Features

‘गच्चीवरील गप्पा’ ९० ते ९४ !

प्रत्येक चांगल्या गोष्टीला शेवट हा असतोच. तसाच ‘गच्चीवरील गप्पां’च्या कार्यक्रमांचा शेवट आता जवळ आला आहे. कोरोना आटोक्यात आल्यामुळं आता लाईव्ह कार्यक्रमाला तितकीशी उपस्थिती नसते, पण नंतर मात्र हे कार्यक्रम आवर्जून पाहिले जातात. या महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमांविषयीचा हा वृत्तांत. अगदी वेगळ्या स्वरूपाची व्यक्तिमत्व निवडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे हे यावरून नक्कीच लक्षात येईल. कातळशिल्पे, अजिंठा, चित्रकथी, छायाचित्रण कला,  अमूर्त कला अशा पाच विषयांवरचे हे कार्यक्रम आणि ते सादर करणार आहेत त्याच क्षेत्रातले दिग्गज कलावंत. त्यासंदर्भातच हे थोडंसं… 

‘गच्चीवरील गप्पां’च्या कार्यक्रमाला आता दोन वर्ष पूर्ण होत आली आहेत. लॉकडाऊनच्या काळात काहीच करण्यासारखी परिस्थिती नसल्यामुळं आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या चित्रकलेच्या क्षेत्रात काहीतरी करायला हवं या जाणिवेतूनच या कार्यक्रमाचा जन्म झाला. आधी वाटलं होतं की काही कार्यक्रम झाल्यावर हे कार्यक्रम आपण बंद करू, पण तसं झालं नाही. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा अफाट प्रतिसाद मिळत गेला. सुरुवातीचे कार्यक्रम फेसबुकवर असायचे. साहजिकच त्यामुळेच की काय कुणास ठाऊक कार्यक्रमांना प्रचंड प्रतिसाद लाभायचा. लाईक्स, शेयरिंग आणि कमेंट्सचा तर अक्षरशः पाऊसच पडायचा. हळूहळू हे कार्यक्रम स्थिरावत गेले, लोकप्रिय होत गेले. मग पंचविशी झाली, नंतर पन्नाशी झाली. पंचविशी झाली तेव्हा फक्त नोंद केली होती, पण पन्नाशी मात्र आम्ही दणक्यात साजरी केली. तोपर्यंत या कार्यक्रमाला एक वर्ष पूर्ण झालं होतं. निवडलेल्या कलावंतांची, मान्यवरांची संख्या देखील मोठी होती. मग आणखीन २५ कार्यक्रम सादर झाल्यावर कार्यक्रम थांबवायचं असं ठरवलं होतं, पण त्याला प्रखर विरोध झाला. म्हणून मग १०० कार्यक्रम पूर्ण करायचं ठरवलं. आज २ जुलै रोजी होणारा ९०वा कार्यक्रम आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात १००वा कार्यक्रम साजरा होईल. शंभरी कशाने साजरी करायची हे काही अद्याप ठरवले नाही, पण काहीतरी वेगळा कार्यक्रम आम्ही आयोजित करू हे निश्चित. ९९पर्यंतचे कार्यक्रम मात्र नक्की झाले आहेत.

'सिंधुदुर्गातील कातळशिल्पे' आणि सतीश लळीत !

या जुलै महिन्यात ‘गच्चीवरील गप्पां’चे एकूण पाच कार्यक्रम होणार आहेत. आज जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सतीश लळीत हे त्यांच्या ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ या छोटेखानी ग्रंथाच्या निमित्तानं आलेल्या अनुभवांविषयी बोलणार आहेत. श्री लळीत हे मूळचे पत्रकार, पण पत्रकारिता सोडून ते महाराष्ट्र शासनाच्या सेवेत शिरले. माहिती आणि जनसंपर्क खात्याचे उपसंचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं. काही काळ त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून देखील काम केलं. महाराष्ट्र सरकारचं मुखपत्र ‘लोकराज्य’चं संपादक पद देखील त्यांनी भूषवलं होतं. सध्या घुंगुरकाठी या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवाभावी संस्थेचं अध्यक्षपद ते भूषवतात. २००१ साली त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक कातळशिल्प शोधून काढलं. त्यांचा हा शोधाचा प्रवास आजतागायत तसाच चालू राहिला आहे. या संदर्भात त्यांनी विविध वृत्तपत्र आणि नियतकालिकांसाठी लेखन देखील केलं. विविध परिषदांमध्ये त्यांनी या संदर्भात पेपर्स देखील वाचले. शेकडो वर्षांपूर्वी मानवानं सड्यावर किंवा कातळावर ही चित्र कशी रेखाटली ? हे जाणून घेण्यासाठीच ‘चिन्ह’नं ‘गच्चीवरील गप्पां’मध्ये त्यांना आमंत्रित केलं आहे.

