No products in the cart.
कलेचा महाप्रवासी : भाग २
कलेचा महाप्रवासी या लेखाच्या पहिल्या भागात आपण जामिनी राय यांचा वास्तववादी चित्रणाचा प्रवास बघितला. पण वास्तववादी चित्रण करताना त्यांना कुठेतरी भारतीय मुळांकडे परावेसे वाटत होते. जामिनी यांना स्वतःची अशी शैली विकसित करायची होती जी साधी असेल, पूर्वगामी असेल आणि ज्यातून भारतीयतेचे दर्शन होईल. या नव्या शैलीवर काम करत असताना जामिनी राय यांच्या असेही लक्षात आले की राजपूत, मोगल किंवा अजिंठा शैलीचा प्रयोग बंगाली चित्रकलेसाठी योग्य ठरणार नाही. मग विचाराअंती त्यांनी बंगाली पट चित्रशैलीचा अभ्यास सुरु केला. आणि त्यांची स्वतःची अशी नवी शैली विकसित केली. पल्लवी पंडित लिखित ‘कलेचा महाप्रवासी’ या दीर्घ लेखातील या दुसऱ्या भागात आपण त्यांच्या नव्या शैलीच्या विकासामागचे विचार जाणून घेऊया.
ज्याप्रमाणे एक थकलेला प्रौढ बालकाच्या निरागस साधेपणाकडे आकर्षित होतो त्याप्रमाणे जामिनींचे लक्ष्य जगाच्या क्लिष्टतेकडून साधेपणाकडे प्रयाण करण्याचे होते. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या मुलांच्या व मित्र विष्णू डे यांच्या मुलींद्वारा साकारलेल्या चित्रांचे लक्षपूर्वक अध्ययन केले. हा साधेपणाचा शोध त्यांना प्रागैतिहासिक काळातील कलेपर्यंत घेऊन आला. त्यांच्या मते ही कला सच्ची आणि नि:स्वार्थ अशी संवादाची परिभाषा असून त्यात अनुकरणाशिवाय मूलभूत रूपबंधाला व्यक्त करण्याचे सामर्थ्य होते. थोडक्यात या बंगाली रूपवादी चित्रकाराच्या मते खरी कला निसर्गाचे अनुकरण करण्यात नसून सच्चेपणाने आणि अवडंबराशिवाय मूलभूत रूप (फॉर्म )निर्माण करण्यात असते. हाच शोध त्यांना बंगालच्या खेड्यांमध्ये घेऊन गेला. 1920 च्या दशकाच्या मध्यात बंगाल मधील लोककलेतील चित्रण पद्धती – ‘पट’ यांचा त्यांनी संग्रह करण्यास व पट निर्मितीची शैली स्थानिक चित्रकारांकडून शिकून आत्मसात करण्यास सुरुवात केली. येथूनच त्यांच्या कलेला एक वेगळे वळण मिळाले.

जामिनी यांच्या पटचित्र शैली शिकण्याची परिणती म्हणजे समृद्ध, इंद्रिय सुखद आणि लयबद्ध अशा शैलीची, ज्याला काही कला समीक्षक ‘मॉडर्न प्रिमिटिविझम’ संबोधित,तिचा उदय झाला! येथे ‘प्रिमिटिविझम’ या शब्दाचा अर्थ जामिनी यांच्या रूढ प्रवाहानुसार चित्रनिर्मिती ते लोककला पद्धतीच्या चित्रणाच्या प्रवासाला उद्देशून म्हटले आहे हे लक्षात घेतले तरी प्रसिद्ध बंगाली कवी, शिक्षणतज्ज्ञ, कला समीक्षक विष्णू डे आणि समीक्षक जॉन इरविन (John Irwin) यांनी कुठल्याही तत्कालीन युरोपीयन चित्रकाराचा अल्तामीराच्या गुहांच्या दिशेने होणारा प्रवास आणि जामिनी राय यांचा लोककलेकडील प्रवास यातील सूक्ष्म भेद लक्षात आणून दिला आहे. या संदर्भात स्पष्टीकरण देताना ते म्हणतात :
“लक्षात घेण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या शैलीला जामिनी सामोरे गेले ते कुणी परकीय व्यक्ती म्हणून नव्हे तर त्यांना या कलेची पाळंमुळं जेथे खोलवर रुजली होती त्या लोकसंस्कृतीच्या जीवन पद्धतीचे ज्ञान व जाणीवही होती.जामिनी यांना पॉल गोगॅची (Paul Gauguin) समतोलता (Equivalence) आणि प्रतिकात्मकता (Symbolism) ही तत्त्वे ग्रहणही करावयाची नव्हती आणि हेन्री मातीस (Henry Matisse) या फ्रेंच चित्रकाराचे ‘इंटिग्रल व्हिजन’ हे तत्त्व त्यांना आत्मसात करण्याचीही आवश्यकता नव्हती.”
जामिनी यांचा प्रवास त्यांना मिळालेल्या एकजिनसी आणि व्यापक अशा संस्कृतीकडे नेणारा होता ज्यातील मिथके, पुराकथा, मूलभूत रूपबंध, प्राथमिक रंग हे वारसाहक्काने जन्मसिद्ध अधिकार म्हणून त्यांना प्राप्त झाले होते.असे असले तरी हा मार्ग जामिनी यांच्यासाठी खडतरच होता. कारण जामिनी यांचे उद्दिष्ट केवळ वरकरणी दिसणाऱ्या चित्रांचे अनुकरण करणे, चित्रात सपाट लेपन करणे करणे किंवा लोककलेचे पुनरूज्जीवन करणे हे नसून क्षतिग्रस्त झालेल्या ग्रामीण परंपरेतील तत्त्वांच्या सहाय्याने नवीन आधुनिक कला निर्माण करणे हे होते.
भारतातील सामंती व्यवस्थेचे अपयश शिवाय आधुनिकीकरणाच्या मार्गातील नैसर्गिक व मानव निर्मित अडथळ्यांमुळे संक्रमणासाठी सहाजिकच अतिशय कठीण असा हा कालखंड होता. एका बाजूला आत्मभान असलेले कलाकार एकीकडे पारंपरिक जादुटोणा यासारख्या गोष्टींवर कायम होते तर दुसरीकडे त्यांना शास्त्रीय ज्ञानाचा लाभही हवा होता. अशा समाजव्यवस्थेत जगताना विविध पातळ्यांवर होणाऱ्या संघर्षामुळे भूक, हिंसा, दडपशाही, दुःख-वेदना आणि मानसिक अस्वास्थ्य यांचे चित्रण म्हणजे जणू एक वीरोचित संघर्ष समजल्या गेला होता.तत्कालीन परिस्थितीचे अप्रत्यक्ष, मार्मिक आणि थेट मुळाशी जोडलेले चित्रण शास्त्र आणि साहित्य यांच्या तुलनेत अतिशय प्रभावीरीत्या दृक् माध्यमात साकारले जात होते. अशा पार्श्वभूमीवर जामिनी राय सहजतेच्या जोरावर ग्रामीण परंपरेच्या मौलिक अशा प्रेरणा स्त्रोताकडे वळले. या वेगळेपणामुळे त्यांच्याकडे निश्चितच आदराने बघितले जाते.
उत्कृष्टतेची मुळं ही मूलतः आपल्या परंपरेत दडलेली असून ती आपल्या वातावरणाला प्रभावीत करतात आणि कलाकार त्याला आपल्या माध्यमात प्रकट करतात, हे सत्य शोधण्याचे श्रेय जामिनी यांना जाते. मध्यमवर्गीय अनुभवांच्या विविध बंधांच्या घट्ट विणीतून परखून आपले उद्दिष्ट ठरविण्यासाठी त्यांनी आपले लक्ष तत्कालीन भारतीय व्यवस्थेकडे वळविले यामुळे इतरांपेक्षा जामिनी वेगळे आणि महत्त्वाचे ठरतात. असे निरीक्षण जामिनी यांच्या कलेबद्दल मुल्कराज आनंद नोंदवितात.
बंगाली लोककलेची वैशिष्ट्ये समजून घेताना या जुन्या लोक-संस्कृतीत दोन प्रमुख प्रवाहांचा संगम झालेला दिसतो. मूलतः नवाश्म युगातील रहिवासी असलेल्या मानवतावादी द्रविडीयन आणि बाहेरून आलेल्या आर्य लोकांच्या अमूर्त काव्यात्मकतेच्या संयोगाने ही संस्कृती जन्माला आली. परकीयांनी येथील स्थानिक दंतकथा, जादूटोणा, भूतंखेतं, सर्प देवता, ग्राम देवता, जल देवता इ. संकल्पना आपल्यात सामावून घेतल्या. मात्र लोक संस्कृती बहरली ती अभिजात राजेशाहीच्या अस्तानंतरच आणि बुद्धाच्या मानवतावादी बंडानंतर लोक संस्कृतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. केंद्रसत्ताक पद्धतीचा अस्त आणि वैदिक धर्मात अंतर्गत कलहामुळे निर्माण झालेले अडथळे यामुळे खेड्यातील गणतंत्र व्यवस्थेत गतिशील आंतरधारांना विशेष चालना मिळाली आणि अशाप्रकारे हिंदुत्वाचे तीन मध्ययुगीन प्रवाह उदयाला आले.उत्तर भारतात वरदायी विष्णूची पूजा होऊ लागली, दक्षिण भारतात निर्माणकर्त्या, पालन कर्त्या आणि संहारकर्त्या अशा शिव पूजेला सुरुवात झाली तर पूर्व भारतात मातृ देवता म्हणून शक्तीचे पूजन केले जाऊ लागले. धर्माच्या या शेवटच्या पंथामध्ये विचित्र अशा योगिक आचरणाच्या क्रियांचा मुख्य स्त्रोत मुख्यत्वे लोह युगातील विध्वंसक तत्त्वज्ञानात असून धार्मिक कर्मकांडाच्या मानसिकतेचा अंतर्भाव हे सतत बंगाल लोककलेचे मुख्य स्त्रोत राहिले. हर्ष उन्मादाने नाचणे, संगीतातील आणि गाण्यातील ताल, नदीची पूजा,नागांची पूजा असे मातृदेवतेच्या संप्रदायात आढळणारे वैविध्य यातून आपल्याला लोक संस्कृतीतील कल्पनाशक्तीने सनातनी विचारांवर मिळवलेला विजयच दिसून येतो. ज्या बांकुडा जिल्ह्यात जामिनी राय यांचा जन्म झाला तेथे बंगालच्या इतर भागापेक्षा विद्रोह आणि सामंजस्य यांची प्रक्रिया अधिक प्रभावी होती.आधुनिकतेच्या काळातही बेलियातोड या गावाने आपली मध्ययुगीन अर्थव्यवस्था जपली होती. सांप्रदायिक कर्मकांडांच्या आधारे तेथील गटांनी आपले आयुष्य बाहेरच्या जगतापासून संरक्षित ठेवले होते.अशा परिस्थितीचे वर्णन करताना एस्चिलस (Aeschylus इ.स.पूर्व 523-इ.स.पूर्व 456) या प्राचीन ग्रीक नाटककाराने वापरलेली उक्ती तंतोतंत लागू पडते. ती अशी :
“निद्रितावस्थेत आत्मचक्षू तेजाने चमकतात तर जागेपणी त्यावर गडद छाया पसरते.”(“The eye of the soul is bright in sleeping and dark in waking.”)
निश्चितच या खेड्यातील कलाकार आत्मभान जागृत असलेले चित्रकार नव्हते. त्यांचे कार्य लोक कल्पनेवर आधारित चित्र निर्मिती करणे आणि समाजातील लोकांच्या आवडीनुसार परंपरागत चालत आलेली रूपे (फॉर्म), प्राथमिक रंग आणि रचना यांचा उपयोग करून दैनंदिन जीवनातील आवश्यक अशा वस्तू जसे मडकी, भांडी,खेळणी, रंगविलेले कापड, पोथ्या, धार्मिक चित्रण इ.निर्माण करणे हे होते.
जामिनी राय यांना लहानपणापासूनच अशा कुशल कारागिरांचा सहवास लाभला होता. त्यांच्यातील सामाजिक स्तर आणि दर्जा यात तफावत असून देखील जामिनी यांना या लोकांबद्दल वाटणाऱ्या स्वाभाविक प्रेमातूनच त्यांचे आकार आणि रचनापद्धती यांचे अनुकरण करणे त्यांनी लहान वयातच सुरू केले होते. त्यामुळे जेव्हा जामिनी युरोपीयन पद्धतीला सोडून लोक परंपरेकडे परतले तेव्हा सणासुदीला एकत्र जमून भक्तिभावाने केलेल्या पटचित्राच्या निर्मिती मागची प्रेरणा आणि भक्ती संप्रदायातील दंत कथा यांचे मर्म, गाभा ओळखणे जामिनी यांना कठीण गेले नाही.जामिनी यांना पूर्ण खात्री होती की बंगाली कलेचे पुनरुत्थान अजिंठा, राजपूत आणि मोगल शैलीने होणे शक्य नाही. कारण, त्यांच्या मते एखादी व्यक्ती परकीय भाषा तर शिकू शकते परंतु त्या भाषेचे वैचारिक मर्म जाणणे तिच्यासाठी कठीण असते.
त्या वेळच्या भारतातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जामिनी यांचे लोककलेकडे परतणे म्हणजे जणू बंडखोरीची कृती होती. त्यांनी केवळ स्थानिक शिल्पींच्या मनोदशेचे चित्रण केले नाही तर जागृतपणे भारतीय चित्रकलेचे वैशिष्ट्य मानल्या गेलेल्या रेषेला पुन्हा तिची ओळख, आदराचे स्थान प्राप्त करून दिले. त्यांच्यामुळेच रेषेतील लय, ताल प्राप्त करण्याच्या शतकभराच्या प्रयत्नांना यश मिळाले होते. लोक परंपरेतूनच जामिनी यांनी संघटन, तोल, प्रमाण ही तत्त्वे आत्मसात केली आणि या तत्त्वांचा उपयोग त्यांनी आकृतीची मूलभूत वैशिष्ट्ये निखरण्यासाठी केला. या प्रक्रियेत निश्चितच जामिनी यांना त्यांचे युरोपीयन पद्धतीचे शिक्षण कामी आले. जसे सरळ रेषेकडून लयपूर्ण रेषेकडे त्यांचा होणारा प्रवास यावर तत्कालीन फ्रेंच चित्रकारांचा प्रभाव तर होताच शिवाय चित्राच्या पोतावर प्रकाशामुळे पडणारा प्रभाव व त्या अनुषंगाने त्यांनी केलेले विविध प्रयोग याची प्रेरणा त्यांना युरोपीयन चित्रकारांकडून मिळाली. मात्र या संपूर्ण प्रक्रियेतून त्यांनी जे साकारले ते भारतीय परंपरेच्या अगदी जवळचे होते आणि त्यातूनच त्यांनी आपली स्वतःची नवी शैली निर्माण केली. येथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे पटुआ कलेचे संवर्धन परंपरागत मिथक आणि विश्वास या गोष्टींवर आधारित होते. या चित्रात साकारलेले पक्षी, प्राणी, झाड यांचा भूतलावरील पक्षी, प्राणी, झाड या गोष्टींशी प्रत्यक्ष संबंध नसून ही कला वैश्विक सारतत्त्वाच्या पायावर आधारलेली कला आहे.जामिनी यांच्या कलाकृतीत या सारतत्त्वाखेरीज कलाक्षेत्रात महत्त्वपूर्ण मानल्या गेलेल्या ‘ मनोवस्था ‘ या तत्त्वाचा सुंदर संयोग झालेला आढळून येतो.
(सर्व चित्रे NGMAच्या वेबसाइटवरून साभार.)
****
या लेखाचा पहिला भाग खालील लिंकवर क्लिक करून वाचा.
कलेचा महाप्रवासी : भाग १
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion