Features

महाराजांचं शिल्प साकारताना… 

शिल्पकार जयदीप आपटे सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पावर काम करत आहेत. शिवाजी महाराजांचं शिल्प तयार करणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखंच आव्हान असतं. त्यामुळे महाराजांचं शिल्प करताना नुसतं उत्तम कारागीर असून जमत नाही तर उत्तम अभ्यासक आणि कलाकारही असणं महत्वाचं असतं. शिल्पकार जयदीप यांनी हे शिल्प तयार करताना त्यांना जे विचार सुचले आणि महाराजांचं शिल्प करताना काय काय बारकावे शिल्पात उतरणं गरजेचं होते ते या लेखातून मांडले आहेत. अनेक उदयोन्मुख शिल्पकारांना यातून दिशा मिळेलच पण कला रसिकही एक शिल्पकार शिल्प तयार करताना काय चिंतन करतो याची माहिती मिळेल.

जसं विविध विषयाचे अभ्यासक त्या विषयाचा अभ्यास करून तो आपल्यासमोर ठेवतात त्याप्रमाणे शिल्पकार किंवा चित्रकाराचे काम हे त्या अभ्यासाचा वापर करून त्याला मूर्त रूप देणं हे असतं. शिल्पकलेला शाश्वत कला म्हटल गेलं आहे. कारण एकदा शिल्पनिर्मिती झाल्यावर पुढे कितीतरी काळ त्यातून आनंद मिळत राहतो. अशा वेळी एक शिल्प उभं करायचं तर त्यामागे तेवढा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. जसं आपल्याकडे असणाऱ्या किंवा उत्खननातून मिळणाऱ्या प्राचीन शिल्पांवरून आपल्याला त्यावेळची माहिती उपलब्ध होते, त्या प्रमाणेच एकदा एक शिल्प घडल्यानंतर कित्येक पिढ्या ते शिल्प बघणार असतात,त्यातून आनंद आणि माहिती घेणार असतात. शिल्प घडवणं म्हणजे फक्त मातीचा पुतळा घडवणं एवढाच मर्यादित अर्थ आपल्याकडे घेतला जातो. वास्तविक शिल्प घडवणं हे अत्यंत अवघड काम आहे.  कारण त्या अचल आकृतिबंधातून त्या व्यक्तीचं जिवंत व्यक्तिमत्व उभं करायचं मोठं आव्हान त्यामध्ये असतं. त्यासाठी त्या व्यक्तीच्या दृश्य वैशिष्ट्यं आणि बारकाव्यांबरोबरच त्याचं अदृश्य व्यक्तित्व टिपण हे देखील खूप महत्वाचं असतं.

उदाहरणादाखल छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पासंदर्भात बोलू. रोजच्या जगण्यात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प किंवा चित्र बघतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प / चित्र आपल्या हातून घडावं असं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. ते व्यक्तिमत्वच असं आहे, की ज्याची प्रत्येकाला भुरळ पडते. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक जण आपल्या आयुष्यात एकदा तरी शिवाजी या तीन अक्षरांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. शिवाजी महाराज म्हटल्यावर शौर्य, बाणेदारपणा, करारी मुद्रा, तो रुबाब या गोष्टी पटकन डोळ्यासमोर उभ्या राहतात. मात्र एक खूप महत्त्वाची गोष्ट आपण विसरतो ती म्हणजे ‘ सामान्यांनी घडवलेला असामान्य इतिहास म्हणजे शिवशाहीचा इतिहास ‘.

शिवछत्रपतींचा एक जहागिरदाराचा मुलगा ते छत्रपती राजा एवढा प्रवास खरं तर दाखवता येणं शक्य आहे. पण बरेचदा शिल्प घडवताना दागिन्यांनी मढवलेलं, अंगरख्यावर कलाकुसर असलेलं शिल्प घडवलं जात, हे चुकीचं नाहीये. पण  या सगळ्यामुळे एक असामान्य व्यक्तिमत्व त्यात हरवत जातं, आणि असा पुतळा करायचा असेल तरी त्या वेळचे दागिने कसे होते ? अंगरखा नेमका कसा होता ? तो कसा शिवला जायचा ? त्याची शिवण नेमकी कुठे असायची ? इत्यादी अनेक गोष्टी अभ्यासण्यासारख्या आहेत. अगदी शिवाजी महाराजांचा मंदिल / जिरेटोप हा कापडाने बांधून मग तो कायम राहण्यासाठी शिवला जायचा. असं असताना आत्ता आपण बघतो तो जिरेटोप गोल, गुळगुळीत असलेला दिसतो. हे तर अगदी सामान्य मुद्दे आहेत की जे दुर्लक्षित केले जातात.

