Features

अशोकस्तंभांचा शोक !

नव्या संसद भवनावर उभारण्यासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय बोधचिन्हाचं सोमवारी नवी दिल्लीत अनावरण करण्यात आलं. त्या समारंभाची छायाचित्रं आणि बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आणि नेहमीप्रमाणे आधी समाज माध्यमांवर आणि नंतर विविध वाहिन्यांवर एकच गदारोळ उठला. ट्विटरवर मूळ अशोकस्तंभ आणि संसद भवनावरील नवीन अशोकस्तंभ यांची तुलना करणारी छायाचित्रं प्रसारित होऊ लागली. आणि बोल बोल म्हणता म्हणता व्हाटसऍप ग्रुपवर गरमागरम चर्चा रंगू लागल्या. अशा व्हाटसऍप समूहात नेहमी होतं तसंच इथंही घडलं. पाहता पाहता दोन गटात विभागणी झाली आणि नंतर मग एकमेकांवर तुटून पडणं वगैरे आलंच. हे सारं पाहिल्यावर मनात काही विचार आले आणि ते कागदावर उतरवल्याशिवाय आयमीन टाईप केल्याशिवाय राहावेना….

७०च्या स्कूल ऑफ आर्टच्या शिल्पकला विभागात सारनाथाच्या अशोकस्तंभाची १८ फूट उंचीची शिल्पाकृती साकार झाली होती. शिल्पविभागात प्रवेश केला की ती चार विशाल अशा सिंहांची पांढरी शुभ्र शिल्प प्रतिमा आपल्या भव्यतेमुळं म्हणा किंवा तिच्या सुबक अशा घडवणुकीमुळं तिथं आलेल्या प्रत्येकाचंच लक्ष हमखास वेधून घ्यायची. शिल्पविभागाच्या त्या अत्यंत भव्य अशा स्टुडिओत प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये बनवलेली ती शिल्पाकृती नंतरचा कितीतरी काळ आकर्षणाचाच विषय होती. मला वाटतं सडवेलकर सर सेवानिवृत्त झाल्यावर विद्यार्थाना काम करायला जागा अपुरी पडते असं दर्शनी कारण दाखवून जेव्हा ती तोडण्यात आली तेव्हा खरोखरच अतिशय वाईट वाटलं होतं.

जेजेमध्ये विधानसभेच्या इमारतीसाठी अशोकस्तंभाची १८ फुटी प्रतिकृती तयार करण्याचं काम चाललं होतं तेव्हाचं छायाचित्र. डावीकडे सर्वश्री मोहन साळसकर, शशिकांत पवार, श्री दत्ता सामंत, विधानसभेचे सभापती उत्तमराव पाटील, शिल्पकला विभागाचे विभागप्रमुख प्रा नीळकंठ खानविलकर, प्रा विठ्ठल शानभाग, जे जे स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता प्रा संभाजी कदम, विद्यार्थी सुखदेव पाठारे आणि कृष्णा पाटील, त्यांच्याशेजारी एमपी तथा मोरेश्वर पवार आणि श्री देशपांडे Photo credit : Krushna Patil

त्यावेळी मी जेजेमध्येच शिकत होतो, फाईन आर्टला. अगदी प्रारंभापासूनच मी वेगवेगळ्या चळवळीत असल्यामुळे फाईन आर्ट विभागातल्याच नाही तर शिल्पकला विभागातील शिक्षकांशी म्हणजे  साळसकर, सामंत, शानभाग इतकंच काय पण विभाग प्रमुख खानविलकर सरांसोबत देखील माझे संबंध अगदी मैत्रीपूर्ण होते. साळसकर आणि सामंत सरांसोबत अनेकदा दुपारी चहा घेण्याइतपत आमची जवळीक होती. शशिकांत उर्फ पप्पू पवार आणि एम पी पवार हे त्यावेळचे ज्युनियर शिक्षक तर जवळ जवळ मला समकालीन त्यामुळे त्यांच्याशी तर अगदी अरेतुरेतच गप्पा व्हायच्या. त्यातले साळसकर, शशिकांत पवार आता आपल्यात नाहीत. दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. पण बाकीचे सारे मात्र आजही आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. कलावंत कधीच सेवानिवृत्त होत नाही, तो शेवटपर्यत कार्यरत राहतो हेच या निमित्तानं जात जाता इथं मला अधोरेखित करावंसं वाटतं.

