No products in the cart.
‘दृक् चिंतन’ : निर्मितीची कथा
काही दिवसांपूर्वी कवी सौमित्र यांचा ‘दृक् चिंतन’ या पुस्तकाचा परिचय देणारा लेख चिन्ह आर्ट न्यूजवर प्रकाशित केला होता. या लेखानंतर ‘दृक् चिंतन’ या पुस्तकाची वाचकांमध्ये बरीच चर्चा झाली. अनेक वाचकांनी हे पुस्तक कुठे खरेदी करता येईल याची विचारणा करणारे फोन केले. त्या पार्श्वभूमीवर आम्ही या ग्रंथ निर्मितीमागील प्रेरणा जाणून घेण्यासाठी पुस्तकाचे संपादक रवींद्र जोशी आणि प्रकाशक कुंदन रुईकर यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतून हे पुस्तक निर्माण करण्यामागे त्यांनी घेतलेल्या कष्टांची सविस्तर माहिती मिळाली. ही दीर्घ चर्चा आम्ही लेख स्वरूपात वाचकांपर्यंत पोचवत आहोत.
संपादक रवींद्र जोशी सांगत होते…
“ २७ जून,२०२० रोजी कोलते सरांना ७४वर्षे पूर्ण होणार होती म्हणून आम्ही काही जणं कोलते सरांना भेटायला गेलो होतो. चित्रकार आणि त्यांची चित्रे या विषयावरील सरांचे प्रसिद्ध झालेले सर्व लेख एकत्र करून एक मोठे पुस्तक करण्याचा प्रस्ताव त्या दिवशी मी कोलते सरांसमोर मांडला. मराठी साहित्यविश्वात विशेषतः दृश्यकलेबाबत फार कमी लेखन झाले आहे आणि सरांचा आजवर प्रकाशित झालेला प्रत्येक लेख दृश्यकलेच्या अभ्यासकांसाठी महत्वाचा दस्तऐवज आहे, तेव्हा हे सर्व लेखन एका ग्रंथात एकत्रित होणे गरजेचे आहे असे मला वाटले. कोलते सर हे खरे तर हाडाचे शिक्षक. चित्रकलेसारख्या महत्वाच्या विषयावर मराठी भाषेत लेखन उपलब्ध नाही हे सरांच्या लक्षात आले तेव्हापासून सरांनी सातत्याने, अगदी हट्टाने मराठीतच लेखन करण्याचा विडा उचलला.
मौज, मुक्तशब्द, अनुष्टुभ् अशा वेगवेगळ्या दिवाळी अंकात आणि इतर काही वृत्तपत्रातून सरांचे लेखन विखुरले होते. त्यामुळेच याचे एका ग्रंथाच्या स्वरूपात दस्तऐवजीकरण होणे महत्त्वाचे होते. म्हणूनच मी हे काम मनावर घेतले. कोलते सरांचे हे पुस्तक ‘मौज’ करणार असे त्यांचे पूर्वी बोलणे झाले होते. त्यामुळे सर्वात आधी ‘मौजे’चे श्रीकांत भागवत, ‘मुक्तशब्द’चे येशू पाटील आणि इतर प्रकाशकांची परवानगी घेतली. सर्व लेख एकत्रित करण्याचे प्रयत्न सुरू केले. या पुस्तकात एकूण ५१ लेख आहेत. १९७६ सालापासून कोलते सरांनी सातत्याने लेखन केले आहे. अनेकांनी सरांचे लेख कुठे कुठे वाचले होते ते आम्हाला कळवले. कवयित्री नीरजा यांनी आम्हाला अनुष्टुभ् मधले तर वंदना बोकील–कुलकर्णी यांनी शब्द मधील काही लेख मिळवून दिले व वेळोवेळी मदत केली.
हा ग्रंथ उत्तमच झाला पाहिजे अशा विचाराने पुस्तकाची मांडणी कशी असावी याचा विचार चालू होताच. चित्रकला या विषयावर असलेल्या पुस्तकातील चित्रे उत्तम दर्जाची असायला हवीत हा त्यामागचा प्रमुख विचार होता. ज्या चित्रकारांवर सरांनी लेख लिहिले आहेत त्यांची चित्रे त्यांची किंवा त्यांच्या वारसदारांची रीतसर परवानगी घेऊन त्यांच्याकडूनच उत्तम प्रतीच्या चित्रप्रतिमा मागवून पुस्तकात समाविष्ट केल्या पाहिजेत असा माझा अट्टहास होता.
दरम्यान सारंग कुलकर्णीने एक नमुना मांडणी संकल्पना तयार केली. ती कोलते सरांना आवडली. त्यानुसार प्रत्येक लेखासाठी किमान एकच चित्र द्यायचा विचार आम्ही नक्की केला आणि ‘सगळी चित्रे परवानगी घेऊनच छापायची’ या हट्टाला तो पूरक ठरला. त्यामुळे आता सगळी चित्रे परवानगीसह आपल्या हातात आली की मगच पुस्तकाचे पुढचे काम सुरू करायचे असे आम्ही ठरवले होते. तोवर सगळे लेख जमा करायचे आणि संपादित करून संहिता नक्की करायची अशा हेतूने काम सुरु केले. २७ जून,२०२१ मध्ये कोलते सरांना ७५वर्षे पूर्ण होणार होती. त्याच दिवशी सरांचे पुस्तक पूर्ण व्हावे असा आमचा संकल्प होता. परंतु या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेमुळे कोलते सरांच्या वाढदिवसाची तारीख उलटणार होती. काम उत्तम व्हावे म्हणून ही गोष्ट मनाविरुद्ध मान्य करण्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नव्हता.
सगळी चित्रे परवानगीसह मिळवण्यासाठी रीतसर पत्रव्यवहार सुरु करावा लागणार होता आणि इथे खरी आमची कसोटी लागली. या पुस्तकात ज्या चित्रकारांवरील लेख समविष्ट केले आहेत, त्यातील जोगेन चौधरी, गणेश हलोई आणि जया गांगुली या तीन चित्रकारांशी प्रथम संपर्क केला आणि त्यांचे होकारार्थी उत्तर सुद्धा आले. अन्य सगळे भारतीय आणि पाश्चात्य चित्रकार चित्रकार आता हयात नाहीत. त्यामुळे त्यांचे किंवा त्यांच्या वारसदारांचे पत्ते, इ– मेल आय.डी./फोन नंबर मिळवण्यासाठी काय करायचे हा एक यक्ष प्रश्न होता.
भारतीय चित्रकारांसोबत सरांचे सौहार्दपूर्ण मैत्र असल्याने त्यांच्याकडून किंवा त्यांच्या वारसांकडून परवानगी आणि चित्रे मिळणार याची खात्री होतीच. पण त्यांना संपर्क कसा करायचा ? अंबादास, मोहन सामंत या अनिवासी भारतीय चित्रकारांची चित्रे कशी मिळवणार? त्यांच्या चित्रांचे स्वामित्व हक्क(Copyrights ) कुणाकडे असतील? याचा शोध सुरू झाला. या सगळ्या कामात यामिनी तेलकर आणि नीना रेगे या दोघींनी खूप मोलाची मदत केली.
डी. जी. कुलकर्णी यांची चित्रे मिळवण्यासाठी त्यांच्या पत्नीशी आम्ही संपर्क केला. त्यांनी आम्हाला उत्तम सहकार्य केले. रायबांच्या मुलाने रायबांचे आत्तापर्यंत कुठेच न छापले गेलेले एक चित्र आम्हाला या पुस्तकात प्रकाशित करायला दिले. राम कुमार यांचा मुलगा श्री. उत्पल वर्मा हे सिडनीला(Sydney) असतात. त्यांनीदेखील संपूर्ण सहकार्य केले आणि तेही बिनशर्त!
मनजीत बावा यांची कन्या डॉ. भावना बावा यांनी कोलते सरांनी लिहिलेला लेख इंग्रजीत भाषांतरीत करून मागवला. खरे तर मराठी लेखाचे इंग्रजीत भावांतर करणे खूप अवघड होते. परंतु आम्ही तेवढी सगळी मेहनत केल्यानंतर त्यांनी लगेच परवानगी दिली. अमृता शेरगिल यांचे वारसदार विवान सुंदरम यांच्याशी मी पत्रव्यवहार करत होतो. पण नंतर असे लक्षात आले की ते दुसराच मेल आयडी वापरतात. त्या मेल आयडीवर मी संपर्क केला असता, केवळ पंधरा मिनिटात त्यांचे ‘उशीर झाल्याबद्दल दिलगिरीसह’ उत्तर आले आणि काही महिन्यापासून अडकलेले काम पंधरा मिनिटात पूर्ण झाले. विवान सुंदरम यांनी तत्काळ मेल पाठवून परवानगी आणि उत्तम प्रतिमा (high resolution image) पाठवली.
श्री अद्वैतचरण गणनायक, महासंचालक, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय(एन्.जी.एम्.ए.) दिल्ली यांचे विशेष आभार मानायलाच हवेत. Grey Art Gallery, New York, Sonia Ballaney, Puja Vaish, युसूफ मेहता, किशोर सिंग, रजनी प्रसन्ना, प्रिया झवेरी, प्रतिमा वैद्य, श्री. अली असगर, Judith Reddy किती नावे घेऊ! या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्यच नव्हते. ज्यांच्याकडून प्रभाकर बरवे यांच्या मुलीचा सोनाली बरवे यांचा संपर्क मिळेल असे वाटले होते त्यांनी तो आजपर्यंत दिलाच नाही. सोनाली बरवे यांची बहिण आणि माझी मैत्रीण मंजिरी वैद्य हिने त्यांचा फोन नंबर आणि मेल आय डी मला दिला. मग कोलतेकाका आणि सोनाली बरवे एकमेकांशी Video Call वर बोलले. सोनाली बरवे यांनी आम्हाला चित्र छापण्याची परवानगी दिली. हे भारतीय चित्रकारांच्या बाबतीतील अनुभव.
पाश्चात्त्य चित्रकारांच्या चित्रांसाठी हे सारे शोधून त्यांची परवानगी घेणे हे काम जास्त अवघड वाटले होते; परंतु तिकडचे कलाकार अत्यंत जागरूक आहेत. स्वामित्व हक्क (Copy rights )आणि प्रतिमा अधिकार( Image rights), बौद्धिक संपदा हक्क (Intellectual Property Rights), असे वेगळेवेगळे असतात हे मला या पुस्तकाच्या कामानिमित्ताने पहिल्यांदाच समजले. उपरोक्त सर्व हक्कांची पायमल्ली होऊ नये यासाठी अॅड. आनंद माहुरकर हे सदैव जागरूक असतात. मित्रत्वाच्या नात्याने त्यांनी हे सारे आम्हाला नीट समजावून सांगितले.
पुस्तकात प्रतिमा छापण्यासाठी ज्या त्या हक्क धारकांना त्यांनी आकारलेले पुनरुत्पादन शुल्क(A reproduction fee) भरून, त्यांच्याकडून आपल्याला परवानगी घ्यावी लागते.
चित्र कुठे छापणार? कप/छत्री/टी–शर्ट/जाहिरात ??? विकणार का फुकट देणार ? कितीला विकणार ? पुस्तक असेल तर किती प्रती छापणार ? किती आणि कुठल्या भाषेत ? चित्र कुठे छापणार ? मुखपृष्ठावर ? मलपृष्ठावर? की आतमध्ये? पूर्ण का अर्धे पान ? रंगीत का श्वेत श्यामल ? त्याचा ले आउट कसा असेल? अशी सगळी सविस्तर चौकशी करणारा एक विनंतीअर्ज भरून पाठवायचा असतो. त्याची पडताळणी करून त्यानुसार ते शुल्क ठरवतात.
चित्र वारसांकडे असेल तर– स्वामित्व हक्क(Copy rights ), प्रतिमा अधिकार( Image rights) दोन्ही त्यांचे आणि चित्र त्यांच्याकडे नसून संग्रहालयात असेल तर दोघांचे वेगवेगळे शुल्क भरावे लागते.
उदा. पिकासोच्या ‘ग्वेर्निका’ या चित्राचे प्रतिमा अधिकार( Image rights) Museo Nacional Centro de Arte Reina Sofía यांच्याकडून घ्यावे लागतात तर पिकासोच्या चित्राची परवानगी SUCCESSION PICASSO ; PICASSO ADMINISTRATION या पिकासोच्या वारसदारांकडून घ्यावी लागते.
त्यामुळे गॅलरीच्या आणि वारसदाराच्या अशा दुहेरी परवानग्या घ्याव्या लागतात. पाश्चात्त्य चित्रकारांच्या चित्रांबाबत अशा सगळ्या आवश्यक त्या परवानगी मिळवण्यासाठी ७५० युरो भरले आणि पुस्तकाचे काम वेगाने सुरु झाले. आम्ही चित्रकारांची चित्रे परस्पर इंटरनेटवरून न उचलता रीतसर परवानगी घेऊन आणि जिथे गरज आहे तिथे शुल्क भरून मिळवली याचा मला एक चित्रकार म्हणून विशेष आनंद आहे.
केवलचित्रांची कोलते सर ज्या पद्धतीने समीक्षा करतात, त्या पद्धतीने मराठीत आजवर कोणीही लिहिलेले नाही. कोलते सरांचा व्यासंग, सरांचे स्वतःचे काम, सरांचे चित्रकलेबाबतचे चिंतन या साऱ्याच्या प्रकाशात त्यांचे लिखाण उजळून निघते. त्यामुळे हे लेखन चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. कोलते सरांचे तीन नवीन अप्रकाशित लेख या पुस्तकात आहेत. त्याबरोबर सरांनी स्वतःबद्दल लिहिलेले पाच लेख – ‘स्वत्व’ असे सर्व मिळून ५१ लेख या पुस्तकात समाविष्ट केले आहेत.
क्रमश:
*****
– रवींद्र जोशी, कुंदन रुईकर
शब्दांकन : कनक वाईकर
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion