No products in the cart.
ग्रेसगॅलरी ! – भाग ४
ग्रेस! हे सृजनाचं, तरल निर्मितीचं नाव. या मनस्वी कलाकाराची कलेकडे बघण्याची दृष्टी अतिशय सूक्ष्म आणि तरीही व्यापक होती. त्यांच्या खोलीत असलेला चित्र, शिल्प, छायाचित्रांचा संग्रह हे आठवणींनी ओथंबलेलं एक कलादालनच होतं. पत्रकार संजय मेश्राम यांचा ग्रेस यांच्याशी बराच जवळचा संबंध आला. त्यातून त्यांनी ग्रेस यांच्या आठवणींचे अनेक पदर उलगडलेले आहेत. विशेषतः ग्रेस यांच्या खोलीत लावलेली चित्रे आणि छायाचित्रे यांच्याशी ग्रेस यांच्या कोणत्या, कशा भावना आणि आठवणी निगडित आहेत, याविषयी यापूर्वी कधीही उजेडात न आलेली रंजक माहिती वाचायला मिळेल. यातून ग्रेस यांच्या कवितेची खोली समजून घेण्यासाठी ग्रेसव्याकूळ चाहत्यांना नक्कीच मदत होईल, अशी आशा आहे. सात भागांच्या मालिकेतील हा चौथा भाग.
———-
ग्रेसगॅलरी !
भाग ४
आकाश तोलून धरणारा पिकासो
भिंतीवरील छायाचित्राकडं निर्देश करीत ग्रेस म्हणतात, पिकासो तिच्या माथ्यावर छत्री घेऊन तिच्या पाऊलपणाचा मागोवा घेतोय. ऊन तोलून धरण्यासाठी की तिरीप अडविण्यासाठी? त्याने फ्रँकाच्या डोक्यावर एक नवेच तरल आकाश तोलून धरले आहे…
थोर चित्रकार पाब्लो पिकासोच्या या छायाचित्राबद्दल मला इतक्या वर्षांनंतर कुतूहल वाटलं. ग्रेस म्हणाले होते, अतिशय प्रसिद्ध छायाचित्र आहे ते. म्हणून मी त्याविषयी शोध घेतला.
१९४४ मध्ये पिकासोचं वय होतं ६३ वर्षे. याच काळात त्याची मैत्री झाली, फ्रँका जिलो हिच्याशी. वय २१ वर्षे. चित्रकलेची विद्यार्थिनी. मैत्रीच्या कॅनव्हासवर दोघांनीही रंग भरले. दोघंही एकत्र राहू लागले. त्यांना दोन मुलंही झाली. काही वर्षांतच रंग उडून गेले. चित्र फिकट झाले. पुढं पिकासोपासून दुरावल्यानंतर १९६४ साली तिनं ‘लाइफ विथ पिकासो’ हे मनोगत पुस्तकातून मांडलं. या पुस्तकावर उड्या पडल्या. बेस्ट सेलर पुस्तक म्हणून गौरव झाला. यात तिनं पिकासोच्या स्वभावाचे विविध पैलू सांगितले आहेत. या पुस्तकावर १९९६ मध्ये ‘सर्व्हायव्हिंग पिकासो’ नावाचा चित्रपटही झाला.
फ्रँका हिनं १९६९ मध्ये, पोलिओवरील पहिल्या यशस्वी लशीचे संशोधक जोनास साल्क यांच्याशी लग्न केलं. ती भारतातही येऊन गेली होती. इथं तिनं बरीच रेखाटनं केली, चित्रं काढली.
पिकासोचं निधन ८ एप्रिल १९७३ रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी झालं. तर फ्रँका जिलो हिनं ६ जून २०२३ रोजी न्यूयॉर्क इथं अखेरचा श्वास घेतला. तेव्हा तिचं वय होतं १०१ वर्षे! शेवटपर्यंत ती चित्रं काढत होती…
आता परत जाऊ, ग्रेस यांच्या घरी.
भिंतीवर असलेलं ब्लॅक अॅण्ड व्हाइट छायाचित्र पिकासो आणि फ्रँका यांचं आहे. १९५१ मध्ये समुद्रकिनारी वाळूत चालताना ते टिपलेलं आहे. पुढं ती, मागं तो. उन्हाच्या किरणांनी तिच्या प्रदेशात घुसखोरी करू नये, म्हणून पिकासोनं तिच्या डोक्यावर भली मोठी छत्री धरली आहे. ती मंद स्मित करीत आनंदानं मागं वळून बघत आहे. तिच्या चालण्यात एक लय आहे, नजाकत आहे. ती हवेवर अलगद तरंगत आहे. दिसत नसली तरी तिच्या अंगाभोवती जणू छोटी छोटी फुलपाखरं उडत आहेत. उबदार हवा. त्यात मोगऱ्याच्या सुवासाची दरवळ.
हा ‘लो अँगल’ फोटो आहे. म्हणजे खाली वाकून किंवा खाली बसून वरच्या दिशेला बघत काढलेला आहे. मागं पिकासोचा पुतण्याही आहे, स्वतःशीच हसत.
युद्धछायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या रॉबर्ट कापा (१९१३-१९५४) यानं हा प्रफुल्ल क्षण टिपला आहे.
पुढं याच छायाचित्रानं मुखपृष्ठ बनून तिच्या पुस्तकाचं सौंदर्य खुलवलं आहे.
आणि
याच छायाचित्रानं ग्रेस यांच्या खोलीचंही सौंदर्य खुलवलं आहे.
●●●
ऐहिक डोळे घेऊन तू आलीस…
प्रसिद्ध अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमन (१९१५-१९८२) आणि ग्रेस यांचं अतूट नातं आहे. तिचं हे नाव स्वीडनच्या राजकुमारीच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं म्हणे! तिचं टोपी घातलेलं छायाचित्र ग्रेस यांच्या खोलीत लावलेलं आहे.
आईच्या वियोगानं ग्रेस घनव्याकुळ रडत असत. इन्ग्रिडचीही आई बालपणीच जग सोडून गेली होती. या गुणी अभिनेत्रीला पाच भाषा येत. पाचही भाषांत तिनं अभिनय केला आहे. ग्रेस यांनी ‘ग्रेस’ हे नाव धारण करण्यामागं इन्ग्रिड बर्गमनचीच प्रेरणा आहे, हे त्यांच्या चाहत्यांना ठाऊक आहेच. ‘संध्याकाळच्या कविता’ हा त्यांचा कवितासंग्रह त्यांनी तिलाच अर्पण केला आहे.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच ‘टू इन्ग्रिड बर्गमन’ असं इंग्रजीत त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलं आहे. ‘इन्ग्रिड बर्गमन’ या शीर्षकानं पृष्ठ क्र. ५८ वर एक कविता आहे. ते म्हणतात,
“आषाढातील भर्जरी मेघांसारखे पूर्ण ऐहिक डोळे घेऊन तू आलीस;
नेस्तनाबूत झालेल्या या साथीच्या गावात…”
आठवतं? पिकासो आणि फ्रान्स्वा जीलो यांचं छायाचित्र कुणी टिपलं होतं? रॉबर्ट कापा! योगायोग काहीही असू शकतात. इन्ग्रिड बर्गमन ही याच रॉबर्ट कापाची प्रेयसी होती. इन्ग्रिडचा जन्म आणि मृत्यूही २९ ऑगस्टचा आहे. १९८२ मध्ये वयाच्या ६७ व्या वर्षी तिनं निरोप घेतला. कॅन्सरनं ग्रेस यांची ‘गळाभेट’ घेतली, त्याच्या फार पूर्वी त्यानं इन्ग्रिडसोबत ‘शेक हॅण्ड’ केलं होतं.
●●●
मर्लिन मनरोची मोहक मुस्कान
सौंदर्यवती मर्लिन मनरोची ( १९२६-१९६२) दोन छायाचित्रं भिंतीवर दिसली. एक सोनेरी केसांची, मनसोक्त हसू उधळणारी, क्लोज अपमधली. दुसरी, हवेनं उडणारा स्कर्ट सावरणारी. ग्रेस म्हणाले, मर्लिन मनरोवर तर माझी कविताच आहे.
तेव्हा मी ती वाचली नव्हती. नंतर मात्र ती शोधून वाचली. ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’ या कवितासंग्रहात पृष्ठ क्र.१३०. कवितेचं शीर्षकच आहे – मर्लिन मनरो. यात तिच्या केसांच्या, डोळ्यांच्या सौंदर्याचं वर्णन आहे. यात ते म्हणतात,
“आवर्तांच्या नृत्यभूमीत भटकणारा एक पक्षी तसे तुझे केस.
