No products in the cart.
‘शुद्ध भाव’ हेच ‘खरे माप’ !
आज (२ नोव्हेंबर) गायतोंडे यांचा जन्मदिवस! आज गायतोंडे हयात असते तर ९८ वर्षाचे असते.आणि त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी सगळ्यांची चढाओढ सुरु असती, पण गायतोंडे मात्र सगळं काही नाकारून त्यांच्या आवडत्या आरामखुर्चीत सिगरेटचा झुरका घेत रमणमहर्षींच्या तसबिरीकडे पाहत बसले असते.
जिवंतपणीच आख्यायिका बनलेल्या गायतोंडें यांची चित्रे आज त्यांच्या मृत्यूनंतर कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहेत. पण त्यांच्या चित्रांचा आस्वाद कसा घ्यायचा हे भल्याभल्यांना देखील कळत नाही , उमगत नाही. ‘चिन्ह’ परिवारातले चित्रकार आणि शास्त्रीय गायक सुनील बोरगांवकर यांनी मात्र प्रस्तुत लेखातून त्यांच्या चित्राचा कसा तरलपणानं सहजगत्या आस्वाद घेता येतो हे अतिशय सोप्या शब्दात दाखवून दिलं आहे.
सकळ देवांचे दैवत |
उभे असे या रंगात ||
रंग लुटा माझे बाप |
शुद्ध भाव खरे माप ||
-श्री संत तुकाराम महाराज
हे वरचं चित्र विश्वविख्यात ऋषितुल्य चित्रकार श्री. वासुदेव गायतोंडे सरांचं !
हे चित्र “कशाची तरी” प्रतिकृती नाही, कुठल्याही विषय-वस्तूची प्रतिकृती वा नक्कल नाही ! हे चित्र शब्दात वर्णन करता येईल असा काहीच अर्थ सांगत नाही ! हे चित्र मला इतर कुठल्यातरी अनुभवाचा प्रति-अनुभव देत नाही, तर हे चित्र पाहात राहणं हाच प्रत्येक वेळी माझ्यासाठी एक नित्यनवा, नेत्रसुखद, समृद्ध करणारा परम आनंदमय अनुभव ठरतो ! हे चित्र मला प्रत्येक वेळी त्यातील दृश्य सौंदर्यक्षण नव्याने उलगडून दाखवतं…आणि मला माझ्यातल्याच काहीतरी, कशाचा तरी नव्याने उलगडा होत राहतो ! मोझार्ट ऐकताना, उ.अमीर खाँसाहेब ऐकताना सुद्धा प्रत्येक वेळी असंच काहीतरी नव्याने दिसतं…उलगडत राहतं…नवं काहीतरी उमलल्यासारखं वाटतं !
छान जुळलेला तानपुरा, त्यात एकजीव झालेला गायकाचा षडज, आणि त्या स्वरानुभवात समरसून मिसळून गेलेला रसिक यांना एकमेकांपासून वेगळं करणं कठीणच ! असाच काहीसा विरघळून जाण्याचा अनुभव हे चित्र पाहाताना होत राहतो !
या चित्रात दिसणारा ‘शुद्ध सौंदर्यपूर्ण दृश्यानुभव’ हाच या चित्राचा विषय आणि, तोच आणि तेवढाच त्याचा अर्थ !
या चित्रात रंग हे फक्त ‘रंग’ म्हणून आणि आकार हे फक्त ‘आकार’ म्हणून प्रकटले आहेत. इथे रंग-आकार हे सृष्टीतील कुठल्या विषयाची-वस्तूची प्रतिकृती चितारण्यासाठी ‘वापरले’ गेले नसून ते दृश्यसृष्टीतील एक स्वतंत्र सौंदर्यपूर्ण दृश्यविचार म्हणून आविष्कारीत झाले आहेत ! हे चित्र सौंदर्यपूर्ण दृश्यविचाराव्यतिरिक्त इतर कुठल्याही विचाराचे प्रतिनिधित्व करत नाही !
“शुद्ध दृश्य सौंदर्यानुभवाव्यतिरिक्त इतर कुठल्याही, कसल्याही अर्थापासून मुक्त असलेलं चित्र” असं या चित्राचं वर्णन करता येईल !
ज्याला जेवढं दिसेल, त्याच्यासाठी तेवढाच अर्थ !
हे चित्र शुद्ध दृश्यभाषा, दृश्यविचार-व्यवहार यातून त्यातील सौंदर्याच्या वर्णनासकटच थेट, स्पष्ट, अखंडपणे प्रकटतं ! या सौंदर्याचं वर्णन इतर कुठल्या भाषेत अनुवादित, भाषांतरित करता येणं केवळ अशक्य आहे कारण हे चित्र आनंदमय, सौंदर्यपूर्ण दृश्य भावार्थाव्यतिरिक्त इतर कुठलंच वक्तव्य करत नाही वा इतर कोणतीही कथा वा व्यथाही सांगत नाही !
