Features

समकालीन कलेतील गणेशाची रुपे

 गणेश या देवतेसाठी हिंदू धर्मात व लोकमानसातही प्रेमाचे स्थान आहे . गणेश ही विद्या व कलांची  देवता आहे . गणेश सर्वशक्तीमान आहे . गणेश हा विघ्नहर्ता आहे . अडचणींचा व विघ्नांचा नाश करुन , मांगल्याची व सुखाची संस्थापना करणारे हे दैवत आहे . यामुळे गणेशाच्या पूजनाशिवाय कोणत्याही शुभकार्याची सुरुवात होऊ शकत नाही : अशी या लोकप्रिय देवतेविषयी धारणा आहे . मागील दोन वर्षांच्या सक्तीच्या विश्रामानंतर , यंदा आपण सारे गणेशोत्सव अधिक हर्षोल्लासाने साजरा करत आहोत . यंदा गणेशोत्सवाचे एकशे एकोणतीसावे वर्ष आहे . १८९३ साली , लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये राष्ट्रीय एकात्मतेच्या आवाहनासाठी गणेशोत्सवाचा ‘ उपयोग करून घेतला आहे हे सूचक आहे . यावरून अव्याहतपणे चाललेल्या व गणेशरूपा भोवती गुंफलेल्या सामाजिक चळवळीचे व एक प्रकारे समाजबांधणीचे यश म्हणता येईल . पण हा केवळ उत्सव न रहाता : अनेक चित्रकार , शिल्पकार , मूर्तीकार , सजावट , लाईटिंग किंवा प्रकाश योजना , हस्तकला वस्तु , शुभेच्छापत्रे अशा कलेच्या अनेक क्षेत्रात अर्थाजनाच्या व उत्पन्नाच्या अनेक संधी मिळवून देणारे व्यासपीठ बनले आहे . 

अर्थातच कला निर्मिती व गणेशरूपे साकारण्याचे महत्व येथे दिसते योगायोग असा की , गणेश उत्सवाच्या आठच दिवस आधी , ” भारतीय समकालीन चित्रकलेतील गणेशाची रुपे ” या माझ्या शोधप्रबंधाला, सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठाची पी.एच.डी. पदवी देण्याची शिफारस करण्यात आली आहे . या संशोधन विषयाच्या अभ्यासाची आवश्यकता व तर्कसंगतता आपल्या लक्षात येते . आधुनिक काळातील चित्रकार , मूर्तीकार , बोधचित्रकार , सुलेखनकार , डिझाईनर्स अशा सर्व कलाकारांना , गणेशाची विविध रुप ही सृजनशीलतेला आवाहन करणारी एक प्रेरणा आहे याची आपल्याला जाणीव होते . आता आपण चित्रकलेतील गणेशरूपांचा  विचार करीत आहोत . समकालीन चित्रकारांच्या गणेशरूपां संबंधी विशेष अभ्यास व लिखाण झालेले दिसत नाही . मला एक चित्रकार व संशोधनकर्ता म्हणून या विषयावर संशोधन करण्याची प्रेरणा म्हणूनच मिळाली आहे . आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत . मागील ७५ वर्षाच्या काळात , भारतीय चित्रकला क्षेत्रात गणपती … गणेश या शब्दांनी  एक वेगळी समज निर्माण केली आहे .

 गतकालात मुंबईतील पथदर्शी प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपचे प्रणेते मकबूल फिदा हुसेन यांनी आपल्या कल्पनाविलासाने गणेशाची विविध रूपे साकार केली . अनेकानेक सृजनशील गणेशरूपांतून हुसेन यांच्या तरल प्रतिभेचा साक्षात्कार आपल्याला पहाता येतो . सहजसुंदर जोरकस रेखांकन  हे हुसेन यांच्या गणेशचित्रांतूनही आपल्या प्रत्ययास येते . हुसेन यांची गणेशावरील अनेक चित्रे ख्यातकीर्त झाली आहेत . प्रस्तुत संशोधनामध्ये , हुसेन यांच्या गणेशरूपांचे स्थान महत्वाचे आहे अग्रणी आहे . भारतीय समकालीन चित्रकलेतील गणेशरूपांचा अभ्यास करतांना विहित काळ हा १९९५ ते २०१५ असा आहे. हा काळ एक काल्पनिक किंवा नोशनल असा काळ आहे . प्रबंध संशोधकाच्या गणेशरूपांवरील चित्रकृतींच्या निर्मितीचा काळ आहे . त्याचप्रमाणे त्या काळातील अनेक चित्रकारांच्या गणेशरूपांचे निरीक्षण करण्याचा हा काळ आहे.  गणेशरूपांचा अभ्यास करतांना , १९०० सालापासून आजवरच्या काळातील विविध विचारधारा , विविध शैली असणाऱ्या १५ चित्रकारांची गणेशरूपे अभ्यासता आली व त्यांचे विश्लेषण करता आले . त्याचप्रमाणे १५ चित्रकारांचे प्रत्यक्षतः अथवा माध्यमातून गणेशरूपांविषयीचे विचार जाणून घेता आले . याशिवाय सात  चित्रकारांच्या मुक्त मुलाखतीतून त्यांचे विचार व त्यांची गणेशरूपे जाणून घेता आली . अशा एकूण ३७ समकालीन चित्रकारांच्या गणेशरूपांचा संशोधनात्मक अभ्यास करुन, काही  निरीक्षणे नोंदवता आली व निष्कर्षाप्रत येता आले . 

या चित्ररूप प्रश्नावलीतील चित्रकारांच्या गणेशरूपांचे  विश्लेषण करतांना , खालील मुद्यांचा साकल्याने विचार केला . ( १ ) गणेशाच्या मूर्तीची वैशिष्ठ्ये उदा . सोंड , कान , मस्तक , पोट , हात, पाय , आसन. ( २ ) चित्राची मांडणी , रचना. ( ३ ) रंगसंगती व रंगकामाची वैशिष्ट्ये. ( ४ ) चित्रातील रेषा.  ( ५ ) गणेशाचा आकार – रूप. ( ६ ) चित्रातील आशय , विचार , प्रतिकात्मकता. ( ७ ) आकाराच्या दृष्टीने वर्गीकरण . उदाः प्रतिरूप , अप्रतीरुप , शैलीदार , अलंकारिक , भौमितीक ईत्याdee. ( ८ ) चित्रात्मक अभिव्यक्ती : काही खास शैली , पोतनिर्मितीसाठी केलेले प्रयोग , काही खास सादरीकरण इत्यादी विश्लेषण केलेल्या काही चित्रकृतीतील गणेशरूपांचे निरिक्षण व विवेचन रसिकांना रंजक वाटेल पण  लेखाच्या विस्तारभयापोटी काही गणेशरूपांसंबंधी आपण जाणून घेऊ या , त्यातील काही वैशिष्ट्ये पाहू.

 मकबूल फिदा हुसेन : 

चित्रकृतीतील रेषा ठळक , स्पष्ट व जोरकस आहेत . काळ्या रंगामुळे आकार स्पष्ट व ठसठशीत दिसतात . रेषा काही ठिकाणी जाड बारिक असल्या तरी ठोस व ताकदीच्या  आहेत . ही कलाकृती प्रतिरूप व अप्रतिरुपाचे संमिश्र आविष्करण आहे . रंगसंगती उष्ण आहे . त्यातील पिवळ्या व शेंदरी रंगांचा वापर चित्रकृतीला आकर्षक बनवतो . सोंडेवरील , पितांबरावरील व कानांवरील हायलाईटस् चित्रकृतीत छायाप्रकाशाच्या नाट्याने  त्रिमितीचा आभास करतात . डाव्या बाजूला कललेली गणेशाची आकृती , चित्रकृतीमध्ये एक हालचाल व गतिमानता निर्माण करते. हातापायांचे बारकावे वा तपशील नसतांनाही ते तिथे असावेत असा एक भासमान प्रत्यय येतो . 

सतीश गुजराल : 

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भारतीय चित्रकारांमध्ये सतीश गुजराल यांच्या चित्रकारितेचे योगदान मोठे आहे सतत नाविन्याचा शोध व प्रयोगशीलता ही त्यांच्या चित्रकामाची खासियत म्हणावी लागेल . चित्रकृतीमध्ये गणेश हा एक महत्वाचा चित्रविषय असला तरी , त्या मागची कथा प्रतिकात्मक असावी . त्यामुळे हा आशय अप्रतिरुप असावा एखादा मुखवटा एखाद्या बालगणेशासारखा दिसतो आहे . त्याच्या शिरावरील मुकुट हा एखाद्या शिरस्त्राणासारखा भासतो आहे . चित्रातील संकल्पना प्रतिकात्मक , अप्रतिरूप असल्याचे आपल्या ध्यानात येते . समकालीन चित्रकृतीमध्ये अभिव्यक्तीचा प्रवास आकारांकडून आशयाकडे होतना या चित्रकृतीमधून पहायला मिळतो आहे . 


एस्.एम्.पंडित : 

प्रतिरूप किंवा वास्तववादी कलाप्रकारातील ही चित्रकृती आहे . ज्या मंचावर गणेश बसले आहेत तो  मंच सुवर्णजडित  व सुशोभित आहे . त्याचे स्वरूप वैभवी व राजसी आहे . रंगसंगती  अतिशय सौम्य , सुंदर व वास्तववादी रंग  वापरले आहेत . कलाकृतीतील रेषा या लयबध्द व प्रवाही  आहेत . त्यामुळे चित्रकृतीत एक संयमित गती निर्माण झाली आहे . एस्.एम् . पंडितांच्या काळात आधुनिक चित्रकला व आधुनिक विचारधारेचा प्रखर प्रवाह वाहत असतांना , पंडितांनी अंगिकारलेला वास्तववादी चित्रणाचा ध्यास वैशिष्ट्यपूर्ण म्हणायला हवा . या काळांत त्यांनी निर्माण केलेल्या दर्जेदार चित्रकृती हजारो रसिकांनी , कॅलेडर्सच्या स्वरूपात दीर्घकाळपर्यंत घराघरांतून आवडीने संग्रहित केल्या. कदाचित अशा प्रकारची लोकप्रियता व रसिकाश्रय इतर चित्रकारांना अभावानेच मिळाला असावा . 

जोगेन चौधरी : 

२१ व्या शतकातील समकालीन चित्रकारांत एक अग्रणी असलेले नाव म्हणजे जोगेन चौधरी त्यांच्या या गणेशरुपाला फिगरेटिव्ह अब्स्ट्रॅक्ट ‘ असा शब्दप्रयोग अधिक उचित वाटेल . यातील गणेशाची आकृती : मानवी किंवा दैवी आकृतीपेक्षा प्राणीस्वरूप किंवा हत्तीरुप अधिक वाटते . गणेशाची आकृती मांडी घालून आहे. तळव्यांची रचना पद्मासनाच्या पध्दतीची वाटते . पण येथेही त्याचे विरूपीकरण झालेले दिसते . गणेशाला ‘ त्रिनेत्र . गणपतीचा तिसरा डोळा दुर्जनांचं  शासन वा नाश ही प्रतिकात्मकता चित्रकाराच्या मनांत असावी का असं विचारावसं वाटतं . या चित्रातील माध्यम व रंगसंगतीचा विचार करतांना , आपल्याला जोगेन चौधरींच्या सिग्नेचर स्टाईलचा प्रत्यय घेतो . ब्लॅक इंकच्या एकमेकांना छेदणाऱ्या , म्हणजे क्रॉस हॅचिंग  ‘ पद्धतीच्या रेषांवर ‘ पेस्टल् ‘ माध्यमातून आच्छादन करून छाया प्रकाशाचे परिणाम साधले आहेत . रंगसंगती ‘ मिनिमलीस्टिक किंवा कमीत कमी रंगांची आहे . हात – पाय , सोंड , मस्तक , हातांची , बोटांची ठेवण , बाहुंची ठेवण ही समकालीन चित्रणाची खासियत म्हणून सांगता येईल . चित्रकाराच्या सहजस्फूर्त अभिव्यक्तीचे दर्शन येथे होते . अभ्यासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे.  


सुजाता बजाज : 

या मूळच्या पुण्याच्या चित्रकार . आज आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकार आहेत . १९८५ सालापासून आजतागायत जवळजवळ ३५ वर्षाचा कालखंड त्या ‘ गणेश ‘ या विषयावर कार्यरत आहेत . भारतीय चित्रकाराने आंतरराष्ट्रीय स्तरावर गणेश ‘ या विषयावर इतक्या दीर्घकाळ यशस्वी काम करणं हे प्रबंध विषयाच्या अभ्यासात अतिशय सूचक व बोधप्रद आहे असं वाटतं . या दृष्टीने या कलाकृतीचा समावेश आवर्जुन करण्यात आला आहे . या अभ्यासातील ही एक पूर्ण केवलाकारी वा अप्रतिरूप कलाकृती आहे . गणेशाच्या मस्तकाच्या जागी चित्रकर्तीने एक वर्तुळाकार , गतीमानतेने चक्राकार आवर्तने करणारी आकृती दाखवली आहे . चंद्राकृतीचे सूचन कदाचित त्यात असावे . त्याच्या पार्श्वभूमीचा आकार हा एखाद्या पंचकोनाच्या  मुकुटासारखा  अप्रतिरूप असाव अशी रंगसंगती , रंगलेपन वा तंत्र : याचा विचार करता  सुजाता बजाज यांनी स्वतः विकसित केलेलं मिश्रमाध्यमाचं तंत्र या चित्रकृतीत वापरलं आहे . यामध्ये ग्राफिक आर्ट- ‘ प्रिंट मेकिंगचे तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे . २०१६ साली मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीतील त्यांच्या गणेशावरील प्रदर्शनात माझी त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली , त्यावेळी गणपती हा मित्र , गुरु , मेंटॉर आणि आनंद , उत्साह व उत्सव , शक्ती , ऊर्जा यांचा पुरस्कर्ता म्हणून मला अतिशय प्रिय आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले . 

