No products in the cart.
ग्रेसगॅलरी ! – भाग ७
जागतिक कीर्तीचा चित्रकार व्हिंसेंट व्हॅन गॉग हे ग्रेस यांचे दैवत होते. त्याच्या विलक्षण प्रतिभेचा, रंगसंभ्रमांच्या करवतीशैलीचा ग्रेस यांनी घेतलेला वेध. पत्रकार संजय मेश्राम यांच्याशी २००९ मध्ये त्यांनी केलेली ही दीर्घ बातचीत. सात भागांच्या या लेखमालिकेचा समारोप करीत आहोत. आजचा हा सातवा आणि अखेरचा भाग.
———-
ग्रेसगॅलरी !
भाग ७
मग ते पुन्हा व्हिन्सेंटच्याविषयी सांगू लागले. म्हणाले, मी जे काही बोलतोय, ती सामग्री मात्र अप्रतिम आहे. व्हिन्सेंट व्हान गॉगच्या रंगक्रंदनाची करवतीशैली किंवा रंगभ्रमांची असंही तुम्ही म्हणू शकता.
क्षणात त्यांचा विचार बदलला. मग म्हणाले, रंगभ्रमांची नको, रंगसंभ्रमांची करवतीशैली हे ठीक राहील.
मग सांगू लागले… या शैलीचे वैशिष्ट्य असे असते की, या शैलीमध्ये व्हिन्सेंट व्हान गॉग… महत्त्वाचं वाक्य आहे… जगताना आणि रंगवताना…
थोडं थांबून, थोडा विचार करून म्हणाले, हे पहा, असं करा –
जगताना आणि जगणं रंगवताना हा गृहस्थ सतत क्रौर्य आणि करुणेच्या हिंदोळ्यावर झुलत होता.
ग्रेस यांचे शब्द मी त्यांना वाचून दाखवले, क्रौर्य आणि करुणेच्या…
त्यांना आणखी काही सुचलं. ते म्हणाले, यात ‘आणि’ नको. आणखी गडबड होते. ‘क्रौर्यकरुणेच्या’ असा एकच शब्द करा. ‘आणि’ केलं तर ते सापडतं ना! ‘क्रौर्यकरुणेच्या’ केलं तर क्रौर्यही सापडत नाही, करुणाही सापडत नाही. क्रौर्यकरुणेच्या हिंदोळ्यावर सतत झुलत होता. हेच त्याच्या चित्रांचं वैशिष्ट्य होय.
ग्रेस शब्दांविषयी कसा सूक्ष्म विचार करायचे, दोन शब्दांची सांगड घालून नवी शब्दनिमिर्ती कसे करायचे, हे जवळून अनुभवायला मिळत होते.
त्यांचं सांगून झालं, असं समजून मी विषय बदलला. मी त्यांना ‘आर्टिस्ट’ मालिकेतील गोगॅंच्या चित्रांचं पुस्तक भेट दिलं होतं. त्याचा उल्लेख ग्रेस यांनी केला. मी म्हणालो, पुस्तक छान आहे ना, प्रवासात ते तुमच्या हातात ठेवा.
ग्रेस यांचं सांगून झालं नव्हतं. त्यांना खूप बोलायचं होतं. ते म्हणाले, माझ्या डोक्यात सध्या व्हिन्सेंट व्हान गॉगच आहे. असं आहे, लिहून घ्या…
विद्ध पक्षिणीची हाक
त्याच्या गळ्यामध्ये;
मग मध्येच थांबून समजावून देतात, विद्ध म्हणजे जखमी.
अधेमधे…
विचार करणारा थोडा पॉझ.
काही क्षणांत योग्य शब्द सुचल्याच्या समाधानात त्वरेने म्हणाले,
अधेमधे धुके
मेंदूसाठी!
लगेच सांगतात, यात मेंदूसाठी या शब्दातील ‘दू’ हा दीर्घ आहे. यात धुकं म्हटलं आहे. कारण बुद्धी कामच करीत नाही.
विद्ध पक्षिणीची हाक
त्याच्या गळ्यामध्ये;
अधेमधे धुके
मेंदूसाठी…
ग्रेस पुन्हा या ओळी म्हणतात. माझ्यासाठी थोडं विश्लेषण करतात. जखमी झालेल्या पक्षिणीची हाक गळ्यामध्ये आहे, हेच खरं जगणं आणि तोच रंगसंभ्रमांच्या करवतीशैलीचा आक्रोश आहे. हे सर्व माझ्या कवितेत आहे. म्हणून मला त्याच्यात सापडलं. करवतीशैलीचा आक्रोश. सतत कापत जाणे – रक्त काढणे, सतत कापत जाणे – रक्त काढणे. अधेमधे धुके, मेंदूसाठी. त्यानंतर तीन टिंबे द्यायचे आहेत, मेंदूसाठी…
ग्रेस सांगतात, धुक्यात सापडलेला आहे. काहीही दिसत नाही त्याला. बुद्धीला काही कळत नाही.
क्षणभर थांबून विचारतात,
आलं तुमच्या लक्षात?
होय! असं माझं उत्तर गृहीत धरून पुढं सांगू लागतात, माझं आणि व्हिन्सेंटचं नातं या कॅन्सरच्या पुनर्जन्मानंतरच्या पहिल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्याकाळी मला आठवलं आहे.
मग त्यांच्या चिरपरिचित स्वभावातील खास शैलीतील सहज प्रश्न,
कैसी रही बात सर?
त्यांना काहीतरी नवीन सुचलेलं असतं. त्यांना त्यांच्याच वाक्यात थोडी सुधारणा करायची असते. ते म्हणतात,
असं करा… शारीरिक कॅन्सरनंतरच्या, निरोपाच्या भेटीनंतरच्या, नव्या कॅन्सरचे मानसिक संगोपन करण्याच्या शहाण्या, कनवाळू पहिल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्याकाळी –
आपण जे सांगत आहोत, ते आपल्या आयुष्याविषयी अतिशय महत्त्वाचं, म्हणूनच लांब पण अर्थपूर्ण वाक्य आहे, याची जाणीव ग्रेस यांना आहे. म्हणूनच आपलं वाक्य थांबवत ते म्हणतात –
असं दीर्घवाक्य होत आहे ते पल्लेदार…
मग लगेच पुढचे शब्द सांगून वाक्य पूर्ण करतात-
– मला व्हिन्सेंटच्या रंगविश्वाचा असा रक्तबंबाळ साक्षात्कार झाला.
पुन्हा तोच दाद घेणारा प्रश्न.
कैसी रही संजयजी?
मी त्यांना दाद देतो. ती त्यांना अपेक्षितच असते.
ग्रेस सांगतात, जखमी पक्षिणीची हाक सतत गळ्यात असते; आणि मेंदूत धुके पसरले असते… हा आपला आणि व्हिन्सेंटचा संबंध आहे सरकार! यात्रिकाच्या खडावा आणि पर्यटकांची पादत्राणे. खडावांना मोजे घालायचे नसतात. प्रवासाची आपल्या पायाला इजा होऊ नये, याची काळजी पर्यटक घेत असतो. तर यात्रिकाचे पाय रक्तबंबाळ होतात, हे आपोआप घडतं. याला म्हणतात, यात्रिकाच्या खडावाचा महिमा.
आज आपण व्हिन्सेंट व्हान गॉगबद्दल अतिशय सविस्तर बोललो, मनापासून बोललो, याचं एक समाधान ग्रेस यांना असावं. हे विचार योग्यप्रकारे शब्दबद्ध होतीलच, याची त्यांना खात्री असावी. म्हणूनच ते म्हणाले, आय विश यू ऑल द बेस्ट माय डियर फ्रेंड. आजचा दिवस आपल्यासाठी खरोखर अपूर्व आहे. तुम्ही माझ्यातील व्हिन्सेंट जागृत केला आहे.
ते सांगू लागले, ‘राजपुत्र आणि डार्लिंग’च्या माझ्या छोट्याशा प्रस्तावनेत मी सहोदर ही संकल्पना मांडली होती. माझ्यापूर्वी होऊन गेलेला व्हिन्सेंट माझा सहोदर आहे. याचा साक्षात्कार मला वर्तमानकाळात झाला. क्या बात बन गई सरकार!
