No products in the cart.
मान्यता नाही आणि प्रवेश प्रक्रिया मात्र चालू !
जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश मिळावा हे सर्वच विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. वारकरी जसा विठुरायाची भेट घेण्याच्या आशेने वारीची खडतर चाल चालत असतो तसा कलेचा विद्यार्थी जेजेमध्ये ऍडमिशन मिळावं म्हणून प्रवेश प्रक्रियेची खडतर वाट चालत असतो. पण या भाबड्या विद्यार्थ्यांना कुठे माहित आहे की कलेचं हे मंदिरही आज फसवं झालंय आणि इथला देवही. एके काळी संपूर्ण आशिया खंडाच्या कला शिक्षणाचं नेतृत्व करणाऱ्या जे जे स्कूल ऑफ आर्टची मान्यताच एआयसीटीईनं रद्द करण्याची वेळ आली आहे. या अत्यंत गंभीर विषयाकडे लक्ष देण्याऐवजी संस्थेचे प्रमुख एमएफएची प्रवेश प्रक्रिया धडाक्यात राबवत आहेत. या सगळ्या मुर्खपणामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक, आर्थिक आणि भावनिक नुकसान होणार हे निश्चित. काय आहे हा संपूर्ण प्रकार, वाचा या लेखात.
सध्या जे जे स्कूल ऑफ आर्ट परिसरात एकेक ऐकावं ते नवलच घडतं आहे. दोनच दिवसापूर्वी आम्ही जेजेमध्ये सध्या काय परिस्थिती आहे आणि जेजेची मान्यता रद्द होऊन टाळं लागण्याची वेळ आली आहे यासंदर्भात सविस्तर माहिती देणारा लेख प्रसिद्ध केला होता. आता अजून एक धक्कादायक बातमी सूत्रांकडून आमच्यासमोर आली आहे. मागील आठवड्यापासून जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये एमएफए प्रवेशासाठी धडाक्यात मुलाखती सुरु आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि देशभरातून विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा म्हणून मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत. पण जी संस्था एआयसीटीईचे निकषच पूर्ण करत नाही त्या संस्थेला अशा पदव्युत्तर कोर्सला प्रवेश देण्याचा अधिकारच नाही. उद्या जर पुरेसे शिक्षकच नाहीत म्हणून एआयसीटीईनं मान्यता रद्द केली तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय होणार ? ही विद्यार्थ्यांची आर्थिक, आणि भावनिक फसवणूक नाही का ?
जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये एमएफएसाठी प्रवेश मिळावा म्हणून असंख्य विद्यार्थी प्रयत्न करतात. जेजेमध्ये प्रवेश मिळावा हे स्वप्नच असतं त्यांचं. त्यामुळे भर पावसात ही गरीब मुलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येऊन मुंबईत दाखल झाली आहेत. जीवघेणा पाऊस, राहण्याचा आणि खाण्या पिण्याचा प्रचंड खर्च, या सगळ्यांना तोंड देत ही मुलं जेजेमध्ये शिकायला मिळावं यासाठी जीवाचं रान करत आहेत. यातील बोटावर मोजण्याइतकीच मुलं सुदैवी ठरतील आणि त्यांना जेजेमध्ये प्रवेश मिळेल. पण पुढे जर संस्थेची मान्यताच रद्द झाली तर तर काय करतील ही मुलं ? या विचारानेच अंगावर काटा येतो.
प्रत्येक महाविद्यालयाला एआयसीटीईचे नियम पाळावेच लागतात. दरवर्षी नियमाप्रमाणे सर्व माहिती एआयसीटीईला सादर करावी लागते. याला अनुपालन अहवाल असे म्हणतात. पण गेले काही वर्ष जे जे स्कूल ऑफ आर्ट ही संस्था हा अहवालच एआयसीटीईला देत नाहीये. त्यामुळे संस्थेची मान्यता रद्द होण्याची परिस्थिती निर्माण झाली असताना जे जे स्कूल ऑफ आर्ट कुठल्या अधिकारात एमएफएच्या अभ्यासक्रमासाठी मुलाखती घेत आहे ? विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळणं एका शासकीय संस्थेच्या प्रमुखाला शोभतं का ? कला संचालक, जे जे स्कूल ऑफ आर्टचे डीन हे पाप फेडणार तरी कुठं ? प्रत्येक छोट्या मोठ्या खाजगी, शासकीय महाविद्यालयाला एआयसीटीईचे नियम पाळावे लागतात. तेव्हा कुठे महाविद्यालयाला मान्यता मिळते. पण जे जे स्कूल ऑफ आर्ट मात्र एआयसीटीईचे नियम गंभीरपणे न घेता विद्यार्थ्यांचं भविष्य वेठीस धरत आहे.
