No products in the cart.
शिक्षक भरती नि शिक्षणाला ओहोटी!
शिक्षक हा खरंतर आदराचा विषय. चांगला शिक्षक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवू शकतो, तर वाईट शिक्षक विद्यार्थ्यांचं भविष्य बरबाद करू शकतो. पण हल्ली शिक्षक हा चेष्टेचा विषय झाला आहे. विशेषतः कला महाविद्यालयात तर अधिकच. शासनसुद्धा शिक्षकांच्या निवड प्रक्रियेला शिक्षक भरती या शब्दात संबोधित करतं. ते उगाचच खोगीर भरती या शब्दाशी साम्य दाखवणार आहे असं आम्हाला वाटतं. अशीच तासिका तत्त्वावरील शिक्षक भरती छ. संभाजीनगर येथील शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयात झाली आहे. या भरतीमध्ये अनेक खटकणाऱ्या गोष्टी आढळून आल्या. त्यांचा समाचार घेणारा हा लेख.
मार्च -एप्रिल महिन्यात ‘ये कौन चित्रकार है’ ही आमची स्टोरी प्रचंड व्हायरल झाली होती. छ. संभाजीनगर कला महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी अगदी स्क्रीनशॉट काढून ही स्टोरी शेअर करत होते. वेगवेगळ्या ग्रुपमध्ये या स्टोरीचीच चर्चा होती. अर्थात या गोष्टीचा आनंद साजरा करावा अशी ही स्टोरी नव्हती. छ. संभाजीनगरच्या शासकीय कला महाविद्यालयातील शिक्षणाचा दर्जा कुठल्या पातळीवर घसरला आहे हे या स्टोरीतून दिसून येत होतं. निमित्त होतं महाविद्यालयाच्या वार्षिक प्रदर्शनाच्या निमंत्रण पत्रिकेचं. ही निमंत्रण पत्रिका एवढी वाईट होती की एखाद्या गल्ली बोळातला टिनपाट डीटीपी ऑपरेटरही यापेक्षा उत्तम पत्रिका डिझाईन करेल. ही पत्रिका कोणी डिझाईन केली याचा आम्ही थोडासा शोध घ्यायचाही प्रयत्न केला, तर माहिती कळाली की महाविद्यालयातील एका तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांनी (?) ही पत्रिका डिझाईन केली होती.
आता हा सगळा विषय पुन्हा इथे मांडण्याचं कारण हे की नुकत्याच शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय औरंगाबाद येथील तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या नेमणूका जाहीर झाल्या आहेत. तसं पत्रही आमच्याकडे पोहोचलेलं आहे. पण यातील नेमणूक झालेल्या शिक्षकांचा आम्ही थोडा अभ्यास केला तेव्हा असं निर्दशनास आलं की स्थानिक उमेदवारांना डावलून मुंबईचे दोन उमेदवार, ज्यांचा अनुभव आणि शैक्षणिक कामगिरी ही इतर उमेदवारांपेक्षा कमी असतानासुद्धा त्यांना नेमणूक देण्यात आलेली. आहे. रेखा व रंगकला या विषयासाठी ज्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये आठ आठ वर्ष अनुभव असलेल्या, ज्यांनी आधी सदरील महाविद्यालयात शिकवले आहे अशा अनेक उमेदवारांना डावलून मर्जीतल्या नवशिक्या उमेदवारांना शिक्षक म्हणून संधी देण्यात येत आहे.
शिक्षक एक जबाबदार व्यक्ती असते. अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य शिक्षकाची गुणवत्ता, सचोटी, व्यासंग यावर अवलंबून असतं. शिक्षकच जर चांगला आणि प्रगल्भ नसेल तर विद्यार्थ्यांचं भविष्यच धोक्यात येतं. त्यामुळे शिक्षकांची निवड ही अतिशय जबाबदारीने करणं क्रमप्राप्त आहे. कायमस्वरूपी प्राध्यापकांची निवड करून गलेलठ्ठ पगार देण्याची जबाबदारी अंगावर घेणं नको म्हणून शासनानं तासिका तत्वावर शिक्षक भरतीचा उपाय काढला. यामध्ये खरंतर नवीन अनुभवी उमेदवारांना संधी देऊन विद्यार्थ्यांना थेट मार्केटमधला प्रत्यक्ष अनुभव देणं शक्य आहे. कारण या १ वर्षाच्या करारामधील तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या तरतुदीमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेले अनेक शिक्षक नेमता येतात. पण या संधीचा फायदा न घेता शासकीय कला महाविद्यालयातील शिक्षक निवड करणाऱ्या पॅनेलने अनेक जुन्याच उमेदवारांना पुन्हा संधी दिली आहे असे दिसते. यापैकी किती उमेदवारांना थेट कामाचा अनुभव आहे? त्यांनी आपापल्या क्षेत्रात काही भरीव कामगिरी केली आहे का? याची कुठलीही शहनिशा न करता केवळ जागा भरण्याचं काम करणे आणि मर्जीतल्या उमेदवारांना संधी देणे असे प्रकार या भरतीमध्ये सर्रास दिसून येत आहेत.
यावर्षीच्या भरतीमध्ये तर नवीनच प्रकार पाहायला मिळाला. साबळे यांनी आपल्या मर्जीतील दोन विद्यार्थ्यांना सेट केले या जागांसाठी. या दोन जेजे स्कूल ऑफ आर्टच्या माजी विद्यार्थ्यांना तासिका तत्वावर शिक्षक म्हणून संधी देण्यात आली. अधिक चौकशी केली असता असे कळते की हे दोघेही २०२० चे पासआऊट विद्यार्थी असून ते विश्वनाथ साबळे यांच्या मर्जीतील विद्यार्थी आहेत. साबळे यांनी जेजे स्कूल ऑफ आर्टच्या नावाखाली घेतलेल्या अनेक प्रकल्पांवर ते काम करतात.
शिक्षक निवड समितीमध्ये प्रा. तरतरे यांचा समावेश होता. मुळात डिप्लोमा वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांची नेमणूक पदवीसाठी शिक्षक नेमणूक करणाऱ्या निवड समितीमध्ये नेमणूक होऊ शकते का हा अभ्यासाचा विषय आहे. तरतरे यांच्याबरोबर प्रा वडजे हे निवड समितीमध्ये होते. पण बहुदा छ. संभाजीनगरच्या महाविद्यालयाचे डीन असूनही त्यांच्या हातात निर्णय नसावा ही गोष्ट रेखा व रंगकला विषयासाठी निवडलेल्या शिक्षकांची यादी पहिली की दिसून येते. मुळात छ. संभाजीनगरच्या महाविद्यालयासाठी मुंबईवरून उमेदवार आयात करण्याची गरज का पडावी? इथेच शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर संस्थेच्या प्रमुखांना विश्वास नाहीये का? स्थानिक विद्यार्थ्यांना डावलून संस्थेचे प्रमुख आपल्याच शिकवण्याच्या क्षमतेविषयी एकप्रकारे अविश्वास दाखवत आहेत? बरं हे उमेदवार शैक्षणिकदृष्ट्या भरीव कामगिरी करणारे असते, कलाक्षेत्रात त्यांचा दबदबा असता तर आम्ही हे समजू शकलो असतो की त्यांच्या येण्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. पण हे मुंबईवरून आलेले नवीन उमेदवार अगदी तरुण आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिकवण्याचा कुठलाही अनुभव त्यांना नाही. केवळ साबळे यांच्यासाठी काम करतात हीच त्यांची जमेची बाजू. खरं तर निवड प्रक्रियेच्या दिवशी अशी कुजबुज होती की हे दोन उमेदवार सगळ्यांना आत्मविश्वासाने सांगत होते की आम्ही फक्त औपचारिकता म्हणून मुलाखतीला आलो आहोत. आमची निवड ही खुद्द साबळे सरांनी आधीच केली आहे. खरं खोटं काय ते त्या ‘विश्वनाथा’ला ठाऊक.
मुलाखत प्रक्रिया संपल्याच्या दुसऱ्या दिवशी डीन प्रा वडजे सर वैद्यकीय रजेवर गेले. त्यांनी गंभीर आजारपणाची रजा घेतली होती असे कळते. अजूनही ते रजेवरच आहेत. आता हा अभ्यासाचा विषय आहे की बरोबर मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या दुसऱ्या दिवशी एखादी व्यक्ती गंभीर आजारी कशी होते ? का फक्त मुलाखत प्रक्रिया पूर्ण करण्यापुरतं संस्थेत यायचं आणि आपल्या मर्जीतले उमेदवार निवडून काम पूर्ण झालं की संस्था वाऱ्यावर सोडून द्यायची असा काही प्रकार आहे.
तर या निवडप्रक्रियेतील सर्वच शिक्षकांनी आपल्या मर्जीतील उमेदवारांना निवडून नवा पायंडा पडला आहे. दोन उमेदवार हे साबळे यांच्या मर्जीतील आहेत. एक ‘गुप्त’ उमेदवार तरतरे यांच्या मर्जीतील तर काही विशेष उमेदवार हे वडजे यांच्या मर्जीतील आहेत. वडजे तर वर्षानुवर्षे त्याच त्याच उमेदवारांना संधी देतात. म्हणजे विद्यार्थ्यांच्या भल्याचा विचार न करता आपल्या मर्जीतील उमेदवारांची निवड करण्याचा हा जो प्रकार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यच अतोनात नुकसान होणार आहे. या अशा प्रकारामुळेच शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाला विद्यापीठाने ‘ड’ दर्जा दिला आहे.
या महाविद्यालयात घडणारा अजून एक भन्नाट प्रकार म्हणजे सदरील महाविद्यालयाच्या डीन साहेबांनी आपल्या मर्जीतल्या एका उमेदवाराला ऍडजंक्ट फॅकल्टी म्हणून नेमले आहे. कुजबुज अशी आहे की मागील वर्षी महाविद्यालयाची गाजलेली निमंत्रण पत्रिका याच महाशयांनी तयार केली होती. जर अनुभवी म्हणून नेमले जाणारे शिक्षक अशा पद्धतीनं काम करणार असतील तर विद्यार्थ्यांचं भविष्य खड्ड्यात जाण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. या फॅकल्टीवर उधळले जाणारे लाखो रुपये हे सामान्य करदात्याच्या खिशातून जातात, असे असताना विद्यार्थ्यांना एक चांगला शिक्षक देणे हे संस्थेच्या प्रमुखांचा काम असत. आपली जबाबदारी पार न पाडता खोगीर भरती करून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे हे महापाप आहे. वैभवशाली शासकीय महाविद्यालयांचे प्रमुख हे पाप दरवर्षी करतात आणि पुन्हा पुन्हा करतात. हेच महाराष्ट्राच्या कला शिक्षणाचं दुर्दैव आहे.
*******
Related
Please login to join discussion