‘राजपुत्र आणि डार्लिंग’ च्या प्रस्तावनेत ग्रेस नेमकं काय म्हणाले होते? ते म्हणतात, आपले सहोदर अगोदरच जन्माला येऊन गेलेले असतात; काही आपल्या काळात सापडतात. त्यांच्या संकेतांनी आपल्या व्यक्तित्वाची जशी पुनर्घटना होते तसेच आपल्या अनुभवाला नवे संकेत मिळतात. माझ्यापुरती ही प्रक्रिया ‘राजपुत्र आणि डार्लिंग’ मध्ये फार ठळकपणे उठून आली असावी, असा माझा अंदाज आहे.
त्या खाली स्वाक्षरी आणि तारीख आहे – १ जानेवारी १९७४.
ग्रेस यांना काहीतरी सांगायचं असतं. ते सांगू लागतात…
आणखी एक. तुम्हाला ती विद्ध पक्षिणीची कविता सांगितली, ती मला आताच स्फुरलेली आहे. आत्ता या क्षणी. त्याच्या मागे पुढे आता कोणती कडवी येतात पहायचं आहे.
ग्रेस यांना बोलताबोलता कविता सुचली, त्यांनी तिचं विश्लेषण केलं आणि या कवितेचा पहिला श्रोता होतो मी. अतिशय दुर्मीळ म्हणावा असा हा योग. ते म्हणाले, ते कडवं मला द्याल. त्याच्या मागेपुढे काही येते का ते पाहीन. नाही तर तेवढं कडवं हीच कविता.
ग्रेस म्हणाले, व्हिन्सेंट व्हान गॉगचं मला आकर्षण आहे, तुम्हालाही आहे. म्हणून तुम्ही ते पिकअप केलं. माझी उच्चारण्याची, बोलण्याची पद्धत आणि शैली तुम्हाला कळली आहे. यालाच म्हणतात, संवादलेखन. तुम्ही माझे संवादलेखक आहात.
ग्रेस मनापासून बोलत असत. त्यांनी दिलेली ही दादही मनापासून होती.
ते म्हणाले, तुम्ही काही गोष्टी काढता, मी काही काढतो. नाही तर तो लेखनिक होतो. तुम्ही संवादलेखक होता. तुम्ही केवळ मान डोलवत नाही. तुम्ही कुठे टोचले जाता, तुम्ही कुठे भोसकले जाता, हा त्याचा लाभ आहे. द्विदल लाभ आहे, द्विदल लाभ.
ग्रेस फार महत्त्वाचं बोलत होते. ते जे बोलत असत, सांगत असत, त्याचा लाभ मला अनुभवता आला. हा अनुभव विलक्षण आणि कधीही विसरता न येण्यासारखा आहे.
खोल विचारांतून बाहेर येत ते म्हणाले, खरं तर मी निराश आहे संजयजी!
ते पुढं फार काही सांगत नाहीत. अशावेळी आपणही फार काही विचारण्याचा प्रयत्न न करणेच योग्य. मी शांत राहिलो.
ग्रेस यांनी गॉगसंदर्भात एक अनुभव सांगितला… मला एक मूर्ख असा मिळाला, म्हणे व्हिन्सेंट व्हॅन गॉगचा तुमच्यावर पगडा दिसतो. मी म्हटलं, नाही. ते मानगुटीवर बसलेलं भूत आहे. तो म्हणाला, व्हिन्सेंट व्हॅन गॉगने आपला कान वस्तऱ्याने कापला की कात्रीने? असेही लोक असतात. लायकी नाही हो लोकांची!
गॉगविषयी पुढल्या वेळी बोलू आपण, असा शब्द देणारे ग्रेस. त्यांनी आपला शब्द पाळला. अगदी मन रितं केलं त्यांनी.
तरी सहजतेनं त्यांनी प्रश्न केला, आणखी काय पाहिजे, बोला. मला वेळच वेळ आहे.
मला आणखी काही नको होतं. ग्रेस भरभरून बोलले. मी भरून पावलो. स्मृतींच्या संग्रहात आणखी एका मोलाच्या संवादाची भर पडली, मी श्रीमंत झालो.
(समाप्त)
संजय मेश्राम
Related
Please login to join discussion