No products in the cart.
काय आहे यंदाच्या मुखपृष्ठांचे चित्र
दिवाळी अंकांचे मुखपृष्ठ पाठवण्याचे आम्ही जे आवाहन केले होते त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. मराठीतल्या सगळ्या महत्वाच्या अंकांच्या संपादकांनी आम्हाला मुखपृष्ठे पाठवली. दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठामागे चित्रकाराचा काय विचार आहे हे वाचकांना कळावे हा आमचा हेतू होता.
दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ हा देखील एक स्वतंत्र विषय असतो. अनेक प्रकाशने दिवाळी अंकाच्या बरोबरच मुखपृष्ठाचीही आधीपासून तयारी करतात. मुखपृष्ठामागे चित्रकाराची मेहनत आणि विचार असतो. या मुखपृष्ठांच्या संग्रहातून अनेक वाचकांना आनंद मिळतो. अनेक वाचक स्वतंत्र कलाकृती म्हणून या मुखपृष्ठांच्या साहाय्याने आपल्या घरातल्या भिंती सजवतात.
नेहमीप्रमाणे मौजेने ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या चित्राकृतीला मुखपृष्ठावर स्थान दिले आहे. यावर्षीही बहुतांश दिवाळी अंकांची मुखपृष्ठे अन्वर हुसेन आणि सुभाष अवचट यांनी केली आहेत. धनंजय गोवर्धने यांनीही शब्दालय, अनुबंध या दिवाळी अंकांची मुखपृष्ठे केली आहेत. हे सर्व दिग्गज चित्रकार आहेत. पण दिवाळी अंकांनी कुठेतरी नवीन चित्रकारांनाही दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठासाठी संधी द्यावी असे वाटते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठांचा हा नजराणा खास चिन्ह आर्ट न्यूजच्या वाचकांसाठी !
“सामान्य माणसांचं रोजचं जगणं हे माझ्या साठी खूप महत्वाचं आणि कुतूहलाचं आहे. त्यांचा रोजचा संघर्ष मला माझ्या आसपास सतत दिसत राहतो. माणसांच्या जगण्याचे अनेक कंगोरे उमजत राहतात. अडचणींवर मात करत रोज नव्या दिवसाला तोंड देणारी ही माणसं खूप चिवट पणे उभी राहिलेली दिसतात. स्वतःसोबत आपलं घर, कुटुंब, नाती सांभाळत जपत त्यांचा प्रवास चालू असतो. अनेक साधनांची, मौज मजेची त्यांच्या आयुष्यात कमतरता असूही शकते, तरीही त्याची खंत न मानता छोट्या छोट्या गोष्टींमधून माणसं आनंद मिळवत राहतात. असे अनेक क्षणही मी अनुभवत राहतो. त्यापैकीच एक क्षण या चित्रात व्यक्त केला आहे. दिवाळी आलीय तोंडावर. सर्वत्र उत्साह भरून राहिलाय. बाजारपेठ गजबजून गेलीय. दूर गावाबाहेर जाणाऱ्या त्या पायवाटेवरून निघालेला तो म्हातारा उत्साहात घराच्या दिशेने निघालाय. जाताजाता त्याने अगदी आठवणीने गावातुन आकाशकंदील घेतलाय विकत. आणखीही काही गोष्टी त्याच्या सायकलच्या हँडल ला लावलेल्या पिशवीत आहेत. कदाचित त्यात नातवंडांसाठी फटाके, किल्ल्यावरची चित्रं, सुगंधी तेलं,साबण असलं काही असेल. तो सायकल चालवत निघालाय घराच्या दिशेने, माळावरून जाणाऱ्या त्या पायवाटेला थोडासा चढ लागलाय, म्हाताऱ्याला तो चढ झेपत नाहीए. तो सायकल वरून उतरून निघालाय मग घराच्या दिशेने….मी दूरवरून त्याच्या मनात भरून राहिलेला दिवाळीचा उल्हास मनभरून बघत राहतो.”
