Features

जन्मशताब्दी वर्षात ‘गायतोंडे’ ग्रंथ इंग्रजीत…

काल १० ऑगस्ट रोजी गायतोंडे यांची पुण्यतिथी होती. आणखीन तीन महिन्यानंतर म्हणजे दोन नोव्हेंबर रोजी गायतोंडे जन्मशताब्दी वर्ष सुरु होत आहे. पण ‘चिन्ह’च्या इतिहासात पहिल्यांदाच आम्ही गायतोंडे यांच्या विषयी वाचकांना लेख देऊ शकलो नाही. त्याच कारण म्हणजे आमच्या वेबसाईटमध्ये एक मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. या अडचणीमुळे खर तर दोन दिवस वेबसाईट बंद राहिली. पण आता ही अडचण दूर झाली आहे. त्यामुळे काल चिन्हचे संपादक सतीश नाईक यांनी तब्येत ठीक नसतानाही लिहिलेला गायतोंडे यांच्यावरील लेख वाचकांसाठी आज देत आहोत. गायतोंडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘चिन्ह’तर्फे प्रकाशित होणाऱ्या आगामी इंग्रजी ग्रंथाचे तपशील या लेखात वाचायला मिळतील.

‘चिन्ह’ तर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाची निर्मिती…
काल १० ऑगस्ट २०२३. २२ वर्षांपूर्वी याच दिवशी चित्रकार गायतोंडे यांचं नवी दिल्लीत निधन झालं. आणखीन तीन महिन्यानंतर म्हणजे दोन नोव्हेंबर रोजी गायतोंडे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. खरं तर गायतोंडे हे नाव भारतीय चित्रकलेत सर्वश्रेष्ठ मानलं जातं. पण असं जरी असलं तरी महाराष्ट्र सरकार काय किंवा गोवा सरकार काय किंवा अगदी केंद्र सरकार काय गायतोंडे यांचं जन्मशताब्दी वर्ष कुठल्या न कुठल्या स्वरूपात साजरं करील असं मला काही वाटत नाही. महाराष्ट्र सरकारच्या संबंधित खात्यांशी मी काही महिन्यांपूर्वी या संदर्भात पत्रव्यवहार केला होता, पण दुर्दैवानं त्यास कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे.

ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारचं कामकाज आता चाललं आहे, त्या संदर्भातल्या सर्वच बातम्या आता आपण वृत्तपत्रात आणि वाहिन्यांवर पाहत असतो. काल कधी नव्हे ते संसदेत देखील त्याचे जे पडसाद उमटले ते देखील आपणच नव्हे तर सर्वच भारतीय नागरिकांनी वाहिन्यांवरून लाईव्ह स्वरूपात उघड्या डोळ्यांनी पाहिले. संपूर्ण महाराष्ट्र काल संसदीय चर्चेच्या त्या अगदी अद्वितीय अशा दर्जाने संकोचला असेल. आता हे वर्ष काय किंवा पुढील वर्ष काय निवडणुकी खेरीज दुसरा कोणताच विषय आपल्या चर्चेत असणार नाही हे निश्चित. त्यामुळे गायतोंडे जन्मशताब्दी वर्षात सरकारकडून कुठलाही कार्यक्रम आखला जाईल अशी अपेक्षा करणंच मूर्खपणाचं ठरेल.

*******

गायतोंडे गेले 2001 साली 10 ऑगस्टला. दुसऱ्या दिवशी मुंबईच्या एका राष्ट्रीय समजल्या जाणाऱ्या इंग्रजी वृत्तपत्रात त्यांच्या मृत्यूची बातमी अवघ्या सहा ओळींमध्ये आली होती. त्या बातमीनंच मला अत्यंत अस्वस्थ केलं. भारतातला सर्वश्रेष्ठ म्हणता येईल असा अमूर्त चित्रकार जातो आणि त्याच्या मृत्यूची बातमी अवघ्या सहा ओळीत? ‘चिन्ह’चं पुनरुज्जीवन करायचं हे त्याच दिवशी नक्की झालं. 2001 सालचा ‘चिन्ह’चा दिवाळी अंक प्रसिद्ध झाला , ज्यात गायतोंडे यांच्यावर सुमारे 30 पानाची विशेष पुरवणी होती. जी अतिशय गाजली. प्रचंड प्रतिसाद मिळाला त्या अंकाला. ‘चिन्ह’चं पुनरुज्जीवनच झालं त्या अंकानं. त्यानंतर 2006 साली ‘चिन्ह’नं एक दीडशे पेक्षा जास्त पानाचा ‘गायतोंडे विशेषांक’ प्रसिद्ध केला. ज्या अंकानं मराठीच नव्हे तर इंग्रजी भाषिकांमध्ये देखील ‘गायतोंडे’ या नावाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण केली. ज्यांना मराठी येत नव्हतं अशा अनेकांनी या अंकातील लेख इंग्रजीमध्ये अनुवादित करून घेऊन वाचले.(काहींनी तर त्यावरून उचलेगिरी करायला देखील मागेपुढे पाहिलं नाही . पण तो वेगळा किस्सा आहे आणि तो नंतर कधीतरी सांगेन ) तोपर्यंत गायतोंडे यांच्या चित्रांचे भाव जगभरच्या लिलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत गेले होते. त्यानंतर पुन्हा एकदा 2007 मध्ये ‘चिन्ह’ने आणखीन एक गायतोंडे विशेषांक प्रसिद्ध केला. तोही अतिशय गाजला.

गायतोंडे यांच्या संदर्भात अतिशय दुर्मिळ असा 200 पेक्षा अधिक पानांचा मजकूर उपलब्ध करून दिल्यानंतर असं वाटलं होतं की आता या मजकुराचा उपयोग करून गायतोंडे यांच्यावरील ग्रंथ प्रकाशित होतील. पण दुर्दैवानं तसं काहीच घडलं नाही. गेल्या सात वर्षात गायतोंडे यांच्यावर एकही ग्रंथ प्रसिद्ध झाला नाही . हे लक्षात घेऊनच ‘चिन्ह’नं आता मराठीत गाजलेला “गायतोंडे ” ग्रंथ इंग्रजीत देखील प्रकाशित करायचं ठरवलं आहे.

खरं तर येत्या2 नोव्हेंबर 2023 रोजी म्हणजे त्यांच्या शंभराव्या जन्मदिनीच हा ग्रंथ प्रकाशित करायचं असं ‘चिन्ह’नं ठरवलं होतं. पण काही ना काही अडचणी उद्भवल्या आणि सर्व कार्यक्रम थोडासाच पुढे ढकलावा लागला. या जन्मशताब्दी वर्षातच ‘गायतोंडे’ ग्रंथाचा इंग्रजी अवतार प्रसिद्ध होईल हे मात्र निश्चित.

अनुवादाचं काम अतिशय जोरात सुरू आहे. हा ग्रंथ आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावा या दृष्टीनंच आम्ही प्रयत्नशील आहोत म्हणूनच आधी तयार झालेला ड्राफ्ट आम्ही आयत्यावेळी रद्द केला. आणि पुन्हा नव्याने कामाला सुरुवात केली. गायतोंडे यांची अतिशय दुर्मिळ चित्रं आणि रेखाचित्र आणि त्यांचे फोटोग्राफ्स या ग्रंथासाठी आम्ही नव्यानं मिळवतो आहोत. किंबहुना या ग्रंथात गायतोंडे यांच्या सर्वच चित्रांचा अंतर्भाव व्हावा या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्नशील आहोत.

सारंच काही आता उघड करता येत नाही. करणंही योग्य नव्हे कारण मराठी पुस्तक आलं तेव्हा आलेला अनुभव भयंकर होता. त्यामुळे हातचं राखूनच आम्ही ही घोषणा करीत आहोत. आत्ता इतकंच सांगतो या ग्रंथाच्या बाबतीत की आम्ही या ग्रंथाच्या निर्मितीत कुठलीच कसूर सोडलेली नाही. आमची संपूर्ण टीम या ग्रंथासाठी अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम करण्याचा प्रयत्न करते आहे.

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा ग्रंथ जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही सहजपणे उपलब्ध होईल अशी वितरण व्यवस्था आम्ही या ग्रंथासाठी खास करीत आहोत. त्यामुळे आगाऊ नोंदणी वगैरे करायची भानगडच आम्ही ठेवलेली नाही. आणखीन तीन महिन्यानंतर म्हणजे दोन नोव्हेंबर 2023 पासून पुढलं संपूर्ण वर्षभर आम्ही ‘चिन्ह’च्या आमच्या वेबसाईटवर म्हणजे www.chinha.in वर ‘गायतोंडे’ या ग्रंथासंदर्भात दर आठवड्याला काही ना काही पोस्ट देणार आहोत. ज्यामध्ये गायतोंडे यांचा शोध आम्ही कसा घेतला ? काय काय प्रयत्न केले फोटो मिळवण्यासाठी, त्यांचे लेख, त्यांच्यावरची माहिती मिळवण्यासाठी कसे कसे प्रयत्न केले हे सारं त्या पोस्ट मधून आम्ही सांगणार आहोत.

‘गायतोंडे ‘ ग्रंथाइतकाच गायतोंडेंचा शोध आम्ही कसा घेतला ते देखील वाचनीय आहे असं आमचं मत आहे. त्यामुळे ‘चिन्ह’च्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका. फेसबुक इंस्टाग्राम, लिंकडेन, ट्विटर , टेलिग्राम यावर देखील आपण आम्हाला फॉलो करू शकता. आणखीन एक सोपी गोष्ट आम्ही करून ठेवली आहे ती म्हणजे ‘चिन्ह’चे आम्ही व्हाट्सअप ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुप द्वारे आम्ही सदस्यांपर्यंत ‘चिन्ह’ मध्ये प्रकाशित होणाऱ्या लेखांच्या लिंक्स पाठवत असतो. एडमिन ओन्ली असं स्वरूप असलेल्या या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी होऊन आपण आमचे अपडेट्स सहजपणे मिळू शकाल त्याची लिंक सोबत देत आहोत.
या निमित्ताने असेच पुन्हा पुन्हा वरचेवर भेटत राहू…

गायतोंडे ग्रंथ आणि ‘चिन्ह’चे इतर अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/FP5vWxtRADo01O10MKOicX
💥विशेष सूचना : ज्यांनी आधी ‘चिन्ह’चा कुठलाही अपडेट ग्रुप जॉईन केला आहे त्यांनी नव्याने हा ग्रुप जॉईन करण्याची गरज नाही. सर्व अपडेट्स त्यांना आधीच्या ग्रुपवर मिळतील.✒️🎨🎨🎨

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.