रामचंद्र खरटमल 

रामचंद्र खरटमल  यांच्या या चित्रकृतीत , प्रतिरूप व अप्रतीरूप  चित्रांकनाचा मिलाफ दिसतो त्यांच्या चित्रकृतीमध्ये वाकळ ( Quilt ) आणि त्यावरील नक्षी , त्यावरील धावदोऱ्यांच्या शिलाईचा आभास ही एक खासियत आहे . या चित्रकृतीतील वाकळ अथवा गोधडी सदृश रचना हे एक प्रतिक आहे . वाकळ ही मायेची उब दर्शवणारे एक प्रतिक आहे . या गणेशरूपातील या प्रतिकाद्वारे अनेक अव्यक्त कथा व चित्रकाराच्या मृदु स्वभावाचा व मायेच्या ओलाव्याचा परिचय व पुर्नप्रत्यय आपल्याला येत रहातो . चित्रकारांच्या आंतरिक भावनांचे प्रतिबिंब या गणेशस्पाच्या चेहेऱ्यावरील प्रसन्न भावातून आपल्याला दृगोचर  होते . या प्रसन्न भावात आपण रंगून जातो . 

या प्रबंधातील अनेक वैशिष्टपूर्ण गणेशांच्या अभ्यासातून , चित्रकार व कलारसिकाच्या मुलाखतींतून अनेक निरीक्षणे पुढे आली . यामधून अधिक विचार व अभ्यासाला वाव आहे . त्यातील काही निरिक्षणे आपल्याला रंजक वाटतील . 

  • गणेशाचे पूर्णपणे अप्रतिरुप किंवा केवलाकारी आकार अभावानेच दिसतात . 
  • गणेशाच्या आकाराचे विरूपीकरण – डिस्टॉर्शन करणे हे समकालीन चित्रणाचे वैशिष्ट्य आहे . 
  • गणेशाच्या मूळ आकाराचे संदर्भ लक्षात घेतांनाही , प्रत्येक चित्रकाराने आपल्या सृजनशील विचारांनी गणेशाच्या रुपात विविधता आणली आहे .
  • प्रत्येक चित्रकाराने आपली स्वतंत्र शैली विकसित केली आहे . चित्रकारांनी गणेशाच्या मूळ आकाराशी साधर्म्य राखत आपल्या आकारात विविधता आणली आहे .
  • पौराणिक व मूर्तीशास्त्रीय संदर्भानुसार द्विशुंड , त्रिशुंड , पंचमुखी व अनेक भुजा असलेली गणेशाची रुपे मूर्तीमधून पहाता येतात . परंतु बहुतांशी समकालीन चित्रकारांनी आपल्या चित्रकृतीत , एकच सोंडेचा गणपती चित्रित करणे अधिक पसंत केले आहे . 
  • गणेश मूर्तीमधील ‘ वैनायकी ‘ हे गणेशाचे स्त्रीरूप , शक्तीरूप अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे- समकालीन चित्रकारांना हे रूप का स्फूर्तीदायक वाटले नाही असा प्रश्न विचारावासा वाटतो . 
  • समकालीन गणेशरुपात , उजव्या व डाव्या सोंडेचे , सरळ सोंडेचे गणपती निरिक्षणात आले . परंतु अधिकाधिक गणपती डाव्या सोंडेचे आहेत असे निदर्शनास आले . परंतु चित्रकारांच्या चर्चेमधून हेही लक्षात आले की , प्रत्यक्ष चित्रणाच्या वेळी , सोंडेची दिशा ही स्वयंस्फूर्त असते . विशिष्ट नसते . 
  • गणेशरूपांच्या चित्रणामागे धार्मिक , अध्यात्मिक विचार असू शकतात पण बहुता.श समकालीन चित्रकारांना गणेश हा देव न वाटता मित्र , सखा , गुरु , मेंटॉर अधिक वाटतो . 

*****

– मिलिंद फडके. 

लेखक हे अभिनव कला महाविद्यालयात ज्येष्ठ अध्यापक असून समकालीन चित्रकलेतील गणेशाची रूपे या विषयावर त्यांनी पी.एच.डी पूर्ण केली आहे. 

 

‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा

https://chat.whatsapp.com/J3E5Y5hTzDXEEWD4cQW2rP

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.