Features

ग्रेसगॅलरी ! – भाग ६

ग्रेस! हे सृजनाचं, तरल निर्मितीचं नाव. या मनस्वी कलाकाराची कलेकडे बघण्याची दृष्टी अतिशय सूक्ष्म आणि तरीही व्यापक होती. त्यांच्या खोलीत असलेला चित्र, शिल्प, छायाचित्रांचा संग्रह हे आठवणींनी ओथंबलेलं एक कलादालनच होतं. पत्रकार संजय मेश्राम यांचा ग्रेस यांच्याशी बराच जवळचा संबंध आला. त्यातून त्यांनी ग्रेस यांच्या आठवणींचे अनेक पदर उलगडलेले आहेत.  विशेषतः ग्रेस यांच्या खोलीत लावलेली चित्रे आणि छायाचित्रे यांच्याशी ग्रेस यांच्या कोणत्या, कशा भावना आणि आठवणी निगडित आहेत, याविषयी यापूर्वी कधीही उजेडात न आलेली रंजक माहिती वाचायला मिळेल. जागतिक कीर्तीचा चित्रकार व्हिंसेंट व्हॅन गॉग हे ग्रेस यांचे दैवत होते.  त्याच्या विलक्षण प्रतिभेचा ग्रेस यांनी घेतलेला वेध सात भागांच्या या लेखमालिकेतील पुढील दोन भागांमध्ये प्रस्तुत करत आहोत. आजचा हा सहावा भाग.

———-

ग्रेसगॅलरी !

 

भाग ६

 

व्हिन्सेंट व्हान गॉग तर माझं दैवत आहे हो! गॉगवर बोललो तर वेडे व्हाल. पुढल्या वेळी बोलू आपण. तुम्ही ते सगळं लिहून घ्या….ग्रेस यांनी शब्द दिला होता.

ग्रेस यांच्या खोलीत गॉगचं चित्र आहे. गॉगशी त्यांचं नातं आहे. त्यांच्या तोंडून गॉगविषयी ऐकायचं होतं. माझा पाठपुरावा सुरूच होता. ही संधी मला गमवायची नव्हती. राहून गेलं, योगच जुळून नाही आला, अशी सल व्यक्त करण्याची वेळच येऊ नये.

ही सुसंधी अखेर आली. ती एक भेट संपूर्ण गॉगलाच समर्पित होती. काहीच दिवसांपूर्वी म्हणजे दि. २४ मार्च २००९ रोजी ग्रेस यांनी मुंबईत जे जे मध्ये व्याख्यान दिलं होतं. तो धागा पकडून त्यांनी बोलायला सुरुवात केली.

ते म्हणाले,  जे जे स्कूल ऑफ आर्टबद्दल जे जे ऐकलं, वाचलं, त्याचे माझ्या मनात एक आकर्षण तयार झाले आहे. माझ्या मनातील आकर्षणाची प्रतिमा आणि प्रत्यक्ष वास्तू यांचा ताळमेळ कसा काय जुळतो, याचा मी विचार करीत होतो. ताळमेळ जुळला नाही तर माझी, वास्तू न पाहता आटलेली प्रतिभा आणि प्रत्यक्ष वास्तू यांच्यामधले अंतर कोणत्या जातीचे, कोणत्या कुळाचे आणि कोणत्या अनुवंशाचे आहे, हे मला तपासून पाहावेसे वाटले.

‘द जंगल बुक’ च्या लेखकाचा संदर्भ देत ग्रेस सांगू लागले, रुडयार्ड किप्लिंग नावाचा प्रसिद्ध लेखक आणि त्याचे तीर्थरूपसुद्धा तिथे राहून गेलेले आहेत. मी फार काळ तिथे थांबलो नाही. सकाळच्या विमानाने पोहोचलो. जणू काही मला सतत कसली तरी घाई असते, अशा पद्धतीने मी वावरत होतो. वास्तू पाहून घेतली. संध्याकाळी विस्तीर्ण पटांगणात शामियाना टाकून तो कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचा प्रारंभ होण्यापूर्वी मी नेहमीप्रमाणे कोसळलेला होतो. मी कुठल्याही टाचण – टिपणातला पूर्वनियोजित मनुष्य नाही. यशापयशाचे भय माझा प्रत्येक क्षणाला पाठलाग करीत असते. Either I am burning light or I refused to burn. एकतर मी अंधार असतो किंवा जळता प्रकाश असतो. त्या ताणाखाली मी वागत असतो. पटांगणात कार्यक्रम असल्यामुळे तिथल्या वृक्षराजीतून संध्याकाळी परतणाऱ्या कावळ्यांचा प्रचंड आक्रोश ऐकला. आपल्या स्वार्थी शांतीच्या मनोवृत्तीसाठी आपल्या अवतीभवती गोंधळ असला तर आपण जरब दाखवून तो गोंधळ, गलबला शांत करू शकतो. पण माझ्या आजुबाजूच्या वृक्षराजीतून क्रंदन करणारे, संध्याकाळच्या परतीचे थकलेले कावळे. त्यांचा गळा मी कसा घोटणार? माझ्यापुढे प्रश्न आला. कावळा एक नाही. कावळ्यांचा कळप आहे.

ग्रेस यांनी ‘थवा’ऐवजी कळप हा शब्द वापरला. ते तन्मयतेनं बोलत होते…

 

मी कळपाने राहणारा मनुष्य नाही. त्यामुळे कळपाचे किंवा कळपातील मनोवृत्तीचे आतिथ्य मी करू शकतो. अतिशय आदराने. त्या कळपाच्या समूहवृत्तीशी माझ्या आत्म्याचे एकच स्पंदन मात्र जुळू शकत नाही. ही माझी मर्यादा आहे. त्यामुळे भाषणाच्या वेळी काय करावे हा पेच पडला. आतून काहीतरी गलबलून आले आणि मी जवळजवळ ओरडल्यासारखे शब्द फेकू लागलो. बोलू लागलो. सांगू लागलो. म्हणालो-

 

Crows are crying around me. I can’t stop them. And after all it was an evening cry of crows. But I wanted to pick up a single lonely crow from their flock.

 

त्यांच्या कळपातून मला एकाकी एकच कावळा तेवढा उचलायचा होता. कारण इतरांना प्रदान करण्यासाठी, कळपाला प्रदान करण्यासाठी मोठी सामग्री माझ्याजवळ नाही. माझी एकच छोटी सामग्री असल्यामुळे  मला एकट पक्षाचेच क्रंदन हवे होते.

 

I wanted to pick up only one single lonely crow and I requested God to send that lonely crow.

तो जो क्रंदन करणारा कळपातला कावळा; कळपातल्या सोबत्यांना सोडून माझ्या विनंतीला भाळून एकट क्रंदन माझ्यासमोर करत आला असता तर म्हणालो असतो,

 

ये कावळ्या इथे ये

आहेस तू उपाशी

माझी खूडून खा ना

प्राणातली उदासी..

 

आणि त्याला अभय देतो. घाबरू नकोस. माझ्या प्राणातील उदासीचा नजराणा उर्फ चिमुकली मेजवानी तुला देतो. माझी खूडून खा ना प्रणातली उदासी.

-आणि तो कळप सोडून आला.

तुला भीती वाटते. त्यामुळे तुला अभयही देतो.

 

बघणार ना तुला रे

कोणी इथून राधा

चोचीत पिंड घे तू

सावत्र बाप माझा…

 

ग्रेस सांगत होते. त्यांची चांगलीच तंद्री लागली होती. ते सलग बोलत होते. त्यांचा प्रवास  व्हिन्सेंट व्हान गॉगच्याच दिशेनं आहे, याची मला अनुभवानं खात्री होती. त्यांना मध्ये थांबवण्याचा प्रश्नच नव्हता.

ते म्हणाले, नंतर एकदम माझ्या मेंदूत एक छोटीशी अग्निरेखा ओढली जावी, त्याप्रमाणे मला व्हिन्सेंट व्हान गॉगच्या वस्तऱ्याची आणि कापलेल्या कानाची चरचरीत आठवण झाली. कावळ्याचे क्रंदन ज्याला मी प्राणातील उदासीची मेजवानी कबूल केली आहे आणि व्हिन्सेंट व्हान गॉगच्या हातातील वस्तरा! तो मुळात त्याचा समकालीन प्रतिभावंत चित्रकार पॉल गोगॅं याच्यामागे द्वेषाने धावला. गोगॅं न सापडल्यामुळे आपोआपच व्हिन्सेंटच्या द्वेषाचे विसर्जन हतबल करुणेत झाले; पण हातातील वस्तरा काही सुटत नव्हता. क्रौर्याचे विसर्जन करुणेत झाले तरी अटळ कर्म टळत नाही.

त्याला त्या कानाची मागणी करणारी वेश्या आठवली. त्या मागणीच्या फेऱ्यात त्याने थांबलेला वस्तरा आपल्या कानावर सपकन चालवला. तडफडणाऱ्या कलावंताच्या आत्म्याची ही आक्रंदनशैली आहे. हा अनुवंश मला व्हिन्सेंट व्हॅन गॉगमुळे मिळाला. त्याच्या रंगशैलीमध्ये असे सगळे क्रंदनाचे, आक्रंदनाचे स्फोटक ठासून भरले आहे.

एका छायाचित्राकडं निर्देश करीत ग्रेस म्हणाले, हा ताज्या फुलांचा नजराणा. यांच्यात व्हिन्सेंट व्हान गॉगशी माझा संबंध स्थापित होत गेला आहे. आक्रंदनशैली ही आहे. त्याच्या रंगांची आक्रंदनशैली.

ग्रेस यांना आपला मुद्दा समजावून देताना सोपी सोपी उदाहरणे द्यायला आवडते. ते करताना आपल्या कवितेची सांगड ते घालतात. ऐकणाऱ्यासाठी हा अनुभव मनाच्या कुपीत जपून ठेवण्यासारखा असतो.

ते म्हणाले, संध्याकाळ झाली की आपली गाय रानावनात चरायला गेली आहे, असे त्या धन्याला वाटते. मग मध्येच वाटते की, परतलीही असेल.

 

पारावर बसल्या गायी

(गायी संध्याकाळी पारावर येऊन बसतात… ग्रेस सांगतात.)

 

की धनी हंबरे रानी

(गाय हंबरते, धनी नाही हंबरत… आपण केलेल्या शब्दप्रयोगाकडं ग्रेस आवर्जून लक्ष वेधून घेतात. या निर्मितीला दाद दिल्याशिवाय आपण राहूच शकत नाही.)

 

झाडांच्या उगमापाशी

नसतात फुलांची गाणी

 

(क्रमश:)

 

संजय मेश्राम

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.