No products in the cart.
गायतोंडे, दै. पुढारी व महाराष्ट्र शासन!
गायतोंडे जन्मशताब्दी वर्षाची बातमी भारतातल्या फक्त एका वृत्तपत्रानं छापली. ते वृत्तपत्र म्हणजे मराठी दैनिक ‘पुढारी’. अन्य कुणाही माध्यमांना याची दखल घ्यावीशी वाटली नाही. महाराष्ट्र सरकारकडे तर सुमारे आठ-दहा महिने आधी पत्रव्यवहार करूनदेखील काहीच घडले नाही. त्याच संदर्भात ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांनी पुराव्यानिशी खुलासा केला आहे. हेतू एवढाच की किमानपक्षी जन्मशताब्दी वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २ नोव्हेंबर २०२४ रोजी तरी सरकारनं पुढाकार घेऊन या संदर्भात काहीतरी करावं.
कालच्या दैनिक ‘पुढारी’मध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. गायतोंडे जन्मशताब्दी वर्षाची बातमी देणारं ‘पुढारी’ हे बहुदा एकमेव दैनिक असावं. याखेरीज अन्यत्र कुठल्याच भाषेत या घटनेची नोंद झाली असावी असं माझ्या तरी पाहण्यात अद्याप तरी आलेलं नाही. ‘पुढारी’साठी ठाण्याच्या पत्रकार अनुपमा गुंडे यांनी ही बातमी दिली होती.
आदल्या रात्री त्यांचा अचानक फोन आला होता. त्यांनी या संदर्भात फेसबुकवर मी लिहिलेल्या पोस्ट वाचल्या होत्या. आणि त्यांना त्यावर सविस्तर बातमी करायची होती म्हणून त्यांनी फोन केला होता. त्यांना हवी होती ती सर्व माहिती मी दिली. मी शासनाशी जो पत्रव्यवहार केला होता तो त्यांना हवा होता त्यासाठी सतत त्या आग्रह करत होत्या. त्या पत्रांच्या प्रती माझ्यापाशी होत्या पण घरात रंगकामाचा प्रचंड पसारा असल्यामुळं लगेच त्या मिळणं अतिशय अवघड होतं. त्यामुळे त्यांना नकार देणं मला भाग पडलं.
पण असं असलं तरी मात्र त्यांनी दुसऱ्या दिवशी आवर्जून मोठी बातमी दिली. त्यासाठी त्यांनी बऱ्यापैकी माहितीदेखील गोळा केली होती. पण त्या माहितीत एकमात्र मोठी चूक केलेली मला आढळली कदाचित हा मुद्राराक्षसाचा प्रताप असावा. (हल्ली वृत्तपत्रातून मुद्रितशोधक ही जमात पूर्णपणे नामशेष झाली असल्याचं मी ऐकून आहे. त्यामुळं त्याचा ठपका नेमका कुणावर ठेवावा हे सांगणं अतिशय अवघड आहे.) गायतोंडे यांचा जन्म १९२४ सालचा पण बातमीत १९२४ सालाऐवजी १९४५ साल पडलं आहे. ही महत्वाची चूक सोडली तर संपूर्ण बातमी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं दिली आहे. माझ्या दृष्टीनं तेच महत्वाचं आहे. संपूर्ण भारतात गायतोंडे जन्मशताब्दीची दखल कुणाही पत्रकाराला घ्यावीशी वाटली नाही. आणि ती अनुपमा गुंडे या मराठी वृत्तपत्रात काम करणाऱ्या तरुण पत्रकाराला घ्यावीशी वाटली ही माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. गायतोंडे यांच्या संदर्भात मी जे काही थोडंफार काम केलं आहे ते संपूर्ण भारतात एका पत्रकारापर्यंत का होईना पोहोचलं आहे हे देखील माझ्या दृष्टीनं महत्वाची गोष्ट आहे.
अनुपमा गुंडे जी पत्रं माझ्याकडे मागत होत्या त्या पत्रांच्या प्रती का होईना आज मला घरात थोडीशी शोधाशोध करताना सापडल्या आहेत. त्या इथं मी देतो आहे. गेल्या वर्षी म्हणजे दि ८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळीच १०.३० वाजता महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी माझी भेट ठरली होती. डिनोव्हो संदर्भात मी जे काही लिहीत होतो ते वाचून बहुदा दादांनी मला भेट देऊ केली असावी. भेट दहा मिनिटांचीच होती. त्यामुळे डिनोव्हो संदर्भात बोलणं संपताच मी गायतोंडे जन्मशताब्दीचा विषय काढलाच. त्यांनी ते शांतपणे ऐकून घेतलं. ‘गायतोंडे’ ग्रंथाची भेट प्रत मी त्यांना देताच त्यांनी फोटोग्राफरना बोलावून फोटोदेखील काढून घेतला. आणि ग्रंथ चाळतचाळत ते म्हणाले की नक्की काहीतरी करूया. मी त्यांना सदर पत्र देताच ते म्हणाले शिक्षणसचिव विकास रस्तोगी साहेबांनादेखील तुम्ही हे पत्र द्या. मी त्यांच्याशी बोलतो. खुंटा हलवून अधिक बळकट करण्यासाठी मी त्यांना असंही म्हणालो की चित्रकार गायतोंडे आपल्या गिरगावच्या वास्तव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत नेमानं जात असत. (हा संदर्भ मला गायतोंडे यांचे बालमित्र शांतू आमोणकर यांच्या मुलाखतीत सापडला होता.) कसं कुणास ठाऊक हा संदर्भ मी पटकन दादांना सांगून टाकला. हेतू हा की त्यांना गायतोंडे यांच्याविषयी किमान आपुलकी वाटावी वगैरे. (हे मी योग्य केलं का अयोग्य केलं हा प्रश्न मला नंतर अनेकदा पडला पण कुठल्याही परिस्थितीत २ नोव्हेंबर २०२३ मध्ये गायतोंडे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरु व्हावं असं मला अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे वाटत होतं त्यामुळे कदाचित मी ते बोलून बसलो असणार.) दादा हेदेखील म्हणाले आता मुंबईला आलाच आहात तर शिक्षण सचिवांना आत्ताच अवश्य भेटा. कदाचित तुम्हाला यावेळी मंत्रालयात सोडणार नाहीत पण फोन तर करा असंदेखील ते म्हणाले.
दादांकडून निघालो आणि मंत्रालय गाठलं. दोन-तीन वेळा डिनोव्होच्या निमित्तानं शिक्षण सचिवांकडं गेलो असल्यामुळं त्यांचे सचिव सुरेश चट्टेचलवाडी (हे नाव मी बहुदा बरोबर लिहिलं असावं) यांना फोन केला आणि दादांचा निरोप सांगितला. त्यांनी मोठ्या तत्परतेनं रस्तोगी साहेबांना जे पत्र आणि ग्रंथ मला द्यायचा होता ते सर्व घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयातून एका माणसाला पाठवलं. त्या माणसाकडे मी सारं सुपूर्द केलं. पोच वगैरे घेणं शक्यच नव्हतं. पण त्याच दिवशी संध्याकाळी विकास रस्तोगी यांच्याकडून ग्रंथ आणि पत्र पोहोचल्याचा मेसेज माझ्या व्हाट्सअपवर आला.
मी धरून चाललो की आता निश्चितपणे काहीतरी होईल. पण अगदी आजतागायत काहीच घडलेलं नाही. काल २ नोव्हेंबर रोजी ‘चिन्ह’नं मात्र ‘गायतोंडे जन्मशताब्दी’ची घोषणा केली आणि अगदी छोट्याशा पातळीवर का होईना गायतोंडे यांच्या आठवणी वर्षभर जागवण्याचा संकल्प सोडला. हे सारं मी आता का लिहितोय? तर किमानपक्षी जन्मशताब्दी वर्ष संपतासंपता म्हणजे २ नोव्हेंबर २०२४ साली तरी उच्च व तंत्रशिक्षण विभागानं या संदर्भात काहीतरी करावं म्हणून. यात माझा वा ‘चिन्ह’चा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही किंवा त्यात मिरवण्याची कोणतीही महत्वाकांक्षा मला नाही.
२००१ सालापासून म्हणजे गायतोंडे यांच्या निधनानंतर पदरचे पैसे खर्च करून मी ‘चिन्ह’ची गायतोंडे विशेष पुरवणी प्रसिद्ध केली. २००६ साली गायतोंडे विशेषांक प्रसिद्ध केला. २००७ साली आणखीन एक विशेष पुरवणी प्रसिद्ध केली. गायतोंडे यांची सर्व चरित्र साधनं उपलब्ध करून दिल्यावर तरी कुणी तरी माईचा लाल पुढं येईल आणि गायतोंडे यांच्यावरील दिमाखदार ग्रंथ प्रसिद्ध करील असं मला वाटलं होतं पण तसं काहीच घडलं नाही. अखेरीस २०१६ साली पुन्हा एकदा ‘चिन्ह’नं मोठं धाडस केलं आणि दिमाखदार ‘गायतोंडे’ ग्रंथ प्रकाशित केला.
२०१६ पासून आजतागायत म्हणजे २०२३ पर्यंत गायतोंडे यांच्यावर इंग्रजीत ग्रंथ प्रकाशित करण्याचं धाडस कुणीही केलेलं नाही. ना त्यांच्या गॅलरीवाल्यानी ना कुणा प्रकाशकांनीदेखील. नाही म्हणायला ‘चिन्ह’च्या कामाची उचलेगिरी झाली पण त्याविषयी न बोलणंच योग्य. म्हणूनच २०२४ साली म्हणजे ‘गायतोंडे जन्मशताब्दी’ वर्षात ‘चिन्ह’नंच ‘गायतोंडे’ ग्रंथ इंग्रजीत प्रकाशित करावयाचा संकल्प सोडला. त्याचं काम आता अतिशय वेगानं सुरु आहे. इतक्यात त्याविषयी सारंच काही सांगू इच्छित नाही किंवा त्याचे फोटोदेखील प्रकाशित करू इच्छित नाही कारण पुन्हा उचलेगिरीची भीती आहेच. पण एवढंच सांगेन की प्रख्यात लेखिका शांता गोखले यांनी या ग्रंथाचा अनुवाद केला आहे. हे लिहिल्यानंतर या ग्रंथाविषयी आणखीन वेगळं काही सांगायला नको असं मला वाटतं, म्हणून इथंच थांबतो.
सतीश नाईक
संपादक
‘चिन्ह आर्ट न्यूज’
Related
Please login to join discussion