अजिंठा लेणी आणि डॉ. श्रीकांत प्रधान

दि. ९ जुलैच्या शनिवारी पुण्याचे डॉ. श्रीकांत प्रधान हे ‘गच्चीवरील गप्पां’मध्ये सहभागी होणार आहेत. ते मूळचे चित्रकार. पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयांमधून त्यांनी उपयोजित चित्रकलेची पदविका घेतली आणि ते चित्र काढू लागले, पेंटिंग्ज देखील करू लागले. पण त्यांचा ओढा लेखन संशोधनाकडे होता. त्यामुळे त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामधून इंडॉलॉजीमध्ये एमए केलं आणि नंतर डेक्कन कॉलेजमधून एमफिल. डेक्कन कॉलेजमधूनच अजिंठा ते अमरावती हा विषय घेऊन त्यांनी पीएचडी पूर्ण केली. आतापर्यंत असंख्य विषयावर, असंख्य परिषदांमधून त्यांनी रिसर्च पेपर्स वाचले आहेत. चित्रकलेसंबंधी नाना विषयांवर त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. विविध परिषदांमध्ये ते सहभागी झाले आहेत. नानाविध प्रदर्शनांमधून त्यांनी आपली चित्र प्रकाशित केली आहेत. इतकंच नाही तर आपल्या चित्रांचे वन मॅन शो देखील त्यांनी भरवले होते. अजिंठ्याची चित्र निर्मिती कशी झाली हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. या अभ्यासातूनच त्यांना अजिंठा चित्रं आणि आंध्रमधील अमरावती शैलीमध्ये साधर्म्य सापडलं. त्याच विषयावर त्यांनी पीएचडी केली. याच विषयावर ते एक ग्रंथ देखील लिहीत आहेत. अभिनव कला महाविद्यालयातून पदविका घेतलेल्या एका उपयोजित चित्रकारानं संशोधनाच्या क्षेत्रात मारलेली ही भरारी उत्तुंग अशीच आहे. ‘गच्चीवरील गप्पां’मध्ये त्यांच्या आजवरच्या प्रवासाविषयीच जाणून घेण्याच्या दृष्टीने प्रश्न विचारले जाणार आहेत.

लेखन, चित्रं आणि जयंत भीमसेन जोशी !

दि. १६ जुलैच्या शनिवारी ‘गच्चीवरील गप्पां’च्या ९२व्या कार्यक्रमात पुण्यातील एक चित्रकार जयंत भीमसेन जोशी हे सहभागी होणार आहेत. घरात अष्टोप्रहर संगीत, पण जयंत जोशी यांना मात्र चित्रकलेचा नाद लागला. त्यांचं शिक्षण पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयात आणि नंतर मुंबईच्या जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधून झालं. शिकत असल्यापासूनच ते उपयोजित कलेची कामं करीत गेले. पुण्यात त्यांचा स्टुडियो देखील आहे. याच काळात कधीतरी छायाचित्रण कलेची आवड देखील त्यांच्यात निर्माण झाली. उपयोजित कलेची कामं करीत असतानाच त्यांचा एक क्लायंट होता मॅक्सम्युलर भवन. या मॅक्सम्युलर भवनने मुंबईत १९८५ साली ‘East West Encounter’ हे वर्कशॉप आयोजित केलं होतं. या वर्कशॉपमध्ये सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली आणि चित्रकलेसंदर्भात एक वेगळीच दृष्टी त्यांना प्राप्त झाली. त्यांचं वाचनही अफाट. साहजिकच त्यातून विचार करण्याची कला त्यांना अवगत झाली. परिणामी ते चित्रकलेवर अतिशय संवेदनशीलपणे लेखनही करू लागले. फेसबुकवर अतिशय तरलपणे ते आपले विचार प्रसारित करीत असतात. पुण्यात नुकत्याच सुरु झालेल्या ‘झपुर्झा’ या आर्ट म्युझियममध्ये आर्ट फोटोग्राफ आणि चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे. त्यांच्या या आजवरच्या अनोख्या प्रवासासंदर्भात बोलण्यासाठीच ‘चिन्ह’नं त्यांना ‘गच्चीवरील गप्पां’मध्ये आमंत्रित केलं आहे.

