No products in the cart.
‘गायतोंडे जनआवृत्ती’ आणि ‘नग्नता’ सवलत योजनेत…
” शरीर अक्षरशः विदीर्ण करुन टाकणारा एक महाभयंकर अपघात सोडला, तर तुमच्या आमच्या कुणाच्याही आयुष्यात घडत असतात, तशाच चित्रविचित्र घटना चित्रकार गायतोंडे यांच्या आयुष्यात देखील घडल्या, पण गायतोंडे ध्येयापासून विचलित झाले नाहीत. प्रचंड वाचन, अखंड मनन, सतत चिंतन, ध्येयाप्रती अढळ निष्ठा आणि कुणाच्याही दबावाखाली न येता आपल्याला हवे तेच प्रत्यक्षात आणण्याची अफाट जिजीविषा याद्वारे ते मार्गक्रमण करीतच राहले. अपघातामुळे कॅनव्हास समोर उभं देखील राहता येईना, पण त्याचा बाऊ न करता कोऱ्या कॅनव्हाससमोरच्या आरामखुर्चीवर ते चिंतन-मनन करीत, थोडेथोडके नाही तर तब्बल आठ वर्ष वाट पाहत बसून राहिले. अखेर तो क्षण आलाच. गायतोंडे पुन्हा नव्या जोमानं पेंटिंग करू लागले. २००१ साली, वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
गायतोंडे यांची भन्नाट कहाणी इथं संपली का ? तर नाही, उलट तिथंच त्या कहाणीनं एक नवं वळण घेतलं. ते गेले आणि काही दिवसांतच त्यांची पेंटिंग कोट्यवधी रुपयांना विकली जाऊ लागली. न्यूयॉर्कच्या ग्युगेनहाईम म्युझियमतर्फे सिंहावलोकन प्रदर्शन भरवलं जाणार असल्याची बातमी आली आणि त्यांची दोन पेंटिंग लंडनमध्ये एकाच दिवशी झालेल्या वेगवेगळ्या लिलावांत १२ कोटींना विकली गेली. तर आणखी एका लिलावात एकच पेंटिंग २३ कोटी ७० लाखांना विकलं गेलं.
गिरगावातल्या चाळीच्या अडीच खोल्यातून सुरु झालेला हा चित्र प्रवास कुठं जाऊन स्थिरावणारेय या विषयी आता कुणीच अनुमान लावू शकणार नाही आहे.”
हा जो वरचा मजकूर तुम्ही वाचत आहात तो आहे ‘गायतोंडे’ ग्रंथाच्या मलपृष्ठावरील मजकूरामधून घेतला आहे. हा ग्रंथ २०१६ साली प्रसिद्ध झाला. आज २०२३. आणखीन नऊ महिन्यानंतर म्हणजे ०२ नोव्हेंबर पासून ‘गायतोंडे जन्मशताब्दी’ वर्ष सुरु होणार आहे. सरकार ते साजरं करील किंवा नाही या विषयी काही कल्पना नाही. त्यांनी ते तसं करावं या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. पण आता साऱ्यांनाच २०२४ च्या निवडणुकांचे वेध लागले असल्यामुळे ते कितपत शक्य होईल या विषयी शंकाच आहे.
गायतोंडे यांच्यावरील संशोधनासाठीचे सारेच संदर्भ उपलब्ध करुन दिल्यावर देखील २०१६ ते २०२३ या कालखंडात कुणीही प्रकाशक किंवा एखादं कला दालन गायतोंडे यांच्यावरील इंग्रजी ग्रंथाचं प्रकाशन करण्यास पुढे आलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. ज्यांनी तो प्रयत्न केला ते प्रकरण सध्या कोर्टात असल्यामुळे त्याविषयी काही बोलणे योग्य ठरणार नाही.
त्यामुळेच आता ‘चिन्ह’नं स्वतःच इंग्रजी ग्रंथ प्रकाशित करण्याचं धाडस मनावर घेतलं आहे. २ नोव्हेंबर २०२३ रोजी तो रीतसर प्रकाशित होईल. दरम्यानच्या काळात गायतोंडे यांच्या चित्रांच्या लिलावातल्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. कोरोना लॉकडाउन मुळे दोन वर्ष फुकट गेली अन्यथा गायतोंडे यांच्या खात्यावर एका चित्रासाठी शंभर कोटीचा विक्रमी लिलाव नक्कीच जमा झाला असता. पुढील वर्ष त्यांचं जन्मशताब्दीचं असल्यानं त्या वर्षी मात्र एक नवा विक्रम नक्कीच प्रस्थापित होईल यात शंकाच नाही.
गायतोंडे ग्रंथ प्रकाशित झाल्यापासून सातत्यानं या ग्रंथाला वाचकांकडून मागणी आहे. वेगवेगळ्या योजनांद्वारे आम्ही हा ग्रंथ वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ‘चिन्ह’च्या विशेष गाजलेल्या ‘नग्नता’ विशेष अंकासोबत ‘गायतोंडे’ ग्रंथाची जनआवृत्ती भेट म्हणून देण्याच्या योजनेला तर वाचकांकडून अतिशय प्रतिसाद मिळाला आहे. ‘गायतोंडे जन्मशताब्दी’च्या पोस्टना सुरु वात झाल्यापासून तर हा प्रतिसाद रोजच वाढतांना दिसतो आहे.
‘नग्नता’ अंक + चित्रसूत्र + गायतोंडे जनआवृत्ती हा १३५० रुपयांचा संच ‘चिन्ह’कडून फक्त ८५० रुपयात घरपोच पाठवला जातो. तुमच्या संग्रहात तो नसेल तर आजच मागणी नोंदवा. आता मात्र अगदी थोडेच संच उरले आहेत याची कृपया नोंद घ्या. ‘चिन्ह’ची प्रकाशनं अत्यंत खर्चिक निर्मितीमूल्य लाभलेली असल्यामुळं त्यांच्या पुन्हा पुन्हा आवृत्त्या काढता येत नाहीत. याची देखील कृपया नोंद असू द्यावी. या सवलत योजनेचे माहिती पत्रक सोबत जोडले आहे.
Related
Please login to join discussion