आज हे सारं मी का लिहितोय ? का ही अशी सारी ४० – ४५ वर्षापूर्वीच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट मधल्या शिक्षक – विद्यार्थ्यांची नावं मी इथं घेतोय ? तर याचं कारण असं की या मंडळींनीच महाराष्ट्र विधानसभेच्या तेव्हा नव्यानं बांधण्यात आलेल्या इमारतीवर बसवण्यात आलेला १८ फुटी अशोकस्तंभ त्यावेळी आमच्या जे जे स्कूल ऑफ आर्टच्या वास्तूतच तयार केला होता.  सर्वश्री प्रा नीळकंठ खानविलकर, हे आमच्या जेजेच्या शिल्पकला विभागाचे तेव्हा विभाग प्रमुख देखील होते. मग झालंच तर विठ्ठल शानभाग, मोहन साळसकर, धनंजय जिरग्याल, मोरेश्वर पवार, शशिकांत पवार ही शिक्षकांची टीम. दत्ता सामंत आणि दत्ता पाटील हे तंत्रज्ञ् आणि कृष्णा पाटील, सुखदेव पाठारे, श्री दत्त, श्री देशपांडे अशा चार विद्यार्थ्यांना घेऊन हे तब्बल १८ फुटी शिल्प अवघ्या चार किंवा पाच महिन्यात याच टीमनं पूर्ण केलं होतं.

मला चांगलं आठवतंय. एके दिवशी खानविलकर सरांच्या केबिनमध्ये गेलो तर सरांनी अगदी उत्साहानं माझं स्वागत केलं. दोन बोटांच्या चिमटीत धरलेल्या सिगारेटचा खोलवर झुरका घेऊन म्हणाले. अरे, ये ये बस बस !  म्हटलं काय सर ? काय विशेष ? बस म्हणून सांगताय काय आज काय चहा वगैरे पाजताय काय ? सर खुशीत दिसत होते, मी आपला उगाचच चहाचा विषय काढला तर सरांनी थेट घुसाळेना हाक मारली, घुसाळे म्हणजे आमच्या जेजेतले एक शिपाई. मुलांचं काम पाहून पाहून त्यानी देखील शिल्पकला आत्मसात केली होती. नंतर तर त्यांची काही शिल्प जहांगीरमध्ये मोठ्या प्रदर्शनात प्रदर्शित देखील झाली होती. घोसाळे येताच सरांनी त्यांना  लक्ष्मणकडून लगेच चहा आणण्याची सूचना केली.
प्रा नीळकंठ खानविलकर आणि अध्यापक एमपी तथा मोरेश्वर पवार यांनी तयार केलेली सारनाथच्या अशोक स्तंभाची प्रतिकृती जी अजूनही जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये आहे