अमूर्त चित्रं आणि पंडित खैरनार !

२३ जुलै रोजी नाशिकचे तरुण चित्रकार पंडित खैरनार यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. पंडित खैरनार हे वांद्रयाच्या रहेजा कॉलेजचे विद्यार्थी ते मूळचे नाशिकचेच, पण मुंबईत येऊन स्थायिक झाले. आपल्याला फक्त चित्रंच काढायची आहेत हे त्यांनी आधीच पक्क ठरवलं होतं. त्या दृष्टीनंच मग त्यांची वाटचाल होत गेली. रहेजा स्कूल ऑफ आर्टचे फारच मोजक्या विद्यार्थ्यांनी अमूर्त चित्रकलेच्या क्षेत्रात महत्वाची कामगिरी केली आहे. ज्यांच्याकडून अपेक्षा करता येईल असे पंडित खैरनार हे त्यापैकीच एक. सतत कलावंतांच्या कोंडाळ्यात असणं, कलेविषयीच बोलत राहणं, गप्पा मारणं यातूनच त्यांची अमूर्त कला खुलत गेली. मोठ्या स्टुडियोत मोठी पेंटिंग करणं हे त्यांचं स्वप्न होतं. मध्यंतरी चित्रकलेच्या क्षेत्रात खूपच मोठी मंदी आली. त्या मंदिच्याच काळात त्यांनी मुंबईतलं आपलं चंबू गबाळं आवरलं, स्टुडियो वगैरे सगळं विकून टाकलं आणि थेट नाशिक गाठलं. थोडं थोडकं नाही तर तब्बल चार-साडेचार हजार स्क्वेअर फुटांच्या स्टुडियोत ते आता सुखनैव पेंटिंग करतात. त्यांच्या या प्रवासाविषयीच जाणून घेण्यासाठी ‘चिन्ह’नं त्यांना ‘गच्चीवरील गप्पां’मध्ये आमंत्रित केलं आहे.

चित्रकथी आणि गंगावणे बंधू !

३० जुलैच्या शनिवारी ९४व्या गप्पांमध्ये कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी गावचे रहिवासी सर्वश्री चेतन आणि एकनाथ गंगावणे बंधू, ज्यांनी ‘चित्रकथी’ या चित्रकलेच्या पुरातन परंपरेचं अतिशय नेटानं जतन केलं आहे ते सहभागी होणार आहेत. त्यांचे वडील परशुराम गंगावणे यांना गतवर्षीच केंद्रसरकारने त्यांच्या या चित्रकथी संदर्भातल्या कार्याबद्दल पद्मश्री प्रदान केली होती. महाराष्ट्रातल्या या अतिशय प्राचीन अशा कलेसंदर्भात जाणून घेण्यासाठीच ‘चिन्ह’नं या दोघांना ‘गच्चीवरील गप्पां’मध्ये आमंत्रित केलं आहे. त्यांचे वडील पशुराम गंगावणे हे देखील या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे. या विषयाच्या सहभागामुळे महाराष्ट्रातील सर्वच कलांचा गोफ ‘गच्चीवरील गप्पां’मध्ये विणण्याचं भाग्य ‘चिन्ह’ला लाभलं असं निश्चितपणानं म्हणता येईल. हाही आगळा वेगळा कार्यक्रम पाहायला विसरू नका.

असे हे जुलै महिन्यातील कार्यक्रम. ऑगस्ट महिन्यात आणखीन चार कार्यक्रम होतील आणि शेवटचे दोन कार्यक्रम मात्र सप्टेंबर महिन्यात पार पडतील. तेही सारे कार्यक्रम निश्चित झाले आहेत, पण त्याविषयीची अधिक माहिती पुढल्या महिन्यातच देऊ. १०० कार्यक्रमांनंतर मात्र हे कार्यक्रम बंद करायचं ठरवलं आहे. यासंदर्भात जर काही सूचना असतील तर अवश्य कराव्यात.

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.