No products in the cart.
ग्रेसगॅलरी ! – भाग ५
ग्रेस! हे सृजनाचं, तरल निर्मितीचं नाव. या मनस्वी कलाकाराची कलेकडे बघण्याची दृष्टी अतिशय सूक्ष्म आणि तरीही व्यापक होती. त्यांच्या खोलीत असलेला चित्र, शिल्प, छायाचित्रांचा संग्रह हे आठवणींनी ओथंबलेलं एक कलादालनच होतं. पत्रकार संजय मेश्राम यांचा ग्रेस यांच्याशी बराच जवळचा संबंध आला. त्यातून त्यांनी ग्रेस यांच्या आठवणींचे अनेक पदर उलगडलेले आहेत. विशेषतः ग्रेस यांच्या खोलीत लावलेली चित्रे आणि छायाचित्रे यांच्याशी ग्रेस यांच्या कोणत्या, कशा भावना आणि आठवणी निगडित आहेत, याविषयी यापूर्वी कधीही उजेडात न आलेली रंजक माहिती वाचायला मिळेल. यातून ग्रेस यांच्या कवितेची खोली समजून घेण्यासाठी ग्रेसव्याकूळ चाहत्यांना नक्कीच मदत होईल, अशी आशा आहे. सात भागांच्या मालिकेतील हा पाचवा भाग.
———-
ग्रेसगॅलरी !
भाग ५
या डोळ्यांची सर कशालाच नाही…
भेदक घारे डोळे असलेल्या मुलीचं जगप्रसिद्ध छायाचित्र भिंतीवर लावलं आहे. या छायाचित्रानं ग्रेस यांना फारच प्रभावित केलं आहे. का आवडतो त्यांना हा फोटो?
‘‘अफगाणिस्तानची मुलगी आहे ती. फारच जबरदस्त आहे. असे डोळे मी आयुष्यात कधी बघितलेले नाहीत. तिच्याविषयी एक डॉक्युमेंट्री बघितली मी. तिची आईही दाखवली होती त्यात. तिच्या या डोळ्यांची सर कशालाच नाही…’’- ग्रेस सांगत होते.
‘‘समुद्राची खोली आहे त्यांना.’’ – मी पुष्टी जोडली.
‘‘काही सांगताच येत नाही. असामान्य डोळे आहेत ते!’’
ग्रेस कशा-कशावर प्रेम करायचे!
या मुलीचं नाव शरबत गुला. अफगाण निर्वासित. बारा वर्षांची असताना ती जगभर ओळखली जाऊ लागली. १९८४ मध्ये एका अमेरिकी पत्रकारानं टिपलेलं तिचं हे छायाचित्र. ते १९८५ च्या ‘नॅशनल जिऑग्राफिक’ च्या मुखपृष्ठावर पहिल्यांदा झळकलं होतं. ग्रेस यांच्या भावविश्वात तिलाही स्थान मिळालं. एखाद्या नियतकालिकात आलेले हे छायाचित्र त्यांनी मोठ्या आकारात प्रिंट करून आणले. त्यालाही भिंतीवर सदस्यत्व मिळालं.
●●●
हा एक फोटो काढून घ्या…
ग्रेस काहीतरी दाखवायचे, त्याविषयी सांगायचे आणि ते मी कॅमेऱ्यात क्लिक करावं, म्हणूनही तेच सुचवायचे.
‘‘लाइट लावून देऊ का?’’- त्यांचा पुन्हा प्रश्न.
ग्रेस यांच्या या खोलीत सूर्यप्रकाश येत नव्हता. एक खिडकी होती, ती कित्येक वर्षे बंदच होती. फोटो घेताना मला कसली अडचण होऊ नये यासाठी त्यांना काळजी. मदतीसाठी तत्पर. ग्रेस यांचं भिंतीवरील एक छायाचित्र क्लिक केलं. त्यांना दाखवत म्हणालो, एका फोटोत दोन ग्रेस.
‘‘क्लास! व्वा! मला हा फोटो द्याल.’’ – ग्रेस यांनी दाद दिली.
होय. सगळेच देईन, असं म्हणत त्यांना कॅमेऱ्यात पुन्हा त्यांचंच एक छायाचित्र दाखवलं.
“फार सुंदर आहे. भिंतीवरील हे सर्व फोटो कुमार गोखलेंनी काढले आहेत….”
त्यांनी लगेच दाद देत माहिती पुरवली. (आता गोखलेही नाहीत. २७ सप्टेंबर २०२१ रोजी तेही सोडून गेलेत. ग्रेस गेले त्याच गावाला.)
प्रसिद्ध पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांनी जलरंगात काढलेलं ग्रेस यांचं पोर्ट्रेट आहे. खरं सांगायचं तर प्रयत्न म्हणून चांगला आहे. तरी खरे ग्रेस पकडण्यात काही तरी राहून गेलेलं आहे, असं वाटतं. त्यापेक्षा ज्या आदर आणि प्रेमानं ते काढलं, ते फार महत्त्वाचं आहे. ग्रेस यांनीही कलावंताच्या या प्रेमाची कदर केली. दीनानाथ रुग्णालयात असतानासुद्धा त्यांनी हे पोर्ट्रेट नागपूरहून सोबत आणून आठव्या मल्यावरील आपल्या ‘सन्माननीय कक्षात’ लावलं होतं.
शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांचंही ब्लॅक एण्ड व्हाइट कलात्मक छायाचित्र टेबलवर आहे. यात चेहरा स्पष्ट नाही, मात्र छाया-प्रकाशाचा वापर उत्तम आहे.
●●●
या व्याकुळ संध्यासमयी,
शब्दांचा जीव वितळतो…
मी दिसेल त्या वस्तू, चित्रांना कॅमेऱ्यात क्लिक करीत आहे. ग्रेस यांना माझ्या कॅमेऱ्याची उत्सुकता.
‘‘यात रोलची भानगड असते का हो?’’ – ग्रेस.
‘‘नाही. नसते. यात मेमरी कार्ड असतं. खूप फोटो काढू शकतो. हवं असल्यास यावरून आपण प्रिंट काढू शकतो.’’’ – मी
‘‘क्या बात! बरं आहे ना! किती डेव्हलप झालं हो!’’ -ग्रेस.
मग म्हणाले, चहा देऊ का? पाणी देऊ का? तुम्हाला काय देऊ, मला काही कळत नाही. चिवडा आहे कपाटात. देऊ का? चांगला आहे. मला चालत नाही; पण संपवायचा म्हणून मी कोणालाही देणार नाही. माझी ती पद्धत आहे.
अरे घ्या हो, असे म्हणत त्यांनी चिवडा पिशवीत दिला घरी न्यायला. थांबा तुम्हाला बॅण्ड लावून देतो, म्हणत पिशवीला रबरबॅण्ड लावून दिला. तो लावताना ते म्हणाले, चिवडा हा माझा अतिशय आवडता पदार्थ आहे. साधा मुरमुऱ्याचा चालतो मला कच्च्या तेलाचा. हा तर मला अलाउडच नाही ना. सोलापूरचे हर्षे आले. त्यांनी सोलापूरची झणझणीत चटणी आणली, प्रेमानं. ती तशीच आहे. मला चालतच नाही.
निघताना ग्रेस यांचे आभार मानले. एवढा वेळ दिला, फोटो काढू दिले…
त्यांना ही औपचारिकता आवडली नाही. म्हणाले, तुम्ही कमाल करता हो! फोटो काढू दिलं म्हणजे काय! त्यांचं जतन करणाऱ्या, त्यांची इज्जत करणाऱ्या माणसानं काढले. सत्कारणी लागला वेळ. नाही तर बसलो असतो मी एकटा.
“मी कॉम्प्युटरमध्ये तुमच्या नावाचं एक फोल्डर करणार आहे. यात तुमच्याविषयीचे लेख, फोटो, ऑडिओ एकत्र राहतील. लायब्ररीसारखं. माझ्या वैयक्तिक संग्रहात सर्व सुरक्षित राहील. कायम.” –मी
ग्रेस बसतात, ती खोली, त्या खोलीतील जिवाभावाच्या माणसांना जवळून जाणून घेण्याचा अनुभव आनंददायी होता. निरोप देण्यासाठी ग्रेस पायऱ्या उतरून खाली आले. पार्किंगमध्ये त्यांची गाडी दाखवली. म्हणाले, मला चांगलं चालवता येईल, तेव्हा तुमच्या घरी येईन. आता मी पुण्याला चाललो. नाही तर या १० तारखेला आलो असतो.
”व्वा! दुर्मीळच संधी राहिली असती.” – मी
“नेक्स्ट टाइम” – ग्रेस.
निरोप घेताना ग्रेस म्हणाले, आप मुझे फोन किजीए मै आपसे बात करुंगा.
मी सहज म्हणालो, पुण्याहून एवढं लगेच परत येण्यापेक्षा थांबा थोडं तिथं. विश्रांतीसाठी. नाही तर दगदग होईल.
ग्रेस म्हणाले, “अजिबात नाही. अजिबात नाही. मी बिलकुल त्या भानगडीत पडत नाही. आपलं काम आणि गरज संपल्यावर ईश्वरानं आग्रह केला तरी थांबायचं नाही, हा माझा बाणा आहे. एक क्षणही जास्त थांबायचं नाही आणि एक क्षणही पूर्वी उठायचं नाही.”
ग्रेस निघून गेल्यावर तब्बल अकरा वर्षे लागली, त्यांच्या खोलीविषयीच्या आठवणी शब्दबद्ध करायला. मन धजत नव्हतं. या खोलीनं मनात कायमचं घर केलं आहे. ग्रेस यांच्याविना ती खोली, ग्रेस नाहीत, असे नागपूर ही कल्पना करवत नाही. आजही कधी आनंदाची, दुःखाची घटना घडली की, हात नकळत फोनकडे हात जातो. बोटं टाइप करू लागतात – G R A C E…
या व्याकुळ संध्यासमयी,
शब्दांचा जीव वितळतो;
डोळ्यांत कुणाच्या क्षितिजे,
मी अपुले हात उजळतो…
●●●
(क्रमश:)
संजय मेश्राम
Related
Please login to join discussion