Features

‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’चे कलेवर

लेखाचं शीर्षक वाचून दचकू नका. जेजे स्कूल ऑफ आर्टच्या सध्याच्या पिढीतील विद्यार्थ्यांनी हा लेख वाचावा म्हणून असं शीर्षक दिलं आहे. पण म्हणून या शीर्षकातील सत्यता कमी होत नाही बरं का. हा लेख वाचून रिल्सच्या जमान्यातील आजच्या पिढीला कळेल की एवढ्या वैभवसंपन्न महाविद्यालयाचं  भ्रष्ट्राचाराने खाऊन खाऊन चोथा झालेलं कलेवरच तुमच्या हातात दिलं आहे. लेख थोडा नव्हे खूप मोठा आहे अगदी ४००० शब्दांचा. पण एक एक वाक्यातून तुम्हाला कळेल की जेजेची वासलात कुणी आणि कशी लावली, तेही नावानिशी. यात आजी माजी अशा सगळ्या लोकांचा सहभाग आहे. आणि हो हा नुसता हवेत केलेला गोळीबार नाही तर  ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांनी वेळोवेळी याचे पुरावेही दिले आहेत.  

त्यामुळे २८ मे २००६ रोजी दै. लोकसत्तामध्ये पूर्वप्रकाशित झालेला ‘सतीश नाईक’ यांचा हा लेख वाचाच. वाचून भयंकर चीड येईल हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे वाचल्यावर १, २, ३, ४ असं म्हणून राग शांत करा!

आरक्षणाच्या सरकारी नियमांमधल्या वाटा पळवाटांचा सोयिस्कर अर्थ लावून , प्रसंगी ‘ साम , दाम , दंड , भेद या साऱ्यांचा पुरेपूर वापर करून वैयक्तिक स्वार्थापायी आरक्षणाचा लाभ घेणारे खरे आणि ‘ खोटे लाभार्थी अधिकारी आणि तंत्रशिक्षण विभागाचे तालेवार मंत्री व त्यांचा गोतावळा अशा सर्वांनी मिळून गेली दोन दशकं , संपूर्ण देशात एकमेव ठरलेल्या कला संचालनालयामध्ये बेबंदशाही माजवून भ्रष्टाचाराचा अक्षरशः कळस गाठला आहे . परिणामी हे कला संचालनालय बंद करून टाकण्याचीच पाळी महाराष्ट्र शासनावर आली आहे . तिचाच हा वृत्तांत .

स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतच्या ५८-५९ वर्षाच्या कालखंडात , संपूर्ण भारतातील एकाही राज्याच्या मुख्यमंत्र्याला चित्रकलेच्या प्रसारासाठी आपल्या शासनाचं स्वतःचं असं एखादं खातं असावं असं वाटलेलं नाही . अपवाद फक्त स्व . यशवंतराव चव्हाणांचा . त्यांनी मोठी दूरदृष्टी दाखवून ४०-४५ वर्षांपूर्वी ज्याची स्थापना केली तेच हे ‘ कला संचालनालय , महाराष्ट्र राज्य , आपल्या स्थापनेनंतर या विभागानं चित्रकार माधव सातवळेकर , प्रल्हाद अ . धोंड, बाबूराव सडवेलकर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं वाटचालही केली . पण सडवेलकर निवृत्त झाल्यानंतर १९८५ सालापासून या विभागानं अधःपतनाची जी काही परिसीमा गाठली आहे तिला चित्रकलेच्या इतिहासात तोड नाही . 

तंत्रशिक्षण खात्यानं या विभागाकडे केलेलं संपूर्ण दुर्लक्ष , आरक्षणाच्या तरतुदींमधील नियमांचा सोयिस्कर अर्थ लावून मंत्रालयातील चांडाळ चौकडीने केलेल्या कलासंचालक पदापासूनच्या नेमणुका , जातीचा खोटा दाखला दाखवून , आरक्षणास पात्र नसलेल्या एका भ्रष्ट कारकुनानं मानाचं उपकला संचालकपद लाटून , मंत्रालयातील वरिष्ठांच्या सहाय्यानं तब्बल १९ -२० वर्षे केलेला भ्रष्टाचाराचा नंगा नाच- या भ्रष्ट माणसास असलेलं  तंत्रशिक्षण विभागाचं अभयदान , त्याचप्रमाणं पैसे खाऊन चुकीचेच निर्णय घेण्याचं संबंधित अधिकाऱ्यांचं कर्तृत्व , परिणामी सदर विभागाच्या विरोधात कोर्टात उभ्या राहिलेल्या शेकडो ( शब्दशः १०० पेक्षा जास्त ) केसेस आणि या साऱ्यामुळे कुठलंच काम कधीच पुढं जाणार नाही अशी झालेली अभूतपूर्व परिस्थिती , या सर्वांमुळे हा संपूर्ण विभागच आता गुंडाळून टाकण्याची आफत महाराष्ट्र शासनावर ओढवली आहे . तीही अन्य कोणा पक्षाच्या राज्यात नव्हे तर खुद्द चव्हाणांच्याच काँग्रेस पक्षाच्या राज्यात . चव्हाणांचाच राजकीय वारसा सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यात आणि ज्या मंत्र्याकडून हे सारं घडलं आहे , घडतं आहे ते तंत्रशिक्षण मंत्री दिलीप वळसे पाटील हे यशवंतरावांच्या मानसपुत्राचे शरद पवार यांचे अगदी निकटचे सहकारी असावेत , याला दैवदुर्विलास असं म्हणावयाच नाही तर दुसरे काय ? 

तंत्रशिक्षण संचालनालयाचा वरवंटा  

‘ लायक माणसं मिळत नाही’ अशी कारणं दाखवून कला संचालनालयाचं विलिनीकरण तंत्रशिक्षण संचालनालयात करून टाकण्याची प्राथमिक तयारी आता जवळजवळ झाली आहे . तंत्रशिक्षण संचालक श्री न . बा . पासलकर यांच्या हातात तर आता कला संचालनालयाची संपूर्ण सूत्रही दिली गेली आहेत . संपूर्ण परीक्षा विभागही तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीत सोपविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत . यानंतर जेजेची दोन्ही कलामहाविद्यालयं एकत्र केली जाण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल . 

कलासंचालक पदानंतर क्रमाक्रमानं इतर पदांवरही घाला घातला जाईल . १५० वर्षांची परंपरा सांगणाऱ्या जेजेचं  अधिष्ठातापदही लवकरच निकालात काढलं जाईल नंतर नागपूर , औरंगाबादच्या कलामहाविद्यालयांवर तंत्रशिक्षण संचालनालयाचा वरवंटा फिरेल म्हणूनच तर अधिष्ठातांची ४ पैकी ३ पदं , प्राध्यापकांची १६ पैकी ११ पदं , कला इतिहासाच्या प्राध्यापकांची तीन पद गेल्या तब्बल १० वर्षांपासून भरलेली नाहीत सहाय्यक अधिव्याख्यात्यांच्या पदांबाबत तर विचारूच नये अशी परिस्थिती आहे . तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे हाल कुत्राही खात नाही . 

मुंबई विद्यापीठ जेजेची मान्यता कधी काढणार ? 

कला संचालनालय आणि तिच्याशी संबंधित जेजेसारख्या संस्थांची तंत्र शिक्षण खात्यानं ही अशी सर्वच बाजूनं कोंडी करून ठेवली आहे . सारं ‘ सेटिंग ‘ अचूक लागलं  की मुंबई विद्यापीठाला आपोआप जाग येईल व ते जेजेला असलेली आपली मान्यता काढून घेईल . नंतर एआयसीटी सुद्धा विद्यापीठाचंच अनुकरण करील . आणि मग या दोन्ही संस्थांची मान्यता नसल्यानंच जेजेची दोन्ही कला महाविद्यालय ‘ नाईलाजास्तव’ बंद केली जात आहेत अशी घोषणा करायला तंत्रशिक्षणमंत्री मोकळे होतील . 

मग जेजेची ही ‘ प्राईम लॅन्ड ‘ सरकारला पैसा मिळतोय असं सांगून कुणा उद्योजकाच्या गळ्यात टाकली जाईल . आणि लवकरच तिथ मॉल्स किंवा मल्टिप्लेक्स उभी राहतील . या निर्णयावर फारच टीका झाली तर तंत्रशिक्षण संचालनालयाच्या कॉम्प्युटर क्लासेसच्या फटावळीला ही जागा आंदण दिली जाईल . तेही जमले तर तंत्रशिक्षण संचालनालय आपली सारी कार्यालय तिथे हलवील , पासलकरांनाही हा निसर्गरम्य कॅम्पस फारच आवडलेला आहे . म्हणूनच तर मागच्यावेळी त्यांनी आपल्या खात्याचे एक कार्यालय अधिष्ठात्यांच्या बंगल्यात आणून वसवण्याचा प्रयत्न केला , पण प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियानं ती ‘ राष्ट्रीय बातमी ‘ केल्यावर पासलकरांना सामान तिथंच टाकून पाय लावून पळून जाव लागलं होतं. आता तर काय हा साराच कॅम्पस त्याच्या हातात अधिकृतपणे  आला आहे. आता त्यांना कोण विचारणार ?

जेजेत स्पॉन्सर टॉवर ?

 कला संचालनालयाचा अधिभार हाती येताच , आपल्या पहिल्या मीटिंगमध्ये पासलकरांनी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आणि आर्किटेक्चरच्या जुन्या वास्तू पाडून टाकून , तिथं एक टोलेजंग इमारत उभी करण्याचं सूतोवाच केलं आहे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या जेजे आर्किटेक्चरच्या कुणा लाकुळे नामक प्राचार्यांनी तर त्या इमारतीचा प्लॅनसुद्धा त्याच मीटिंगमध्ये सादर केला , आता बोला ! ( आणखी काय काय ‘ प्लॅनिंग ‘ या लोकांनी आधीपासून करून ठेवलं आहे देव जाणे किंवा ते तंत्रशिक्षण मंत्री जाणे .) जेजे व कला संचालनालयातील भ्रष्टाचाराची धुणी मुंबईतील महत्त्वाची वृत्तपत्र गेली काही वर्ष नित्यनियमानं  धूत असताना , पासलकरांनी आल्या आल्या प्राधान्य मात्र कशाला दिलं तर ते जुन्या इमारती पाडून नवी इमारत बांधण्याला ( बहुदा त्यांचा स्पॉन्सरही ठरला असावा ) न. बा . पासलकर हे तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या नात्यातलेच आहेत असे जेजे परिसरात कुजबुजले जातं ते बहुदा खरंच असावं. 

 एकदा जेजेच्या अधिष्ठातापदांचा ‘ निकाल ‘ लावला की पासलकरसाहेबांनी अधिष्ठातांचा एक बंगला तंत्रशिक्षण संचालकांसाठी म्हणून खास राखून ठेवावा , म्हणजे मग २४ तास त्यांना तिथं राहून जेजेची विल्हेवाट लावणं सोप जाईल . पुढील वर्षी जेजेची १५० वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्तानं त्यांना आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांना जेजे बंद केल्याची भेट सध्या संपूर्ण भरात असलेल्या भारतीय चित्रकलेला देऊन टाकता येईल . 

अपूर्ण

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.