…जशी बासरीतून निघालेली सुरेल, गोड सुरावट ही तिच्या सांगितीक अर्थासकटच प्रगटते, त्या अर्थाला स्पष्टीकरणाची गरजच नसते, ती सुरावट सुरेल सांगितीक सौंदर्यानुभवाव्यतिरिक्त इतर काहीच सांगत नाही ! त्यातील स्वर भाव, सौंदर्य विचार, संगीतमयता, नादमयता हाच त्या सुरावटीचा विषय आणि तोच अर्थ ! हा सांगितीक अनुभव शब्दातीत असतो ! या श्राव्य अनुभवाचं इतर भाषेत भाषांतर, व्याख्या वा वर्णन करणं अशक्य असतं ! ज्याचा कान जेवढा तयार, त्याला तेवढं संगीत ऐकू येतं, त्याला जेवढं ऐकू आलं…त्याच्यासाठी तेवढाच ‘अर्थ’ !
खरंतर आपणच आपल्या सवयीनुसार किंवा सोयीनुसार शुद्ध रंग-आकारांना, शुद्ध संगीताकृतींना कसले कसले तरी अर्थ लावत किंवा शोधत बसतो, आणि त्यामुळे त्या रंग-आकारांमधला शुद्ध दृश्यभाव प्रदुषित आणि गढूळ होऊन जातो !
षडजाला तो “षडज” असण्याव्यतिरिक्त इतर कुठलाच अर्थ नसतो, कोमल गंधार हा त्यातून उमलणाऱ्या सुरेल श्राव्य भावार्थाव्यतिरिक्त इतर कुठलाच अर्थ सांगत नाही!
अशा चित्रातून होणारं विशुद्ध सौंदर्यतत्वाचं आनंदमय दृश्य-निरूपण ऐकायला आपले डोळे मात्र तयार हवेत !
ज्याच्याकडे जेवढी ‘दृष्टी’, त्याला तेवढीच ‘सृष्टी’ दिसणार हे ही लक्षात घ्यायला हवं !
कुठल्याही विचाराची अभिव्यक्ती भाषेशिवाय होऊ शकत नाही आणि आपल्याला त्या भाषेची समज नसेल तर त्या अभिव्यक्तीवर, त्या कलाकृतीवर खापर फोडू नये !
या चित्रातून मला काव्यही ऐकू येतं, संगीतही दिसतं आणि नाट्यही अनुभवायला मिळतं.
सुरेख काव्य कोरून काढल्यासारखे भासणारे दृश्य आकार, त्या स्थूल – सूक्ष्म आकारांचा आपसातील नाट्यमय संवाद, नेमकेपणाने संगीतबद्ध केलेल्या अचूक काॅर्ड्स – हार्मनीज प्रमाणे भासणारी रंग-आकारांमधील धुंद करणारी जुगलबंदी, लय, ताल, छंद, रम्य आलापी, रंग छटांमधून ऐकू येणाऱ्या बारीक बारीक हरकती, खटके, मुरक्या, एकमेकांशी असलेले सुसंवादी सहअस्तित्व आणि सहचर्य, अवघं अवकाश भरून व्यापलेल्या सुगंधासारखी संपूर्ण कॅनव्हासभर पसरलेली एक मुख्य सुंदर रंगछटा… आणि हे सगळं किती नेमकं आणि अचूक… रूप भेद प्रमाण भाव लावण्य योजना … ना कण भर कमी – ना कण भर जास्त !
हा सगळा अनुभव किती सुंदर आणि मोहक आहे. संगीत, काव्य, नाट्य वगैरे कलांच्या अंतरंगात प्रवाहणाऱ्या शुद्ध भावरंगांच्या एकत्रीत-एकजीव अशा प्रतिबिंबाचा आभास या चित्रात होत राहतो. ‘अवघा रंग एक झाला’ असा काहीसा अनुभव मिळतो. खरंतर संगीत, चित्र, काव्य, नाट्य वगैरे विविध कलांच्या अभिव्यक्तीच्या माध्यमभाषांचं बाह्यरूप भिन्न असलं तरी त्यांच्या मुळाशी असलेल्या बीजरूपाला जीवन देणारं, त्या बीजातील सौंदर्यमुल्यांचं पोषण करणारं सारतत्व हे एकसमान तत्वांनी, समानधर्मी – समस्वभावी सौंदर्यमुल्यांनी युक्त असल्याचं जाणवतं. हे सारतत्व वैश्विक, शाश्वत, अखंड, स्थळा-काळाच्या मर्यादेपलीकडचं असल्याचे संकेत मिळत राहतात ! बहुतेक या वैश्विक सारतत्वालाच श्री.तुकोबा महाराजांनी ‘सकळ देवांचे दैवत’ असं म्हटलं असावं !
