Features

निवडुंगाची फुले १

आयुष्यात खावे लागलेले टक्केटोणपे काही जणांना मोडून टाकतात तर काही जण या त्रासातून शहाणे होऊन उत्तुंग भरारी घेतात. निवडुंग काट्यांनी लडबडलेला असतो पण त्यालाही सुंदर फुलं येतात, त्याप्रमाणे वेदनेंतून होरपळलेलं आयुष्य पुढं सुंदर होऊन इतरांच्याही आयुष्यात हास्य निर्माण करतं. प्रतोद कर्णिक यांचं ‘निवडुंगाची फुलं’ हे सदर अशाच सुंदर आयुष्यांचा वेध घेणार आहे. या सदरातील पहिली कथा असेल प्रसिद्ध छायाचित्रकार विकी राय यांची. विकी राय यांची कहाणी म्हणजे रस्त्यावरचं भणंग आयुष्य ते फोर्ब्सच्या यादीतील सन्माननीय व्यक्तिमत्व अशी टोकाच्या लंबकावर फिरलेली. ती जाणून घेण्यापूर्वी हे सदर प्रतोद कर्णिक यांना कसं सुचलं ते जाणून घेऊया या पहिल्या भागातून.

वेदनेच्या पोटी सृजनाची नव – निर्मिती होते, असं आपण अनेकदा ऐकतो. अगदी मातेच्या उदरातून एका इवल्याशा जीवाचा जन्मही मरणप्राय अशा प्रसूती वेदनांतूनच होतो‌.

अत्यंत त्रासातून, दुर्दैवाच्या दशावतारांनी पोळून निघालेल्या मनांत, ज्याला कुणी निसर्ग म्हणेल, कुणी परमेश्वर म्हणेल… पण चराचरात व्यापून राहिलेलं ते चैतन्य, तेच जणू सृजनाचं, कलेचं शिंपण करत या वेदनेवर प्रेमाची फुंकर घालत असतं.

याचाच अनुभव मला पहिल्यांदा आला तो मी कला महाविद्यालयात शिकत असताना. तेव्हा शनिवारी कॉलेज दोन तास असे आणि रविवारी सुट्टी तर असायचीच. मी मुंबईला एकटा असा त्या काळात पहिल्यांदा फिरत होतो. नवलाई, उत्सुकता, कुतुहल सगळचं होतं.

शनिवारी दुपारी एक वाजता कॉलेज सुटलं आणि मी माझ्या भटकंतीला बाहेर पडलो. जवळच एक विस्तीर्ण बगीचा दिसला. तिकडे एक मोठा घोळका उभा होता. लहान – लहान मुलांच्या घोळक्यात एक माझ्या वयाची मुलगी काहीतरी सांगत होती. मग ती मुलं अर्ध गोलाकार बसली. मधे पाच, सहा माझ्याच वयाची मुलं, मुली. एकानं पटापट पॅड आणि ड्रॉईंग पेपर वाटले. आणि मधे उभ्या असलेल्या त्या मुलीने पिशवीतून तीन – चार चिनी मातीचे बनवलेले आंबे बाहेर काढले. मुलांनी परत एकच गलका केला. कुणी म्हणत होत आंबा, कुणी आम… मग पेन्सिली दिल्या गेल्या. प्रत्येक मुलाजवळ जाऊन ती तो मातीचा आंबा त्याला दाखवत होती. मग खडूच्या छोट्या पेट्या त्यातलीच दोन मुलं एकेका समोर ठेवत होती.

मुलांनी दिलेल्या पॅडला कागद लावला आणि ते त्या आंब्याकडे पहात त्याचं चित्र रेखाटू लागले. चित्रकलेचे हे धडे या उद्यानात देणं पाहून, मी थबकलो. त्या मुलांजवळ गेलो. माझ्या आयुष्याला समृद्ध करणारी एक नवी संधीच माझ्यासमोर त्या उद्यानातील निसर्गाच्या सान्निध्यात चालून आली होती.

मीरा नायर यांच्या ऐंशीच्या दशकातल्या “सलाम बॉंबे” या पारितोषिक विजेत्या चित्रपटानंतर रस्त्यावरच वाढणाऱ्या या मुलांसाठी त्यांच्या पुढाकारातूनच १९८९ सालापासून असे विविध उपक्रम राबवले जात होते. मग मीही सगळी माहिती मिळवली. त्यांच्या ऑफिसमधे जाऊन मलाही असं काम करायचं आहे असं सांगितलं. आणि त्यांच्यात सामील झालो. त्यानंतर मग मला आठवडाभर शनिवार दुपारचे वेध लागत.‌

Mira Nair

ही रस्त्यावर उन्हा, पावसात, थंडी, वाऱ्यात वाढणारी मुलं. भिकेत मिळालेलं बिस्किट, एखादा पावाचा तुकडा खाऊन गुजराण करणारी.‌ संस्थेतर्फे त्यांना आंघोळीचं महत्व, आंघोळ कशी करावी हेही तिकडले ताई, दादा प्रेमानं शिकवत. स्वच्छतेचं, आरोग्य राखण्याचं महत्व त्या मुलांना सांगत. देणगीतून आलेले कपडे मुलांना दिले जात. काही वेळा नवीन कपडेही मीरा दीदींकडून या मुलांसाठी पाठवले जात.

मी अशी लहानगी मुलं जाता येता नेहमी बघत असे. पण आपल्या सारखीच हाडामासाची ही मुलं किती विदारक आयुष्य जगत असतात, हे मात्र इथं आल्यावरचं समजलं. नियतीची सगळीच दानं उलटी पडलेल्या या कोवळ्या जीवांना साधं माणसाचं आयुष्य द्यायला दीदी झपाटल्यासारखी काम करत होती. पहाता, पहाता अनेक युवा, तरुणही या कामात तिने जोडले.

आज गेल्या ३४ वर्षात या संस्थेने एकट्या मुंबईत अशा रस्त्यावरच्या ५०० मुलांचं पूर्ण वेळ पालकत्व स्वीकारण्यापर्यंत गरुडझेप घेतली आहे‌.त्यांची रहाण्याची, जेवणाची, शिक्षणाची सोयही संस्थेच्या केंद्रांमधे केली जाते.

या मुलांना चित्रकला शिकवताना खूप मजा येई. ज्यांना शिक्षणाचा गंध नव्हता, शाळा काय असते माहिती नव्हतं. आपल्याच अवतीभवती वाढणारी ही मुलं, आजवर रस्त्यावरच्या भटक्या प्राण्यांसारखं जीवन जगत होती. अशी ही कोवळी मुलं. त्यांना A for Apple शिकवलं, तर समजत नसे. यावर उपाय म्हणून मग मातीची वेगवेगळी फळं, वस्तू बनवण्यात आल्या. चित्रांचे तक्ते तयार केले गेले.‌ मग या मुलांना ज्यात काही रस निर्माण होऊ शकेल असं काही करायला द्यावं, जेणे करुन ती संस्थेशी जोडली जातील. एकदम अंकलिपी शिकवली, पाढे शिकवले तर पुढल्या वेळी परत ते ढुंकूनही पहाणार नाहीत. म्हणून या उपक्रमाचा श्रीगणेशा त्यांच्याशी संवाद साधून, त्यांना गोष्टी सांगून, गाणी शिकवत, चित्रकला शिकवली गेली.‌

यातील बरीचशी मुलं खूप मन लावून चित्र काढत. त्यांची चित्रकला ही अतिशय थक्क करणारी होती. कितीतरी मुलं अप्रतिम चित्र काढत. मनाला येतील ते रंग देत. अगदी निळ्या रंगाचा आंबा, गुलाबी रंगाचा पेरु. पण त्या चितारण्यातही एक विलक्षण जादू जाणवे. एका सहा, साडेसहा वर्षाच्या हमीद नावाच्या मुलानं चितारलेला जोकर आजही डोळ्यांसमोर तरळत असतो.

त्यानंतर तब्बल एकवीस वर्षांनी २०११ ला असाच एक उपक्रम मध्यप्रदेशात सुरु करण्याचा योग आला. तो चित्रकलेपुरता मर्यादित होता. तिकडेही अनुभव असाच. सुरवातीला चॉकलेट देऊनही पळून जाणारी मुलं, हळू हळू चित्रकलेत रमली. त्यातल्या कितीतरी मुलांची चित्रकला थक्क करुन गेली.

या अनुभवांनंतर यावर मनात खूप सूक्ष्म विचार सुरुच होते. त्यावरची बरीच माहिती, संशोधन, इतरांचे अनुभव यांचा अभ्यास केला. आणि जे सत्य समजलं, ते कलेचा, माणूस नावाच्या विधात्याच्या सर्वांग सुंदर निर्मितीचा एक नवा कप्पा उघडत माझ्यासमोर आला.

यावरील अनुभवांवर, यातील संशोधनावर आणि मळलेल्या फाटक्या लक्तरातल्या, भुकेचा आगडोंब असह्य करणाऱ्या या लहानग्यांच्या हातात पेन्सिल, समोर कागद, रंगाची पेटी, एखादा साधा कोडॅक किंवा हॉटशॉट कॅमेरा जरी आली तरी माळरानावर वाढणाऱ्या गवतावर आणि काटेरी निवडुंगांवर येणाऱ्या रंगीबेरंगी फुलांसारखी ती कशी मोहरुन जातात… रंगतात, यावर सविस्तर लेखांची लेखमाला या “निवडुंगाची फुले” या सदरातून सुरु करण्याचा विचार आहे.

******

– प्रतोद कर्णिक,
लेखक हे चित्रकार आणि जाहिरातकर्मी आहेत.

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.