No products in the cart.
फेसबुक पेजचं दशक आणि ‘गायतोंडे जन्मशताब्दी’ वर्ष !
या वर्षाच्या शेवटाला म्हणजे २ नोव्हेंबर २०२३ पासून ‘गायतोंडे जन्मशताब्दी’ वर्षाला प्रारंभ होणार आहे. गायतोंडे यांचा जन्म २ नोव्हेंबर १९२४ चा. त्यामुळेच २ नोव्हेंबर २०२३ पासूनच पुढलं संपूर्ण वर्षभर गायतोंडे यांच्या संदर्भात ‘चिन्ह’तर्फे विविध कार्यक्रम करण्याचा विचार आहे. ‘चिन्ह’चा प्रमुख उद्देश हा चित्रकला विषयक साहित्याचा प्रसार करणं हा असल्याने या साऱ्या कार्यक्रमांचा भर अर्थातच इव्हेंट्सवर राहणार नसून गायतोंडे यांच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण समाज माध्यमांवर जास्तीत जास्त प्रसारित करण्यातच राहणार आहे. त्या दृष्टीनेच आम्ही कामाला सुरुवात केली आहे.
येतं संपूर्ण वर्ष आम्ही याच जागी गायतोंडे यांच्या संदर्भातल्या विविध प्रकारच्या पोस्ट तसेच त्यांच्या संदर्भात ५० – ६० वर्षात प्रसिद्ध झालेले लेख प्रसिद्ध करणार आहोत. गायतोंडे यांनी कुणालाही फारशा मुलाखती दिल्या नाहीत, ज्या काही दिल्यात त्या ‘चिन्ह’च्या गायतोंडे अंकात प्रकाशित झालेल्याच आहेत.साहजिकच त्यामुळे त्यांच्या संदर्भात आजवर प्रकाशित झालेल्या लेखांचाच त्यात जास्त समावेश असेल. अलीकडच्या काळात भारतातील विविध राज्यातून चित्रकला विषयक नियतकालिके मोठ्या प्रमाणावर प्रकाशित होऊ लागल्यामुळे या अंकात प्रसिद्ध झालेल्या गायतोंडे यांच्यावरचा विविध भाषेतील लेखांचा समावेश देखील त्यात असेल हे वेगळे सांगायला नकोच.
वर्षभर चाललेल्या या उपक्रमातून गायतोंडे यांच्यावरील दस्ताऐवजीकरणाचे काम पूर्ण होईल या विषयी आमच्या मनात कोणतीही शंका नाही. हा उपक्रम अधिकाधिक यशस्वी व्हावा भविष्यातील अभ्यासकांना तो सहजगत्या उपलब्ध व्हावा यासाठी ‘चिन्ह’च्या सर्वच वाचकांना तसेच हितचिंतकांना आम्ही जाहीर विनंती करतो आहोत की, कृपया या प्रकल्पाचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी आम्हाला साहाय्य करा. ‘चिन्ह’ची वेबसाईट, फेसबुक अकाउंट आणि फेसबुक पेजेस आणि इन्स्टाग्राम व ट्विटर अकाउंट्स यांचा आम्ही अधिकाधिक उपयोग करून घेणार आहोत म्हणून तेथे आम्हाला अवश्य फॉलो करा. आपल्या आप्त मित्र मैत्रिणींना देखील त्या विषयी सांगा.
जेणेकरुन त्यातून मोठा प्रसार होऊ शकेल.
या संदर्भात एक अगदी वेगळी मोहीम आम्ही सुरु करतो आहोत. त्याविषयी अधिक माहिती वाचा पुढल्या मंगळवारच्या पोस्टमध्ये गायतोंडे यांचं जे चित्र प्रकाशित केलं आहे ते २००६ सालच्या ‘गायतोंडेंच्या शोधात…’ अंकाच्या मुखपृष्ठावर वापरलं होतं. गायतोंडे यांचं फेसबुकवरील पेज ६ जानेवारी २०१२ साली सुरु झालं होतं. त्यावेळी आम्ही हेच चित्र पहिल्या पोस्टसाठी वापरलं होतं. त्याच चित्रानं आता ‘गायतोंडे जन्मशताब्दी’ वर्षाची सुरुवात करीत आहोत. तब्बल एक दशक झालं फेसबुकवरील हे पेज सुरु झाल्याला. पण गायतोंडे यांच्या विषयीचं सांगणं, बोलणं आणि ऐकणं अद्याप संपलेलं नाही. ते तसंच सतत चालू राहणार आहे. शतकातूनच एखाद दुसरी अशी व्यक्तिमत्व जेव्हा निर्माण होतात तेव्हाच हे घडत हे वेगळं सांगायला हवंय का ?
एवढं सगळं वाचल्यानंतर जर कुणाला ‘चिन्ह’नं प्रकाशित केलेल्या गायतोंडे ग्रंथाविषयी अधिक जाणून घ्यायची इच्छा झाली तर ९००४०३४९०३ या ‘चिन्ह’च्या व्हाट्सअप नंबरवर ‘GAI’ हा पाठवा.
******
– सतीश नाईक,
संपादक, चिन्ह
Related
Please login to join discussion