No products in the cart.
वारलीची कर्नाटकी बहीण ‘ चित्तारा’ !
प्रतीक जाधव कोकणातून निघाला, गोव्यात गेला आणि आता कर्नाटकात शिरलाय. त्याला आम्ही नियमितपणं लिहायला सांगितलं खरं, पण आमचंच शेड्युल थोडंसं उलटं पालटं झालं. असंख्य अडचणी आल्यामुळं त्यानं पाठवलेला पहिला लेख आम्ही उशिरा प्रकाशित केला. खरं तर गोव्याचं प्रवासवर्णन यात यायला हवं होतं, पण ठीक आहे, हळूहळू सारं सुरळीत होत जाईल. आजच्या दुसऱ्या भागात त्यानं कर्नाटकमधल्या चित्तारा कलेविषयी लिहिलं आहे. ते वाचायला तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री आहे.
कोकण, गोवा आणि मग कारवारपासून आता कर्नाटकात आलोय. कलाप्रवासाचं हे दुसरं पर्व सुरू होऊन महिना उलटलाय.
समुद्राचे खारे वारे झेलत आणि आयुष्यात कधी नाही पाहिले तेवढे समुद्रावरील सूर्यास्त पाहत आलोय. किनाऱ्यावरील वाळूत तासनतास बसून मावळतीच्या रंगांना अनुभवत आहे. कोकणापासून इथं कर्नाटकात येईपर्यंत होत गेलेले भाषेतील, जेवणातील, वेशभूषेतील, भौगोलिक असे अनेक बदल गमतीशीर आहेत. सावंतवाडी जवळची भाषा मालवणी कोकणी मिश्रित तर कारवारची कोकणी कन्नड मिश्रित भाषा. प्रत्येक सीमेवर असणाऱ्या या मिश्रित भाषा मला रंगाच्या ग्रेडेशनसारख्या वाटतात. एक एक छटा हळुवार बदलताना दिसते. कुठेही एकदम तीव्र बदल नाही. सगळं कसं अलगद बदलत जातंय.
कर्नाटकात आल्यानंतर आता मराठी आणि हिंदी भाषा उरली नाही. फक्त कन्नड भाषिक लोकं भेटत आहेत. भाषेची चांगलीच गोची झाली आहे. आणि कोणाला हिंदीत काही विचारलं तर लोकं सरळ दुर्लक्ष करतात (ठराविक लोक). होन्नावर इथं आलोय आणि काल काही लोक एकमेकात बोलत होते. मी त्यांना हिंदीमध्ये रस्ता विचारत होतो. अक्षरशः त्यांनी मला भूत घोषित केलं हो ! म्हणजे मी काहीतरी विचारतोय आणि यांच्यापैकी एकानेही उत्तर देणं तर सोडाच, पण माझ्याकडे एक कटाक्ष सुध्दा टाकला नाही. जणू सगळं काही पूर्वनियोजित होतं. एवढं दुर्लक्षित करण्याची ही भन्नाट कला कशी जमते लोकांना काय माहित !
इथं आल्यावर मला कळलं की इथं चित्तारा चित्रकलेचा प्रकार एका गावात आहे. मी तिथं जायचं ठरवलं.
‘हसुवंथे’ हे त्या गावाचं नाव. होंनावर पासून ‘तलगुप्पा’ गाव आणि पुढे हसुवंथे. जवळपास 70-80 किमीचा प्रवास. शरावती नदीच्या खोऱ्यातील हा सगळा रस्ता आहे. प्रचंड तीव्र चढ-उताराचा रस्ता. आणि वाटेत जे जंगल आहे, तेवढं घनदाट जंगल मी कधीच पाहिलं नव्हतं. ऊन जमिनीवर येतच नाही येवढं घनदाट. त्यात नाना पक्षी, प्राणी, अनेक झरे आणि मोठा जोग धबधबा पार करत मी अखेर त्या हसुवांथे गावात आलो.
कशी तरी माहिती मिळाली की ईश्वर नाईक म्हणून एक गृहस्थ आहेत या गावात, ते चित्रे काढतात. त्यांच्या घराचा शोध घेत गेलो. सुपारीची झाडं, नारळ यांनी वेढलेलं ते एक घर होतं. काहीच पूर्वसूचना न देता मी जाणार होतो. त्यामुळं हे गृहस्थ घरी नसतील तर माझा इथं येण्यात काहीच अर्थ नव्हता. पण घरासमोर येताच समोर एका व्यक्तीनं स्वागत केलं ते म्हणजे स्वतः ईश्वर नाईक हेच. माझा जीवात जीव आला.
माझा परिचय मी करून दिला आणि माझं येण्याचं कारणही सांगितलं. हा माणूस एवढ्या आतमध्ये जिथे लोकं हिंदी देखील बोलत नाहीत. अशा गावात अस्खलित इंग्रजी बोलत होता. मला कमाल वाटली. पण नंतर लक्षात आलं की या चित्रकौशल्यामुळे त्यांना देश-परदेशात जाण्याच्या संधी मिळाल्या होत्या. त्यामुळं मला एक धीर वाटला की किमान आमचा संवाद इथं चांगला होऊ शकतो आणि चांगली माहिती जमा होऊ शकते.
चित्तारा हा खरं तर महाराष्ट्रातील वारलीच्या जवळ जाणारा चित्रप्रकार. त्याचा हेतू सुध्दा बराच सारखा. लग्नकार्यात चौक म्हणून रंगवणे, घराची सजावट करणे इत्यादी. पण वेगळेपण असं आहे की एक तर या चित्रात ब्रश म्हणून अंबाड्याचे बोटभर लांबीचे काही धागे एकत्र धरतात. मधेच त्याला गाठ मारतात जेणेकरून चांगली पकड मिळेल आणि तो धागा रंगात बुडवून रेषा काढतात. आता ह्या पध्दतीमध्ये रंगवताना सरळ रेषा मारणे सहज जमते. तेवढे लयदार रेषा किंवा वर्तुळाकार रेष मारणे सहज नाही होत. त्यामुळे चित्रात सरळ रेषा भरपूर दिसतात.
थोड्याफार फरकानं माणसं वारली सारखीच आहेत, पण या चित्रांमध्ये माणसं जास्त दाखवत नाहीत.
रंग वारलीपेक्षा जास्त असतात. एकूण चार रंग वापरले जातात. मातीपासून लाल, तांदळापासून पांढरा आणि तेच तांदूळ तेलात करपवून काळा. आणि एका फळाच्या सालीपासून पिवळा असे एकूण चार रंग. चित्रात पक्षी, निसर्ग, घर, इथला पारंपारिक रथ असे माणूस आणि निसर्ग यांचे नाते सांगणारे विषय असतात.
डहाणूपासून एवढ्या लांब आणि तितकाच जुना कलाप्रकार इकडे असणं हाही एक वेगळाच कुतूहलाचा प्रश्न आहे. पण ही चित्रकला या भागात नामशेष झालीच आहे. फक्त ईश्वर नाईक यांनी त्यांच्या आजीच्या, आईच्या मदतीनं आणि आसपासच्या गावातील म्हाताऱ्या बायांना विचारपूस करत हा प्रकार पुन्हा जिवंत केला आहे. पूर्वी फक्त महिलाच ही चित्रे काढायच्या. पण ईश्वर यांनी स्वतः सुरुवात करून आता त्यांच्या मुलींना आणि गावातील महिलांना सुध्दा शिकवायला सुरुवात केली आहे. या कामासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार सुध्दा मिळाला आहे. भारतात अनेक कानाकोपऱ्यात, जंगल, वाडीत असे अनेक लोकं आहेत ज्यांनी आपला हा अमूल्य वारसा टिकवून ठेवला आहे. ही लोकच आपला वारसा आहेत. त्यांच्यापर्यंत आपण ही पोहोचणं तितकंच महत्वाचं आहे.
मातीच्या भिंती सारवून ही चित्रं काढली जातात पण आता सिमेंटची घरं आली आणि ही चित्रं नाहीशी होत गेली. काही दशकांनंतर हे कदाचित काही नसेलही. पण आपल्याकडे काय होतं हे सांगायला तरी काही असावं म्हणून अशा ठिकाणी जाऊन ते पाहणं, जतन करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे.
निघताना मस्त केळीच्या पानावर त्यांनी जेवू घातलं. भात आणि त्यावर चिंचेच्या पाण्याची एक आमटी होती. कैरीची वाटलेली चटणी आणि बीटची सुकी भाजी. उन्हाळ्याच्या दिवसात हे असं जेवण… पोट तर भरतच पण उन्हाचा चटका पण कमी करतं.
इथून पुढं आता मंगळूरकडे रवाना होणार आहे. पुढचे अनुभव सुद्धा लिहीत राहीनच. माझे व्हिडिओ सुध्दा तुम्ही ‘kala pravaas‘ या यु ट्यूब चॅनल वर पाहू शकता.
प्रतिक जाधव
कला प्रवास
कर्नाटक
१२ एप्रिल २०२२.
Related
Please login to join discussion