No products in the cart.
ग्रेसगॅलरी ! – भाग २
ग्रेस! काहींसाठी विश्व, काहींसाठी भावविश्व. काहींसाठी धुकं, चकवा, भुलभुलैया. ग्रेस हे खरंतर सृजनाचं, तरल निर्मितीचं नाव आहे. सलग १८-२० तास एकांतात बसून राहणाऱ्या या मनस्वी कलाकाराची कलेकडे बघण्याची दृष्टी अतिशय सूक्ष्म आणि तरीही व्यापक होती. त्यांच्या खोलीत असलेला चित्र, शिल्प, छायाचित्रांचा संग्रह हे आठवणींनी ओथंबलेले एक कलादालनच होते. पत्रकार संजय मेश्राम यांनी २००९ मध्ये ग्रेस यांच्याशी संवाद साधून त्यांच्या मनातील त्या आठवणी जाग्या केल्या होत्या. त्यावर आधारित हा विशेष लेख चिन्हच्या वाचकांसाठी ७ भागांमध्ये प्रस्तुत करत आहोत. यामध्ये साहित्य, चित्रकला, संगीत, अभिनय या सर्वच क्षेत्रांतील दिग्गजांच्या आठवणी, किस्से आणि त्यावर ग्रेस यांचं भाष्य असा आजपर्यंत प्रकाशित न झालेला मजकूर वाचायला मिळेल. ग्रेस ज्या खोलीत बसून कविता लिहायचे, तिचा परिचय झाला तर त्यांच्या कवितेची खोली समजून घेण्यासाठी ग्रेसव्याकूळ परिवारातील सदस्यांना नक्कीच मदत होईल, अशी आशा आहे.
———-
ग्रेसगॅलरी !
भाग २
तुझ्यासोबतचा फोटो मी काढून टाकतो!
भिंतीवरील एकेका चित्राकडं, छायाचित्राकडं बोट दाखवत ग्रेस माहिती द्यायचे. कॅमेऱ्यात ते त्यांना दाखवलं की म्हणायचे, छान कॅमेरा आहे हो तुमचा. कोणता आहे? फार सुंदर. छान येतात फोटो.
ग्रेस आणि त्यांची कन्या मिथिला असं दोघांचं एक सुंदर छायाचित्र आहे. ते बसायचे, तिथं वरच्या बाजूला. दोघांचेही क्लोज अप. मिथिलानं चेहऱ्याला डाव्या हातानं स्पर्श केला आहे. अनामिकेत (रिंग फिंगर) अंगठी घातलेली आहे. हाताला काळा पट्टा असलेलं घड्याळ. हलकंसं स्मित. बोलके डोळे, शांत भाव. चेहऱ्यावर छाया-प्रकाशाचं उत्तम संयोजन.
मिथिलाच्या मागं ग्रेस आहेत. कन्येच्या पाठीशी पित्याचा आश्वासक आधार. त्यांचा उजवा हात गालावर. जाड फ्रेमचा चष्मा. त्यातून बघणारे मोठे डोळे. मिथिलाचा चेहरा अगदी सुस्पष्ट. तर ग्रेस यांचा अस्पष्ट. ब्लर. जणू मध्येच धुकं यावं तसं. समोर बहुधा खिडकी असावी. तिथून येणाऱ्या उजेडाचं प्रतिबिंब मिथिला यांच्या दोन्ही डोळ्यांत दिसतं. ग्रेस यांच्या चष्म्याच्या उजवीकडील काचेवरही प्रकाशाचा शुभ्र तुकडा येऊन बसलेला दिसतो.
ग्रेस म्हणाले, ‘‘हा फोटो होऊन गेला. काय सुंदर फोटो आहे हो! तसा फोटो होणे नाही.”
या फोटोविषयीच नव्हे तर कन्येविषयीचं प्रेमही ग्रेस यांच्या शब्दाशब्दातून व्यक्त होत होतं. ते म्हणाले, ‘‘त्या फोटोग्राफरचं नाव मला आठवत नाही. आठवलं की सांगतो नंतर. त्याला मी म्हटलं होतं, याची निगेटिव्ह हवी. मला तू दे. यावर तो म्हणाला, मी माझे हात तोडून देईन, पण निगेटिव्ह देणार नाही.’’
पुढील भेटीत कधी विषय निघाला नाही. त्यामुळं त्या कलात्मक छायाचित्राच्या कलात्मक फोटोग्राफरचं नाव कधी कळलंच नाही.
ग्रेस यांनी एका लेखात म्हटलं आहे, मिथिला म्हणजे माझ्या मनाच्या कॉन्व्हेंटमध्ये उगवलेलं देवाघरचं फूल. ही तिची माझी जन्माजन्मीची ओळख, मी कधीच अधोरेखित करून ठेवलेली आहे. या परतीच्या, सरतीच्या हिवाळ्यात मात्र मिथिलेच्या आठवणींचा महापूर कसा सावरावा, कसा आवरावा तेच कळत नाहीये.
इतक्या दिवसांनंतर माझी उत्सुकता मला शांत बसू देत नाही. ग्रेस यांच्या काही परिचितांना त्या फोटोग्राफरविषयी विचारलं. कुणीच काही सांगू शकलं नाही. मिथिला यांना विचारावं का? त्याच एकमेव विश्वासार्ह स्रोत. त्यांना आठवेल का सारं? त्या बोलतील काय? पण त्यांच्याशिवाय दुसरं कुणी सांगूही शकणार नाही ना! विचारून तर बघू.
अखेर उत्तर मिळालं- कुऱ्हेकर!
पूर्ण नाव जरी नाही, पण आडनाव कळलं. हा नक्कीच कमालीचा फोटोग्राफर असावा. ग्रेस यांना त्यांचे काही फोटो काढून घ्यायचे होते. त्या दिवशी त्यांनी कुऱ्हेकरला घरी बोलावलं. घर म्हणजे कोणतं? नॉर्मल स्कूल क्वार्टर. मिथिला तेव्हा मेडिकल कॉलेजला होती. वर्ष होतं १९८१. मागच्या अंगणात पेरू आणि लिंबाचं झाड होतं. तिथं हे छायाचित्र काढलं आहे. कुऱ्हेकर हा फोटोग्राफर म्हणून चांगला होता, पण त्याचा जम बसला नव्हता. जगण्याशी त्याचा संघर्ष सुरू होता. दाढी, चष्मा, उंचापुरा पण किरकोळ शरीरयष्टी.
तो घरी आला. रोलचा कॅमेरा घेऊन सज्ज झाला. ग्रेस यांनी त्याला काही सूचना केल्या. हे बघ. दोघांचेही क्लोज अप हवे. मिथिलाचा चेहरा स्पष्ट असावा. तिच्या मागं माझा चेहरा असेल, तो ऑबस्क्युअर (हा ग्रेस यांचाच शब्द) असावा.
काही दिवसांतच छायाचित्राचं प्रिंट होऊन ते हातात आलं. आकारही मोठा. ग्रेस यांना हवा होता, अगदी तसाच. ग्रेस यांचं हे अतिशय प्रिय छायाचित्र. पण कधी मिथिलाशी भांडण झालं की ते तिला ‘धमकी’ द्यायचे. म्हणायचे, थांब आता. तुझ्यासोबतचा हा फोटो मी काढून टाकतो!
…पण तसं कधी घडलंच नाही. मिथिला घरी आली की ते छायाचित्र भिंतीवरच दिसायचं. आजही ते तिथंच आहे, स्वतःमध्ये कितीतरी स्मृतींना सामावून. ग्रेस यांचे विविध मूड्स, निर्मिती, आयुष्यातील चढउतार… असं बरंच काही.
धाकटी कन्या माधवीसोबतही ग्रेस यांचं एक ब्लॅक अँड व्हाइट छायाचित्र आहे.
या फोटोग्राफरचीही एक कहाणीच आहे. ग्रेस नेहमीच त्याच्या सुखदुःखाविषयी चौकशी करायचे. तो ही संवेदनशील मनाचा होता. ऐन तारुण्यातच नवरा गमावलेल्या एक युवतीशी त्यानं लग्न केलं होतं. पुढं त्याला मुलगीही झाली. त्यानं घेतलेल्या निर्णयाबद्दल ग्रेस यांनाही आनंद झाला होता. तो हळूहळू स्थिरावतोय, याचं त्यांना समाधान वाटायचं. काही दिवसांनंतर अचानक एक दिवस बातमी आली, कुऱ्हेकरनं स्वतःला संपवलं.
●●●
…तर मी गेले असते भेटायला!
ग्रेस यांना यासोबतच आणखी एक छायाचित्र फार आवडायचं. ते सांगू लागले, ‘‘ तो मेधासोबतचा बघा, तोही विलक्षण फोटो आहे.”
मिथिलासोबतचा आणि हा, असे दोन्ही फोटो मी क्लिक केले. कॅमेरा समोर करीत ते त्यांना दाखवले.
‘‘व्वा! फार सुंदर. फार सुंदर. गजहब आहे! सुंदर सुंदर. आपल्याच फोटोवर माणूस फिदा होऊन जातो हे पाहिल्यावर. नाही?” – ग्रेस यांची उत्स्फूर्त दाद.
मेधा म्हणजे मेधा पाटकर. पुढं नर्मदा आंदोलनाच्या नेत्या म्हणून त्यांना सारं जग ओळखायला लागलं. त्यांच्यासोबतच्या छायाचित्राकडं ग्रेस यांनी लक्ष वेधलं, पण फार काही सांगितलं नाही. मीही विचारलं नाही. आता इतक्या वर्षांनंतर मात्र उत्सुकता वाटली. नागपूरचे कार्यकर्ते विलास भोंगाडे यांच्याकडून पाटकर यांचा मोबाइल क्रमांक घेतला. फोन केला. त्यांना विनंती केली. त्या म्हणाल्या, “थोडा वेळ बोलू शकेन. या क्षणी मध्यप्रदेशात आहे. आता पहाडात निघाले. उद्या नर्मदा खोऱ्यात असेन.”
‘‘ग्रेस सरांनी त्यांच्या खोलीत तुम्हा दोघांचं एक छायाचित्र आवडीनं लावलं आहे. घराच्या व्हरांड्यात बसलेले दोघं. काही आठवतं? कधी काढलं? कुठे काढलं?’’- मी.
त्या म्हणाल्या, ‘‘माझ्याबरोबरचा नाही. माझा एकटीचा फोटो आहे. मी त्यांच्या घरी एक- दोनदा गेले होते. तेव्हा बघितला होता.”
“नाही. तुम्हा दोघांचा!’’ – मी
‘‘मी नाही पाहिला. तुमच्याकडं आहे का तो? पाठवा मला. ते एकदा गुजरातमध्ये आले होते भेटायला. तेव्हाचा असेल. मी अहमदाबादमध्ये राहून विविध जिल्ह्यांत कार्य करत होते. नर्मदेचे आंदोलनही सुरू झालं होतं. वर्ष असेल १९८४-८५.’’ – त्या आठवू लागल्या.
‘‘हा फोटो नवेगाव बांधचा तर नाही ना?” – मी.
मी त्यांना ते छायाचित्र बघायला पाठवलं.
‘‘एकदा मारुती चितमपल्ली यांच्याकडं जंगल सफारीसाठी गेलो होतो आम्ही. ते त्यांचे प्रिय दोस्त होते. पण हा फोटो तिथला नाही. गुजरातचाच वाटतो.’’
त्यांना जुने दिवस आठवू लागले. काही क्षण आठवणीत हरवून गेल्या.
ही माझ्यासाठी नवी माहिती होती. ग्रेस म्हणतात, त्या प्रमाणे ते छायाचित्र खरंच विलक्षण आहे. खोलीत छायाचित्र आहे, पण छायाचित्रात खोली (डेप्थ) आहे. खादीचा कुर्ता घातलेली तेव्हाची तरुण, लोभस मेधा सहज ओळखू येत नाही.
नवेगावचा संदर्भ आला म्हणून चितमपल्ली यांना फोन केला. काही आठवतं का, म्हणून सहज विषय काढला. ते म्हणाले, “होय. आले होते ते नवेगावला. वर्ष मात्र आठवत नाही. तिथं फोटो काढल्याचंही आठवत नाही. कसं आठवणार? बरीच वर्षे झाली.”
मिथिलालाही आठवतं, दादा गुजरातला जाऊन आले होते, तेव्हा त्यांनी काही फोटो दाखवले होते. त्यातलाच हा फोटो.
त्यामुळं हा फोटो गुजरातमधला आहे, हे नक्की झालं.
मेधा पाटकर म्हणाल्या, ‘‘ग्रेस आजारी होते, मला माहीतच नाही. ते गेल्यावरच कळलं. भटकळांनी मला कळवलं. आधी कुणी कल्पना दिली असती तर मी गेले असते त्यांना भेटायला!’’
ग्रेस यांना त्यांच्या अखेरच्या दिवसांत भेटू न शकल्याची रुखरुख त्यांच्या आवाजात स्पष्ट जाणवत होती.
तुटलेली ओळख विणता
प्राणांची फुटते वाणी,
पायांतुन माझ्या फिरतो
अवकाश निळा अनवाणी.
●●●
(क्रमश:)
संजय मेश्राम
Related
Please login to join discussion