No products in the cart.
गाफील राहून चालणार नाही !
२ मे रोजी जेजेत अनन्य अभिमत विद्यापीठासंदर्भात पहिली सभा झाली. त्यानंतर समाज माध्यमांवर त्यासंदर्भात पोस्ट पडताच खूपच प्रतिक्रिया आल्या. या संपूर्ण सभेचं ‘चिन्ह’नं लाईव्ह प्रसारण केलं होतं, ते काही फारसं चांगलं नव्हतं पण तरी देखील ते खूप पाहिलं गेलं, आजही पाहिलं जात आहे आणि त्यानंतर मात्र विचारणांचा एकच ओघ सुरू झाला. तो म्हणजे यात आम्हाला भाग कसा घेता येईल ? यासाठी आम्ही काय करायचं ? कुठे भेटायचं ? कोणाला भेटायचं ? कुठला व्हॉट्सअप ग्रुप आहे का ? एक ना दोन नाना प्रश्नांचा हवाहवासा वाटणारा भडीमार झाला. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं या लेखात देण्याचा प्रयत्न करतो आहे.
आपण विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं कदाचित आम्हाला देता येणार नाहीत, कारण त्यातला काही भाग गोपनीय आहे. अजून काही काळापुरता तरी तो गोपनीय असावा या दृष्टीने आम्ही सर्वांनी मिळूनच निर्णय घेतला आहे, त्यामुळे काही घडामोडींविषयी मी कुठलेही भाष्य करणार नाही किंवा त्याची माहिती देणार नाही हे कृपया लक्षात घ्यावं. गोपनीयता जी आहे ती केवळ हा प्रकल्प किंवा आपलं हे आंदोलन यशस्वी व्हावं यासाठीच आहे. दुसरा कुठलाही हेतू त्यात नाही हे कृपया समजून घ्या.
२ मे ला आम्ही जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टच्या असेंब्ली हॉलमध्ये भेटलो, तेव्हाच खरं तर जुळवा जुळविला सुरुवात झाली. आलेल्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याचं नाव नोंदवलं गेलं, मोबाईल नंबर नोंदवला गेला. जे जे स्कूल ऑफ आर्ट, अप्लाइड आर्ट आणि आर्किटेक्चर या तिन्ही कॉलेजमधले विद्यार्थी सभेला उपस्थित होते. त्या सर्वांची यादी मिळून २५० पर्यंत गेली. ही कामाची पहिली सुरुवात होती. त्यानंतर कालच्या रविवारी ठाण्यामध्ये एक छोटी सभा झाली. या सभेत दोन तारखेच्या सभेनंतर ज्यांनी ज्यांनी विचारणा केली होती आणि आंदोलनात सहभागी होण्याची इच्छा दर्शवली होती त्या सर्वांनाच निमंत्रित करण्यात आलं होतं. खऱ्या घडामोडी घडणार आहेत त्या शासकीय पातळीवर. त्या कुणी हाताळायच्या ? किंवा तेथे कोणी उपस्थित राहायचं ? यासंदर्भात निर्णय घेतले गेले, पण प्रामुख्यानं संघटन कसं उभं करायचं यादृष्टीनेच अधिक चर्चा झाली.
सर्वात महत्त्वाची घटना घडणार आहे ती ही की या तीनही कॉलेजची मिळून माजी विद्यार्थी संघटना तयार केली जाणार आहे. आज देखील या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटना अस्तित्वात आहेतच. पण त्या कार्यान्वित आहेत किंवा नाहीत याविषयी त्यातल्या सभासदांखेरीज अन्य कोणी सांगू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. उदाहरणार्थ आमच्या जे जे स्कूल ऑफ आर्टची ‘जेजेआईट्स’ ही संघटना आहे. तिचा रीतसर मी सभासद झालो आहे. शिरीष मिठबावकर या संघटनेचे अध्यक्ष होते तोपर्यंत या संघटनेत काहीना काही कार्यक्रम होत होते. तोपर्यंत मी तिच्याशी संबंधित होतो, पण नंतर मात्र तिच्या कार्यक्रमांविषयी काही कळेना, पत्रे देखील येईनात. त्यामुळे संपर्क तुटला तो तुटलाच. मध्यंतरी या ‘जेजेआईट्स’चा एक व्हॉट्सअप ग्रुप काढला गेला. त्या ग्रुपमध्ये देखील माझा समावेश होता, पण त्या ग्रुपमध्ये जेजेत एकेक वर्षाचा कोर्स केलेले आपण जेजेचेच विद्यार्थी असं म्हणून मिरवू लागले तेव्हाच मी या ग्रुपमधून बाहेर पडलो. आता तो ग्रुप आहे किंवा नाही, ही संघटना अस्तित्वात आहे किंवा नाही याबद्दल मला काहीही कल्पना नाही. अशीच अवस्था अन्य संघटनांची देखील असू शकते. त्यामुळे यासंदर्भात खोलात जाऊन काम करावं लागेल हे निश्चित !
जर या संघटनांकडून पुरेसा प्रतिसाद मिळणार नसेल तर पूर्णपणे नवी संघटना उभी केली जाईल आणि ती युद्ध पातळीवर कार्यान्वित केली जाईल हे निश्चित. नेमके काय होईल याविषयी इतक्यात तरी सांगता येणार नाही, कारण त्या संस्थांच्या प्रतिनिधींशी या संदर्भात चर्चा करावी लागेल, नंतरच हा निर्णय होईल. पण एवढे मात्र निश्चित की जे जे अनन्य अभिमत विद्यापीठ तयार व्हायचं असेल तर त्याच्या पुढल्या वाटचालीत या तीनही महाविद्यालयांच्या माजी विद्यार्थी संघटनांचा मोठाच हातभार असेल यात शंकाच नाही.
त्याची पूर्वतयारी म्हणून व्हॉट्सअप ग्रुप बांधण्यास सुरुवात झाली आहे. ‘चिन्ह’नं प्रारंभापासूनच ‘जेजे जगी जगले’, ‘क(।)लाबाजार’, ‘कलाशिक्षण महाचर्चा’, ‘सेव्ह जेजे / जेजे वाचवा’ ही फेसबुक पेजेस चालवली आहेत. जेजेशी संबंधित असंख्य आजी माजी विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत. या पेजेसवरून ‘चिन्ह’तर्फे आम्ही सर्व कलाविषयक माहिती प्रसारित करीत असतो. जेजेच्या या आंदोलनाची माहिती देखील आम्ही इथं प्रसारित करतो आहोत आणि तिला प्रतिसाद देखील प्रचंड मिळतो आहे. याखेरीज माझं व्यक्तिगत आणि आशुतोष आपटे यांच्या पेजेस किंवा अकाऊंटवरून देखील जेजेचे माजी विद्यार्थी जे जे अनन्य अभिमत विद्यापीठात सहभागी होऊ शकतात. अनेकजणं त्याच मार्गानं सहभागी होत आहेत. आणखीन जास्तीत जास्त दोन आठवड्यातच निर्णय होईल आणि त्यानंतर मात्र लगेचच नव्या संघटनेची अकाउंट्स किंवा पेजेस फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर सुरु होतील.
माजी विद्यार्थ्यांची संघटना अस्तित्वात आली की लगेचच त्यातूनच वेगवेगळ्या समित्या निर्माण केल्या जाणार आहेत. तातडीने आम्ही निर्माण केलेली पहिली समिती म्हणजे या आंदोलनाची प्रसिद्धी करणारी एक विशेष समिती. या समितीतर्फे अर्थातच समाज माध्यमं, वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या यांच्याद्वारे प्रसार करून जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचता येईल हा पहिला कार्यक्रम आखण्यात आला आहे. या आंदोलनात जे जे काही होईल ते ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवावे आणि त्यांचा पाठिंबा आंदोलनाला मिळावा या दृष्टीनं देखील उर्वरित कार्यक्रम आखण्यात आला आहे. प्राथमिक पातळीवर संघटना बांधण्याचे काम आता सुरू झालं आहे, पण याला खरी गती येईल ते मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच जी एक दुसरी बैठक ठरली आहे त्या बैठकीनंतरच !
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या गतीनं त्वरित कारवाई करून हा प्रश्न हाताळला आहे ते पाहता जेजे अनन्य अभिमत विद्यापीठासंदर्भात निर्णय घेण्यास आता सरकारला फार कालावधी लागणार नाही एवढं निश्चित. पण तरीदेखील गाफील राहून चालणार नाही. समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून जेजेच्या सर्वच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा आणि कलाप्रेमींचा पाठिंबा आपल्याला मिळवावा या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतो आहोत. आम्ही ज्या पोस्ट प्रसारित करतो आहोत त्या पोस्ट आवर्जून वाचा, त्यांना लाईक्स द्या, त्यांना जास्तीत जास्त शेयर करा, त्या पोस्टवर अधिकाधिक प्रभावी प्रतिक्रिया द्या. या साऱ्यामुळे जेजेच्या माजी विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद होईल हे नक्की ! ‘चिन्ह’तर्फे आम्ही #savejj #जेजेवाचवा हे हॅशटॅग वापरतो आहोत आपणही त्यांचा वापर करू शकता. लक्षात ठेवा जेजे वाचवण्याची ही अखेरचीच संधी आहे आणि ती आपल्याला घालवायची नाही. तेव्हा शुभस्य शीघ्रम ! या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर 90040 34903 या ‘चिन्ह’च्या नंबरवर ‘INFO JJ’ हा मेसेज पाठवा, आम्ही तुमच्याशी संपर्क साधू !
Related
Please login to join discussion