सत्यं शिवम् सुंदरम् अशा या सारतत्वाविषयी भान आलं की असं एखादं चित्र, संगीत, काव्य हे कुणाचं, कुठल्या देशातलं, कुठल्या काळातलं, कुठल्या प्रकारात मोडणारं, कुठला ईझम – कुठलं घराणं इत्यादी गोष्टी गौण ठरू लागतात…’फसवं सौंदर्य’ आणि ‘शुद्ध सौंदर्य’ यांमधील फरक हळूहळू स्वच्छ दिसू लागतो…’शुद्ध दृश्य भाषा’, ‘ शुद्ध दृश्यानुभव’ या सर्रास वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा नेमका अर्थ उमगतो…या शब्द प्रयोगामागचं नेमकं मर्म उलगडतं… मग चित्रातील अमका रंग-अमका आकार हा अमक्याचं प्रतिक आणि तमका रंग-तमका आकार हा तमक्याचं प्रतिक म्हणून पहा… चित्रातील लाल रंग म्हणजे कधी क्रांतीचं…कधी धोक्याचं प्रतीक म्हणून पहा वगैरे वगैरे प्रकारच्या चौकटबद्ध, पूर्वग्रहदूषित मानसिकतेतून संस्कारबद्ध झालेली दृष्टी हळूहळू अधिकाधीक मुक्त होत जाते आणि मग दृष्टीला दृश्यातील शुद्ध सौंदर्यतत्व उमगू लागतं. चित्रातलं ‘चित्र’ दिसू लागतं. लाल रंगाचा ‘लाल रंग’ एवढाच शुद्धभाव, तेच त्याचं शुद्ध सौंदर्य, तेच मर्म, तोच अर्थ ! आणि काळा रंग हा ‘काळा’ असण्याव्यतिरिक्त इतर कुठलाही अर्थ व्यक्त करत नाही, याचं भान येतं !
एखाद्या गाण्याला सांगितीक भाषेव्यतिरिक्त चिकटलेले इतर सर्व अर्थ, विचार व्यवहार, संदर्भ इत्यादी वजा केल्यावर उरतो तो फक्त “शुद्ध सांगितीक भाव”!
चित्राला, दृश्य भाषेव्यतिरिक्त चिकटलेले इतर सर्व विचार व्यवहार,अर्थ, संदर्भ वजा केल्यावर उरतो तो फक्त “शुद्ध दृश्य भाव” !
वरवरच्या सगळ्या पूर्वग्रहदूषित विचारधारा, त्यातून आलेले तर्क वितर्क, त्यातून आलेला उसना-उधार आविर्भाव वगैरे सारं काही गळून पडलं की उरतो तो “शुद्ध भाव” असं श्री. तुकोबा महाराजांना म्हणायचं असावं !
शुद्ध दृश्यभावाला ‘टायटल’ दिलं तरी तो अशुद्ध होईल, म्हणून हे चित्र “Untitled” !
शुद्ध चित्रानुभव हा दृश्य भाषेव्यतिरिक्त इतर कुठल्या भाषेत वाचता येत नाही, तर तो फक्त दृष्टीने वेचता येतो, हे भान मला श्री.गायतोंडे सरांच्या चित्रांनी दिलं आहे आणि दृश्यातील ‘विशुद्ध दृश्यपण वा शुद्ध भाव’ अनुभवण्यासाठी माझ्या दृष्टीचं आणि माझं शुद्धीकरण केलं आहे !
या ऋषितुल्य, सिद्धहस्त कलावंतापुढे नतमस्तक !
शेवटी, एखाद्या सौंदर्यस्थळात नक्की काय बघायचं किंवा काय ऐकायचं, सौंदर्यानुभव कसा घ्यायचा हे शिकवता येत नाही, ते कदाचित सतत स्वाध्याय प्रक्रियेत राहूनच ज्याला त्याला आपापल्या क्षमतेनुसार उमगू शकतं ! एखाद्याला एखाद्या गाण्यावरून जीव ओवाळून टाकावासा वाटतो, तर दुसऱ्याला त्याच गाण्याची कटकट वाटू शकते ! दोघेही आपापल्या जागी योग्य असू शकतात !
प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट कळतेच असं नाही, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट कळायलाच हवी असंही नाही, तसं शक्यही नाही !
ज्याला जे आवडतं आणि पचतं, ते त्यानं करावं, पहावं, खावं, ऐकावं… त्यातूनच आणि तेवढंच ज्याचं त्याचं पोषण होणार !
*****
– सुनील विनायक बोरगांवकर
चिन्ह प्रकाशित गायतोंडे ग्रंथ मागवण्यासाठी 90040 34903 या क्रमांकावर संपर्क करा.
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion