Features

जामिनी राय : कलेचा महाप्रवासी (भाग ५)

जामिनी राय : कलेचा महाप्रवासी या दीर्घ लेखाच्या अंतिम भागात जामिनी राय यांना चित्रकार विविध स्तरावर मिळालेल्या मान्यतेबद्दल जाणून घेऊया.  एक यशस्वी कलाकारावर जितकी स्तुतीसुमने उधळली जातात, तेवढीच टीकाही होते. यामुळे जामिनी राय लोकांपासून दूर राहून आपली कला निर्मिती करत राहिले. या काळात चित्रकार म्हणून जामिनी यांचा प्रवास आता काजळीच्या काळ्या रंगांचा वापर कुंचल्याने करून अधिक शुद्ध रेषा आणि मूर्त रूपाच्या शोधाकडे सुरू झाला होता. समाजातही विशेषतः आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना आधुनिक चित्रकार म्हणून मान्यता मिळाली. अनेक युरोपिअन, अमेरिकन कला चाहते जामिनी राय यांच्या चित्रांचा संग्रह करू लागले. जामिनी हे सतत प्रयोगशील राहिले आणि स्वतःला घडवत गेले. कालातीतता हा महत्त्वपूर्ण गुणधर्म आपल्याला जामिनी यांच्या कलाकृतीत आढळून येतो. ज्या वेळी अधिकाधिक भारतीय चित्रकार परकीय कलाशैलींकडे आकर्षित होत होते, त्याच वेळी जामिनी यांनी लक्षणीयरित्या आणि कौशल्याने लोककलेचा आधार घेत आपली विशिष्ट अशी भारतीयत्वाचा साज धारण केलेली कला शैली विकसित केली. त्यामुळे जामिनी यांचे कलाक्षेत्रातील स्थान निश्चितच अबाधित आहे.

1920च्या दशकात इतर तत्कालीन चित्रकारांप्रमाणे जामिनी यांनी चित्रकारीला सुरुवात केली होती मात्र 1930 च्या दकात जामिनी एक प्रसिद्ध असामी झाले होते.  ‘इंडियन सोसायटी ऑफ आर्ट’नी देखील त्यांची विशेष प्रशंसा केली होती.1928 मध्ये कलकत्ता शासकीय कला विद्यालयात जेव्हा मुकुल डे प्राचार्य म्हणून रूजू झाले तेव्हा त्यांनी अकॅडमिक  शैलीत काम करणाऱ्या सर्व चित्रकारांना तेथून काढून टाकले. मात्र ते राय यांचे प्रशंसक होते आणि त्यांनी या धडपडणाऱ्या चित्रकाराला चित्रकलेचे सामान आणि काम करण्यासाठी कला विद्यालयातील एक मोठी खोली उपलब्ध करून दिली होती. त्यांनीच 1929 मध्ये कला विद्यालयात जामिनी यांचे महत्त्वाचे असे पहिले प्रदर्शनही आयोजित केले होते.  हे प्रदर्शन जेव्हा संपले तेव्हा जामिनी रंग आणि कागद घेऊन जमिनीवर बसले होते. मुकुल डे बाहेरून आत आले आणि जामिनींच्या चित्र विक्रीतून आलेल्या पैशांची उधळण त्यांनी जामिनींवर केली. 

तत्कालिन कलाकार नंदलाल यांचे जामिनींशी मतभेद असले तरी जामिनींप्रती  नंदलाल यांना आदरच होता. 1936 च्या लखनौ काँग्रेसच्या सौंदर्यीकरणाचे काम जामिनींना नंदलाल बोस यांच्यामुळेच मिळाले होते. या प्रदर्शनात जामिनी यांची पटचित्रांवर आधारित चित्रे नंदलाल बोस यांच्या बरोबरीने प्रदर्शित करण्यात आली होती. 1935 मध्ये के.सी. दास या कोलकत्यातील प्रसिद्ध मिष्ठान्न गृहाच्या मालकाने जामिनी यांना रामायणावर आधारित प्रत्येकी 91 x 396 से.मी. अशा भव्य आकाराची सतरा चित्रांची मालिका तयार करण्यासाठी कमिशन दिले होते. हे काम इ.स.1940 मध्ये पूर्ण झाले. जामिनी यांच्या चाहता वर्गात युरोपीयन लोकही अनेक होते ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. या संदर्भात मुंबई स्थित ऑस्ट्रियन कला समीक्षक रूडी वॉन लेडन (Rudy von Leyden )आपले निरीक्षण नोंदवतात ते असे :“कोलकत्यातील संध्याकाळच्या टिमटिमत्या दिव्यांच्या प्रकाशात अनेक ब्रिटीश किंवा अमेरिकन अधिकाऱ्यांचे पाय जामिनी यांच्या घराकडे वळत. खाकी पोशाखातील व्यक्ती खानावळी किंवा क्लबमध्ये जामिनी यांच्या गुणवत्तेची चर्चा करताना आढळून येत.” 

या अधिकाऱ्यांपैकी एकाने जामिनी यांनी साध्य केलेल्या सरलीकरणामुळे कला, रंग आणि रचना यांचा आस्वाद घेणे सहज शक्य झाले असल्याचे नमूद करत त्यांचे रेडिओवरून  विशेष आभार मानले होते. परदेशी मान्यवर व्यक्ती जसे ब्रिटीश जैवशास्त्रज्ञ जे.बी.एस. हाल्डेन (J.B.S.Haldane), कादंबरीकार इ.एम. फॉस्टर (E.M.Foster), सोव्हीएतचे चित्रपट निर्माता सेवोलोड पुडोवकीन (Vsevolod Pudovkin) हे नेहमी त्यांच्या गाठीभेटी घेत असत. भारतात धर्मगुरू म्हणून कार्यरत असलेल्या श्रीयुत मिलफोर्ड (Mr.Milford) यांच्या पत्नी मेरी मिलफोर्ड (Mary Milford) यांनी 1944 मध्ये ‘होरायझन’ या लंडनमधील मासिकात लिहिलेल्या ‘ए मॉडर्न प्रिमिटिव्ह’ या निबंधासोबत जामिनींद्वारा साकारलेले पेनमधील व्यक्तिचित्रण प्रसिद्ध करून इंग्लंडमधील आधुनिक ज्ञानवाद्यांना जामिनींची ओळख करून दिली. बंगालचे गव्हर्नर असलेल्या  रिचर्ड कॅसी (Richard Casey) यांची पत्नी माई कॅसी (Maie Casey) या देखील जामिनी यांच्या कलेच्या विशेष चाहत्या होत्या.

या काळात जामिनींना अचानक मिळालेली प्रसिद्धी आणि प्रशंसा यामुळे त्यांचे मन इतरांच्या प्रति काहीसे साशंक असे. त्यामुळे जमावापासून ते दूर राहत. शिवाय छोट्या-छोट्या गैरसमजुतींमुळे त्यांचे मित्रही त्यांना दुरावले होते.

चित्रकार म्हणून जामिनी यांचा प्रवास आता काजळीच्या काळ्या रंगांचा वापर कुंचल्याने करून अधिक शुद्ध रेषा आणि मूर्त रूपाच्या शोधाकडे सुरू झाला होता. फलक चित्रांचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म या चित्रांमध्ये जामीन यांनी अतिशय बारकाव्यांनिशी उतरवलेले आपल्याला दिसतात. काजळीच्या काळ्या रंगातून साकारलेले आकार शांत मनाची निर्मळता आणि रेषेतील कमी लयदार तत्त्व आणि कमीत कमी घुमावदार फटकारे या अपरिहार्यतांची जाणीव करून देतात. ब्रशद्वारे साकारलेली ही रेखाचित्रे खूप विशेष नसली तरी त्यांच्या ख्रिस्ताच्या जीवनाशी संबंधित अभ्यासाच्या वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतात.

येथे एक प्रश्न आवर्जून विचारला जातो तो म्हणजेएक हिंदू, ज्याने कधीही ख्रिस्ती धर्माशी संबंधित कुठलाही ग्रंथ वाचला नाही तो कसा काय ख्रिस्ताच्या जीवनावर चित्रण करण्यास उद्युक्त झाला? या प्रश्नाला उत्तर देतांना जामिनी अनेक कारणे देतात. सर्वात महत्वाचे म्हणजे जामिनी यांना त्यांची नवी शैली, नवे तंत्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून पूर्णतः अपरिचित, नवीन विषयाला लागू पडतात का? हे बघायचे होते. सहाजिकच ख्रिस्त हा विषय त्यांच्यासाठी पूर्णतः नवीन होता आणि त्यामुळेच योग्यही होता. दुसरे असे की प्रबोधन काळातील उत्कृष्ठ कलाकृती म्हणून गणल्या गेलेल्या काही कलाकृतींच्या छायाचित्रणाच्या प्रती त्यांच्या बघण्यात आल्या होत्या. मात्र या प्रती बघून त्यांना अपेक्षित समाधान मिळाले नव्हते. त्या चित्रकारांनी ख्रिस्ताच्या मानवी गुणविशेषांची अपरिहार्यता दर्शवायला हवी होती असे त्यांचे मत होते. शिवाय मानव आणि परमात्मा हे अमूर्त आणि प्रतिकात्मक रुपातच एकात्म दर्शविले जाऊ शकतात हे त्यांना दाखवून द्यायचे होते. त्यांचे हे ध्येय किती योग्य होते? आणि त्यात त्यांना कितपत यश मिळाले? हे ठरविणे व्यक्तिसापेक्ष आहे. पण एक मात्र निश्चित या चित्रणात जामिनी यांनी अमूर्त गहनता आणि दुसऱ्या जगताच्या रहस्यवादासह बायझंटाईन कलेतही आढळणारी तरलता आणि अत्यंत साधेपणाचा भाव अचूकरित्या टिपला तर आहेच शिवाय मानवतावादी चित्रकारांनाही ख्रिस्ताच्यामानवया संकल्पनेचे यथायोग्य चित्रण साधले नव्हते ते जामिनी यांनी साधलेले दिसते.

बाराव्या शतकातील अनामिक फ्रेंच लोककलाकार आणि जामिनी यांच्यात आपणांस एक समांतर धागा आढळून येतो तो म्हणजे या दोन्ही पद्धतीत अलंकरणात्मक तालबद्धतेला अधिक महत्त्व प्रदान करण्यात आले असून चित्रकारांनी चेहऱ्याच्या अवयवांच्या वैविध्यावर (डोळे, दाढी, जिवणी) भर देऊन ख्रिस्ताचा साधेपणा आणि मानवी भाव प्रदर्शित केले आहेत.ख्रिस्ताच्या अध्ययनानंतर जामिनी यांनी पुढे काय साधले? मधली चारपाच वर्षे त्यांनी उत्कृष्ठ कला निर्मिती केली. सतत काम करताना कलाकाराची संथ गतीने का होईना पण प्रगती सुरू असते. मात्र काही समीक्षकांच्या मते जामिनींच्या बाबतीत त्यांच्या नंतरच्या काळातील कलाकृती पुढे गेलेल्या वाटता त्यात भूतकाळात साध्य केलेल्या गोष्टींचीच अधीरतेने उजळणी केलेली आढळून येते.

कलाकाराची कला आणि अनुभव यांचे एकत्रीकरण झाले की त्याच्या प्रगतीची प्रक्रिया मंदावते. असेच काहीसे जामिनी यांच्या बाबतीत झाले असावे. शिवाय जामिनी यांचे स्वतःचे असे मानणे होते की, ते एका अशा कला परंपरेचे निर्वहन करीत होते जेथे कलाकृतीचे अद्वितीय असणे महत्वपूर्ण नव्हते. पट शैलीमध्ये पुनरावृत्ती ही एक सामान्य बाब होती आणि स्वतःलापटुआम्हणून घेण्यात जामिनी यांना कसलाही कमीपणा वाटत नसे. जामिनी यांच्या मते कलाकृतींच्या निर्मितीची प्रक्रिया ही सामूहिक प्रयत्नांची परिणती असावी. शिवाय कलाकृतींची किंमत सर्वसामान्यांना परवडणारी असावी जेणेकरून त्यांची कला घराघरात पोहोचेल.

1954 मध्ये अमेरिकन कलासंग्राहक पेगी गुगेनहाईम (Peggy Guggenheim) या जेव्हा भारत भेटीसाठी आल्या तेव्हा त्या जामिनी यांना आवर्जून भेटल्या. जामिनींच्या कलाकृतीतील सुलभीकरणाने त्या विशेष प्रभावीत झाल्या होत्या. चित्रातील त्रिमितीयतेला जामिनींनी केलेल्या विरोधाची त्यांनी विशेष नोंद तर घेतलीच शिवाय जामिनी यांच्या चित्रातील प्राचीनतेच्या ध्यासाची तुलना त्यांनी रोमानियन अतिवास्तववादी चित्रकार व्हिक्टर ब्राऊनेर (Victor Brauner) यांच्याशी केली. आणि जमिनी  हे भारतातील ‘एकमेव आधुनिक चित्रकार’असल्याचा किताब बहाल करत त्यांचे रामायण या मालिकेवर आधारित एक चित्रही पेगी यांनी विकत घेतले.

1954 मध्ये भारत सरकारने जामिनी यांना पद्मभूषण देऊन गौरविले. तर 1955 मध्ये जामिनी यांची ललित कला अकॅडमिच्या वतीने ‘प्रथम फेलो’ म्हणून निवड करण्यात आली. रॉय क्रॅव्हेन (Roy Craven) या अमेरिकन कला मर्मज्ञाने 1971 मध्ये राय यांच्या चित्रांचे प्रदर्शन ‘युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडा आर्ट गॅलरी’ येथे आयोजित केले होते. या व्यतिरिक्त परदेशातील अनेक कलादालनांमध्ये जामिनी यांची चित्र प्रदर्शने आयोजित केल्या  गेली होती. पुढे 1976 मध्ये आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार द्वारा जामिनी यांचा समावेश ‘श्रेष्ठतम नऊ’ कलाकारांमध्ये करण्यात आला. हे असे नऊ चयनित कलाकार आहेत ज्यांनी आपल्या कलात्मक आणि सौंदर्यात्मक कलेने भारतीय कला आणि संस्कृतीला अमूल्य ठेवा प्रदान केला आहे.

जामिनी हे सतत प्रयोगशील राहिले आणि स्वतःला घडवत गेले. कालातीतता हा महत्त्वपूर्ण गुणधर्म आपल्याला जामिनी यांच्या कलाकृतीत आढळून येतो. उदात्तता आणि लयबद्धतेने परिपूर्ण असलेल्या कलाकृतीत मानवीयता आणि दैवत्व यांचा अपूर्व संगम आढळतो. रेषेतील सफाई, रंगांची सामान्य चमक, निर्मितीची सुदृढ भावना या वैशिष्ट्यांसह सपाट आणि ग्रामीण शैलीतही जीवन आणि गती यांचा सुरेख मेळ त्यांनी साधलेला दिसतो. ज्या वेळी अधिकाधिक भारतीय चित्रकार परकीय कलाशैलींकडे आकर्षित होत होते त्याच वेळी जामिनी यांनी लक्षणीयरित्या आणि कौशल्याने लोककलेचा आधार घेत आपली विशिष्ट अशी भारतीयत्वाचा साज धारण केलेली कला शैली विकसित केली त्यामुळे जामिनी यांचे कलाक्षेत्रातील स्थान निश्चितच अबाधित आहे.

समाप्त

*****

– पल्लवी पंडित 

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.