– अन्वर हुसेन
“माझ्या आसपास जे काही आहे, त्याचं मला खूप आकर्षण आहे. निसर्ग, गावं, शहरं, नद्या,डोंगर, आकाश, माणसं, त्यांच्या वापरातल्या वस्तू, घरं, पुस्तकं.. खूप काही. माणसांचे दैनंदिन जीवन, त्यांच्या गप्पा, विश्रांती, प्रवास, त्यांचं काम. हे सगळं मला त्या त्या लोकांशी जोडतं. त्या त्यातून त्या माणसांचं जगणं मला कळतं. त्यात मला अनेक कहाण्या दिसतात. त्यातून चित्रं होत जातात.ऋतुरंग च्या मुखपृष्ठावर असलेलं शाळेला निघालेल्या दोन मित्राचं चित्रही यापैकीच आहे. माझा शाळेशी प्रत्यक्ष संबंध सुटून बरीच वर्षे झाली होती, पुन्हा माझ्या मुलीला शाळेत सोडण्याच्या निमित्ताने नव्याने शाळा मलाही भेटली. रोज न चुकता सकाळ संध्याकाळ शाळेत मी जायला लागलो. त्या वेळी वेगवेगळ्या वयाची कित्येक मुलं मुली, त्याचं शाळेतलं, वर्गातलं, ग्राउंड वर च वावरणं या सगळ्यात मी गुंगून जायचो. मुला मुलींचं शाळेला येणं जाणं. पावसात भिजणं, ग्राऊंडवर मनसोक्त खेळणं, भांडणं, अनेक गोष्टी अनुभवत राहिलो. त्यातून काही चित्रं झाली. त्या पैकीच हे एक चित्र आहे. जे ऋतुरंग च्या दिवाळी 2022 च्या अंकावर आहे. हे चित्र जलरंगात केलेलं आहे. सायकल वरून डबल सिट शाळेला निघालेले दोघे मित्र आहेत. शाळेकडे जाण्या येण्याच्या वाटेवर खूप मुलं मुली दिसायची. पण बहुतांश विध्यार्थी आजच्या काळातल्या नव्या टाईपच्या स्टायलिश सायकली घेऊन एकेकटे जाताना दिसायचे. क्वचित कोणी चित्रातल्या सारखी सायकल घेऊन जाताना दिसायचे. मग तशी सायकल आणि तो युनिफॉर्म पाठीवर पुस्तकांची बॅग हे सगळं बघून माझं मनही न कळत शाळेच्या दिवसात जायचं. मित्रांच्या सायकलींवर मागे बसून गावाबाहेरच्या रस्त्यांवर फिरणं आठवायचं. खूप काही त्या दिवसातल्या आठवणी येत रहायच्या…
तेच मग चित्रात उतरलं एक दिवस…”
– अन्वर हुसेन
चित्रावरचे भाष्य :
“नैसर्गिक अन्नसाखळीचं…
भगव्याची हिरव्याची
निळ्याची पिवळ्याची
आणि काळ्यापांढर्यासहीत
तानापिहिनिपाजा अशा सगळ्या
एकमेकांत पाठमोर्या सुर्या खुपसून
रोज नवीन तयार होणारी उपरंगांच्या गढ्यांतली
ही लालभडक खुर्ची हिंसा गुदमरतेय आतल्याआत
शहरात झोपटपट्टीत गावात अत्रतत्र सर्वत्र
प्रार्थनागृहांतून ढळढळीत सांडणारी मानवी…
– नैसर्गिक अन्नसाखळीचं समजू शकतं कोणीही!… “
– सुधीर देवरे
