No products in the cart.
हमाममे सारे नंगे!
गुणवत्ता, पात्रता हे निकष न लावता उमेदवारांची नेमणूक केली म्हणजे काय होतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे कला संचालनालय आणि त्यांच्या अखत्यारित येणारी चार शासकीय कला महाविद्यालयं, ज्यात जे जे स्कूल ऑफ आर्टसारखी महत्त्वाची संस्थादेखील आलीच. कोणे एके काळी भारतातील सर्व राज्यात उच्च स्थानावर असलेलं महाराष्ट्राचं कलाशिक्षण आज अक्षरशः धुळीला मिळालं आहे. हे सारं कसं झालं याचाच आणखीन एक नमुना म्हणजे औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयातील अधिष्ठात्यांची निवड. त्याच निवडीचा हा पंचनामा…
———
कला संचालनालयातील सावळा गोंधळ दूर करायच्या दृष्टीनं आता महाराष्ट्र सरकारनं पावलं उचलावयाची ठरवलं आहे किंवा काय न कळे पण आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी या कामी जातीनं लक्ष घातलं असल्याच्या बातम्या कानी येऊ लागल्या आहेत. खरं तर यावर विश्वास बसत नाही, पण खरोखरच तसंच काही तरी घडू लागलं आहे. कला संचालकांनी ७ डिसेंबर २०२३ रोजी पाठवलेल्या पत्राची एक प्रतच व्हाटसअपवरुन आमच्या हाती आली आहे. त्यात विषय लिहिला आहे. ‘श्री रमेश सुभाष वडजे, अधिष्ठाता, शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या गैरवर्तणुकीबाबत व नियमबाह्य कामांबाबत’.
खरं तर श्री रमेश वडजे यांनी आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत नियमांमध्ये बसणारी कामं तरी अशी कोणती केली याबाबत खरं तर चौकशी केलं जाणं अत्यावश्यक आहे, पण ते असो, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी जर या संदर्भात काही कारवाई करावयाचं आरंभलं असेल तर त्याचं स्वागत करणं गरजेचं आहे यात शंकाच नाही. या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांचे शहर जिल्हाध्यक्ष श्री नागराज गायकवाड यांनी श्री वडजे यांच्या संदर्भात लिहिलेलं एक पत्रच ‘चिन्ह’च्या हाती आलं आहे. श्री गायकवाड यांनी ७ डिसेंबर २०२३ रोजी ते पत्र उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना लिहिलं. त्यांनी ते बहुदा दादांच्या हाती त्याच दिवशी दिलं असणार, आणि दादांनीदेखील बहुदा त्याच दिवशी ते पत्र प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांच्याकडे सुपूर्द केलं असणार. पत्रावर बहुदा ‘तातडीचे’ असा शेरा असणार त्यामुळेच की काय कला संचालक (प्रभारी) राजीव मिश्रा यांना तात्काळ कारवाई करावयास भाग पडून त्यांनी बहुदा श्री रमेश वडजे यांना त्याच दिवशी चौकशीचे पत्र रवाना केले असणार. कला संचालनालयाच्या इतिहासात बहुदा अशी तत्परता अद्याप कुणाला दाखवता आली नसावी त्यामुळे श्री राजीव मिश्रा हे अभिनंदनास पात्र आहेत.
सदर दोन्ही पत्रं आम्ही जशीच्या तशी सोबत देत आहोत.
या पत्रांमुळे जे प्रश्न आम्हाला पडले ते इथं मांडणं अत्यावश्यक वाटतं.
उदाहरणार्थ…
१) या पत्रात श्री नागराज गायकवाड यांनी सुमारे दोन वर्षात श्री वडजे यांच्या संदर्भात गंभीर तक्रारी करणारी सुमारे सहा पत्रे कला संचालक आणि शिक्षण सचिवांना पाठवली असतानाही त्या पत्रांची दखल श्री मिश्रा आणि श्री रस्तोगी यांना का घ्यावीशी वाटली नाही?
२) काही महिन्यापूर्वी तर शिक्षण सचिव रस्तोगी हे संभाजी नगरच्या येथे संस्थेला भेट द्यायला गेले असतानाही श्री वडजे हे तब्येतीचे कारण सांगून रजा टाकून आपल्या घरी नाशिकला निघून गेले, त्यावर शिक्षण सचिवांनी काय कारवाई केली?
३) श्री वडजे यांच्या गैर कारभारासंदर्भात वृत्तपत्रांनी सातत्यानं अत्यंत गंभीर बातम्या दिल्या असतानाही त्यांच्यावर काही कारवाई करण्याची गरज सरकारला का भासली नाही?
४) श्री वडजे यांच्या नेमणुकीसंदर्भातच अत्यंत गंभीर आक्षेप घेतले जात असताना सरकारनं वेळीच चौकशी का केली नाही?
५) श्री वडजे आणि अन्य एका अधिष्ठात्याच्या नेमणुकामधल्या चुका निस्तरण्यासाठी, त्यावर पांघरूण घालण्यासाठी भूत संवर्गाचा घाट घातला गेला, असा आरोप ज्यांना याची झळ बसणार आहे त्यांनी केला आहे या आरोपात तथ्य आहे का? आता तरी या प्रकरणाची चौकशी सरकार करणार आहे का?
६) मंत्रालयातल्या ज्या अधिकाऱ्यानं हा कट रचला असा आरोप जेजे परिसरात सर्रास केला जातो त्या अधिकाऱ्याची चौकशी आता तरी सरकार करणार आहे का?
७) सदर अधिकारी उच्च व तंत्रशिक्षण खात्यात तब्बल सहा वर्ष ठाण मांडून बसला आहे (नियमानुसार त्या पदावर त्याला तीन वर्षच राहता येतं) त्याला आता तरी सरकार त्या पदावरून हटवणार आहे का?
८) सुप्रीम कोर्टाने भूतसंवर्गाबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यात उच्च व तंत्रशिक्षण विभाग गेले सात आठ महिने का टोलवाटोलवी करतो आहे?
९) सुप्रीम कोर्टाने दिलेल्या दट्ट्यानेदेखील शिक्षण सचिव रस्तोगी यांना संबंधितांना का जाब विचारावासा वाटला नाही? हे नेमकं काय गौडबंगाल आहे?
१०) तब्बल ५० वर्ष जुन्या शासकीय कला महाविद्यालयाचं अधिष्ठाता पद भूषवणाऱ्या अधिकाऱ्यास तुलनेनं अत्यंत नव्या अशा कला महाविद्यालयात शिक्षण घेता येतं का?
११) त्यासाठी त्याला कला संचालकाची परवानगी घेणं अनिवार्य नसतं का?
१२) मुळात जी डी आर्ट असलेल्या विद्यार्थ्याला थेट एमएफएला प्रवेश मिळतोच कसा?
१३) संभाजीनगरमध्ये शासकीय कला महाविद्यालयात “पूर्ण वेळ” अधिष्ठाता म्हणून सरकारी नोकरी करणाऱ्याला दुसऱ्या एखाद्या कला महाविद्यालयात जाऊन “पूर्ण वेळ” अभ्यासक्रम कसा काय करता येतो?
१४) करणारा ढीग करेल पण तो करत असताना त्याचे वरचे अधिकारी (म्हणजे अर्थातच कला संचालक) काय झोपा काढत होते का? त्याना हा प्रश्न का कधी विचारावासा नाही वाटला? चंद्रकांत दादांनी यात जातीनं लक्ष घातल्यावर आठ तासात वडजे यांना पत्र पाठवताना कला संचालकांना जनाची सोडा, मनाचीदेखील लाज वाटली नाही का?
१५) कला संचालक आचरट पण शिक्षण सचिवांनादेखील यात वावगं काही नाही वाटलं?
नेमकं काय चुकतंय?
महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदावर नियुक्ती होण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता पदव्युत्तर पदवी असावी असा नियम गेल्या किमान दोन दशकांपासून आहे. इतकंच नव्हे तर वेळोवेळी त्या नियमात सुधारणा होऊन पदव्युत्तर पदवी व्यतिरिक्त NET परीक्षा पास असणे आवश्यक आहे आणि ती पास केली नसेल तर पर्याय म्हणून डॉक्टरेट (PhD) केलेले असणे आवश्यक आहे अशा प्रकारच्या सुधारणा होऊनही १२ ते १५ वर्षे होऊन गेली आहेत. असे असताना मुळात तशी शैक्षणिक पात्रता नसलेली व्यक्ती महाविद्यालयात प्राध्यापक पदावर नेमली जाते कशी? इतकंच नव्हे तर त्या पदाची मूळ शैक्षणिक पात्रता पूर्ण न करताच त्या व्यक्तीला प्राचार्य पदावर नेमले जाते कसे? आणि त्या पदावर नेमणूक झाल्यानंतर त्या व्यक्तीला पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या महाविद्यालयात जाऊन अभ्यास करण्याची मुभा प्राचार्य पदावर असताना दिली जाते कशी? प्राचार्य पद म्हणजे केवळ कंत्राटी पद्धतीने तासिका तत्त्वावर शिकवणे नव्हे. शिकवण्याव्यतिरिक्त कार्यालयीन कामकाज, संस्थेचे व्यवस्थापन इत्यादी अत्यंत मोठी जबाबदारी प्राचार्य पदावर असते. तसे असताना कोणता प्राचार्य अर्ध वेळ काम करून अर्ध वेळ शिक्षण घेऊ शकेल? जर ते शिक्षण अर्धाच वेळ देऊन करणे शक्य असेल, तर ती पदवी Full time पदवी नक्कीच नसणार. असे असेल तर मग ती घेऊन सहाय्यक प्राध्यापक पदाची किमान शैक्षणिक पात्रतासुद्धा साधली जात नाही. तर मग प्राचार्य पद दूरच राहिले. दुसऱ्या बाजूला, प्राचार्य पदाच्या जबाबदाऱ्या अर्धवट सोडून उच्च शिक्षण घेतले तर त्या जबाबदाऱ्या पूर्णपणे पार कशा पाडणार? नोकरीत कायम असताना उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर तशी संस्थेची रीतसर परवानगी घेऊन अभ्यासासाठी सुट्टी (Study leave) घ्यावी लागते. अशी सुट्टी सहसा पूर्ण वेळ PhD करण्यासाठी घेतली जाते, तिचा कालावधी ३ वर्षांचा असतो. त्या दरम्यान तुम्हाला पगार मिळत नाही किंवा संस्थेच्या नियमानुसार फारतर अर्धा किंवा त्यापेक्षाही कमी पगार मिळतो. आणि तुम्ही काम करत असलेल्या पदावर अन्य व्यक्तीची नेमणूक केली जाते जेणेकरून काम योग्य प्रकारे पूर्ण होते. या सर्व तरतुदी नवीन नाहीत, कुठल्याही शैक्षणिक संस्थेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी असलेले हे अगदी सर्वसामान्य नियम आहेत. इथे मात्र यातील एकही नियम पाळलेला दिसत नाही. |
औरंगाबाद ते अमरावती अंतर आहे तब्बल तीनशे सव्वा तीनशे किलोमीटरचं. औरंगाबाद इथं अधिष्ठाता म्हणून नोकरी करणारा इसम रोज ६५० किलोमीटरचा प्रवास करुन अमरावतीला जाऊन परत औरंगाबादेत येणं शक्य आहे का? असा प्रश्न उच्च व तंत्रशिक्षण खात्यातल्या एकाही अधिकाऱ्याला पडू नये याचं आश्चर्य नाही वाटत – या साऱ्यांची कीव येते. असले अधिकारी मंत्रालय आणि कला संचालनालयात मोक्याच्या जाग्यावर बसले आहेत याची लाज वाटते, शरम वाटते. किळस येते.
सर्वात भयंकर म्हणजे ज्या कला महाविद्यालयात श्री वडजे यांनी एमएफए शिकण्यासाठी प्रवेश घेतला असे दाखवले जाते, त्या डॉ संजय कुऱ्हे आर्ट कॉलेजमध्ये म्हणे शिल्पकला हा विषयच शिकवला जात नाही, असं जाणकार सांगतात. अगदी अमरावतीमधले अन्य कला शिक्षण संस्थाचालकदेखील या संदर्भात उत्तर देण्यास असमर्थता दाखवतात, तर मग प्रश्न असा पडतो की वडजे साहेबानी एमएफए केलं तरी कुठं? (शिक्षण सचिव, कला संचालक या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावीच लागतील. कारण हे लिहीत असताना संजय कुऱ्हे कॉलेजची वेबसाईट चेक केली असताना तिच्यात पेन्सिल ड्रॉईंगपासून सिरॅमिक्स क्लासेसपर्यन्त सगळे विषय आढळले पण शिल्पकला हा विषय मात्र म्या पामराला काही दिसला नाही. माझ्यापेक्षा अधिक दूरदृष्टी असलेला कोणी जाणकार माझं यातलं अज्ञान दूर करू शकेल काय? सोबत जी कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची जी मार्कलिस्ट छापली आहे तिच्यातल्या ‘क्रिएटिव्ह स्कल्पचर’ या शब्दाचा अर्थदेखील मला कुणी समजावून सांगेल काय? ३०० पैकी २१५ गुण पटकावलेल्या वडजे यांच्या शिल्पाचे फोटो कुणी पाठविल काय?
शेवटचा मला पडलेला प्रश्न भयंकर आहे. जर का समजा श्री नागनाथ गायकवाड यांनी लिहिलेल्या पत्रामुळे जर का वडजे यांची चौकशी झाली आणि तिच्यात ते दोषी ठरले तर संजय कुऱ्हे मॉंडर्न आर्ट कॉलेजमधून अशाच पद्धतीनं एमएफए केलेल्या महाराष्ट्रातील अन्य कॉलेजातील शिक्षकांच्या एमएफएच्या पदव्यांचं काय होणार?
लिहिण्यासारखं भरपूर आहे आणि त्यावर लिहिणारदेखील आहे पण तूर्त इतकंच!
सतीश नाईक
संपादक, चिन्ह आर्ट न्यूज
Related
Please login to join discussion