No products in the cart.
अगम्य देशा, उत्कल देशा!
प्रतीक जाधव हा ध्येयवेडा तरुण. जेजेमधून शिक्षण पूर्ण करताच त्याने सायकलवरून भारत भ्रमण करण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात त्याला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतंय. प्रवासात येणाऱ्या अनुभवांमुळे तो कलाकार म्हणून समृद्ध होतोय. या प्रवासात प्रतीकला अनंत अडचणी आल्या, पण प्रतीक कुठेही न डगमगता हा प्रवास पूर्ण करतोय. सध्या तो ओडिसा प्रांतात आहे. ओडिसा अगम्य आणि थरारक आहे. इथे निलगिरी नियमगिरी सारख्या पवित्र डोंगर रांगा आणि त्यात वसलेले कित्येक आदिवासी आणि जैव विविधता आहे. कुठे नरबळीसारख्या अनिष्ट प्रथा अस्तित्वात होत्या, तर कुठे चक्क मुंग्यांची अंडी खाल्ली जातात. या सगळ्या अनुभवांविषयी प्रतिकने या लेखात वर्णन केलं आहे. सोबत त्याने काढलेले फोटो आणि स्केच खास चिन्ह आर्ट न्यूजच्या वाचकांसाठी.
भारत भ्रमण करता करता मी ज्या समूहात राहतो त्या समुदायाच्या चालीरीतींप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करतोय. सध्या ओडिशात राहत असल्याने तिथल्या अगम्य चालीरीतींबद्दल जाणून घेताना थक्क व्हायला होते. ओडिसा अगम्य आहे. ज्याला राष्ट्रगीतात उत्कल म्हणून संबोधले जाते ते हे राज्य. निलगिरी नियमगिरी सारख्या पवित्र डोंगर रांगा आणि त्यात वसलेले कित्येक आदिवासी आणि जैव विविधता.
रायगडा जिल्ह्यातील नियमगिरीच्या पायथ्याशी माझा मुक्काम आहे काही दिवस. इथे कोंध, डोंगरीया कोंध ह्या आदिवासी जमाती राहतात. ज्यांची भाषा ‘कुई ‘ आहे. अगदी अलीकडे म्हणजे 1961 पर्यंत यांच्यामधे दरवर्षी नरबळी देण्याची प्रथा होती. मलाही ऐकून धक्का बसला होता. दर वर्षी पिकाची उपज चांगली व्हावी , हळद पीक चांगल यावं म्हणून पृथ्वी देवतेला हा बळी दिला जायचा. ज्याचा बळी दिला जायचा त्याला टोकी म्हणत. टोकी स्त्री, पुरुष, किंवा लहान मूल कोणीही असू शकते. नियम असा की फक्त हा बळी त्याची किंमत मोजून आणलेला असावा. फुकट कुठे पकडलेला नसावा. तेव्हा बऱ्याचदा बाहेरच्या प्रदेशातून गरीब घरातील एखादे मूल किंवा व्यक्ती चांगला मोबदला देऊन इकडे आणलं जायचं.
गावाच्या एखाद्या टोकाला बळी स्तंभ असायचा जिथे त्या माणसाचा बळी दिला जायचा. आणि मग प्रत्येक जण त्याच्या मांसाचा एक एक तुकडा कापून आपापल्या शेतात नेऊन पुरायचे. मानले जायचे की त्या माणसाच्या रक्ताने शेती सुपीक होईल आणि पिक भरघोस मिळेल. असं म्हणतात की आजही काहींच्या घरात तेव्हाचे मासाचे तुकडे जपून ठेवलेले आहेत. आजही प्रत्येक गावात तो लाकडी बळी स्तंभ आपण पाहू शकतो. ब्रिटिशांनी हळूहळू ही प्रथा बंद करायचा प्रयत्न केला. आणि आता माणसाऐवजी प्राण्यांचा बळी दिला जातो.
डोंगरी कोंध नियमगिरी पर्वतावर राहतात. त्यांचे दागिने भारी खास आहेत. दागिने घालताना स्त्री पुरुष हा भेद नसतो मुळी. स्त्रिया आणि पुरुष बऱ्यापैकी सारखे दागिने घालतात. पुरुषांनी सुध्दा नाकात तीन नथन्या घातलेल्या दिसतात. चोपून विंचरलेले केस, नाजूक पिना लाऊन सजवलेले आणि गळ्यात मोठमोठ्या चांदीच्या कड्या, भडक कपडे असा त्यांचा पेहराव भारी आकर्षक वाटतो.
ब्रासचे हे दागिने डोक्रा कास्टींग पद्धतीनें बनवलेली आहेत. काही गावांमध्ये मला हे डोक्रा कास्टींग पाहायला मिळाले. सध्या कोंध समुदायाबरोबर मी राहतोय. ह्या गावात रोज म्हाताऱ्या मस्त लांबलचक सिगार पिताना दिसतात. जी त्यांनी स्वतः बनवलेली असते. सहा इंचा पर्यंत त्याची लांबी दिसते.
आदिवासींच्या लोककथा संग्रह करण्याचा प्रयत्न करतोय. भारी मजा येतेय इकडे. पूर्वग्रह बाजूला सारून ज्या लोकात जातो त्यांच्यासारखं राहण्याचा प्रयत्न करतोय. बहुतेक उद्या आम्ही जंगलात मुंग्यांची अंडी पकडायला जाणार आहोत. त्या अंड्याचे काही पदार्थ बनवून ही लोकं खातात. जे मीही खाणार आहे. पदार्थ कसा होता.. आणि अंडी पकडण्याचा अनुभव पुढच्या भागात ….
****
– प्रतीक जाधव,
कला प्रवास,
३ ऑक्टोबर २०२२
Related
Please login to join discussion