Features

द्रविडच्या चित्रकार आईचं चरित्र !

काही महिन्यापूर्वी राहुल द्रविडच्या चित्रकार आई डॉ. पुष्पा द्रविड यांचं चरित्र प्रकाशित झालं. आता साक्षात ‘द वॉल’ राहुलच्या आईचं चरित्र असल्यामुळे सोशल मीडियावर त्याबद्दलची पोस्ट प्रचंड व्हायरल झाली, नाहीतर चित्रकाराला आपल्या समाजात एवढा मान कुठे मिळतो ? पुस्तकाच्या मुखपृष्ठामुळे जरी या चरित्राबद्दल अपेक्षा वाढत असल्या तरी पुस्तक वाचताना अनेक त्रुटी दिसून येतात. या पुस्तकाला चांगल्या संपादकाची गरज होती असे पदोपदी जाणवत राहते. असे असले तरी तरुण चित्रकारांनी विशेषतः चित्रकला क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या मुलींनी हे चरित्र जरूर वाचले पाहिजे. कर्नाटकसारख्या काहीशा कर्मठ राज्यात राहून एका महिला चित्रकारानं  चाळीस – पन्नास वर्षांत एवढे उत्तुंग करिअर घडवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. राहुल द्रविड क्रिकेटर असल्याने त्याच्या आत्मचरित्रावर वाचकांच्या उड्या पडतात. पण द्रविडच्या आईचं कर्तृत्व राहुलच्या कर्तृत्वापुढे कुठेही कमी नाही, कदाचित काकणभर सरसच आहे, असे असताना केवळ चित्रकार असल्यामुळे त्यांचं चरित्र एका मर्यादित परिघापुरतंच राहता काम नये. चित्रकला आवडणाऱ्या, किंवा चित्रकार असलेल्या आपण सगळ्यांनीच या चरित्राला उचलून धरायला हवेच.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातली गोष्ट कदाचित डिसेंबरच्या पहिल्या आठवडयातली देखील असेल. क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्या आईचं चित्रकार डॉ पुष्पा द्रविड यांच्यावरचं ‘कॅनव्हास ते वॉल’ हे पुस्तक प्रकाशित झालं होतं. आणि त्या संदर्भात समाजमाध्यमांवर एक पोस्ट प्रसिद्ध झाली होती. त्या पोस्टमधील छायाचित्रात राहुल आणि त्याचा भाऊ विजय आणि डॉ पुष्पा द्रविड यांचं एक अतिशय सुरेख असं छायाचित्र देखील होतं. ही पोस्ट अक्षरशः क्षणार्धातच व्हायरल झाली होती.

ज्याला ती मिळाली त्याने ती इतरांना फॉरवर्ड केली होती. व्हाट्सअप ग्रुपवर तर विचारू नका अशा वेगाने ती फिरली होती. चित्रकला क्षेत्राशी दुरान्वयाने देखील ज्यांचा संबंध आला नसेल अशांचा ती पोस्ट व्हायरल करण्यात मोठा वाटा होता. माझ्या फोन मध्ये सुमारे ९००० कॉन्टॅक्टस आहेत. यावरून माझ्या व्हाट्सअप नंबरवर ती पोस्ट किती जणांनी फॉरवर्ड केली असेल याची कल्पना येऊ शकेल. ती डिलिट करून टाकतांना माझी अक्षरशः बोटं दुखू लागली होती.

माझा चित्रकलेशी संबंध असल्यामुळे कदाचित ओळखी अनोळखीच्या लोकांनी ती मला फॉरवर्ड केली असावी. राहुल द्रविडच्या लोकप्रियतेचा त्यात महत्वाचा वाटा असल्यामुळेच न राहवून असंख्य लोकांनी ती पोस्ट व्हायरल केली असावी. त्यातल्या किती लोकांनी सदर पुस्तक विकत घेऊन वाचलं असेल हा विषय संशोधनाचा ठरू शकतो. ज्या प्रमाणात ती पोस्ट फॉरवर्ड झाली होती ते पाहता त्या पुस्तकाची आवृत्ती २४ तासातच संपायला हवी होती. पण या विषयी त्या पुस्तकाचे प्रकाशक ‘बुकगंगा’वाले अधिक माहिती देऊ शकतील.

