No products in the cart.
‘फोर्ब्स’ मानांकित फोटोग्राफर विकी राय
विकी राय हे ‘सलाम बालक’ ट्रस्टच्या मेहनतीला आलेलं सुरेख फळ असलं तरी खुद्द विकीने एक उत्कृष्ट फोटोग्राफर बनण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. विकी रायच्या कहाणीच्या या तिसऱ्या भागात विकीला ब्रिटीश फोटोग्राफर डिस्की बेंजामिन आणि दिल्लीचे नामवंत फोटोग्राफर अनय मान यांचं मार्गदर्शन कसं मिळालं आणि विकीने स्वतः काय प्रयत्न केले ते जाणून घेऊया. ज्यांना आयुष्यात काही करायचं आहे किंवा फोटोग्राफर बनायचं आहे त्यांच्यासाठी म्हणूनच हा तिसरा भाग खूप महत्वाचा आहे.
स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकरांची एक आठवण, लहान असताना जेव्हा त्या कामं मिळवण्यासाठी वेगवेगळ्या फिल्म स्टुडिओंच्या दारात वणवण करत फिरत होत्या, काम नाही मिळालं तर त्यांना खूप वाईट वाटे. असं वाटे की आज बाबा असते तर हे दिवस वाट्याला आले नसते. पण पुढे जेव्हा त्या वृद्धापकाळामधे घरात विश्रांती घेताना विचार करत, तेव्हा त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवे – विधात्याला आजची लता मंगेशकर घडवायची होती, म्हणून एवढे अडचणींचे पहाड त्यानी उभे केले. बाबा जर तेव्हा असते तर एखाद्या घरंदाज सारस्वत कुळात थाटामाटात लग्न लाऊन दिलं असतं आणि चार चौघींसारखं चूल आणि मूल यातच आयुष्य गेलं असतं.
म्हणजेच विधात्याला जे घडवायचं असतं ते घडवण्यासाठी तो विशिष्ट पार्श्वभूमी, नेपथ्य तयार करतो आणि त्याला जे घडवायचं असतं तेच तो घडवतो. विकी रॉय यांच्या बाबतीतही अगदी तीच गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते.
जेव्हा विकीने सेंटरमधल्या सरांना ठामपणे सांगितलं, मुझे फोटोग्राफर बनना है। नेमके त्याच वेळी ब्रिटीश फोटोग्राफर डिस्की बेंजामिन भारतात आले होते, आणि सलाम बालकच्या कार्याने प्रभावित होऊन ते विकीच्या सेंटरवर येऊन फोटो शूट करत होते. (२००४) सरांनी त्यांना सांगितलं, He wants to become Photographer. Can you teach him photography ? डिस्की आनंदानी तयार झाले.
मग ते गळ्यात मोठमोठे कॅमेरे घेऊन पुढे आणि विकी त्यांचा ट्रायपॉड घेऊन त्यांच्या मागे मागे. ते त्याला शटर म्हणजे काय, शटर स्पीड म्हणजे काय, लेंस कशी फोकस करावी, हे सगळं सांगत. पण इंग्रजीतून. पण याचं बिचाऱ्याचं दहावी पर्यंतचं शिक्षण हिंदीतून झालेलं. मग तो नुसतच ओ… या… ओहो, असं बोलत राही. पण ते जे सांगत ते मात्र सगळं आमच्या डोक्यावरुन… मग ज्याला इंग्रजी बोलता येतं, अशा सेंटरमधल्या एका मित्रालामध्ये घालून, त्यांनी डिस्कींना विचारलं, मला इंग्रजी येत नाही, समजत नाही, मग मी फोटोग्राफी कसा शिकणार ? त्यावर डिस्कींनी उत्तर दिलं, चीन, जपान, कोरिया अशा बऱ्याच देशांतल्या लोकांना इंग्रजी येत नाही. पण ते खूप उत्तम फोटोग्राफी करतात. तुझ्याकडे फोटोग्राफीसाठी लागणारी नजर, दृष्टिकोन आहे, हे मी आत्ता अनुभवलंय. तू जिद्दीनी फोटोग्राफी शिक. खूप मोठा फोटोग्राफर होशील.
जणू नियतीनेच डिस्की बेंजामिन या ब्रिटिश फोटोग्राफरना नेमक्या वेळी तिकडे पाठवून आपलं भाकीत वर्तवलं होतं. २००५ ला विकी अठरा वर्षांचे झाला. नियमाप्रमाणे त्याला सलाम बालक ट्रस्टमधून बाहेर पडणं क्रमप्राप्त होतं. बाहेरच्या जगामधे धाडताना या मुलांना भांडीकुंडी, कपडे दिले जातातच पण स्वत:च्या पायावर उभं राहीपर्यंत महिन्याचा खर्चही दिला जातो. अगदी जिमची फी सुद्धा. विकीने आजवर त्याला सलाम बालक ट्रस्टने दिलेल्या कोडॅक कॅमेरावरच फोटो काढले होते.
