No products in the cart.
प्रवास ‘नलिनी मलानी’ यांचा !
कलासंग्राहक संगीता जिंदाल यांनी सुरु केलेल्या ‘आर्ट इंडिया’ या कलाविषयक त्रैमासिकानं अलीकडंच रौप्यमहोत्सवी वर्ष साजरं केलं. या त्रैमासिकातर्फे कलाविषयक चर्चा, गप्पा या कार्यक्रमाचं देखील आयोजन केलं जातं. गेल्याच आठवड्यात पेडर रोडवरच्या जिंदाल मॅन्शनमध्ये प्रख्यात चित्रकार नलिनी मलानी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. आर्ट इंडिया त्रैमासिकाचे संपादक अभय सरदेसाई यांनीच ती मुलाखत घेतली. त्या मुलाखतीचा हा वृत्तांत !
‘आर्ट इंडिया’ हे त्रैमासिक जिंदाल ग्रुप जवळपास गेले २५-२६ वर्ष चालवत आहे. त्यांनी नुकतंच हाँगकाँगच्या टुरिझमबरोबर टाय-अप केलं असून त्याचा तसेच चित्रकर्त्री नलिनी मलानी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जिंदाल मॅन्शन या पेडर रोडवरील इमारतीत आयोजित करण्यात आला होता.
तळमजल्यावर असलेली प्रभाकर कोलते, गणेश हलोई यांची चित्रं जिंदाल यांच्या कलाप्रेमाची साक्ष देतात. छोट्याशा पण विलक्षण नटलेल्या सभागृहात मुंबईमधील अनेक आर्ट क्रिटीक आणि चित्रकार मंडळी उपस्थित होती. मुसळधार पाऊस पडत होता. काही मंडळी उशिरा आली तरी एकूण सभागृह भरलेलं होतं. सुरुवातीलाच हाँगकाँग टुरिझमने तिथल्याच एम प्लस या प्रचंड मोठ्या एक्झिबिशन हॉलचा आणि संकुलाचा परिचय करून दिला. जगभरातल्या मोमा, टेट, ग्युगॅनहॅम अशा गॅलेर्या खूप मोठ्या इमारतीत किंवा संकुलात वसलेल्या असतात. तशीच हाँगकाँग एमआर्टची इमारत आहे आणि त्याच्या बाजूलाच अजून एक मोठं म्युझियम उभं राहिलं आहे. या सगळ्या म्युझियमचा परिचय रुक्षपणे करून न देता त्यांची खेळकर शब्दातली टूर आयोजित करण्यात आली होती.
त्या संकुलात काय काय आहे त्यांचा परिचय क्युरेटरने करून दिलाच, पण त्याची चटपट उत्तरे देण्याची स्पर्धाही घेतली. ज्यातील स्पर्धकांना पाच-पाच बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. जी अर्थात कार्यक्रमानंतर त्यांच्यापर्यंत पोचवली जातील. या ठिकाणी दोन वर्षापूर्वी नलिनी मलानी यांचं प्रदर्शन झालं होतं. कोविडमुळे त्यांना तिथे जाता आलं नव्हतं तेव्हा त्या प्रदर्शनाची तयारी कशी झाली यावर पाच मिनिटांची छोटी फिल्म दाखवण्यात आली. त्यात हाँगकाँगचे क्युरेटर म्हणाले, ‘नलिनी यांना या प्रदर्शनातल्या वस्तू कशा लावायच्या आहेत हे नेमकं जाणून घेण्यासाठी आम्ही अनेक ठिकाणी कॅमेरे लावले. कारण मलानी हजर नसल्यामुळे त्यांची जी काही व्हिजन आहे ती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ते आवश्यक होतं. काही ठिकाणी मलानी यांना अपेक्षित गोष्टी झाल्या नाहीत तरी त्यांनी त्याकडे एक वेगळा परिणाम म्हणून पाहिलं. असंही क्युरेटर यांनी सांगितलं.
चीन आणि अर्थातच हाँगकाँग इथे अत्यंत कडक सेन्सॉरशिप असते. ती किती प्रमाणात असते याचा थोडासा परिचय मलानी यांच्या स्नेह्यांनी करून दिला. ते म्हणाले की, तिथे सेन्सॉरशिप म्हणत नाही पण अगदी बारीक सारिक गोष्टी ध्यानात घेतात, लिहून काढतात. कुठल्याही क्युरेटरपेक्षा त्यांचं पाहणं तीक्ष्ण असतं, असं त्यांनी गंमतीने म्हटलं. त्याचं एक उदाहरण देताना त्यांनी म्हटलं की, नलिनी मलानी यांच्या प्रदर्शनातील गोष्टी १४ वर्षांखालील मुलांना पाहण्यासारख्या नाहीत त्यामुळे गॅलरीचा जो उघडा भाग होता जिथून कोणीही दूरवरून प्रदर्शन पाहू शकत होतं तो कापडं लावून बंद करण्यात आला.
एकूणच ‘आर्ट इंडिया’ हे ‘आर्ट न्यूज’ किंवा ‘आर्ट फोरम’ या मासिकांच्या धर्तीवर चालणारे मासिक सुरू करणे आणि दीर्घकाळ चालवणे ही जिंदाल कुटुंबियातील संगीता जिंदाल यांची कल्पना होती. आपल्या छोटेखानी भाषणात त्या म्हणाल्या की, नलिनी मलानी या खर्या अर्थाने आंतरराष्ट्रीय चित्रकार आहेत. माझ्यासारख्या कला संग्राहकाला तिचं एखादं चित्र आपल्याजवळ असावं असं वाटत होतं पण शक्य झालं नाही. कारण तिच्या चित्राला आंतरराष्ट्रीय बाजारात भरपूर मागणी असते. या पुढे त्यांची चित्रं भारतात राहावीत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
मलानी यांची मुलाखत ‘आर्ट इंडिया’चे संपादक अभय सरदेसाई यांनी सुरू केली. मुलाखतीच्या सुरुवातीलाच अभय यांनी मलानी यांची मागची प्रदर्शनं, त्यांच्या भेटी त्यातील उबदारपणा याचं वर्णन केलं. पहिलाच प्रश्न अर्थातच त्यांच्या कामाच्या वेगळेपणाबद्दल किंवा वेगळं माध्यम निवडण्याबद्दल विचारण्यात आला. याचं कारण असं १९६९ साली जेजे स्कूल ऑफ आर्टमधून पास झाल्यावर बहुतेक माणसं जशी कॅनव्हासवर किंवा कागदावर चित्र करतात तसं न करता त्यांनी थेट आज ज्याला व्हिडिओ फिल्म म्हणतात म्हणजे चित्रपट माध्यमातून आपलं काम दाखवणं पसंत केलं. त्याबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देताना त्या म्हणाल्या की, ‘मला जे काही सांगायचं होतं ते अपुरं वाटत होतं त्यामुळे मला जे सांगायचं आहे त्यासाठी वेगळी अशी भाषा शोधणं आवश्यक होतं’, असं म्हणत त्या भूतकाळात शिरल्या.
अभय सरदेसाई यांनी अकबर पदमसी यांच्या आर्ट व्हिजन प्रकल्पाबद्दल विचारलं. ज्यात त्या सक्रिय होत्या. त्यांनी सांगितलं की, अकबर पदमसी, गायतोंडे ही चित्रकलेतली मंडळी किंवा सत्यदेव दुबेंसारखा नाटकातला माणूस किंवा संगीतातली माणसं अशा सगळ्यांबरोबर भुलाभाई देसाई इन्स्टिट्यूटमध्ये काम करत असू. सगळ्यांच्या भरपूर चर्चा आणि वाद होत. गिरीश कर्नाड देखील तेव्हा तिथे आले होते. अल्काझींनी त्या काळात त्यांचं ‘तुघलक’ हे नाटक सादर केलं होतं. हे नाटक भारतीय मायथॉलॉजिचा पूर्णपणे वेगळा विचार करणारं होतं. या सगळ्यातून आम्हाला खूप काही मिळालं. त्याचबरोबर मोठ्या दिग्गज कलावंताबरोबर काम करता आलं आणि चर्चाही करता आली. दुबे आणि माझी अनेकदा भांडणं होत. तो मला त्याच्या नाटकासाठी पोस्टर बनवायला सांगायचा किंवा आणखी काही काम सांगायचा. भांडणांनंतर म्हणायचा, ‘आता मला जेवायला घाल !’.
या पद्धतीच्या खेळकर संवादानंतर सभागृहात हशा पसरला. त्यामुळे वातावरण मोकळं झालं. यानंतर अभय सरदेसाई यांनी त्यांना त्यांच्या आजवरच्या कामाबद्दल बोलतं केलं. विशेषत: स्त्रीवाद किंवा पुरुषसत्ताक प्रवृत्तीला त्यांनी केलेला विरोध या सगळ्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारले आणि नलिनी मलानी यांनीही मोकळेपणानं उत्तरं दिली. त्यांची पूर्वीची जी कामं होती त्यांच्या अनुषंगानं अनेक प्रश्न होते. उदा., ऍलिस इन वंडरलँडसारख्या पुस्तकाचा त्यांनी केलेला वापर, सिलेंड्रिकल चित्रे. १९६९ नंतर त्यांना पॅरिसला शिष्यवृत्ती मिळाली त्याबद्दलही त्या बोलल्या. मी दोन वर्षासाठी पॅरिसमध्ये राहणार होते पण मी तिथे गेले तेव्हा तिथलं आर्ट स्कूल बंद होतं. मग मी चित्रकार रझांना भेटले आणि त्यांनी मला हेटर यांचा परिचय करून दिला. त्यांच्या स्टुडियोत मी ग्राफिक शिकले, चित्रांच्या प्रती काढणं वगैरे.
भारतात आल्यावर त्यांनी टिपिकल कॅनव्हास आणि कागदांवर चित्रे केलीच पण वेगवेगळी इन्स्टोलेशन्स देखील केली. वेगवेगळ्या माध्यमातून काम केलं. त्याबद्दल विचारताना अभय सरदेसाई यांनी, १९९३ सालानंतर त्यांनी दंगलीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कामाची आठवण करून दिली. तेव्हा त्या म्हणाल्या की, कुमारस्वामी हॉल जो राजा शिवाजी वस्तूसंग्रहालयात आहे तिथं त्यांनी प्रदर्शन केलं. मंटो यांच्या तोबा टेक सिंग या कथेवर आधारित इन्स्टोलेशन केलं होतं. त्यात व्हिडिओ, लाकडी पेट्या आणि इतर अनेक गोष्टींचा वापर होता.
९६ साली जेव्हा त्यांनी प्रदर्शन केलं तेव्हा तरुण मुलं इन्स्टॉलेशन करत होती. विवान सुंदरमसारखे काही जण सोडता तिच्या पिढीच्या चित्रकारांनी इन्स्टॉलेशनला हात घातला नव्हता. त्यानंतर त्यांनी मॅक्समुलर भवनला ५० वर्ष झाली म्हणून जे इन्स्टोलेशन केलं त्याचा अनुभव सांगितला.
समकालीन चित्रकारांबद्दल, मायथोलॉजीच्या अभ्यासाबद्दल. त्या म्हणाल्या की, बाळ छाबडांपासून ते अरुण कोलटकरांपर्यंत अनेक मंडळी भुलाभाई देसाई इन्स्टिट्यूटशी जोडलेली होती. सभागृहात शरयू दोशी उपस्थित होत्या. त्यांच्याकडे बोट दाखवून त्या म्हणाल्या, शरयूचा नवरा विनोद दोशी यांनी आम्हाला ती जागा उपलब्ध करून दिली. दुर्दैवानं त्याचे सगळे ट्रस्टी मरण पावले आणि शेवटच्या ट्रस्टीनं ती जागा विकली आणि तिथे भलीमोठी गगनचुंबी आकाशगंगासारखी इमारत उभी राहिली. पण विनोद दोशींनी नंतरही भरपूर मदत केली, असं त्या म्हणाल्या.
याप्रकारे जवळपास चाळीसएक वर्षातील त्यांच्या कारकीर्दीचा धावता आढावा या मुलाखतीत घेण्यात आला. समीक्षक अभिजीत ताम्हाणे यांनी मलानी यांच्या जुन्या इंस्टॉलेशनबद्दल प्रश्न विचारले. ज्या काळात इतर लोकं पारंपरिक काम करत होते त्या काळात तुम्ही इंस्टॉलेशन्स केलीत तेव्हा समकालीन चित्रकारांचा आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळाला यावर बोलताना त्या म्हणाल्या की, ‘चित्रपट हे एक असं माध्यम आहे की त्याला नेहमीच प्रतिसाद मिळतो. आठ मिलीमीटरच्या फिल्मवर त्यांनी सुरूवातीला चित्रं केली. ज्यांच्या निगेटिव आणि पॉझिटिव बनवायला देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. तिथपासून ते व्हिडिओच्या साहाय्यानं इन्स्टॉलेशन्स इथपर्यंत त्यांच्या कामात फरक कसा पडत गेला इथपर्यंत निरनिराळ्या विषयांवर त्या बोलल्या. उदा., गुजरातमध्ये कोळी समुदायाबरोबर काम केलं किंवा पारंपरिक कलाकारांबरोबर काम केलं, त्यांचा अनुभव आणि भारतीय संगीताबद्दलचा अनुभव, इंस्टॉलेशन्स करताना येणारे अनुभव याबाबत त्या भरभरून बोलल्या. जवळपास पाऊण-एक तासच मुलाखत चालली. पण नंतरच्या अनौपचारिक गप्पा अधिकच रंगल्या होत्या. साहजिकच अनेकांचा पाय निघत नव्हता.
Related
Please login to join discussion