ती पोस्ट फॉरवर्ड करणाऱ्यांचा असाही समज असू शकेल की ‘हा चित्रकार आहे चित्रकलेवर लिहितो बिहितो, वेबसाईट चालवतो तर याला आधी ही माहिती समजायला हवी. किंवा त्याला माहिती नसेलच तर या निमित्तानं माहिती देखील मिळेल’ या हेतूनं ती पोस्ट मोठ्या प्रमाणावर मला फॉरवर्ड झाली असावी.

पण मला डॉ पुष्पा द्रविड यांच्या विषयी माहिती होतीच. किंबहुना त्यांची माझी भेट देखील झाली होती. त्याचं असं झालं. बहुदा १९८५ / ८६ साली जहांगीर आर्ट गॅलरीत त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं होतं. आणि त्या प्रदर्शनाचं उद्घाटन लोकसत्तेचे संपादक माधव गडकरी यांच्या हस्ते झालं होतं. जागतिक मराठी परिषदेचं काम त्या काळी माधवरावांनी जोरात सुरु केलं होतं. त्यामुळेच अन्य राज्यातले सारेच मराठी गुणीजन त्यांच्या सोबत जोडले गेले होते. प्रदर्शनाचं निमंत्रण द्यायला द्रविड पती पत्नी लोकसत्तेत आले होते. आणि माधवरावांना आपल्या माणसांचं अतिशय कौतुक असल्यामुळं त्यांनी आवर्जून मला बोलावून घेऊन त्यांच्याशी परिचय करुन दिला होता. (मी त्यावेळी लोकप्रभा साप्ताहिकात नोकरी करीत होतो) त्यांनीही मला प्रदर्शनाला यायचं निमंत्रण दिलं होतं.

त्यावेळी मी जहांगीरच्या कमिटीवर देखील होतो. गेल्या चाळीस बेचाळीस वर्षात इतकी प्रदर्शनं पाहिली पण ते प्रदर्शन मात्र कायमचं स्मरणात राहिलं, कारण उदघाटन समारंभ चालू असतानाच तिथल्या गर्दीचा फायदा घेऊन कुणीतरी चोराने पुष्पाताईंची दागिन्यांची बॅगच उचलून नेली होती. रडवेल्या झालेल्या पुष्पाताईंचा चेहरा आजही आठवतो.

राहुल त्यावेळी बारा तेरा वर्षाचा असावा. तो क्रिकेट चांगलं खेळतो असं त्या म्हणाल्याचं आठवतं. पण या वयात सारीच मुलं क्रिकेट खेळतात आणि ती चांगलंच खेळतात असं माझं मत असल्यानं मी काही फार खोलात शिरलो नाही. पण नंतर मात्र राहुलने आपल्या कर्तृत्वानं अक्षरशः चमत्कार घडवला यात शंकाच नाही.

***

बुकगंगावाल्यांकडून पुस्तक लगेचच मागवलं. मी जिथं राहतो तिथं पोस्टाची सोय फारशी चांगली नसल्यामुळं ते पुस्तक उशिरा हातात पडलं. पण तो पर्यंत हे सारं मला आठवत होतं. मधल्या काळात या पुस्तकाच्या लेखिका शर्मिला पटवर्धन यांच्याशी देखील फोनवरुन बोलणं झालं. ‘चिन्ह’च्या यु ट्यूब चॅनेलसाठी या पुस्तकावर एखादा व्हिडीओ करायचा असंही नक्की झालं. पण पुण्याहून माझ्या हाती पुस्तक पडायला खूपच उशीर झाला आणि तोपर्यंत शर्मिला पटवर्धन परदेशी निघून गेल्या होत्या. साहजिकच व्हिडीओ करायचा राहिला तो राहिलाच.

आज वाचू उद्या वाचू असं करता करता ते पुस्तक काल परवा वाचून हातावेगळं केलं. डॉ पुष्पा द्रविड यांच्या अतिशय प्रसन्न हास्य मुद्रेतल्या सुंदर छायाचित्रानं पुस्तकाचं मुखपृष्ठ सजलं आहे. ते पाहिल्या बरोबर पुस्तक हाती घ्यावंसं वाटतं. पण त्यावरच्या बटबटीत टायपोग्राफीनं मात्र विरस होतो. मुखपृष्टावरच्या कॉपीमधील ‘प्रेरणादायी’ हा शब्द ‘प्रेरणादाई’ अशा पद्धतीनं लिहिलेला पाहून मात्र मन चरकतं. पुस्तकाचं मलपृष्ठ पाहून तर मन निराशच होतं. ज्या पद्धतीनं फोटोंचा वापर केला आहे. ज्या पद्धतीनं लोगो आणि पुस्तकाची किंमत आणि बारकोड प्रसिद्ध केला आहे, विशेषतः लेखिकेचा फोटो ज्या पद्धतीनं छापला आहे ते पाहिल्यावर या पुस्तकाला चांगल्या संपादकाची गरज होती हे प्रथम दर्शनीच लक्षात येतं.

मृखपृष्ठ उलगडल्यानंतर लेखिकेच्या नावासाठी जो टाईप वापरला आहे तो पाहिल्यावर तर आपली अगदी खात्रीच पटते. वास्तविक पुस्तकावर लेखिकेचं नाव आहे. पण अर्पण पत्रिका वाचल्यावर मात्र वाचक गोंधळात पडू शकतो की हे पुस्तक म्हणजे पुष्पा द्रविड यांचं आत्मकथन आहे की काय ? पण नंतरचं प्रास्ताविक वाचल्यानंतर हे लक्षात येतं की हे पुस्तक आत्मकथनात्मक नव्हे तर चरित्रात्मक आहे.

ज्यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे त्या अर्थतज्ञ, पद्मविभूषण डॉ विजय केळकर यांची प्रस्तावना वाचल्यानंतर त्यातल्या मराठीवर संपादकांनी अधिक लक्ष द्यायला हवं होतं असं सतत वाटून जातं. अगदी ढोबळ मानानं चूक सांगायची तर प्रस्तावनेचा उल्लेख चक्क ‘अग्रलेख’ असा केला आहे जे संपूर्णतः चूक आहे.

या पुस्तकाच्या लेखिका शर्मिला पटवर्धन यांनी विविध क्षेत्रात काम केलं आहे. जसं की पब्लिक रिलेशन, कॉपी रायटिंग, अनुवादक, आकाशवाणी वरील श्रुतिकालेखन वगैरे. मराठी नियतकालिकांसाठी त्या वरचेवर लिहीत असतात. त्यातून मिळालेल्या अनुभवांचा हे पुस्तक लिहितांना त्यांना निश्चितपणे फायदा झाला आहे. त्यामुळे हे तब्बल २०० पानी पुस्तक अगदी सहजगत्या वाचून होतं. कॉपी रायटिंगमधला सफाईदारपणा त्यांच्या लेखनातून सहजपणे जाणवतो. ‘कॅनव्हास ते वॉल’ असे शीर्षक देण्यामधून त्यातली कल्पकता निश्चितपणे जाणवते. पण चित्रकलेसारख्या बालपणापासून तशा अगदी जवळच्या पण मोठं होत असताना सर्व सामान्यांपासून हटकून दूर दूर जाणाऱ्या विषयावर अधिक मनन, विचार मंथन आणि त्याचा अधिक अभ्यास करणं अत्यावश्यक होतं हे मात्र वारंवार जाणवत राहतं. अगदी साधं उदाहरण सांगायचं झालं तर ‘आर्ट’ आणि ‘आर्टस्’ यात महदंतर आहे हे देखील लेखक आणि संपादकांच्या लक्षात येऊ नये याचं आश्चर्य वाटतं. अशा असंख्य ढोबळ चुका या पुस्तकात आहेत. अगदी पटकन उदाहरण सांगायचं तर ‘अलायन्स फ्रान्से’ या विख्यात फ्रेंच संस्थेचा उल्लेख तिथं ‘अलायन्स फ्रँचायजी’ असा करणं वगैरे.

खरं तर चरित्र नायिकेचा आजवरचा सर्वच प्रवास विलक्षण रोमहर्षक आहे. ज्या जिद्दीनं पुष्पाताई स्वतःला उभं करतात, ज्या जिद्दीनं त्या कलेचा ध्यास घेतात आणि ज्या जिद्दीनं त्या पुढे पुढे जात राहतात हे सारंच विलक्षण प्रेरक आहे. त्या काळात मध्यप्रदेशमध्ये असा चित्रकलेचा ध्यास घेऊन एका महिलेनं पुढं यावं हे केवळ लोकविलक्षणच आहे. मध्यप्रदेश ते थेट कर्नाटकपर्यंतचा त्यांचा प्रवास आपल्याला थक्क करून टाकतो. पुष्पाताईंचं लग्न जुळल्याचा किस्सा त्यांनी अतिशय रंगवून सांगितला आहे. पण ज्यांच्यामुळे पुष्पाताई चित्रकार झाल्या त्या चित्रकार एल एस राजपूत यांच्याविषयी मात्र या पुस्तकात फारसं वाचावयास मिळत नाही. याचं कारण लेखिकेला असलेली चित्रकला विषयाची अपुरी महिती हेच असावं.