बाहेर पडताना विकीनी सलाम बालक ट्रस्टकडून पुढील काही काळासाठी मिळू शकणारे महिन्याच्या खर्चाचे पैसे घेणं टाळलं, पण नवीन डी एस एल आर. कॅमेऱ्यासाठी लोन मागितलं. त्यातून निकॉनचा एफ ८० हा तेव्हाचा अद्ययावत कॅमेरा घेतला. या मुलाची फोटोग्राफीची ओढ पाहून आणि साध्या कोडॅक कॅमेऱ्यानी काढलेल्या फोटों मधलं कसब पाहून सलाम बालक ट्रस्टनी त्याला कॅमेऱ्यासाठी लोन तर दिलंच वर त्याला दर महिन्याला दोन रोल आणि ते धुवायचा खर्चही द्यायला सुरवात केली.
विकी दिल्लीतल्या नामवंत फोटोग्राफर अनय मान यांना भेटला. त्यांनी विकीला असिस्टंट म्हणून ठेवायची तयारी दर्शवली. पण अट एकच होती, कमीत कमी तीन वर्ष नोकरी करायची. त्याचं काय कारण ? विकीच्या या प्रश्नावर अनयजी म्हणाले, माझ्याकडे आल्यावर सहा महिन्यांत तरुण मुलांच्या डोक्यात हवा जाते. आणि ते नोकरी सोडतात. त्यामुळे ते माझ्याकडून जे शिकायला आलेले असतात, ते न शिकताच जातात आणि फक्त माझं नाव वापरत कामं मिळवतात. महिन्यातून जेव्हा काम असेल तेव्हा, साधारण आठ ते दहा दिवस तरी यावं लागेलं. बाकीच्या वेळात तुला हवं ते करायला तू मोकळा असशील. आणि महिना तीन हजार पगार, सेलफोन आणि बाईक. मग काय, विकीच्या आनंदाला पारावार राहिला नाही. कधीकधी सलग चार, सहा दिवस स्टुडिओत शूट असे. विकी त्या दरम्यान एकच टिशर्ट रोज घालून येई. मग एकदा अनय सरांनी समजावून सांगितलं, आपण ज्यांची कामं करतो ते खूप मोठे लोक असतात. त्यांच्या समोर रोज तेच कपडे घालून येणं बरं दिसत नाही. मग सरांनी त्याला नवीन कपडे घ्यायला पैसे दिले. आणि लॉंड्रीच्या खर्चासाठी, शेविंग आणि केसांना जेल लावायला असे महिना ५०० रुपये अधिकचा भत्ता द्यायला सुरवात केली. आपलं रहाणीमान, दिसणं, वागणं हे सगळच किती महत्वाचं असतं, हे विकी इथे अशा प्रसंगातून शिकत होता.
पण महिन्याचे तीन हजार विकीला पुरत नसत. त्याचा रहाण्याचा, जेवणाचा खर्च, कॅमेऱ्याच्या हप्त्याचे दरमहा ₹५०० द्यावे लागत. त्यातच नोकरी व्यतिरिक्त उरलेल्या वेळात झपाटल्यासारखी आपल्या लाडक्या निकॉन एफ ८० मधून फोटोग्राफी करत हिंडणं, यात फोटोग्राफीचा सगळाखर्च भागेना. मग विकीनी यावरही एक शक्कल लढवली. तो मोठमोठ्या लग्नामध्ये वेटरचं काम करे, वेटरचं काम नसेल तर कधी डोक्यावर पेट्रोमॅक्सचे दिवे घेऊन वरातीतून चाले. या कामांतून पैसे मिळवत तो अनय सरांकडे फोटोग्राफीचं अनुभवातून शिक्षण आणि स्वत:चा फोटोग्राफीचा ध्यास, हे दोन्हीही सांभाळत होता.
अनयसरांकडे विकीनी फोटोग्राफीचे धडे गिरवत, फोटोग्राफीतल्या तांत्रिक आणि कलात्मक बाजू आत्मसात केल्या. आपल्या सूक्ष्म निरिक्षणातून, छाया प्रकाशाच्या या खेळात आता विकी प्रवीण झाला होता. अनय सरांबरोबर विदेशातही त्याला फोटोग्राफीच्या कामानिमित्त ते बरोबर नेत. वेगवेगळे देश, विमान प्रवास, फाईव्ह स्टार हॉटेलमधे रहाणं हे विकीला खूप स्वप्नवत वाटत होतं. प्रवासाची त्याची हौस अशा प्रकारे पूर्ण होत होती. काही चुकलं तरीही अनय सर, ग्राहकांसमोर कधी त्याला झापत नसत. नंतर व्यवस्थित समजावून सांगत. आजवरच्या लहानपणापासूनच्या अनुभवांपेक्षा हा अनुभवही विकीला सुखावणारा होता.
क्रमश:
*******
– प्रतोद कर्णिक,
लेखक चित्रकार आणि जाहिरात कर्मी आहेत.
Related
Please login to join discussion