No products in the cart.
जेजेत भावी शिक्षकांची सामूहिक कॉपी !
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ३० एप्रिल रोजी होऊ घातलेल्या परीक्षेची प्रवेशपत्रे, प्रश्नपत्रिका, उमेदवारांची माहिती इत्यादी समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याच्या आजच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनं महाराष्ट्रात मोठी खळबळ माजवली आहे. यावरुन लोकसेवा आयोग उमेदवारांची कशा प्रकारे निवड करत असेल याची चांगलीच कल्पना येते. असेच लोकसेवा आयोगाने काही काळापूर्वी कला संचालनालयासाठी निवडलेले उमेदवार (?) कलेच्या क्षेत्रात जाऊन आज काय दिवे लावत आहेत याचं दर्शन घडवणारा हा वृत्तांत.
स्थळ : अर्थातच जेजे स्कूल ऑफ आर्ट
गेल्या आठवड्यात जेजेमध्ये डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशनच्या परीक्षा झाल्या. जेजेच्या १६६ वर्षाच्या इतिहासात घडली नसेल अशी घटना या परीक्षेच्या वेळी घडली. सुमारे तीस – चाळीस विद्यार्थी या परीक्षेला बसतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जी तथाकथित कला महाविद्यालयं चालवली जातात त्या कला महाविद्यालयातून फाईन आर्ट किंवा अप्लाइड आर्टच्या पदविका अभ्यासक्रमातून जे विद्यार्थी पहिला वर्ग मिळवून उत्तीर्ण होतात अशाच विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. हा अभ्यासक्रम पूर्ण वेळेचा असतो. त्यासाठी जेजेत एक खास वर्ग राखून ठेवलेला असतो.
प्रा. प्र अ धोंड , प्रा. शांतीनाथ आरवाडे यांनी अतिशय कडक शिस्तीनं हा अभ्यासक्रम राबवला आणि लोकप्रिय देखील केला होता. भले भले कलाशिक्षक या दोघांना अक्षरशः टरकून असत. पण कालांतरानं वरील शिक्षक आपल्याशी का कडक वागले याची त्यांना जाणीव होत असे. वरील दोन प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीनंतर प्रा. वसंत सोनवणी यांनी काही प्रमाणात त्यांची परंपरा पुढे नेली. पण नंतर मात्र या वर्गाची पूर्णतः वाताहत झाली. चांगले कलाशिक्षक तयार करावे हा या अभ्यासक्रमाचा मूळ हेतू होता. पण आता मात्र चित्रकलेच्या क्षेत्रात किंवा परीक्षेत कॉपी कशी करावी याचं प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम म्हणून हा वर्ग ओळखला गेला तर आश्चर्य वाटू नये ! अशी घटना नुकतीच या वर्गात घडली.
गेल्या आठवड्यात डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशनच्या वर्गाची परीक्षा झाली. आणि या परीक्षेत थिअरीच्या पेपरला विद्यार्थ्यांकडून चक्क सामुदायिक कॉपी झाली असल्याचं कळतं आहे. आधीच जेजेत कायम स्वरुपी शिक्षक फारसे नाहीत. सारा कारभार हंगामी आणि कंत्राटी शिक्षकांकरवी चालवला जातो. कंत्राटी शिक्षकांची केस कोर्टात चालू आहे. त्यामुळे त्यांचं लक्ष शिक्षणात असून नसल्यासारखं. तर हंगामी शिक्षकांचा प्रकारच वेगळा तेही सतत गॅसवर. आपण जातो का राहतो अशी आपल्या भवितव्याची चिंता सतत त्यांच्या डोक्यावर. साहजिकच त्यांचंही लक्ष शिक्षणावर नसल्यास नवल ते काय ?
जेजेचा वापर टेबलस्पेस सारखा करायचा आणि भरपूर व्यावसायिक कामं करुन चारितार्थ चालवायचा असाच एकूण बहुसंख्य शिक्षकांचा खाक्या असल्यानं त्यांचंही विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याकडे लक्ष नाहीच. ( आणि का असावं ? सरकार त्यांना जर पंधरा – पंधरा वीस – वीस वर्ष गुलामासारखं राबवून घेणार असेल, त्यांच्या भवितव्याची कुठलीच तरतूद करणार नसेल तर त्यांनी त्यात का जीव ओतून काम करावं ? ) त्यातच दोन वर्ष कोरोनानं वाया घालवलेली. अधिष्ठाता साबळे हे व्यावसायिक कामं करण्यात गुंतले असल्यानं त्यांचंही विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाकडे आणि व्यवस्थापनाकडे लक्ष नाही. अशी एकूण अराजकाची परिस्थिती जेजेत असल्यामुळं जेजेत शिक्षणाचे बारा वाजले असल्यास नवल नाही. फाईन आर्ट आणि क्राफ्ट विभागाच्या अभ्यासक्रमांबद्दल वेळोवेळी लिहिलंच आहे. त्यामुळे त्या विषयी आता इथं लिहिण्याचं टाळतो.
जेजेच्या ज्या वर्गातून आजवर महाराष्ट्राला किंवा देशाला जे चांगले कलाशिक्षक दिले गेले त्या वर्गात किंवा त्या शिक्षण प्रशिक्षण विभागात आज शिक्षणच दुरापास्त झालं आहे. आधीच शैक्षणिक वर्ष उशिरा सुरु झालं, त्यातच गेल्या संपूर्ण वर्षभरात विद्यार्थ्यांचा अचानक झालेला संप, कोरिया बिएनालेमुळे सुमारे महिनाभर वर्ग न भरु शकल्यानं न झालेला अभ्यास, दिवाळी आणि नाताळची सुट्टी, कलावेध स्पर्धेसाठी करावी लागलेली तयारी आणि वार्षिक प्रदर्शनामुळे करता न आलेला अभ्यास यामुळे विद्यार्थ्यांचा प्रचंड वेळ वाया गेला. साहजिकच त्याचा परिणाम शिक्षणावर झाला. संपूर्ण वर्षभरात या विद्यार्थ्यांना तीन विषयांच्या प्रत्येकी दहा या प्रमाणे एकूण तीस असाइनमेंट पूर्ण करायच्या होत्या पण त्यातल्या फक्त सातच म्हणजे एकवीसच असाइनमेंट वर्गशिक्षकांकडून करुन घेतल्या गेल्या. अन्य तीन असाइनमेंट म्हणजे एकूण नऊ असाइनमेंट आपण तुम्हाला ऍडजस्ट करुन देतो असं विद्यार्थ्यांना वर्गशिक्षकांनी सांगितलं. ही कला शिक्षण क्षेत्रात चुकीचा प्रघात पाडणारी अत्यंत भयंकर अशी गोष्ट आहे. कला संचालनालयातल्या परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना थोडी तरी लाज किंवा शरम असेल तर त्यांनी या प्रकरणाची त्वरित चौकशी करावी आणि आम्ही म्हणतोय त्यात तथ्य आहे की नाही हे पाहावे.
कला संचालकांनी देखील आपली उदासीनता सोडून आणि ‘आपल्याकडे चांगली माणसंच नाहीत’ हे सततचे रडगाणे आता थांबवून यात जातीनं लक्ष घालावं आणि पाहावं यात संबंधित शिक्षक दोषी आहेत किंवा नाहीत ते. पण ते यातलं काही एक करणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. कारण सारेच आतून एक आहेत. या सर्व प्रकरणावर लिहिण्याची आमच्यावर वेळ आलीये ती एका धक्कादायक घटनेमुळे. याच डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशनच्या तीन विषयांच्या थिअरीच्या परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांनी सामुदायिकपणे कॉपी केली कारण गेलं वर्षभर थिअरीच्या तिन्ही विषयांचं म्हणे एकही लेक्चर होऊ शकलं नव्हतं. हे सर्व म्हणे वर्गशिक्षकांच्या आदल्या दिवशी लक्षात आलं. कदाचित ते विद्यार्थ्यांनीच त्यांच्या लक्षात आणून दिलं असावं. असेल सुद्दा. वर्गशिक्षक एक्स्ट्राकरिक्युरल ऍक्टिव्हिटीजमध्ये प्रचंड बिझी असल्यामुळे बहुदा विद्यार्थ्यांना शिकवावयास वेळ मिळाला नसावा.
त्यावर उपाय काय ? तर तो असा की आदल्या दिवशी म्हणे वर्गशिक्षकांनी संध्याकाळी उशिरापर्यंत विद्यार्थ्यांना वर्गात थांबवून ठेवले. सर्व विद्यार्थी वर्गात येताच दार खिडक्या बंद करुन घेतल्या. आणि नंतर म्हणे वर्गशिक्षकांनी ‘स्मितहास्य’ करत करत उद्याच्या परीक्षेत कुठले प्रश्न येणार ते थेट सांगून टाकलं. सात – साडेसात वाजेपर्यंत कॉलेजात बसलेले विद्यार्थी विरार, कर्जतपासून कुठे कुठे लांब लांब राहणारे घरी पोहचेपर्यंत त्यांना १० – ११ वाजले असावेत. मग त्यांनी काय करावं ? ( ती आयडिया देखील वर्गशिक्षकांनीच त्यांना सांगितली होती की काय हे मात्र कळू शकले नाही. ) त्यांनी धडाधड मोबाईलवर उत्तरांचे फोटो काढून घेतले. आणि दुसऱ्या दिवशी परीक्षेला आल्यावर वर्गात वर्गशिक्षक किंवा सुपरवायझर देखील नसल्यानं मुलांनी धडाधड मोबाईल पाहून उत्तरपत्रिका लिहून टाकल्या. त्यावेळी वर्गशिक्षक तिथं नसल्याच्या नोंदी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात निश्चितपणे टिपल्या गेल्या असणार. ते कुठे बसले होते ते देखील कॅमेऱ्यात नोंद झालं असणार. एवढं सगळं ठासून सांगितल्यावर देखील कला संचालक या प्रकरणाची चौकशी करणार नसतील तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांना त्वरित आर्किटेक्चर कॉलेजमध्ये परत पाठवावं. अशी जर मागणी जर आम्ही केली तर त्यात आमचं काय चुकलं ? सगळे पुरावे कागदोपत्री मौजूद आहेत. सीसीटीव्हीवर साऱ्याची नोंद झाली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कॉल रेकॉर्डिंग आणि व्हाट्सअप तपासल्यास सारेजणच मुद्देमालासह हाती लागतील. आहे हिंमत उच्च व तंत्रशिक्षण खात्याची हे सारे करावयाची ?
त्या दिवशी शिक्षण प्रशिक्षण विभागाचे विभाग प्रमुख देखील उपस्थित नव्हते. काही जण म्हणतात की ते बहुदा महाराष्ट्र सरकारचं सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी पुण्याला गेले असावेत. काय की बुवा ! कुणास ठाऊक ? जेजेच्या या डिपार्टमेंटमध्ये जे काही घडतं ते अक्षरशः चक्रावून टाकणार असतं. परवा तर एक विद्यार्थी सांगत होता आमचे एक हंगामी सर सकाळी येतात सही करतात आणि बाहेर निघून जातात. आणि संध्याकाळी परत येतात सही करतात आणि घरी निघून जातात. दिवसा कुठे जातात ? असं त्या विद्यार्थ्याला विचारलं ‘तर तो म्हणाला माहित नाही बुवा ! पण कोण कोण म्हणतात की ते मंत्रालयात जातात.’ एका मंत्री साहेबांचे ते म्हणे ओएसडी आहेत. आता खरोखरच कुणा मंत्र्यांचे ते ओएसडी असतील तर ते विद्यार्थ्यांना घडवणार की मंत्र्यांना सांभाळणार की ? जेजेमध्ये हे सारं असं चाललं आहे. काय लिहावे आणि किती लिहावे ? कोळसा उगळावा तेवढा काळाच !सारखा उगाळून उगाळून आपले हातच काळे व्हावेत. काही गोष्टी तर अशा आहेत की त्यांचा उच्चार करणं देखील योग्य वाटत नाही. पण या गोष्टी जेजेमध्ये घडतायेत ही वस्तुस्थिती आहे.
नुकतंच जे घडलं ते मात्र अगदी वर लिहिलंय तस्संच घडलंय. त्यात काडीमात्रही फरक नाही किंवा चूकही नाही. मंत्रालयातल्या तंत्रशिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना शिक्षणाबाबत थोडी जरी आस्था असेल तर त्यांनी या कामी चौकशी समिती बसवावी आणि चौकशी करुन आम्ही जे म्हणतो आहोत त्याची सत्यता पडताळून घ्यावी. आम्ही म्हणतोय त्यातला थोडा जरी तपशील चुकला तरी तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला आम्ही तयार आहोत.
हे सांगत असताना एक जुनी आठवण सांगितल्या शिवाय राहत नाही. प्रा आरवाडे या विभागाचे प्रमुख असताना याच वर्गाचा थोडासा अभ्यासक्रम परीक्षा जवळ आली असताना देखील शिल्लक राहिला होता. त्याला कारण ठरलं होत ते प्रा शहाणे सरांचं आजारपण. प्रा शहाणे हे या वर्गाची व्हिजिटिंग लेक्चर्स घेत असत. त्यांचं वय झालं होतं. पण मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून ते जेजेत येत असत. पण जेव्हा त्यांना जेजेमध्ये येणं अशक्य झालं तेव्हा प्रा आरवाडे यांनी शहाणे सरांची जेजेमध्ये खास राहण्याची व्यवस्था केली आणि शहाणे सरांना उरलेली लेक्चर्स घ्यायला लावली. शहाणे सरांची ती लेक्चर्स शेवटची ठरली. कारण नंतर लगेचच त्या आजारपणातच सरांचं निधन झालं. अतिशय हळवं होत एका माजी विद्यार्थ्यानं ही आठवण मला आवर्जून सांगितली. हे शिक्षक पाहा नाही तर आजचे न शिकवणारे, शिक्षण देता देता नको ते उद्योग करणारे, विद्यार्थ्यांना कॉपी करायला भाग पाडणारे नीच मनोवृत्तीचे शिक्षक पाहा. वास्तू तीच आहे, अभ्यासक्रम देखील तोच आहे फक्त काळ बदललाय आणि माणसं.
आमचा उच्च व तंत्रशिक्षण खात्याला थेट प्रश्न आहे. असे शिक्षक तुम्ही समाजाला देणार आहात का ? हेच विद्यार्थी पुढं शाळाशाळांमध्ये शिरुन पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना चित्रकला हा विषय शिकवणार आहेत. त्यांना हे असलं कॉपी करण्याचं प्रशिक्षण द्यावं अशी तुमची अपेक्षा आहे का ? त्यात तुमची कदाचित मुलं, नातवंड, पतवंडं देखील असू शकतील याचा तरी तुम्ही कधी विचार केला आहे का ? का अख्या महाराष्ट्राचंच तुम्ही भ्रष्ट मंत्रालयात रूपांतर करण्याचा विडा उचललाय ?
*****
– सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
Related
Please login to join discussion