पीएचडीसाठी किंवा प्रदर्शनाच्या कॅटलॉगसाठी ज्या पद्धतीचा बायोडाटा दिला जातो तो बायोडाटा आधारभूत मानून हे पुस्तक लिहिले गेले असावे असा भास सतत होत राहतो. एल एस राजपूत यांच्या संदर्भात घडले तेच प्रो चंद्रेश सक्सेना यांच्या बद्दलही म्हणावयास हवे. पण असं असलं तरी मध्यप्रदेश मधलं विशेषतः इंदोर, ग्वाल्हेर आणि उज्जैन या शहरांमधलं मराठी माणसांचं जगणं त्यांनी अतिशय संवेदनशील पद्धतीने रेखाटलं आहे यात शंकाच नाही.

पुष्पाताईंचा विवाह जुळणं आणि खूप मोठा प्रवास करुन कर्नाटकात अगदी वेगळ्या राज्यात वेगळ्या भाषेच्या मुलखात स्थायिक होणं, स्थायिक होण्यासाठी केलेला संघर्ष, आधी कानडी भाषा शिकणं आणि नंतर नोकरीच्या निमित्तानं इंग्रजी भाषा अंगीकारणे त्यातून उभा राहिलेला सारा संघर्ष अतिशय छान शब्दात त्यांनी व्यक्त केला आहे. कर्नाटक सारख्या कर्मठ प्रदेशात चाळीस पन्नास वर्षांपूवी एखाद्या मराठी स्त्रीनं ( ते देखील मध्यप्रदेशातून आलेल्या ) उभं राहणं, स्कुटर चालवणं, पेंटिंग करणं, मोठमोठाली म्युरल्स करणं, शिल्प घडवणं, आर्किटेक्ट कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणं आणि राहुल व विजय यासारख्या पराक्रमी मुलांना जन्म देऊन त्यांचं संगोपन करणं ही साधीसुधी गोष्ट नव्हे. पण त्या साऱ्या जबाबदाऱ्या पुष्पाताईंनी यशस्वीपणे पेलल्या. आणि त्यात त्यांनी देदीप्यमान यश मिळवलं. याच काळात देशभरात त्यांनी आपल्या चित्रांची प्रदर्शनं भरवली होती.

त्यांनी कर्नाटकमध्ये मोठमोठाली म्युरल्स घडवली. त्यांनी घडवलेली तीस,चाळीस,पन्नास फुटांची म्युरल्स पाहून छातीवर अक्षरशः दडपण येतं. चिन्नास्वामी स्टेडीयमवरचं ४५०० चौरस फुटांचं म्युरल त्यांनी घडवलं हे वाचल्यावर तर आपण अक्षरशः अवाक होतो. या म्युरलमध्ये पुष्पाताईंनी गुंडप्पा विश्वनाथ, चंद्रशेखर पासून ते राहुल द्रविड पर्यंतच्या असंख्य कर्नाटकी क्रिकेटपटूंची शिल्प देखील साकारली आहेत. हे सारं पुष्पाताईंनी कसं केलं असेल असा प्रश्न आपल्याला सतत पडत राहतो. हे सारंच शर्मिला पटवर्धन यांनी अतिशय प्रभावी पद्धतीनं मांडलं आहे.

असं असलं तरी खूप काही या पुस्तकात गमावलं गेलं आहे हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहतं. या पुस्तकातच राहुल द्रविड यांची प्रदीर्घ मुलाखत प्रकाशित करण्यात आली आहे. इतकंच नाही तर त्याचा भाऊ विजय आणि दोघांच्याही पत्नींच्या मुलाखती या जरी चांगल्या उतरल्या असल्या तरी या पुस्तकाला उगीचच जोड अथवा ठिगळं लावल्या सारख्या वाटतात. त्या परिशिष्ट म्हणून लावल्या गेल्या असत्या तर अधिक योग्य दिसले असते. पुस्तकातल्या पुष्पाताईंच्या मुलाखती बद्दल देखील हेच म्हणता येईल. त्यामुळेच या पुस्तकाला विनाकारण एखाद्या गौरव ग्रंथाचं स्वरूप प्राप्त झालं आहे.

चित्रकलेवर मराठीतून प्रसिद्ध झालेली बहुतांशी पुस्तकं ही चांगल्या संपादकांच्या अभावी फसलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. हे पुस्तकही त्यास अपवाद आहे असं म्हणता येणार नाही. पुष्पाताईंचे यजमान शरद द्रविड यांचं छान शब्दचित्रं या पुस्तकातून उभं राहतं. पण त्यांचं निधन कधी झालं ? कशामुळं झालं ? हे मात्र आपल्याला कळत नाही. ही या पुस्तकातली अतिशय महत्वाची त्रुटी आहे.

पुष्पा द्रविड यांची एक कलाकृती.

एखाद्या चित्रकारांवरचं पुस्तक असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते पुस्तक त्याच्या चित्रांनी सजलेलं असलं पाहिजे अशी अपेक्षा असते. पण या पुस्तकात मात्र एक जेमतेम आठ पानांचा फॉर्म चित्रांनी व्यापला आहे. ३०-३०. ४०-४० फुटांची लांबलचक चित्रं १५” x १८” आकाराच्या चित्रांबरोबर विभागणी करुन एकाच आकारात छापली आहेत. हे अतिशय वाईट आहे. त्यामुळे पुष्पाताईंनी केलेल्या कामांचा प्रभाव कुठेही जाणवत नाही असं खेदानं म्हणावं लागतं. या पुस्तकातली ही सर्वात मोठी त्रुटी आहे. चित्रकारावरचं पुस्तक काढायचं आणि त्या चित्रकाराच्या कलाकृती दुय्यम स्थान देऊन प्रकाशित करायच्या, तेही अवघ्या आठ पानांत आणि अतिशय गचाळ स्वरुपात छापायच्या हा त्या कलावंतांवर सरळ सरळ अन्याय आहे.

खरं तर डॉ पुष्पा द्रविड यांचं कलेच्या क्षेत्रातलं योगदान निश्चितपणे मोठं आहे. मध्यप्रदेशमधून फक्त मराठी आणि हिंदी भाषा घेऊन कर्नाटक सारख्या काहीशा हिंदी भाषा विरोधी राज्यात यायचं. तिथं केवळ कानडीच नाही तर इंग्रजी भाषा देखील आत्मसात करायची, एका आर्किटेक्टचर कॉलेजमध्ये नोकरी मिळवायची कर्नाटकामध्ये म्युरल्सची शेकडो फुटांची व्यावसायिक कामं यशस्वीपणे करायची, साठीनंतर रोएरिक सारख्या चित्रकारावर पीएचडी करायची हे कमी पडलं म्हणून की काय भारतातील विविध शहरात चित्रांची प्रदर्शनं भरवायची, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सारं करत असताना राहुल आणि विजय यांच्या सारख्या गुणी मुलांचं संगोपन करुन त्यांच्या कर्तृत्वाला वाव द्यायचा, राहुलनं तर आपल्या कर्तृत्वानं सारं जगच पादाक्रांत केलं. हे सारं सोपं नव्हे, आणि म्हणूनच पुस्तक प्रकाशित झाल्याची बातमी सोशल मीडियावर झळकताच लागलीच ते मागवून घेतलं होतं. कदाचित मी मूळचा चित्रकार असल्यामुळं आणि चित्रकला पुस्तक प्रकाशन संदर्भात थोडं फार काम केलं असल्यामुळं माझ्या अपेक्षा थोड्या अधिक वाढल्या असणार. पण असं जरी असलं तरी हे पुस्तक चित्रकला क्षेत्राशी संबंधित प्रत्येकानंच आवर्जून वाचायला पाहिजे. विशेषतः या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या मुलींनी, तरुणींनी, महिलांनी तर हे पुस्तक विकत घेऊन वाचायलाच पाहिजे असं मी नक्कीच सुचवेन.

*****

– सतीश नाईक,
संपादक, चिन्ह

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.