मला काम करताना जे काही मुद्दे प्रकर्षानं जाणवले, त्याचा वापर मी करत गेलो. त्या वेळेला बांधायची आणि मूठ असलेली अशा दोन्ही प्रकारच्या ढाली वापरल्या जायच्या, एका शिल्पात अशी बांधलेली ढाल मी केली. तेव्हा बऱ्याच जणांनी मुद्दाम विचारलं की ढाल अशी का दाखवली आहे ? किंवा काम करताना अस लक्षात आलं की शिवाजी महाराजांचं शिल्प 1659 च्या आधीचं की नंतरचं हे सहजपणं  दाखवता येणं शक्य आहे. 1659 च्या अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी राजांना डाव्या डोळ्याच्या वर कपाळावर जखम झाली होती. साहजिकपणे त्या जखमेचा व्रण दाखवून काळ दाखवता येऊ शकतो.
बऱ्याचदा आपल्याकडे शिवाजी महाराज म्हटलं की फक्त घे तलवार कर युद्ध एवढंच दाखवलं किंवा बघितलं जातं. शिवाजी राजांचे बाकीचे गुण त्या शिल्पात यावे याकडे फारसं लक्ष नाही दिलं जात.

शिवाजी महाराजांची जी अस्सल चित्रं आहेत, त्यात त्यांचा अंगरखा बघून बरेचदा असं वाटायचं की अंगरखा असा फुगलेला का दाखवला आहे ? पण अलीकडेच एका शिल्पावर काम करताना रघुजीराजे आंग्रे यांच्याबरोबर संवाद साधण्याचा योग आला. त्यावेळी त्यांच्याकडून अनेक बारकावे कळाले. रघुजीराजे यांनी चर्चेत सांगितलं की, तो अंगरखा असा दिसतो कारण त्यावेळी जवळपास 16 वार कापड अंगरख्यासाठी वापरलं जायचं.  शिवाय योद्धा असल्यानं घोडेस्वारी करणं क्रमप्राप्त होतं. त्यामुळे तो अंगरख्याचा घेर तेवढा असायचा. जेणेकरून घोडेस्वारी करणं सहज व्हावं. नवीन शिल्पावर काम करतोय तेव्हा हेच ठरवलं होतं की शिवाजी राजे हे सर्वसामान्य माणसासारखे दिसले पाहिजेत, पण त्यात तो सार्वभौम छत्रपतींचा रुबाब पण दिसलाच पाहिजे. जेव्हा रघुजीराजांना ते न सांगता लक्षात आलं तेव्हा खरंच वाटलं की जमतंय काम.

दुर्दैवाने आपल्याकडे जे काम देतात त्यापैकी 90 टक्के लोक असा सूक्ष्म विचार करत नाहीत. आणि शिल्प करणाऱ्यांनी तर शिवाजी महाराज म्हणजे ठराविक साचेबद्ध काम एवढंच डोक्यात ठेऊन काम केलंय. खरं तर शिवशिल्पातला प्रत्येक भाग हा विचार करून करण्याचा भाग आहे. त्यांची शरीरयष्टी, हावभाव, कपडे, जोडे, हत्यार, घोडे, इतक्या गोष्टी आहेत की प्रत्येक गोष्टीवर कितीतरी बोलता येईल. एवढं लिहिण्यामागचं कारण एवढंच की आपण शिवाजी महाराजांना देवासारखं पाहतो. ते व्यक्तिमत्व देवाचा अवतार असल्यासारखंच आहे. पण देवत्व दिल्यानं त्यांनी केलेला पराक्रम आपण करू शकतो ही शक्यताच कमी होत जाते, त्याऐवजी जर सामान्य माणसांनी केलेला असामान्य पराक्रम दाखवता आला तर आपण त्या व्यक्तिमत्वाच्या जास्त जवळ जाऊ शकतो. मुळात शिल्प म्हणजे फक्त कोरीवकाम, गोड- गुळगुळीत मूर्तीइतकंच नसतं, तर त्यामागचा विचार लोकांपर्यंत पोचवता आला पाहिजे. प्रत्येक कलाकार हा उत्तम कारागीर( craftsman) असणं गरजेचं आहेच, पण प्रत्येक कारागीर हा कलाकार असतोच असं नाही.

********
– जयदीप आपटे

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.