मग मीच विषय काढला. काय सर आज काय विशेष ? तर सरानी खूण करून मला पेडस्टलवरचं शिल्प बघायला सांगितलं. म्हटलं ही तर सारनाथच्या अशोकस्तंभाची प्रतिकृती आहे. ही इथं कशी आली ? कुणी केली ? तर सर म्हणाले, थांब थांब सांगतो सांगतो सारं. अरे नुकताच सारनाथाला जाऊन आलो. एमपी देखील होता माझ्यासोबत. एमपी म्हणजे एम पी पवार. तो नुकताच जेजेत शिक्षक म्हणून रुजू झाला होता. ( अगदी अलीकडं तो जेजेचा ( अर्थातच ) प्रभारी अधिष्ठाता म्हणून सेवानिवृत्त झाला .) आम्ही दोघांनी मिळून ही प्रतिकृती तयार केली आहे. मला राहवेना मी भोचकपणा करून मध्येच म्हटलं ‘अप्रतिम आहे, पण कशासाठी केलीत तुम्ही ?’ तेव्हा त्यांनी सांगितलं की नरिमन पॉइंटला महाराष्ट्र विधानसभेची जी नवी इमारत होते आहे ना तिथं बसवली जाणार आहे ती इमारतीतल्या सभागृहाच्या वरती. ‘तिथून कुणाला दिसणार आहे ती ?’ मी आपला काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेलो. तर ते म्हणाले, ‘अरे ही नाही रे बाबा ! याच्यावरून १८ फुटाची मोठाली प्रतिकृती तयार करायची आहे. ती तिथं एवढ्या उंचीवर लावली जाणार आहे.’ ते सारं ऐकलं आणि मी थरारलोच. माझं आ वासलेलं तोंड पाहून सर म्हणाले, सरकारचं काम आहे. आपल्याला मिळालंय. उत्तमराव पाटलांनी खूप आग्रह धरलाय. बाबुराव पाठीशी आहेत म्हणून मी देखील धाडस करायचं ठरवलंय.

पाठयपुस्तकातल्या धड्यानंतर सारनाथच्या अशोकस्तंभाशी झालेला हा दुसरा परिचय.

मग रीतसर काम सुरु झालं. अगदी भला मोठा सांगाडा उभारला गेला. मग मातीकाम सुरु झालं. बापरे ते मातीकाम पाहुन आम्हा पेंटिगच्या विद्यार्थ्यांना तर धडकीच भरायची. पण अत्यंत शांतपणानं घोसाळे सारख्या अनेक शिपायांना माती मळताना पाहून आणि ती शिल्पात अत्यंत नेटकेपणानं  रचणाऱ्या साळसकर, जिरग्याल ( दोघंही आता हयात नाहीत ) शानभाग तसेच शशिकांत आणि एमपी हे दोन पवार, या शिक्षकांना आणि कृष्णा पाटील, सुखदेव पाठारे ( हा देखील अकाली गेला) श्री दत्त आणि श्री देशपांडे ( हे तर वयानं कितीतरी ज्येष्ठ, पण हॉबीचे विद्यार्थी ) यांना अगदी  मनापासून काम करताना पाहून इतकं मोठं काम सहजपणानं होईल याची खात्री पटली होती. अगदी तसंच होत गेलं.
विधानसभा इमारतीवरील अशोकस्तंभ
विधानसभा इमारतीवरील अशोकस्तंभ

मातीकामालाच जो काही वेळ लागला तोच. पण ज्या पद्धतीनं या साऱ्यांनी महिन्या दोन महिन्यातच शिल्पाचा जो काही मूळ ढाचा उभा केला तो खरोखरच अदभूत होता. त्या शिल्पाची सारीच नजाकत त्यांनी या क्ले वर्कमध्ये अगदी तंतोतंत आणली होती. एकदा कुणी मंत्री किंवा कदाचित विधानसभेचे सभापती येणार म्हणून सारनाथाच्या शिल्पावरून जी रिप्लिका सरांनी तयार केली होती ती देखील या क्ले वर्क शेजारी आणून ठेवली होती. ती पाहिल्यावर तर येणारे जाणारे सारेच या कामावर खुश झाले होते. तिथून मग ते काम त्या टीमनं अगदी झपाटल्यासारखं केलं.

मातीकामावरून मग मला वाटतं प्लास्टरचा मोल्ड तयार केला, त्यावरून मग प्लास्टरची प्रतिकृती केली गेली. मग मेणाचा मोल्ड काढला गेला. आणि मेणाच्या मोल्ड्वरुन मग ब्रॉन्झ कास्टिंग केलं गेलं. यातला तांत्रिक तपशील कदाचित चुकला देखील असेल कारण त्या घटनेला आता थोडीथोडकी नाही तर तब्बल ४३ वर्ष उलटली आहेत. तेव्हा चूकभूल द्यावी घ्यावी. अगदी शेवटचा कास्टिंगचा एपिसोड मला चांगलाच आठवतो. त्यादिवशी आम्ही सामंत आणि साळसकर सरांसोबतच होतो. एरवी सतत थट्टामस्करी करणारे सामंत सर त्यादिवशी जरा टेन्शनमध्ये होते. पण पाहिलं कास्टिंग यशस्वी झालं आणि मग सामंत सर नेहेमीसारखेच भंकस करायला मोकळे झाले होते.

महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात त्यावेळी जेजे संदर्भात वरचेवर बातम्या येत. या अशोकस्तंभाच्या कामासंदर्भात १९७९ साली प्रकाशित झालेली एक बातमी मला माझ्या संग्रहात सापडली ती इथं मुद्दामहून देत आहे. आता तिच्यातले तपशील गमतीदार वाटू शकतात. त्यावरून जेजेतल्या त्या वेळच्या राजकारणाची देखील कल्पना येऊ शकते.

महाराष्ट्र टाइम्स दि ८ फेब्रुवारी १९७९

मला चांगलं आठवतं की ज्या दिवशी तो अशोकस्तंभ विधानभवनावर क्रेन्स वगैरे मार्फत चढवला तेव्हा जेजेचे आम्ही बरेचसे विद्यार्थी ते अभूतपूर्व असं  दृश्य पाहायला विधानभवनात हजर होतो. तेव्हा काय व्हिडिओ बिडिओ काढण्याची पद्धत नव्हती नाहीतर काहीच नाही तर आज गेलाबाजार निदान युट्युब चॅनलवर तरी आम्ही नक्कीच दिसलो असतो. असो !

सारनाथच्या अशोकस्तंभाशी झालेली तिसरी भेट.

हे सारं मी सांगतोय कारण कालपासून नवी दिल्लीत सुरु झालेला नवा वाद हे एव्हाना वाचकांच्या लक्षात आलं असेलच ! त्याचं असं झालं की नवीन संसद भवनावर उभारण्यासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय बोधचिन्हाचं अनावरण सोमवार दि १२ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आणि त्याच्या बातम्या वृत्तपत्रात झळकताच नव्या वादाला तोंड फुटलं. त्या संदर्भात पहिली प्रतिक्रिया उमटली ती ट्विटरवर. अविषेक गोयल यांनी तर सारनाथच्या अशोकस्तंभाच्या दोन ( जिच्यात नव्या संसद भवनावरील स्तंभाच्या फोटोचा देखील समावेश होता ) प्रतिमा एकत्र जोडून दोन्हीतला फरक जाणवून दिला. आणि मग एकच धमाल सुरु झाली. ट्विटरच नाही तर फेसबुक, ईन्स्टाग्राम आणि अन्य समाज माध्यमांवर पोस्टवर पोस्ट पडू लागल्या. सारनाथच्या मूळ स्तंभांचे आणि प्रतिकृतींचे अनेक फोटो व्हॉट्सअपवरून येऊ लागले. विविध ग्रुप्सवर चर्चा होऊ लागल्या. वाद वाढू लागले. फेसबुकवर तर एकेका पोस्टवर पन्नास पन्नास शंभर शंभर प्रतिक्रिया येऊ लागल्या. नेहमीप्रमाणेच मोदींचे चाहते आणि मोदींचे विरोधक अशीच विभागणी आताही होऊ लागली / झाली. आणि असं झाल्यावर ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया येतात त्या सर्वसाधारणपणे वाचण्याच्या लायकीच्याच नसतात त्यामुळे त्या वाचायच्याच मी सोडून दिल्या.

