No products in the cart.
‘गायतोंडे जन्मशताब्दी’ वर्ष!
आजपासून ‘गायतोंडे जन्मशताब्दी‘ वर्ष सुरु होत आहे. ते सादर करण्याच्या बाबतीत कुठलंही राज्य सरकार किंवा केंद्र सरकार पुढाकार घेणार नाही हे लक्षात आल्यावरच ‘चिन्ह‘नं निर्णय घेतला की आता आपणच आपल्या पद्धतीनं ‘गायतोंडे जन्मशताब्दी‘ वर्ष साजरं करायचं. त्या निमित्तानं ‘चिन्ह‘ ‘गायतोंडे‘ ग्रंथाची आंतरराष्ट्रीय दर्जाची निर्मितीमूल्य लाभलेली आवृत्ती प्रसिद्ध करणार आहोत आणि ‘चिन्ह‘च्या या वेबसाईटवर एका विशेष विभागात तसेच समाजमाध्यमांवर दर आठवड्याला गायतोंडे यांच्या स्मृती जागवणार आहोत.
आज २ नोव्हेंबर २०२३. बरोब्बर ९९ वर्षांपूर्वी म्हणजेच २ नोव्हेंबर १९२४ रोजी नागपूर येथे चित्रकार वासुदेव संतू गायतोंडे यांचा जन्म झाला. त्या अर्थानं येतं वर्ष हे ‘गायतोंडे जन्मशताब्दी’ वर्ष मानलं जायला हवं. पण आपल्या इथे ‘मोले रडाया घातले’ अशी सारी विचित्र परिस्थिती आहे. त्यातच पुढलं वर्ष हे लोकसभेच्या निवडणुकांचं असणार आहे. हा मजकूर लिहीत असताना भारतातल्या पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीच्या दुंदुभी वाजू लागल्या आहेत. त्यामुळे माध्यमांमधलं सारंच वातावरण निवडणूकमय झालं आहे. अशा परिस्थितीत कोण गायतोंडे? आणि काय? अशी परिस्थिती निर्माण झाली असली तर त्यात काही नवल नाही. त्यामुळेच सरकारी पातळीवर ‘गायतोंडे जन्मशताब्दी’ साजरी होईल याविषयी मला कोणतीच आशा उरलेली नाही.
अर्थात मी एक लहान माणूस आहे. गायतोंडे यांच्या अलौकिक अशा जगण्यानं आणि त्यांच्या चित्र-प्रतिमेनं भारावून जाऊन १९७४-७५ सालापासून मी त्यांना फॉलो करू लागलो. तो काळ खूप वेगळा होता. कुणाविषयी काही जर जाणून घ्यायचं असेल तर ते फक्त लिखित माध्यमातूनच जाणून घेता येत असे. म्हणजेच पुस्तकं, नियतकालिकं किंवा वृत्तपत्र यामधूनच. आज ज्याच्या सोबतीनं आपण जगतो त्या इंटरनेटसारख्या प्रभावी माध्यमाचा तेव्हा शोध लागायचा होता. साहजिकच कुणाविषयीदेखील माहिती जमा करायची झाली तर ती छापील माध्यमांच्या साहाय्यानंच करावी लागत असे. अन्य दुसरं कुठलंही माध्यम नव्हतं. अशा काळात मी चित्रकार गायतोंडे यांच्या संदर्भात एक एक कागद, एक एक चित्र जमवत गेलो. ज्याचा कालांतरानं एक खूप मोठा संग्रह झाला.
खरं तर गायतोंडेंचं नव्हे तर सर्वच भारतीय चित्रकारांच्या संदर्भात मी हे दस्तावेजीकरणाचं काम करत आलो होतो. पण चित्रकार म्हणून गायतोंडे माझे सर्वात फेव्हरेट होते. म्हणून मी त्यांचा उल्लेख इथं करतो आहे. कारण याच संग्रहाचा वापर करून मी चित्रकार गायतोंडे यांच्यावर ‘चिन्ह’या कला वार्षिकाचे तीन विशेष अंक अनुक्रमे २००१, २००६, २००७ प्रसिद्ध केले. गायतोंडे यांच्या चरित्राची सर्व संदर्भ साधनं उपलब्ध करून दिल्यावरदेखील कुणीही प्रकाशक किंवा गॅलरीवाला त्यांच्यावरचा ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी पुढं येईना म्हणून याच अंकातील मजकुरामध्ये आणखीन थोडी भर टाकून मी २०१६ साली गायतोंडे यांच्यावर एक विशेष मराठी ग्रंथ प्रसिद्ध केला. जो अतिशय गाजला. पण त्यालाही आता सात वर्ष लोटली आहेत.
याचाच अर्थ असा की गायतोंडे यांच्या निधनाला उणीपुरी २३ वर्ष पूर्ण झाल्यावरदेखील त्यांच्याबाबत ‘अधिकृत माहिती’ देणारा इंग्रजी ग्रंथ प्रकाशित झालेला नाही हे लक्षात घेऊन त्यांच्या ‘जन्मशताब्दी’ वर्षात म्हणजे २०२४ सालात ‘चिन्ह’नं मूळ मराठी ग्रंथ ‘गायतोंडे’ हा इंग्रजीत प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या राज्यात त्यांचं मूळ होतं असं मानलं जातं ते गोवा राज्य किंवा ज्या राज्यात त्यांनी तब्बल ४०-४२ वर्ष वास्तव्य केलं आणि चित्रकार म्हणून मोठं नाव कमावलं ते महाराष्ट्र राज्य किंवा ज्या राज्यात त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य व्यतीत केलं ते दिल्ली राज्य किंवा ज्यानं त्यांना सत्तरच्या दशकात वयाच्या ५२ किंवा ५३ व्या वर्षी पदमश्री बहाल केली ते केंद्र सरकार या कुणालाच त्यांची ‘जन्मशताब्दी’ साजरी करण्याविषयी काहीएक पडलेली नाही. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा सुमारे वर्षभर आधी मी महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांच्याशी संपर्क साधून २०२४ साल हे ‘गायतोंडे जन्मशताब्दी’ वर्ष म्हणून साजरं करावं अशी विनंती केली पण माझ्या या विनंतीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या.
शेवटी मूळ मराठी ‘गायतोंडे’ ग्रंथ इंग्रजीत प्रकाशित करून आपणच त्यांचं ‘जन्मशताब्दी’ वर्ष साजरं करावं असा निर्णय मी घेतला. मी काय किंवा ‘चिन्ह’ काय यांचा आवाका फार छोटा आहे त्यामुळे हा ग्रंथ प्रकाशित करणं आणि दर आठवड्याला ‘चिन्ह’च्या वेबसाईटवर आणि समाजमाध्यमांवर गायतोंडे यांच्या संदर्भातल्या पोस्ट प्रसारित करणं एवढ्यापुरतंच आम्ही आमचं कार्य मर्यादित केलं आहे.
आज २ नोव्हेंबर २०२३. आजपासून आम्ही हा उपक्रम सुरु करीत आहोत. हा उपक्रम २ नोव्हेंबर २०२४ पर्यंत सातत्यानं चालेल. एवढी मात्र मी खात्री देतो. तर भेटूच इथून पुढं दर आठवड्याला.
सतीश नाईक
संपादक
‘चिन्ह आर्ट न्यूज’
Related
Please login to join discussion