No products in the cart.
‘बाप’माणूस
मुलीचा बाप होणं हे जबाबदारीच काम असतं. भारतात अनेक लोक मुलीचा जन्म नाकारतात. पण १९६६ साली एका जाहिरातकर्मीनं एका काल्पनिक मुलीला जन्म दिला. तिच्या जन्माच्या वेळी निर्मितीच्या प्रसूतिवेदना सोसल्या. आणि जन्म झाला तो जगप्रसिद्ध अशा अमूल गर्लचा! ही ‘अमूल गर्ल’ गेली पन्नास वर्ष भारतीय जाहिरात विश्व गाजवत आहे. तिची आई आणि पिता अशा दोन्ही भूमिका बजवणारे ऍडमन सिल्व्हिस्टर दा कुन्हा यांचं मंगळवार दि २० जून २०२३ रोजी निधन झालं. दा कुन्हा या जाहिरात संस्थेचे ते सर्वेसर्वा. त्यांनी जरी अनेक ब्रॅण्ड्सना आपल्या जाहिरातींनी मोठं केलं असलं तरी ते ओळखले जातात ते अमूल या सहकारी दूध उत्पादक संघाच्या जाहिरातींसाठी. कुठलाही ब्रँड यशस्वी होण्यासाठी त्याचा दर्जा उत्तम असणं महत्वाचं असतंच पण योग्य आणि कल्पक जाहिरात त्या ब्रॅण्डला यशाच्या शिखरावर पोहोचवते. याच कल्पकतेने गुजरातमधल्या एका छोट्या दूध उत्पादक संघाला दा कुन्हा यांनी जाहिरातीच्या माध्यमातून एक बलाढ्य ब्रँड मध्ये रूपांतरित केलं.
मराठमोळे जाहिरातकर्मी भरत दाभोळकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात दा कुन्हा यांच्या एजन्सीमधून सुरु केली. भरत दाभोळकर हे फिलिप्स सारख्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होते. दा कुन्हा यांनी त्याची सर्जनशीलता लक्षात घेऊन त्यांना ऍड एजन्सीमध्ये संधी दिली. या लेखातून दाभोळकरांनी द कुन्हा यांच्या आठवणी सांगितल्या आहेत.
या जगात काही लोक जिनियस असतात तर काहींना जिनियस लोकांकडून काम करून घेण्याची क्लुप्ती गवसलेली असते. सिल्वेस्टर दा कुन्हा यांच्यामध्ये मात्र दोन्ही गुण विशेष होते. दा कुन्हा हे जिनियस तर होतेच पण यशस्वी मॅनेजमेंट गुरुही होते. कोणामध्ये कुठला गुण आहे आणि या गुणाचं सोनं कसं करायचं हे त्यांना अगदी बरोब्बर माहित होत. ते नवीन कल्पनांना संपूर्ण पाठिंबा द्यायचे. माझ्या सर्व नवीन कल्पनांना त्यांनी भरपूर प्रोत्साहन दिलं. मुंबईतल्या इंग्रजी वातावरणातून आलेल्या दा कुन्हा यांना मराठी किंवा हिंदी येत नसे. पण जेव्हा मी त्याच्याजवळ हिंग्लिश (हिंदी + इंग्लिश) भाषेतील जाहिरातींची कल्पना मांडली तेव्हा त्यांनी या कल्पनेला संपूर्ण पाठिंबा दिला. त्यांचा हा मोकळा स्वभाव मला प्रचंड आवडायचा.
मी जाहिरात क्षेत्रात पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात काम करून आलो होतो. माझ्याकडे कायद्याची डिग्री होती. पण असं असताना त्यांनी माझ्यातली कल्पकता ओळखली. आणि मला संधी दिली. मी दा कुन्हा एजन्सीमध्ये काम सुरु केल्यानंतर माझ्या वरिष्ठ सहकाऱ्याने दुसरीकडे नोकरी सुरु केली आणि अचानक माझ्यावर मोठ्या जबाबदाऱ्या आल्या. या काळात मी सगळं पटकन शिकलो. जाहिरात एजन्सीमधल्या प्रत्येक विभागातील काम शिकताना दा कुन्हा अक्षरश: वडिलांसारखे माझ्या पाठीशी होते. त्यामुळेच पुढं माझं नाव झाल्यावर माझ्याकडे अनेक संधी आल्या तरी मी दा कुन्हा एजन्सी सोडली नाही.
काम करता करता अमूलच्या जाहिराती करण्याची जबाबदारीही माझ्यावर आली. दा कुन्हा यांनी कार्टूनिस्ट इस्टस फर्नांडिस यांच्याबरोबर अमूल गर्लची निर्मिती केली होती. तिच्या निर्मितीची कहाणीही मोठी सुरस आहे. साठ वर्षांपूर्वी पोलसन या एकमेव बटर ब्रॅण्डची बाजारामध्ये एकहाती सत्ता होती. या ब्रॅण्डचा स्वतःचा एक मॅस्कॉट ( शुभंकर) होता. ती मुलगी पोलसन गर्ल म्हणून प्रसिद्ध होती. या ब्रॅण्डच्या टक्करमध्ये अमूलसारखा सहकारी संघ कुठेच नव्हता. मग अगदी कमी बजेटमध्ये दा कुन्हानी ही अमूल गर्ल तयार केली. अमूल गर्लचं वैशिष्ट्य म्हणजे ती गोड तर होतीच पण तात्कालिक घडणाऱ्या घटनांवरती ती कधी विनोदी पद्धतीनं, कधी भावनिक भाष्य करते. ते भारतीय लोकांना प्रचंड आवडलं आणि आजही आवडत आहे.
या अमूल गर्लच्या पुढील वाटचालीत माझं योगदान काय असेल तर मी सांगेन की आधी इंग्रजाळलेल्या या ‘अमूल गर्ल’च खऱ्या अर्थानं मी भारतीयीकरण केलं. मी तिला मराठी, हिंदी, बंगाली अशा वेगवेगळ्या भारतीय भाषांमधून घराघरात पोहोचवलं. याचा उपयोग अमूलला घराघरात पोहोचवण्यात झाला.
डा कुन्हा यांनी माझी कल्पकता बघून एक दोन नाटकांसाठीही मला लेखनाची संधी दिली. दा कुन्हा हे स्पष्टवक्ते असले तरी नवे प्रयोग करण्यास कधीही कचरले नाहीत. मला नाटकांसाठी विचारणा केली असता मी त्यांना सांगितलं की, ‘मी माझ्या शैलीत म्हणजे हिंग्लिश शैलीत नाटकाचं लेखन करेन. हे तुम्हाला योग्य वाटत असलं तरच मी तुमच्यासाठी नाटक लिहितो.” यावर दा कुन्हा म्हणाले, “तुझा हा प्रयोग लोकांना आवडेल असं मला वाटत नाही पण तू वेगळं काहीतरी करत आहेस तेव्हा बिनधास्त लिही तुझ्या शैलीत.” त्यांनी असा हिरवा कंदील दाखवल्यानंतर मी ‘आय लव्ह बॉम्बे’ हे नाटक माझ्या शैलीत लिहिलं. आणि लोकांना ते प्रचंड आवडलं. १९८०-८२ साली या नाटकानं इतिहासच घडवला. आणि माझी नाटककार म्हणूनही ओळख तयार झाली. खरं तर अनेक मोठ्या मोठ्या समीक्षकांनी माझ्या या हिंग्लिश प्रयोगाला खूप नावं ठेवली होती पण दा कुन्हा आणि प्रेक्षकांनी मला नेहमीच पाठिंबा दिला.
दा कुन्हा यांच्या घरी पु. ल. देशपांडे यांनी भेट दिली होती. तो किस्सा मला आठवतो. दा कुन्हा यांच्या जुन्या पद्धतीच्या आणि ऐसपैस घरात पुलंचं आगमन झालं तेव्हाच क्षण आणि ती भेट अजूनही माझ्या लक्षात आहे. या दोन दिग्गजांनी यावेळी निवांत गप्पा केल्या. पुलंनी या भेटीत पोर्तुगीज घरांची वैशिष्टयं, त्यांचं आर्किटेक्चर यांची माहिती दिली. या भेटीवेळी आत्माराम भेंडेही आमच्यासोबत होते.
माणसाचं आयुष्य नेहमी नाट्यमय वळणं घेत राहतं. मी एका वेगळ्याच क्षेत्रात काम करत होतो. कधीतरी जाहिरात क्षेत्रात काम करण्याची उर्मी माझ्या मनात आली. वेगवेगळ्या एजन्सीमध्ये संधी शोधात असताना दा कुन्हांनी मला संधी दिली. माझ्या प्रयोगांना साथ दिली. मला एजन्सीमध्ये मोठं पदही दिलं. त्यांच्या या पाठिंब्यामुळेच आजचा भरत दाभोळकर घडला आहे हेच खरं. सिल्व्हिस्टर दा कुन्हा मला भेटले नसते तर मी वेगळंच काहीतरी करत असतो. दा कुन्हा यांनी अनेक ब्रॅण्डही घडवले आणि माणसंही घडवली. अशा या ‘बाप’माणसाला माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
एका मित्राने मला दोन दिवसांपूर्वी विचारलं की दा कुन्हा यांना श्रद्धांजली कशी देशील ? मी त्याला एवढंच सांगितलं मी एक होर्डिंग तयार करेन. त्यावर सिल्व्हिस्टर दा कुन्हा यांना तान्ह्या बाळाला कुशीत घेणाऱ्या आईच्या रूपात दाखवेन. आणि टॅगलाईन असेल ” Utterly butterly SYLVICIOUS ”
*****
– भरत दाभोळकर
(या लेखाचं शब्दांकन करताना काही भाग हा ‘निवडक चिन्ह’ या चिन्ह प्रकाशनाच्या पुस्तकातील ‘भरत’बेट या लेखातून घेतला आहे.)
शब्दांकन : कनक वाईकर
Related
Please login to join discussion