नव्या संसद भवनावरील अशोक स्तंभाचा अनावरण समारंभ झाला तेव्हाचं छायाचित्र
पण मग मी त्यावर विचार करू लागलो.  वृत्तपत्रात त्या अनावरण समारंभाचे फोटो पाहिल्यावर आपल्याला नेमकं त्यातलं काय खटकलं ? मला खटकलेली पहिली गोष्ट म्हणजे सारनाथचा अशोकस्तंभ म्हणून ज्या काही दृश्य प्रतिमा माझ्यावर येऊन आदळल्या त्या प्रतिमांशी पाहताक्षणीच मात्र मी अजिबात समरस होऊ शकलो नाही हे खरं. सारनाथचा स्तंभ  प्रत्यक्षात मी कधी पाहिला नाही, पण मी त्याच्या दोन रिप्लिका मात्र अगदी जवळून पाहिल्या. अगदी हात लावून पाहता येईल इतक्या जवळच्या अंतरावरून पाहिल्या. आणि त्या मूळ स्तंभाची अतिशय सुंदर अशी छायाचित्रं देखील जवळून पाहण्याची मला संधी मिळाली. कदाचित त्यामुळेच ते फोटो पाहिल्यावर माझ्या मनात नकारात्मक भावना तयार झाली असणं शक्य आहे.
अनावरण समारंभाच्या जागेची सजावट ज्या बटबटीतपणं करण्यात आली होती ती पाहून तर मला धक्काच बसला. आपण एखाद्या राष्ट्रीय मानचिन्हांचा अनावरण सोहळा पाहतोय का एखादा धार्मिक सोहळा पाहतोय असा मला प्रश्न पडला. ज्या जागेत सदर समारंभ केला होता त्या जागेत लाल जाजम किंवा कार्पेट अंथरलं असणं आपण समजू शकतो पण मूळ शिल्पाभोवती रंगीत कपडा ( तोही बहुदा भगवा किंवा कदाचित लालही असू शकेल ) आणि त्या शिल्पाभोवती केशरी, पिवळ्या, लाल फुलांच्या माळा लावणं कितपत संयुक्तिक होऊ शकतं या विषयी माझ्या मनात जरूर शंका आहेत. कुणाही धर्मनिरपेक्ष नागरिकांच्या मनात त्या उमटू शकतात.

त्या साऱ्याचा दृश्य परिणाम असा झाला की त्या सर्व रंगीबेरंगी किंवा लालकेशरी जाजम, कार्पेट, कापड आणि फुलांवर ऊन पडून त्याचं परावर्तित प्रतिबिंब त्या स्तंभाच्या प्रतिकृतीवर पडलं आणि तो अतिशय उग्र दिसू लागला असावा असं माझं मत आहे. याचा अर्थ तो तसा नाही, किंवा त्यात काहीही चुकलेले नाही असं मात्र मी काही म्हणू शकणार नाही. याची कारणं अनेक. पण ती सांगण्यापूर्वी मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. मी ही जी विधानं करतो आहे ती या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांचा अभ्यास करून, तसेच या संदर्भात युट्यूबवर जे व्हिडीओज प्रसारित झाले आहेत ते पाहूनच करतो आहे, त्यामुळे माझ्या निरीक्षणाला निश्चितपणे काही मर्यादा आहेत हे मी नाकारणार नाही, पण आता कॅमेरा वगैरे तंत्रज्ञान देखील इतकं प्रगत झालं आहे की जगाच्या दुसऱ्या टोकाला बसून तुम्ही एक अगदी बारीकशी देखील चूक जगाला दाखवून देऊ शकता. त्याचाच फायदा घेऊन या संदर्भात मी काही खटकलेल्या गोष्टी पुढं मांडू इच्छितो.

सारनाथच्या वस्तुसंग्रहालयातला मूळ अशोकस्तंभ
संसदेच्या नव्या वास्तूवर विराजमान झालेला सुनील देवरेकृत अशोकस्तंभ
१) प्रथमदर्शनी या शिल्पाचं आकारमानच चुकलं आहे असाच भास होतो.
२) मूळ शिल्पापेक्षा या चारही सिंहाच्या छातीचा घेर जरा जास्त वाटतो.
३) मूळ शिल्पातील सिंहापेक्षा ते जरा जास्तच लठ्ठ भासतात.
४) मूळ शिल्पातील सिंहांच्या वयापेक्षा या शिल्पातील सिंहाचं वय जरा जास्तच वाटतं आहे.
५) मूळ शिल्पातील सिंहापेक्षा कपाळ जास्त मोठं वाटतं इतकंच नाही तर  त्यावर आठ्या पडल्या आहेत असा भास होतो.
६) मूळ शिल्पातील शिल्पाचे डोळे शांत भाव दर्शवतात तर या शिल्पातले डोळे वटारलेले वाटतात. त्यातल्या रागीट भावामुळे भुवया देखील आक्रसलेल्या वाटताहेत.
७) मूळ शिल्पातील सिंहाचे कान दिसत नाहीत या शिल्पातील कान मात्र खूपच गोलाकार भासतात.
८) मूळ शिल्पातील सिंह तरुण आणि रुबाबदार वाटतात. यातले काहीसे वयस्कर.
९) मूळ शिल्पातील सिंहाची तोंडं भारदस्त आहेत तर या सिंहाची तोंडं निमुळती आहेत.
१०) मूळ शिल्पातील सिंहाच्या तोंडातील सुळे चटकन पाहिल्यावर दिसत नाहीत, यातले फटकन दिसतात.
११) मूळ शिल्पातील सिंहाच्या जिभा आत आहेत तर यातल्या बाहेर आल्या आहेत.
१२) मूळ शिल्पातील सिंह शांत वाटतो तर या शिल्पातील सिंह चिडलेला वाटतो. चिडल्यामुळे त्याच्या नाकपुडीपासून डोळ्यापर्यंत गेलेली वळी शिल्पात अगदी स्पष्ट जाणवते.
१३) मूळ शिल्पातील अत्यंत रेखीवपणे रेखाटलेल्या आयाळींशी या शिल्पातील आयाळीचा दुरान्वयानेही संबंध नाही. अत्यंत पोरकटपणे ते तयार केल्या गेल्या आहेत.
१४) मूळ शिल्प बहुदा सॅण्ड स्टोनमध्ये कोरलेले असावे आणि सदर शिल्प ब्रॉन्झमध्ये केलेलं आहे. पण मूळ शिल्प कोरताना शेकडो वर्षांपूर्वी शिल्पकारानं सिंहाच्या आयाळीचे जे सुलभीकरण केलं आहे ते मात्र सदर शिल्पकाराला २०२२ सालात मातीकाम करतानाच करता येऊ नये याचे आश्चर्य वाटते.
१५) सिंहाचे पाय तर अत्यंत ओबड धोबड पद्धतीनं करण्यात आले आहे. त्यात कोणतीच कलात्मकता दिसत नाही. किंबहुना जोडकाम केलेले भाग स्पष्टपणे दिसत राहतात. इतकंच नाही तर वेल्डिंगचे सारेच्या सारे डाग तसेच ठेवले आहे की काय असे वाटत राहते.
हे झाले मूळ शिल्पाबद्दल, ज्यावर ते उभे आहे त्या पायथ्याविषयी लिहिणं हे तर अत्यंत अपमानास्पद आहे, इतकं ते वाईट आहेत. त्यात कोरलेले घोडा, हत्ती, बैल इत्यादी प्राणी तिसऱ्या किंवा चौथ्या दर्जाच्या कारागिरांनी तयार केले आहेत की काय असं वाटत राहतं, इतके ते वाईट्ट आहेत. आणि खालचं लोटस तर या शिल्पातून पूर्णतः गायबच आहे. का ते नंतर लावलं जाणार आहे ? हे देखील कळत नाही.
शिल्पकार सुनील देवरे यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं आहे की, ‘हे शिल्प मी सारनाथच्या शिल्पावरून जसंच्या तसं तयार केलं आहे. त्याचे मी आधी फोटो काढले आणि नंतर त्यावरून मी जशीच्या तशी प्रतिकृती तयार केली आणि मग हे मोठं शिल्प मी तयार केलं.’ पण या त्यांच्या विधानांवर विश्वास ठेवणं केवळ अशक्य आहे.
शिल्पकार सुनील देवरे हे देखील जेजे स्कूल ऑफ आर्टचेच विद्यार्थी ( आर्टस् नव्हे ). त्यांनी इंडिया टुडेच्याच मुलाखतीत म्हटलं आहे की, नऊ महिने हे काम चालू होतं. आणखीन कुठंतरी असंही वाचायला मिळालं की ९० कारागीर या शिल्पासाठी दिवस रात्र काम करीत होते. पण नव्या संसद भवनावर लावलेलं शिल्प पाहता त्यांचा हाही दावा अविश्वसनीय वाटतो.
विधानसभा इमारतीवरील अशोकस्तंभ

