No products in the cart.
न झालेल्या अटकेची बित्तंबातमी !
नांगरेसाहेबांनी आपली होणारी अटक टळल्याची घटना अर्थातच संबंधितांसोबत एका मोठ्या हॉटेलात सेलिब्रेट केली. नशीब त्या पार्टीला मला बोलावण्याचा अगोचरपणा त्यांनी केला नाही. त्याच वेळी आणखीन एक मनस्ताप देणारी घटना घडली ती म्हणजे श्री नांगरे यांना हवी तशी बातमी दैनिक लोकसत्तामध्ये छापून आली. अगदी विशेष अँकरच्या स्वरुपात. नांगरे यांच्यावर कसा अन्याय झाला हे त्या बातमीत अगदी विस्तृत स्वरुपात दिलं होतं. सरळ सरळ खोटी बातमी होती ती. आज इतक्या वर्षानंतर देखील ती बातमी वाचल्यावर तिच्यातली बेजाबदार विधानं उघड उघड दिसतात. आणि आज इतक्या वर्षानंतर देखील खोट्या बातमीतली खोटी विधानं स्पष्टपणे दिसू लागतात. ज्या वृत्तपत्राला आपण आता पर्यंत जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि कला संचालनालयासंबंधीतल्या बातम्या अत्यंत जबाबदारीनं दिल्या होत्या त्याच वृत्तपत्रात अशा स्वरुपाची बातमी यावी याचं मला अतिशय वाईट वाटलं.
ती बातमी येणार हे कळताच ती येऊ नये या हेतूनं मी लोकसत्ताचे तेव्हाचे संपादक श्री अरुण टिकेकर यांची भेट घेतली. भेट देण्यासाठी सुद्धा त्यांनी मला तंगवलं. वास्तविक पाहता त्यांचा दुपारचा चहा माझ्याच टेबलाजवळ व्हायचा. इतका त्यांचा माझा परिचय होता. पण त्यांची मती कुणीतरी भ्रष्ट करुन टाकली असावी. नेहमी सारखं बोलेनात, उडवा उडवीची उत्तरं देऊ लागले. ज्या वार्ताहराला त्यांनी ती बातमी करावयास दिली होती त्याला भेटा म्हणून ते सांगू लागले. वास्तविक पाहता तो वार्ताहर मला खूपच ज्युनियर होता. माझी जवळ जवळ पंधरा सोळा वर्षाची नोकरी त्या संस्थेत झाली होती. त्या अर्थानं मी तिथं ज्येष्ठ होतो. पण तरी देखील जेजे आणि कला संचालनालया संदर्भात बातमी आहे म्हणून मी त्याला भेटलो. त्याने शांतपणे सगळं ऐकून घेतलं. आणि चेहऱ्यावर कुठल्याही भावना न दाखवता शांतपणे बघूया म्हणाला. या त्याच्या वागण्याचा अर्थ उघडच होता.
बातमी त्याला, संपादक अरुण टिकेकर यांना आणि नांगरे व कंपूला हवी होती तशीच आली. आता सारखं तेव्हा नव्हतं. राज्यकर्ते वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांना घाबरुन असत. त्या काळी वृत्तपत्रातली चार ओळींची बातमी देखील राजकारण्यांना निर्णय मागे घेण्यास भाग पाडत असे. साहजिकच त्या बातमीमुळे संबंधित अधिकारी बॅकफूट वर गेले आणि नांगरे यांची धिंड काढता काढता वाचवली गेली.
भयंकर मनस्ताप देणारी घटना होती ती. पत्रकार म्हणवणारे देखील किती खालच्या दर्जाचं राजकारण खेळू शकतात, कुठल्याही थराला जाऊ शकतात हे त्या बातमीनं मला दाखवून दिलं होतं. वास्तविक पाहता ज्यांनी कोणी बातमी उघड करुन किंवा फोडून हा सारा प्रकार घडवून आणला होता त्यांचा माझा अर्थाअर्थी तसा काही एक संबंध नव्हता. वाद किंवा भांडण असण्याचा देखील काही प्रश्नच नव्हता. त्या आस्थापनेच्या दुसऱ्या विभागातली माझी नोकरी सांभाळून मी केवळ सामाजिक कार्य किंवा जबाबदारी या भूमिकेतूनच जे जे किंवा कला संचालनालया संदर्भात बातम्या देत होतो. अर्थातच त्या वृत्तपत्रातील माझ्या असंख्य मित्रांनी तसेच उच्च पदावरील अधिकाऱ्यांनी मदत केल्यामुळेच हे सारं शक्य झालं होतं. १९८१ सालापासून या संदर्भात दिलेल्या प्रत्येक बातमीचं कात्रण आजही माझ्यापाशी आहे. त्या बातमीमुळं पुढं काय घडलं याची माहिती मी आज इतक्या वर्षांनंतरही अचूकपणे देऊ शकतो.
त्या घटनेनंतर मात्र लोकसत्तेला मी चित्रकला विषयक बातम्या देणं बंद करुन टाकलं. मधल्या काळात म्हणजे २००० साली नोकरीची २० वर्ष पूर्ण होताच मी पत्रकारिता देखील सोडून दिली आणि लेखन, वाचन, चित्रकला आणि संपादन यांना माझा पूर्ण वेळ दिला.
बहुदा २००४ साल असावं. एके दिवशी दुपारी अचानक ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा मला फोन आला. केतकर तेव्हा दैनिक लोकसत्ताचं संपादक पद भूषवत होते. केतकर मला म्हणाले जे जे स्कूल ऑफ आर्टचं जे काही चाललं आहे ते योग्य नव्हे. तुझ्या सारख्या माहितगारानं त्या वर काहीतरी लिहायला हवंय. अन्यथा ती संस्था नामशेष होईल. साऱ्यांचं लक्ष तिथल्या जागेवर आहे. राज्यकर्ते तिथे टॉवरचं उभे करतील. एक संस्कृती लयाला जाईल.
त्यावर आधी घडलेला प्रकार मी त्यांना सांगितला. आणि मी का या संदर्भात लिहू शकत नाही ते देखील स्पष्टपणे सांगून टाकलं. ते म्हणले असं नाही चालणार. तू काहीतरी लिहायलाच हवंय. आता लोकसत्तेचा संपादक मी आहे. तू जे लिहिशील त्यातला एकही शब्द मी बदलणार नाही एवढी मी तुला खात्री देतो. त्यांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं माझी समजूत घातली आणि माझ्याकडून होकार देखील घेतला.
ती बातमी होती मुंबई विद्यापीठाच्या एमएफएच्या परीक्षेत जे जे स्कूल ऑफ आर्टचा, परीक्षेला न बसलेला विद्यार्थी पहिला आला होता त्याची. लोकसत्तेच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेल्या या बातमीनं जे जे स्कूल ऑफ आर्ट, कला संचालनालय आणि मुंबई विद्यापीठ व अर्थातच उच्च व तंत्रशिक्षण खातं. यांच्या अब्रूची अक्षरशः लक्तरं काढली. आणि सरकारला कारवाई करणं भाग पडलं.
आणि त्या नंतर मात्र मी सुटलोच जे जे स्कूल ऑफ आर्टला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानं जो सोहळा होणार होता त्या निमित्तानं मी एक भलीथोरली लेखमाला लोकसत्तेमध्ये लिहिली. ती अतिशय गाजली. पुराव्यानिशी सारा भ्रष्टाचार मी उघड्यावर आणला होता. पण भ्रष्ट अधिकाऱ्यांनी १९८६ सालापासून जी काही आपली घट्ट पकड त्या खात्यावर बसवली होती त्यामुळे भ्रष्टाचार उघडकीला आल्यावर देखील तोंडदेखली कारवाई करण्यापलीकडे ते काही करु शकले नाहीत. ( ज्यांना हे सारं वाचून ती लेखमाला वाचावी असं वाटेल त्यांनी कृपया ‘चिन्ह’च्या वेबसाईटला भेट देऊन ‘कालाबाजार’च्या अंकाची पीडीएफ वाचावी त्यात ती संपूर्ण लेखमाला दिली आहे. ( https://chinha.in/2008_
परिस्थिती इतकी बिघडून गेली आहे की आज तुकाराम मुंडेंसारखा कुणी कडक अधिकारी आला तरी त्यातून मार्ग काढू शकणार नाही. ती सुधारायची असेल आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट वाचवायचं असेल तर ते कला संचालनालयापासून दूर करणं अत्यावश्यक होतं. आणि ते अत्यंत अवघड असं काम माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यशस्वीपणे केलं. त्यासाठी त्यांनी अठ्ठावीस खासदारांना जेजेमध्ये आणलं आणि डिनोव्होचा मार्ग मोकळा केला. त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. ते मंत्री झाल्यानंतर एकदा अशीच त्यांच्या सोबत धावती भेट झाली होती. त्यावेळी ते म्हणाले होते ‘नाईक, तुमचं सारं लिखाण मी वाचलंय. काळजी करु नका, जे काही करायला पाहिजे ते मी करतोय.’ आणि त्यांनी ते खरोखरच करून देखील दाखवलं. मला मात्र ते अगदी अलीकडे म्हणजे वर्षा दीड वर्षापूर्वी कळलं.
आता उरलंय कला संचालनालय. त्याचा शेवट मात्र अटळ आहे. त्याला कुणीही वाचवू शकणार नाही इतक्या वाईट अवस्थेला ते पोहोचलंय. संपूर्ण भारतात एकमेव असलेलं कला संचालनालयासारखं खातं सरकारला बंद करण्याची वेळ आली आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे, पण ती वस्तुस्थितीच आहे. महाराष्ट्राच्या उर्वरित कला शिक्षणाबद्दल काय सांगावं ? नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम त्यांना त्यांची जागा दाखवून देईलच. या साऱ्याला कारणीभूत ठरले ते माजी कला संचालक नांगरे यांचे डावपेच. तिथूनच कला संचालनालयाला अवकळा येत गेली. आणि ज्या कला महाविद्यालयाचे नांगरे हे प्राचार्य होते त्याच कला महाविद्यालयात महाराष्ट्राचं सांस्कृतिक धोरण ठरवण्यासंदर्भात सुहास बहुळकर यांनी पहिली विचारसभा बोलवावी हा सारा प्रकार अत्यंत दुर्दैवी होता म्हणूनच त्याचा समाचार घेणं क्रमप्राप्तच होतं. म्हणूनच इतक्या विस्तारानं मी लिहिलं. या लेखमालेतील आणखीन एक लेख शिल्लक आहे त्यात मी अभिनव आणि नांगरे यांचे धागेदोरे आजपर्यंत कसे पोहोचतात या विषयी लिहिणार आहे. तूर्त इतकेच.
*****
– सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
Related
Please login to join discussion