No products in the cart.
हे तीन अधिकारी नेमकं कुणासाठी काम करतात?
जेजे स्कूल ऑफ आर्ट आणि अन्य तीन कला महाविद्यालयातील प्राध्यापक, अध्यापकांच्या १४८ जागा भरण्याचा कट ज्या पद्धतीनं रचला गेला आणि तो प्रत्यक्षात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत त्याकडे बारकाईनं पाहिलं तर असं लक्षात येतं की, हा कट निश्चितपणे यशस्वी होणार नाही. कारण ज्या पद्धतीनं पदभरती करण्यासाठी नियम तयार केले आहेत ते अतिशय कच्च्या पायावर आहेत. त्यामुळेच ‘मॅट‘नेदेखील या पदभरतीसाठी काही आक्षेप नोंदवून नियम शिथिल करायला सांगितले आहेत. आणखीनही यासंदर्भात बरंच काही घडणार आहे. त्याचीच माहिती देणारा विशेष लेख.
उच्च व तंत्रशिक्षण विभागातला एक ज्येष्ठ अधिकारी आणि कला संचालनालयातील दोन डचरू अधिकाऱ्यांनी मिळून चारही शासकीय कला महाविद्यालयातील प्राध्यापकांची सुमारे दीडशे पदं लोकसेवा आयोगातर्फे भरावयाचा कट कसा रचला ते आपण मागील लेखात पाहिलं. आता या लेखात आपण पाहूया तो प्रत्यक्षात कसा आणला त्या संबंधीची सांगोवांगीची माहिती. कारण अशा स्वरूपाची कटकारस्थानं ही उघडपणे कुणीच करत नाही, ती सर्वसाधारणपणे एखाद्या बारमध्ये अथवा जिथं लोकांचा फारसा वावर नसतो अशा ठिकाणी रचली जातात. खूपच गुप्तता राखली जाते. इथंही तसंच घडलंय. पण तरीसुद्धा बातमी फुटायची ती फुटलीच! उच्च व तंत्रशिक्षण खात्याच्या ज्या ज्येष्ठ अधिकाऱ्यानं हा कट रचला त्याला फक्त पैसा गोळा करणं एवढंच ठाऊक आहे आणि त्यासाठी तो काहीही करायला तयार असतो.
आठवतंय ‘चिन्ह’नं काही महिन्यांपूर्वी एक स्टोरी छापली होती? त्या स्टोरीमध्ये आम्ही अनुदानित कला महाविद्यालयांच्या शिक्षकांना जो एरियर्स मिळणार होता त्यात आपलाही वाटा असायला हवा यासाठी या अधिकाऱ्यानं आग्रह धरला. कोट्यवधी रुपये सरकारकडून या शिक्षकांना मिळणार होते. त्याचे चेक काढण्यासाठी या माणसानं सतत चालढकल केली. शिक्षक बिचारे घायकुतीला आले तेव्हा यानं नवा डाव टाकला. हा स्वतः काहीच करत नाही, सगळं काही दुसऱ्यांकरवी करतो. याच्यावतीनं त्याचे अनेक एजंट वसुलीची अशी कामं करत असतात. असाच एक एजंट त्याला छत्रपती संभाजीनगरात मिळाला. त्याच्याकरवी त्यानं डाव टाकला आणि तो यशस्वीदेखील केला. त्यानं काय केलं असेल? यानं त्या एजंटकरवी त्या शिक्षकांना निरोप पाठवला, एवढेएवढे टक्के द्या नाहीतर चेक मिळणार नाही, असा त्या मेसेजचा मथितार्थ होता.
दीड-दोनशे कलाशिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आधीच घायकुतीला आलेले. त्या साऱ्यांना या दोघांनी मिळून जाळ्यात ओढलं आणि सर्व शिक्षकांना वर्गणी काढायला भाग पाडलं. प्राचार्य, प्राध्यापक, सहाय्यक अधिव्याख्याता, हेडक्लर्क, क्लर्क आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी या साऱ्यांकडून त्यांनी रोकड स्वरूपात वर्गणी गोळा केली, सारा व्यवहारदेखील या हरामखोरांनी फुटायला नको म्हणून तिकडे दूर छत्रपती संभाजीनगरात केला. लाखो रुपयांची रोख रक्कम बॅगमध्ये घालून संबंधित कर्मचारी संघटनेचे नेते संभाजीनगरमध्ये पोहोचले. तिथं त्या कला संचालनालयातल्या ज्येष्ठ अधिकाऱ्याकडे पैसे पोचते केले. त्या एजंटने पैसे पोहोचताच संभाजीनगरमधून मंत्रालयात तोफांची सलामी दिली आणि पुढं या सगळ्या शिक्षकांचे एरियर्सचे चेक कुठलाही अडसर न होता निघाले.
या प्रकरणाची मोडस ऑपरेंडी आम्ही जशी घडली तशी प्रसिद्ध केली, त्यांची नावं देखील ओळखता येतील अशा पद्धतीनं दिली. कारण हे हरामखोर, उलट्या काळजाचे महाराष्ट्र शासनाचे अधिकारी कुठलाही पुरावा ठेवत नाहीत. म्हणूनच आम्ही त्यांची नावं जाहीर करू शकलो नव्हतो. पण मंत्रालय, कला संचालनालय आणि विनाअनुदानित कला महाविद्यालयातील शिक्षकांना ती बरोबर समजली. पण कुणीही चकार शब्द काढला नाही, ब्रदेखील काढला नाही. एरवी जराशी जरी टीका केली तरी फुरफुरणारे, अंगावर वसकन धावून येणारे टिनपाट पदाधिकारीदेखील मूग गिळून गप्प राहिले. यामुळेच हे उन्मत्त अधिकारी माजले आहेत.
त्यांच्यावर जर तेव्हाच सरकारनं कारवाई केली असती तर आज जेजे आणि अन्य तीन शासकीय कला महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या पदांचा बाजार मांडायची यांची हिम्मत झाली नसती. पण त्या साऱ्या शिक्षकांनी ढुंगणात शेपट्या घातल्या (शब्द अश्लील वाटेल, पण तोच योग्य आहे). त्यातल्या बहुसंख्य शिक्षकांनी या प्राध्यापकांच्या पदासाठी अर्ज केले आहेत. ज्यांनीज्यांनी अर्ज केले त्या प्रत्येकाला हा उच्च व तंत्रशिक्षण खात्याचा अधिकारी आणि त्याचे कला संचालनालयातले दोन साथीदार बडवबडव बडवणार आहेत.
फिल्डिंग थेट लोकसेवा आयोगापर्यंत लावली असल्यास नवल नाही. किंबहुना ती तशी लावली जातेच. आणि म्हणून जेजे आणि अन्य तीन शासकीय कला महाविद्यालयात कुठलीही लायकी नसलेल्या भणंग – भिकाऱ्यांच्या नेमणूका होत राहतात. गेल्या काही वर्षात झालेल्या या सर्व नेमणूका पहा किंवा ‘कालाबाजार’चा अंक वाचा. आम्ही लिहीत असलेल्या प्रत्येक शब्दाची प्रचिती तुम्हाला येईल.
आता हे शिक्षक कुठल्या तोंडानं यांना नाही म्हणणार आहेत? आम्ही तर असं ऐकतोय की फिल्डिंग पार सांगली – सातारापासून लावली गेली आहे. कुणाला घ्यायचं, कुणाला मोठं पद द्यायचं सर्व काही निश्चित झालं आहे. एकेका पदामागे आपल्यासारखी सर्वसामान्य पापभिरू माणसं विचारदेखील करू शकत नाहीत असे आर्थिक व्यवहार होणार आहेत! ते कितीचे असतील? कसे असतील? कुठे केले जातील? सर्व माहिती आमच्यापर्यंत येऊन पोहोचते आहे. ज्यांच्याज्यांच्या नेमणूका ठरल्या आहेत त्या साऱ्यांची एक यादी करून त्याचे बंद लिफाफे (शाह – मोदींचा आवडता शब्द) आम्ही लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, पोलीस महासंचालक, सीबीआय, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य इत्यादी ठिकाणी आधीच देऊन ठेवणार आहोत.
हे सारं आम्ही करतो आहोत ते जेजे आणि अन्य तीन शासकीय कला महाविद्यालयातील शिक्षण वाचवण्यासाठी. आणि ही आम्हाला मिळालेली शेवटची संधी आहे असं आम्ही समजतो. कारण गेल्या २५-३० वर्षांमध्ये ज्या ज्या नालायक आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या नेमणूका उच्च व तंत्रशिक्षण खातं आणि कला संचालनालयात झाल्या त्यांनी हेच तर धंदे आयुष्यभर केले आणि केवळ त्यामुळेच महाराष्ट्रातलं कोणे एके काळी भारतात सर्वोच्च स्थानावर असलेलं कलाशिक्षण आज संपूर्णपणे कोलमडलं आहे. या तीन नीच अधिकाऱ्यांचा कट जर यशस्वी झाला तर महाराष्ट्रातून कलाशिक्षण संपूर्णतः हद्दपार होणार आहे हे निश्चित! ते जर होऊ द्यायचं नसेल तर या संपूर्ण भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर निर्णय घेणाऱ्या ‘चिन्ह’चे हात बळकट करा.
सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
Related
Please login to join discussion