“एखाद्याला त्याच्या कवितेच्या किंवा सृजनात्मक कलाकृतीच्या निर्मितीनंतर त्याचा अर्थ सांगावा लागू नये. तो सहज या हृदयीचे त्या हृदयी श्वासासारखा सहज समजत जावा अशी कलाकाराची अपेक्षा असते. पण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये कला प्रकाराला महत्त्व दिलं जात नाही आणि सद्यस्थितीत कला हा विषय काढूनच टाकण्यात आला आहे. त्यामुळे कलेचा आस्वाद कसा घ्यावा ह्याचं शिक्षण शाळेपासूनच देणं आवश्यक आहे पण ते दिलं जात नाही. त्यामुळे समाजामध्ये ‘दृष्यअशिक्षितता’ आहे. चित्र समजावून घेण्यासाठी चित्राशी संवाद साधायला हवा. आपण फक्त चित्र बघतो कारण ते आपल्या दृष्टीच्या आकलनात सहज सरावाचं आहे. पण चित्रापासून थोडं दूर/तटस्थ होऊन त्या चित्राकडे पहाणं आवश्यक असतं. अनेकदा चित्रकारही स्वतः चित्रापासून थोडं दूर होऊन तटस्थपणे चित्राकडे बघतो तेव्हा त्याला त्यातले गुणदोष दिसतात आणि मग तो दोष दूर करण्याचा प्रयत्न करतो. रसिकांनी चित्राकडे तटस्थपणे पहावं, चित्राशी संवाद
साधण्याचा प्रयत्न करावा. रंग, रंगलेपनाची पद्धत. रंगाचा कमी जास्त, जाड, घट्ट, पातळ, तरल असा वापर कुठे? कसा? आणि का केला असेल असे प्रश्न स्वतःला विचारायला हवेत.
असे प्रश्न रसिकांच्या मनात निर्माण झाले की त्याची उत्तरं त्याला त्याच्या सुप्त मनात दिसू लागतात. त्या शक्यता असतात, उत्तराच्या जवळ जाण्याच्या प्रत्येक कलाकार निर्मिती करताना स्वतः आनंद घेत असतो. जी कलाकृती निर्माण करताना सहज, उत्स्फुर्त असे रंगलेपन होते जे मनातून आलेले आणि मनाजोगे स्थिर झालेले असतात तेव्हा ते रंगच ठरतात. पुढचा दुसरा कोणता रंग त्या चित्रात कुठे आणि कसा असावा या अंत:उर्मीने कलाकार ते चित्र रंगवतो. त्या क्षणाची त्याची भावावस्था त्या रंगातून येते, त्या उत्स्फुर्त सर्जक फटकाऱ्यातून येते. एकावर एक थर लेपन करताना जुना थर लोप पावतो आणि नवा थर एकावर एक थर चढत जातो. एकाचा अंत ही दुसर्याची सुरुवात असते. अंधाराचा अंत हीच प्रकाशाची सुरुवात असते. निळा, जांभळ्या रंगानंतर फिकट निळा, हिरवा निर्मितीचा लवलवता पोपटी आणि जीवनाचा निळा. सळसळतं पाणी त्याचं साचलेपण त्याचं प्रवाहीपण, पांढरे पक्षी आणि पक्षाच्या अवकाशातील स्वच्छंदी विहरण्याने मोकळा श्वास, आनंद, उल्हास, उत्साह सळसळतं चैतन्य सारं काही जाणवत रहाते.”