या निःसंग आरसेमहालातून भटकताना दिसणारे डोळे तुझे.
आत्महत्या म्हणजे एक ऑर्केस्ट्रा किंवा त्वचातंतूंचे एक जाळीदार शिल्प.”
ग्रेस यांच्या अभिरुचीचा हा एक उत्तम नमुना आहे.
●●●
ग्रेस व्हायोलिनच्या क्लासला जातात !
मी ग्रेस यांच्या खोलीतच आहे. भिंतीकडं बघतोय. ते काही सांगत आहेत. मी काही विचारतोय… माझ्या मन:पटलावर व्हायोलिनचे तरंग उमटत आहेत.
‘‘हा व्हायोलिनसोबतचा तुमचा एक फोटो आहे. सोबत पं. हृदयनाथ मंगेशकर दिसतात. तुम्हाला व्हायोलिन येतं? कधी वाजवता?’’- मी.
ग्रेस सांगू लागतात, ‘‘१९८२ ते ८७ पर्यंत मी घाऱ्यांकडे व्हायोलिन शिकायला नियमित जात होतो. हे इटालियन वाद्य आहे. हे इतकं सुंदर आणि देखणं वाद्य आहे! त्यामुळे मी इटालियनचे सगळे दुर्गुण माफ करायला तयार आहे. मला आकर्षित करणारं या वाद्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लोक तिथं रस्त्यावर रडताना, हसताना, व्हायोलिन वाजवत असतात. मी त्या आकर्षणात पडलो आणि म्हटलं की आपल्याला व्हायोलिन वाजवता आलं पाहिजे. म्हणून मी क्लास जॉईन केला.’’
‘‘मस्त! मग पुढं…?’’- मी.
‘‘पुढं माझ्या लक्षात आलं की, जे काही आपल्याला मिळायचं असतं, ते मिळत असतं. त्याचा संग्रह करता येत नाही. आपल्या वाट्याला शब्दाचा आणि कवितेचा जो एक थेंब आला आहे, तेवढाच आपला वाटा आहे. इतर श्रेष्ठ माध्यमांना आपण स्पर्शही करू शकत नाही. व्हायोलिन वादनात जर मला कवितेइतकी सिद्धी मिळाली नसती, तर मी फार दुःखी झालो असतो… आणि असलेल्या दुःखात आणखी भर पडली असती. म्हणून मी तो नाद त्याचवेळी सन्मानपूर्वक सोडून दिला. त्याची आठवण म्हणून हा फोटो आहे. त्या व्हायोलिनला सूर लावून देतानाचा हा फोटो आहे. हृदयनाथ मला मदत करतोय.’’
मी आठवणी टिपून घेतोय.
ग्रेस यांनी सांगितलेली अतिशय दुर्मीळ फोटोची तेवढीच दुर्मीळ कथा. नव्हे गाथा! मी चकित. तेव्हा त्यांनी ‘घाऱ्यांकडे’ असा उल्लेख केला होता. बस्स. आज इतक्या वर्षांनंतर प्रथमच हा प्रसंग आठवताना वाटलं. हे घारे कोण असावेत? कुठं राहत असत? तेव्हा ग्रेस कुठं राहायचे?
कुणाला विचारावं? बघू तर…
ज्येष्ठ संपादक कमलाकर धारप यांना फोन केला. ते म्हणाले, थांब. मी विचारून सांगतो. पाच मिनिटांत त्यांचा फोन आला. हसतच म्हणाले, ” लिहून घे. प्रभाकर घारे! धंतोलीत ते राहायचे, त्या गल्लीचे नावही घारे गल्ली. व्हायोलिनचे क्लास घ्यायचे. आकाशवाणीतही नियमित जात असत. माणिक गोडघाटे तेव्हा राहायचे नॉर्मल स्कूल क्वार्टरमध्ये. ते यायचे क्लासला.”
धंतोलीतच राहत असलेल्या एका जुन्या परिचिताला धारप यांनी विचारलं. त्यानं दिलेली माहिती त्यांनी जशीच्या तशी मला पुरवली. गंमत वाटली.
●●●
(क्रमश:)
संजय मेश्राम
Related
Please login to join discussion