खरं तर अपेक्षेप्रमाणे एमएफएचे वर्ग नवीन डी-नोव्हो स्टेटसच्या अनुषंगाने होणे अपेक्षित होते. या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने जेजे कॅम्पसमधील उपयोजित कला इन्स्टिट्यूटने एमएफएचे प्रवेश सुरूच केले नाहीत. पण जेजे स्कूल ऑफ आर्ट मात्र अतिशय घाईघाईने प्रवेश प्रक्रिया जुन्या अभ्यासक्रमासाठी, जुन्या नियमांच्या साहाय्याने पार पाडत आहे. याच्यामागे काही ‘अर्थ’पूर्ण कारणं तर नाहीत ना ? बरं कला संचालकही या वेडेपणाला साथ देत आहेत. असं कुठलं कारण आहे ज्यामुळे कला संचालक, डीन आणि या प्रक्रियेत सामील होणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहेत ?
मुळात बीएफएच्या सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांसाठीच संस्थेमध्ये बसायला जागा नाही. पुरेसे शिक्षक नाहीत, स्टाफ नाही, इतर सुविधा नाहीत. असं असताना बीएफएचा कोर्स कसाबसा रेटला जात आहे. मग या नव्या एमएफएच्या विद्यार्थ्यांचा बोजा संस्थेवर कशासाठी लादला जात आहे ? उच्च तंत्रशिक्षण खात्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे म्हणून तासिका तत्त्वावर हवे तितके शिक्षक नेमण्याचा आदेश दिलेला असताना जे जे स्कूल ऑफ आर्टने अजून शिक्षकांचीच भरती केली नाही. तर विद्यार्थ्यांची भरती कशाला करत आहेत ? संस्थेत शिक्षक नसताना नव्याने येणाऱ्या या एमएफएच्या विद्यार्थ्यांना भुतं येऊन शिकवणार आहेत का? हा विद्यार्थ्यांच्या भावना, भविष्य यांच्याशी केलेला हा किती विकृत खेळ आहे ? विद्यार्थ्यांची उमेदीची वर्ष या आचरटपणामध्ये वाया जातील याचं गांभीर्य संस्थेचे डीन साबळे यांना नाहीये का ?
जे जे स्कूल ऑफ आर्टसारखी संस्था जर एआयसीटीईचे नियम पाळत नसेल आणि प्रभारी कला संचालक एआयसीटीईच्या मिनातवाऱ्या करण्यासाठी सध्या दिल्लीत मुक्काम ठोकून असतील तर परिस्थिती किती गंभीर आहे हे तुम्हीच समजून घ्या. अशा परिस्थिती जे विद्यार्थी मुलाखतीसाठी गेले आहेत त्यांना या लेखाचे वाचक म्हणून जागरूक करा. नाहीतर विद्यार्थ्यांवर गंभीर परिस्थिती ओढवू शकते.
दुसरं म्हणजे ही जी प्रवेश प्रक्रिया आहे ती पारदर्शक पद्धतीनं होत नाही हे समजून घ्या. सगळ्या भारतातून जे विद्यार्थी एमएफए कोर्ससाठी ऍडमिशन मिळावं म्हणून मुबंईत येत आहेत त्यांची कुठलीही स्टुडिओ टेस्ट घेतली जात नाही. सगळा कारभार तोंडी सुरु आहे. म्हणजे मुलाखतीत काही प्रश्न विचारले जातात, बीएफएला किती मार्क्स आहेत हे पाहिलं जातं. विशेष म्हणजे मुलाखत घेणारी समिती आहे त्यामध्ये एकही प्रशासकीय कर्मचारी नाही. प्रशासकीय कर्मचाऱ्यांचं काम हे या सगळ्या विद्यार्थ्यांचे कागदपत्र पूर्ण आहेत की नाही ते नियमांमध्ये बसत आहेत की नाही याची नोंद घेणं असत. निवड समितीतले शिक्षक विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासतात. असं असताना जर प्रशासकीय कर्मचारीच सोबत नसेल तर कागदपत्रांची शहनिशा कोण करणार ? विद्यार्थ्यांनी जर काही खोटी कागदपत्र दिली तर त्याची जबाबदारी कोण घेणार ? आणि मुळात विद्यार्थी निवडीचे निकष काय लावले आहेत ? केवळ तोंडी प्रश्न विचारून विद्यार्थी निवडता येतो का ? त्याची कामातली गुणवत्ता ठरवता येते का ?
आता संस्थेची मान्यताच जर एआयसीटीई काढून घेणार असेल तर बीएफएच्या विद्यर्थ्यांचाही प्रश्न तयार होतोय. सीईटीमध्ये झालेल्या निवडप्रक्रियेनंतर जेजेमध्ये बीएफएसाठी या मुलांनी प्रवेश घेतला. पण जर मान्यता रद्द झाली तर एवढ्या मोठ्या संख्येनं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं काय होणार ? याचा विचार कोणीच केलेला नाहीये. त्यामुळे पालक, विद्यार्थी यांनी संपूर्ण शहनिशा करूनच बीएफएसाठी संस्थेत प्रवेश घ्यावा. इशारा देणं आमचं काम आहे कारण यातून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
अजून एक गंभीर मुद्दा असा आहे की या संस्थेत शिक्षण पूर्ण केल्यांनतर अनेक विद्यार्थी नोकरी करण्यासाठी प्रयत्न करतात. संस्थेच्या नावावर विद्यार्थ्यांना नोकरी मिळतेही, पण जर एआयसीटीईची मान्यताच रद्द झाली तर विद्यार्थ्यांना मिळालेल्या पदव्याही रद्द होणार अशा वेळी जे विद्यार्थी नोकरी करत आहेत किंवा पुढे नोकरीसाठी अर्ज करत आहेत त्यांच्या नोकऱ्या जातील. जे जे स्कूल ऑफ आर्ट सारख्या संस्थेसाठी केवढा लज्जास्पद प्रकार आहे हा ?
जे जे स्कूल ऑफ आर्ट या संस्थेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम किती तरी गांभीर्यानं नियोजित करणं अपेक्षित आहे, पण याची जाणीव जेजेचं प्रशासन चालवणाऱ्या प्रशासकांना नाही ही गोष्ट अतिशय शरमेची आहे. विद्यार्थी केवढी मोठी स्वप्न घेऊन संस्थेत प्रवेश घेण्यासाठी येत असतील ? कारण बाहेरच्या माणसाला कुठे माहित असतं की एकेकाळी आशिया खंडाचं कला नेतृत्व करणारं हे महाविद्यालय आज खस्ता हालतीत आहे ? संस्थेकडं एक वास्तू सोडली तर काहीच वैभवशाली उरलं नाहीये. संस्थेची हालत ‘बडा घर पोकळ वासा’ अशी झाली आहे ! आम्ही वेळोवेळी या विषयाला वाचा फोडत आहोत. कुणी निंदा कुणी वंदा पण आमचा हा वसा अविरत सुरु आहे. आता अपेक्षा आहे महाराष्ट्राचं उच्च शिक्षण खात, एआयसीटीई काहीतरी कारवाई करतील याची. या लेखाच्या माध्यमातून आम्ही एआयसीटीईला आवाहन करतो की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जो भयंकर खेळ सुरु आहे त्याची वेळीच दखल घेऊन संस्थेच्या बाबतीत योग्य निर्णय घ्यावा. नाहीतर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणाऱ्या या खेळाला तुम्ही देखील जबाबदार असाल.
******
Related
Please login to join discussion