– धनंजय गोवर्धने
“यशवंत देशमुख हे आजच्या भारतीय समकालीन दृश्यकलेतील एक महत्त्वाचे नाव. यशवंत देशमुख यांची चित्रसृष्टी वस्तू (ऑब्जेक्ट) च्या प्रतिरूप होण्यासाठी ओळखली जाते. विदर्भातील एक खेडे ते महानगर असा प्रवास केलेल्या यशवंत देशमुख यांच्या कलासर्जनात अगदी रोजमर्रा असणाऱ्या वस्तूंची प्रतिरूपे आहेत, तशी कल्पिता तू नवे रूप धारण करणारी वस्तूंची परावर्तित रूपेही. वस्तूची (ऑब्जेक्ट) असणारी ओळख निरस्त करून तिला एक नवीन ओळख देण्याचा सर्जनशील प्रयत्न इथे जसा दिसतो, तसा तिचे निर्जीव महत्त्व नाकारून त्या वस्तूला अधिक बोलती करण्याचा, सजीवत्व देण्याचा प्रयत्नही. येथे साकारण्यात आलेली कलाकृती – ‘भवताल – सर्जन – वस्तू’ यांच्यातले एक नवे द्वैत उभे करणारी आहे. तलवार (शस्त्र) या वस्तूचे केवळ प्रतिरूपच नाही तर त्याच्या अवकाशाचे स्थानांतरण इथे केले गेले आहे. कोणतीही कलाकृती पाहणाऱ्याला दृश्य अनुभव देण्याचे एक विशिष्ट कार्य करत असते. नि हा दृश्य अनुभव जर भवतालाशी निगडित असेल तर ती कलाकृती केवळ कला रूप न राहता तत्कालीन वर्तमानाला दिलेला प्रतिसाद प्रतिरोध म्हणूनही एक नवे रूप धारण करत असते. यशवंत देशमुख यांच्या आजवरच्या सर्जनातून हे द्वैत वारंवार नवे रूप घेऊन समोर आले आहे. ते भारतीय कलेला समृद्ध करणारे आहे.”
“मानवी जगाचा एकूण विश्वाचा पसारा ज्या पाच तत्त्वावर उभा आहे… ही पाच तत्वे कलेतही आपले अस्तित्व टिकवून ठेवत असतात. विशेषतः जे जे अमूर्त आहे, निराकार आहे तिथे त्या पंचभुतांचा आढळ ठळक असतो. रवी मंडलिक हे समकालीन भारतीय अमूर्त कलेतील एक महत्त्वाचे नाव. झपाटून टाकणारी निसर्गाची विविध रूपे त्यांच्या आजवरच्या सर्जनात सातत्याने आली आहेत. तिथे ढगांचा कोसळत जसा आहे तसा अमर्याद अरण्याचा मोहवून टाकणारा, गारुड करणार एहसास आहे. या घनदाटपणाची विराटपणाची स्खलित होणारी असंख्य निराकार प्रतिरुपे या चित्रातून पाहता येतात. रंगाचा निसर्गतः एकमेकात मर्ज होणारा, रंगाचे आदिम असे कोलाज निर्माण करणारा प्रभावी वापर हे मंडलिक यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य.”
“दिन दिन दिवाळी … गायी म्हशी ओवाळी … लहानपणी हे गाण ऐकायचो . आता आतासा त्या ओळींचा अर्थ लक्षात येतो आहे . गुराढोरांच्या मदतीने शेतशिवारं फुलत , फळत , बहरत असायची . त्यामुळेच आनंदात दिवाळी साजरी करता यायची . त्यांच्याप्रती प्रेम , आदर व्यक्त करण्यासाठी हे गाणं आहे गावात अलिकडे जनावर खूपच कमी होत आहेत . शेणामुळे जमिनीचा कस वाढतो. हे आम्ही विसरलो आहोत सायनिक खताच्या वारेमाप वापराने जमिनी ओसाड होत आहेत. आज जगभर निकस जमीनी वाढत आहेत . एएका गायीच्या वा म्हशीच्या वर्षभरातल्या शेणावर तीस एकर जमिनीचा कस वाढू शकतो. शेतीतज्ञ प्रयोग करून या निष्कर्षावर पोचले आहेत. गोवंशाच्या मलमूत्राचे महत्व भविष्यात आणखी वाढणार आहे. हा विषय सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी हा आमचा लहानसा खारीचा वाटा. शेण नव्हे मित्रांनो ते सोनं आहे…!”
-पुंडलिक वझे
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion