No products in the cart.
‘दृक् चिंतन’ : निर्मितीची कथा
“कोलते सरांच्या पुस्तकाचा दर्जा कोलते सरांसारखाच असायला हवा” अर्थात पुस्तकाची निर्मिती उत्कृष्टच करायची हे आमचे लक्ष होते. हा ग्रंथ प्रकाशित करताना कलात्मक दृष्टिकोन आम्ही शेवटपर्यंत जोपासला. त्यामुळे पुस्तकाची किंमत वाढली. विशेषतः चित्रांचे परवानगी शुल्क ७५० युरो/-(पाउण लाख रुपये फक्त/-) भरायचे हीच सुरवात असल्याने उगाच मोठ्या प्रकाशकांकडे जाऊन नकार ऐकायची माझी तयारी नव्हती. त्यामुळे आम्हीच ही पुस्तक निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बुलढाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यासंगी शिरीष देशपांडे, पु.ना. गाडगीळ अँड सन्सचे कलासक्त संचालक अजितदादा गाडगीळ तसेच रवी कुळकर्णी, विनायक शेटे यांनी अंशतः अर्थसहाय्य देऊ करून आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या .
पुस्तकासाठी अक्षर जुळणी– संपादन साहाय्य अर्चना दीक्षित–आपटे यांनी निगुतीने आणि वस्तुनिष्ठपणे केले. शुचिता नांदापूरकर–फडके, प्रज्ञा मिलिंद घाणेकर यांनी डोळ्यात तेल घालून मुद्रित शोधन केले. सारंग कुळकर्णी यांनी पुस्तकाचे मुखपृष्ठ, मांडणी, संकल्पना आणि ‘दृक् चिंतन’ चे logo सुलेखन करून पुस्तकाला अभिजात देखणेपणा बहाल केला. कलायडो ग्राफिक्सचे श्री.श्रीनिवास वीरकर यांनी मुद्रणाची जबाबदारी घेतली आणि उत्तमरित्या निभावली. अशा सगळ्यांच्या अथक मेहनतीनंतर हा ग्रंथ साकार झाला.”
‘अनुनाद प्रकाशना‘चे प्रकाशक कुंदन रुईकर म्हणाले,
“निर्मिती आणि वितरणाचा हा ‘गोवर्धन उचलण्याचा’ प्रयत्न आम्ही पहिल्यांदाच ‘दृक् चिंतन‘च्या निमित्ताने केला आहे. असे देखणे आणि म्हणूनच महाग पुस्तक रसिक वाचकांपर्यत पोचवण्यासाठी लागणारी यंत्रणा आमच्याकडे उपलब्ध नव्हती. पण उपरोक्त प्रायोजक आणि बाकीचे सगळे हितचिंतक मित्र, इंटरनेट, टीम अनुनादचे माझे सर्व सहकारी… नवनाथ, माधव, जगन्नाथ, प्रथमेश, अचला, गौरी आणि समाजमाध्यमांच्या आधाराने हे साध्य करणे आम्हाला शक्य झाले.
२७ जून,२०२१ रोजी कोलते सरांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही हे पुस्तक लवकरच प्रकाशित करणारआहोत असे आम्ही जाहीर केले, त्या दिवसापासूनच ‘दृक् चिंतन‘ या पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी आम्ही केलेल्या आवाहनाला रसिक वाचकांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच अगदी गोवा, बेळगाव येथूनही तरुणांचे, ज्येष्ठांचे, लहान–थोरांचे आम्हाला अगणित फोन आले.
पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण, नागपूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक अशा केवळ प्रमुख शहरांतूनच नव्हे तर बांदेले, अक्कलकोट, चिपळूण, सावर्डे, नगर, नारायणगाव, शेगाव, गोंदिया, नांदेड, चंद्रपूर, जयसिंगपूर अशा महाराष्ट्रातील अनेक लहानमोठ्या गावांतील कलाकार, रसिक, जाणकार वाचक आजही या पुस्तकाची मागणी करत आहेत. या ग्रामीण भागातील वाचक मित्रांना या प्रकारच्या साहित्याची अधिक आस आहे असेच आम्हांला प्रकर्षांने जाणवले.
“या पुस्तकाची किंमत एकरकमी देणे शक्य नसल्याने पैशाची तजवीज करून आम्ही लवकरच नक्की एक प्रत घेणार आहोत तरी आमची प्रत राखून ठेवावी”, अशी विनंती करणारे फोनही बरेच आले. विशेष महत्त्वाचे म्हणजे त्यातील कोणीही आमच्याकडून अधिक सवलतीची मागणी सोडा, अपेक्षाही केली नाही. फक्त अधून मधून फोन करून त्यांच्यासाठी प्रत राखीव आहे ना याची खात्री हे वाचक करून घेत होते आणि आम्हीही त्यांच्या या विनंतीचा मान ठेवू शकलो याचे आम्हांला निश्चितच समाधान आहे. कोलते सरांबद्दलचा आदर आणि आपुलकी सगळेच व्यक्त करत होते. त्यामुळे स्वाभाविकच त्यांची आणि आमची देखील एक प्रकारची जवळीक निर्माण होत गेली. हा अनुभव आमच्यासाठी अत्यंत विलक्षण आणि हृद्य असाच अनुभव होता आणि आहे
‘दृक् चिंतन‘ ची प्रत प्रत्यक्ष पाहील्यावर किंवा वाचल्यावर आजवर अनेक जणांनी प्रत्यक्ष फोन करून पुस्तकाच्या आशयापासून मांडणीपर्यंत सर्व वैशिष्ट्यांची भरभरून प्रशंसा केली अणि चित्रकलेला वाहिलेला मराठीतला एक उत्तम ग्रंथ संग्रहात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
सर्वश्री सयाजी शिंदे, रवी कुळकर्णी, राम कोल्हटकर, स्वप्ना दातार, अंजली कलभंडे यांनी एकापेक्षा अधिक प्रती विकत घेतल्या. त्यातली एकच प्रत स्वतःला ठेऊन बाकी प्रती त्यांनी गरजूंना द्या असेही सांगितले. शंकर पळशीकर यांच्या मुलीने आम्हाला बक्षीस म्हणून काही रक्कम भेट दिली. हे खूप सकारात्मक प्रतिसाद होते.
अशोक शहाणे, अरुण खोपकर, सुजीत पटवर्धन, अतुल पेठे, किशोर कदम, कौशल इनामदार, सुरेश भागवत, शर्मिला फडके, चिन्मयी सुमीत, मिनाक्षी पाटील आदी मान्यवरांनी प्रती विकत घेऊन आमचा आत्मविश्वास वाढवला.
योग्य वितरकांपर्यंत आवश्यक तेवढ्या सक्षमपणे पोहोचणे कदाचित आम्हांलाच शक्य झाले नसेल. कल्याणचे पपायरस–बुक स्टोअर, पुण्यातील सुदर्शन कला दालन, दर्पण आर्ट गॅलरी, राजहंस–पुस्तक पेठ, संस्कृती प्रकाशन, पाटील एंटरप्रायझेस, पुस्तकविश्व, बुकगंगा मुंबईतील लोकवाङ्मयगृहाचे पीपल्स बुक हाऊस, शेगाव येथील बीज ग्रंथ वितरण, नाशिकचे ज्योती स्टोअर्स ग्रंथ दालन यांनी आपल्या ग्रंथ दालनांमध्ये ‘दृक् चिंतन‘ उपलब्ध करून देऊन आम्हाला वाचकांपर्यंत पोचण्यासाठी मदतच केली आहे.
“कलेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि सुजाण वाचक यांच्या दृक्–जाणीवा समृद्ध करणारा हा ग्रंथ आमच्याकडून सवलतीच्या दरांत विकत घ्यावा” असे आवाहन महाराष्ट्रातील सर्व म्हणजे शंभराहून जास्त कला महाविद्यालयांना email किंवा पत्र पाठवून आम्ही केले होते. त्यांपैकी जे.जे. स्कूल ऑफ अप्लाईड आर्ट, भारती विद्यापीठ, सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सोफिया पॉलिटेक्निक, रहेजा स्कूल ऑफ आर्ट, MSFDA आणि ललितकला केंद्र– सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे, देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन,’ या आठच शिक्षण संस्थांनी‘ आमच्याकडून पुस्तकाच्या प्रती विकत घेतल्या आहेत. आमची मातृसंस्था जिथे कोलते स्वतः शिकवत होते त्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या अधिष्ठात्यांना वा आजच्या कला संचालकाना प्रत्यक्ष भेटून विनंती करूनसुद्धा त्यांनी अजूनही एकही प्रत घेतलेली नाही हा दैवदुर्विलास…! बाकीच्या उर्वरित शिक्षण संस्थांनी उपरोक्त वितरकांकडून पुस्तक विकत घेतली असतील तर आम्हांला कल्पना नाही पण तशी शक्यता कमीच आहे ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे..!
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांनी ‘नी. स.गोखले पारितोषिक’ (उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती)‘ हा पुरस्कार देऊन ‘दृक् चिंतन’ला सन्मानित केले आहे. आपण केलेल्या चांगल्या कामाची अशी पावती मिळाली याचे आम्हांला समाधान आहे.
या सगळ्या ‘Happening’ साठी सरते शेवटी प्रभाकर कोलते सरांचे तर आम्ही कायमचे ऋणी आहोत. आणि त्यांच्या या ऋणातच राहणे आम्हांला आवडणार आहे.
समाप्त
– रवींद्र जोशी, कुंदन रुईकर
शब्दांकन : कनक वाईकर
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion