवा घेतील आणि आपला स्वतंत्र मार्ग निवडतील. आत्मविश्वासाने जगाला सामोरे जातील. आणि ठामपणे म्हणतील,”रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा…”
******
प्रतोद कर्णिक
चिन्हच्या ऑनलाईन चाईल्ड आर्ट गॅलरीमध्ये आलोक शेलार या बालचित्रकाराचं प्रदर्शन खालील लिंकवर क्लिक करून आवर्जून बघा.
ARTFUL SPIRIT
Related
Please login to join discussion