No products in the cart.
चित्रपट पोस्टर्सचा रंजक इतिहास
चित्रपट जाहिरात क्षेत्रातील दादा असलेले सुबोध गुरुजी यांचे ‘पाऊलखुणा’ हे कॉफी टेबल प्रकारातील पुस्तक अलीकडेच प्रसिद्ध झाले. या पुस्तकात भारतात चित्रपट व्यवसाय सुरु झाल्यापासून १९९० पर्यंत हाताने रंगवलेल्या चित्रपट पोस्टर्सचा रंजक इतिहास वाचता येईल. विशेष म्हणजे या पुस्तकात चित्रपट पोस्टर्सचा नुसता इतिहास वाचायलाच मिळत नाही तर ती पोस्टर्सही बघायला मिळतात. सुबोध गुरुजी यांनी मेहनत आणि चिकाटीने या पोस्टर्सचा संग्रह करून तो वाचकांसाठी खुला केला आहे. या पुस्तकात मोजक्या शब्दातला पोस्टर कलेचा इतिहास आहे. विशेष म्हणज एकाच पुस्तकात इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत मजकूर देण्याचा एक वेगळा प्रयोग केला गेला आहे.
खरं तर भारतात चित्रपट उद्योग भरभराटीला आला त्याचे एक कारण म्हणजे, त्यांची सुंदर आणि नेमकी जाहिरात करणारी पोस्टर्स आहेत असे म्हटले तर अतिशयोक्तीचं ठरणार नाही. साधारण १९२० पासून वेगवेगळ्या चित्रकारांनी सिनेमाची पोस्टर्स आपल्या जादुई कुंचल्याने सजवली. १९९० पर्यंत ही हाताने पोस्टर्स तयार करण्याची कला अस्तित्वात होती. त्यानंतर मात्र तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळे ही कला हळूहळू नामशेष झाली.
खरं तर सिनेमा बनवणारी प्रोडक्शन हाऊसेस, दिग्दर्शक यापैकी कुणीही ही पोस्टर्स बनवणाऱ्या कलाकारांना उचित असे श्रेय दिले नाही. त्यामुळे यापैकी अनेक मास्टर पोस्टरकर्ते आज विस्मृतीच्या गर्तेत गेले आहेत. अनेक उत्तोमोत्तम पोस्टर्सवर चित्रकाराचे नावच नाहीये. पण संदर्भ साधने पुरेशी नसताना या पुस्तकात गुरुजींनी मोजक्या चित्रकारांची थोडक्यात माहिती समाविष्ट केली आहे. यामध्ये एस.एम. पंडित, रघुवीर मुळगांवकर, विश्वनाथ गोपाळ भिडे, रामकुमार शर्मा , पाम आर्ट्सचे वसंत गोविंद परचुरे, दिवाकर वासुदेव करकरे या कलावंतांची थोडक्यात माहिती त्यांच्या वैशिष्ट्यांसह दिली आहे. खरं तर या कलावंतांच्या चित्रपट पोस्टर्स निर्मितीच्या कारकिर्दीबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे सुबोध गुरुजी यांना ही माहिती मिळवताना कष्ट पडले असणार हे निश्चित.
हे कॉफी टेबल प्रकारातले पुस्तक असल्यामुळे आणि पुस्तकाचा विषयच चित्रपट पोस्टर असल्यामुळे संपूर्ण रंगीत आणि सचित्र पुस्तक आहे. पानापानावर शक्य तितक्या चित्रपटांच्या पोस्टर्सची चित्रे दिलेली आहेत. या सगळ्या पोस्टर्समधून आपल्याला चित्रपट प्रसिद्धी कलेत वेळोवेळी झालेला बदल दिसून येतो. या सचित्र पानांमध्ये १९२४ पासून १९८९ पर्यंतची पोस्टर्स समाविष्ट केली आहेत.
हे पुस्तक वाचताना एक वाचक म्हणून आपल्या एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे अनेक उत्तोमोत्तम चित्रकारांनी ही चित्रपट जाहिरात पोस्टर्सची कला विकसित केली. प्रत्येकाने छपाईच्या मर्यादा लक्षात घेऊन नुसती कलाच नाही तर तंत्रही विकसित केले. पण काळाने मात्र या कलेवर अन्याय केला. कम्प्युटरचा जमाना आल्यावर ही कला नामशेष झाली. तंत्रज्ञान मानवी कौशल्यापुढे किती भयंकर आव्हान तयार करते आहे असे आता जाणवते.
पुस्तकाला चित्रपट समीक्षक अशोक राणे यांची प्रस्तावना आहे. प्रस्तावनेच्या शेवटी त्यांनी सुबोध गुरुजी यांची एक ओळ समाविष्ट केली आहे. ती या पुस्तकाच्या निर्मितीमागचं एकूण सारंच सांगते. सुबोध गुरुजी म्हणतात,” १९२४ ते १९८९ हा ६५ वर्षे चालत असलेला रंगरेषांचा ‘महायज्ञ’ १९९० सालात निवांत झाला. अनेक कलाकारांनी आपल्या कलेच्या समिधा या यज्ञात अर्पण करून शक्य होईतो तो प्रज्वलित ठेवला होता.
त्यामुळे हे पुस्तक खरेदी करून आवर्जून वाचा. आपल्या संग्रहात जरूर ठेवा. हल्ली कॉफी टेबल बुक्स मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत एकच पुस्तक करण्याचा हा एका वेगळ्या विषयावरचा उत्तम प्रयोग आहे. उत्तम छपाई, लेआऊट आणि मुखपृष्ठाने हे पुस्तक सजले आहे. अर्थात सुबोध गुरुजी हे स्वतः कलाकार असल्यामुळे या निर्मितीसंबंधीच्या बाबी उत्कृष्ट होणारच होत्या. पण चित्रपट पोस्टर्स कलेचा एक महत्वाचा दस्तऐवज म्हणून हे पुस्तक कलाप्रेमींच्या संग्रही असणे आवश्यक आहे.
पाऊलखुणा
लेखक : सुबोध गुरुजी
प्रकाशन : अनुबंध प्रकाशन
किंमत : रु ९९९
पुस्तक मागवण्यासाठी संपर्क: +91 98509 66207
*****
– कनक वाईकर
Related
Please login to join discussion