मुंबईच्या विधान भवनासाठी केलेल्या अशोकस्तंभाची प्लास्टर ऑफ पॅरिसची प्रतिकृती जवळजवळ चार – पाच वर्ष जेजेतच होती. त्यावेळी काढलेले मोल्ड देखील नंतर बराच काळ तेथे होते, पण नंतर विद्यार्थ्यांना जागा कमी पडते, असं कारण दाखवून जेजेच्या राजकारणात असलेल्या संबंधितांनी ती डमी नष्ट करायला लावली. त्यावेळी काढलेले मोल्ड देखील अशाच पद्धतीनं नष्ट केले गेले. थोडीशी दूरदृष्टी दाखवून त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी जर त्याची जपणूक केली असती तर जेजेला अशी असंख्य कामं आपणहून चालून आली असती असं मागे वळून पाहताना वाटतं. हे लेखन चालू असताना अनेक शिल्पकार मित्रांनी मदत केली. अनेकांनी सारनाथच्या अशोकस्तंभाच्या कुणीकुणी केलेल्या रिप्लिकाचे फोटो पाठवले. पण ती कामं पाहिल्यानंतर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये झालेली प्रतिकृती ९९ टक्के अचूक होती असं विधान अगदी सामान्य माणसं देखील ठामपणे करू शकतील याविषयी माझ्या मनात तरी शंका नाही.

वर उल्लेखलेल्या दोन ज्येष्ठांचे मार्गदर्शन त्यांनी घेतलं असतं तर नऊ महिने आणि ९० कारागीर हे गणित देखील त्यांना बदलता आलं नसतं का ? मुंबईतल्या विधान भवनावर लावलेला अशोकस्तंभ जे जे स्कूल ऑफ आर्टमध्येच अवघ्या चार फार तर पाच महिन्यात तयार झाला आणि त्यासाठी फक्त नऊ-दहा जणांचीच टीम कार्यरत होती. त्यातले तर चार विद्यार्थीच होते, दोन तांत्रिक भाग सांभाळणारे होते, तीन किंवा चार शिपाई माती मळत होते आणि अवघ्या सहा शिक्षकांनी १८ फुटी स्तंभ अवघ्या चार-पाच महिन्यात तयार केला असेल तर देवरे यांनी आपलं गणित नेमकं कुठं चुकलं ? हे पाहायला हवं होतं असं आता राहून राहून वाटतं.
या लेखाच्या प्रारंभी मी ७०च्या दशकात जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्राध्यापक नीळकंठ खानविलकर यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेल्या अशोकस्तंभाविषयी लिहिले आहे. तो अशोकस्तंभ लोटस सकट १८ फूट उंचीचा होता तर देवरे यांचा अशोकस्तंभ २१ फूट उंचीचा आहे. ज्यांनी तो तयार केला ज्यांच्या हाताखालीच जेजेमध्ये सुनील देवरे यांचं शिक्षण झालं त्या विठ्ठल शानभाग, एमपी तथा मोरेश्वर पवार यांचं मार्गदर्शन घेणं त्यांना काही फारसं अवघड नव्हतं, पण ते त्यांनी का घेतलं नाही हे समजणं कठीण आहे. प्राध्यापक खानविलकर आणि एमपी पवार यांनी तयार केलेली मूळ अशोकस्तंभाची प्रतिकृती देखील जेजेमध्ये उपलब्ध असताना तिचा वापर त्यांनी या कामाच्या अभ्यासासाठी का केला नाही ? हे देखील समजणं मोठं अवघड आहे.

या संदर्भात अधिक माहिती घेतली असताना असं लक्षात आलं की केवळ तीन साडेतीन लाख रुपयातच त्या काळात ते शिल्प पूर्ण झालं होतं. तेव्हा ती रक्कम प्रचंड वाटली होती. आज ४० वर्षानंतर त्या रकमेकडे पाहताना गम्मत वाटते. कारण कोट्यवधी रुपये या फसलेल्या कामासाठी खर्च केले गेले असणार. आता याची जबाबदारी कुणी घेणार आहे का ? अधिक चौकशी केली असता असंही कळलं की, या कामाला आयएस ऑफिसर्सच्या कमिटीनं मान्यता दिली आणि त्या कमिटीत एकही चित्रकार वा शिल्पकार नव्हता. असं असेल तर ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. असंही कळलं की, एक शिल्पकार या कमिटीत होते, त्यांनी या शिल्पाला विरोध देखील केला होता, पण तो या अधिकाऱ्यांनी मानला नाही. त्याचा निषेध म्हणून ते शिल्पकार या कमिटीतून बाहेर पडले. असं जर असेल तर ही गोष्ट देखील अतिशय गंभीर आहे.

आता पुढं काय ? एक कलावंत म्हणून मला हे काम अजिबात रुचलेले नाही. जेजेच्याच एका माजी विद्यार्थ्यानं इतक्या थिल्लर पद्धतीनं काम करावं याचं मला अतिशय वाईट वाटलं आहे. बहुसंख्य चित्रकार, शिल्पकारांच्या प्रतिक्रिया देखील माझ्यासारख्याच आहेत. असंख्य व्हॉट्सअप ग्रुपवर या शिल्पाच्या घडणीसंदर्भात अतिशय गांभीर्यानं चर्चा झाल्या आहेत. शिल्पकार सुनील देवरे यांच्याशी माझा परिचय नाही. त्यांच्याविषयी मला काही ठाऊक देखील नव्हतं. पण सुमारे महिन्याभरापूर्वी माझे मित्र डॉ. घनश्याम बोरकर यांनी मला श्री देवरे यांनी केलेल्या नग्न शिल्पांवरच्या कविता पाठवल्या तेव्हा ते मला ज्ञात झालं. त्या कविता मला आवडल्या होत्या आणि त्यांची शिल्प देखील. म्हणूनच ‘चिन्ह आर्ट न्यूज’वर आम्ही त्या प्रकाशित देखील केल्या होत्या. या अनावरण समारंभाची बातमी येताच डॉ. बोरकर यांच्याकडून श्री देवरे यांचा फोन नंबर देखील मी मागवून घेतला, त्यावर विशेष लेख प्रसिद्ध करावा म्हणून, पण फोटो जसजसे न्याहाळत गेलो तसतसा ती स्टोरी देण्यामधलं माझं स्वारस्य हळूहळू नष्ट होऊ लागलं आणि अखेरीस तर हे लिखाण मला करावं लागलं.

फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या समाज माध्यमांवर देखील या शिल्पाची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली गेली आहे. उत्स्फूर्तपणे शेकडो प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केल्या आहेत. या साऱ्याची नोंद सरकार घेणार आहे का ? सरकारला ती घ्यावयास विरोधी पक्ष भाग पाडणार आहेत का ? कारण प्रश्न एखाद्या शिल्पाचा नाही तर स्वतंत्र भारताच्या मानचिन्हाचा आहे !

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.