No products in the cart.
कलेचा महाप्रवासी : भाग १
जागतिक स्तरावर मान्यता मिळालेला आद्य भारतीय चित्रकार कोण? असा प्रश्न आला तर जामिनी राय हे नाव सर्वप्रथम एकमुखाने समोर येईल. याचे महत्वाचे कारण म्हणजे जामिनी राय यांचा कला प्रवास पश्चिमेकडून पूर्वेकडे असा होता. त्यांनी ब्रिटिश शैलीचे रीतसर शिक्षण घेतले पण लवकरच पाश्चात्य कला नियमांचे जोखड झुगारून त्यांनी आपल्या कलेची मुळे इथल्या मातीत शोधली. भारतीय कला शैलीला जागतिक पटलावर स्थान देणारे आद्य चित्रकार म्हणजे जामिनी राय. पल्लवी पंडित यांनी त्यांच्या कारकिर्दीवर विशेष लेख लिहिला आहे. तो पाच भागात दर सोमवारी चिन्ह आर्ट न्यूजच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत. त्यातला हा पहिला भाग. या लेखाचे महत्व म्हणजे जिथे तिथे पाश्चात्य अंधानुकरण करायची सवय लागलेल्या भारतीय मानसिकतेला अस्सलतेचे दर्शन या लेखातून होईल. बंगाल स्कूल की बॉम्बे स्कूल या वादात न पडता महान भारतीय चित्रकार जामिनी राय यांचा जीवनपट आपल्याला जाणून घेता येईल.
“युरोप अथवा अमेरिकेतील कलामर्मज्ञास जर भारतीय चित्रकाराचे नाव विचारले तर ते सांगण्यास तो असमर्थ ठरेल. (कारण एकोणिसाव्या शतकात इंग्रजांनी स्थापन केलेल्या कला महाविद्यालयामुळे भारतीय कलेची जी अपरिमित हानी झाली आहे त्यातून अजूनही भारतीय कला सावरली नाही.) आणि जर त्यांनी कुठले नाव सांगितलेच तर ते निश्चितच जामिनी राय यांचे असेल. कारण ते एक असे चित्रकार होते ज्यांच्या कलेत पाश्चात्य प्रणालींचे केवळ अंधानुकरण न आढळता मौलिक अशा कला तत्त्वांचा आणि भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम आढळतो.”
जामिनी राय यांच्या बद्दलचे हे उद्गार आपल्याला 1987 मध्ये जामिनी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या कॅटलॉग मधील कला समीक्षक शची राणी गुर्टू यांच्या लेखात वाचायला मिळतात.
आधुनिक भारतीय चित्रकलेच्या प्रणेत्यांमधील एक महत्त्वाचे चित्रकार म्हणजे जामिनी राय. यांच्या कलेने केवळ ललित कलेत नवीन धारा प्रस्थापित केली नाही तर रेखाटन, रचना व उपयोजित कला यांनाही प्रभावित केले. लोककलांचा शोध आणि हस्तकलांचे पुनरुज्जीवन या कलाक्षेत्रातील त्या काळातील महत्त्वाच्या घटना मानल्या जातात आणि त्यासाठी जामिनी राय यांच्या लोककलेचे महत्त्व जाणणाऱ्या पारखी दृष्टीचे आणि या कलांची तत्कालीन कलेशी सांगड घालीत त्यातील मर्म, उत्साह आणि निरागसता जपण्याच्या त्यांच्या कृतीचे आपण सदैव ऋणी असले पाहिजे.
जामिनी यांचा जन्म पश्चिम बंगालमधील बांकुडा जिल्ह्यातील बेलियातोड या छोट्याशा गावातील जमीनदार परिवारात 11 एप्रिल 1887 रोजी झाला. त्यांचे वडील रामतरण राय हे एक हौशी चित्रकार होते. अतिशय साधे, सरळ आयुष्य जामिनी यांच्या वाट्याला आले. लहानपणापासूनच बंगालच्या छोट्या छोट्या गावात फिरून त्यांनी हस्तकला कारागीर व मातीच्या विविध वस्तू बनविणाऱ्यांकडून बरेच काही शिकून घेतले. मातीच्या बाहुल्या, भांडी, खेळणी, जुन्या पद्धतीच्या तसबिरी व इतर तत्सम गोष्टींचे निरीक्षण करणे, अनुकरण करणे व त्याला पुढे आपल्या पद्धतीने विकसित करणे हा जणू त्यांचा नित्यक्रम असे. कदाचित त्या कारागिरांना काम करताना बघून सर्वप्रथम रंग आणि आकार व त्यायोगे सर्जनात्मक क्रियांप्रति चेतना जामिनी यांच्या मनात निर्माण झाली असावी. त्या संदर्भात एका ठिकाणी जामिनी लिहितात :
“मला लहानपणापासूनच रंगांचे आकर्षण होते. कित्येकदा खेळण्यांना रंगवून–रंगवून विद्रुप केल्यामुळे मला घरचे रागवीत. माझी रंगांप्रती आसक्ती एवढी तीव्र होती की कुठल्याही कामाकरिता जर मी बाजारात गेलो तरी माझे पाय आपोआप सर्व प्रथम चित्रकारांच्या दुकानांकडे वळत आणि कित्येक तास गुंग होऊन मी त्यांचा रंगांशी चाललेला खेळ बघत बसे. माणूस जसा आहे अथवा तो भविष्यात कसा असेल? असे त्याचे चित्रण केले जाते मात्र त्याची रंगमयता कुणालाच का दिसली नाही? असे विचार माझ्या मनात रुंजी घालत. अशीच तीव्र ओढ मला पटुआंबद्दल होती. विविध रंगांची उधळण करत ज्या तन्मयतेने ते आपल्या कलेने निर्जीव वस्तूंना सजीव बनवित, तो अनुभव घरच्यांचा राग विसरण्याचे बळ देत असे.”
जामिनी यांच्या चित्रकार होण्याच्या इच्छेला व त्यांच्या क्षमतांना प्रोत्साहन देत 1903 मध्ये रामतरण राय यांनी त्यांना कोलकत्याच्या गव्हर्मेंट स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये दाखल केले. अवनीन्द्रनाथ टागोर यांच्या मार्गदर्शनाखाली जामिनी यांचे कला शिक्षण सुरू झाले. याच काळात बंगाल शैली तिच्या अतिउच्च शिखरावर विराजमान होती. मात्र थोड्याच अवधीत अवनीन्द्रनाथांच्या जागी पर्सी ब्राऊन आले. जामिनी यांचे असीम गुण आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व यांनी ते विशेष प्रभावित झाले व त्यांना कलानिर्मितीचे विशेष स्वातंत्र्य देऊ केले. कलेचे हे औपचारिक शिक्षण घेताना जामिनी यांनी अथक मेहनत आणि संयम यांचा मेळ साधत तांत्रिक योग्यता आणि परिपक्वता ग्रहण केली.कला महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण केल्यावर जामिनी यांनी प्रस्थापित रीतीप्रमाणे व इतर युरोपीयन चित्रकारांच्या प्रभावाखाली रूढ प्रवाहानुसार एक चित्रकार म्हणून आपला प्रवास सुरू केला. व्यक्तिचित्रणात त्यांचा हातखंडा होता शिवाय प्रतिकृती निर्मितीचे कामही ते उत्तम करीत. या काळात जामिनी यांचा चित्रकार म्हणून कोलकत्याच्या नाट्य जगताशीही घनिष्ठ संबंध होता. त्यामुळे त्यांच्यातील चित्रकाराला वास्तविकता आणि भ्रम यांच्यातील परस्पर संबंधांना समजून घेण्यास विशेष मदत झाली.
1910 ते 1920 या काळात जामिनी यांनी एकीकडे अकॅडमिक पद्धतीत तैल रंगात व्यक्तिचित्रणे आणि आकृतीबद्ध रचना चित्रांची निर्मिती केली.जामिनी यांच्या समकालीन चित्रकारांपेक्षा कितीतरी अधिक विषय वैविध्य आपल्याला त्यांच्या या अकॅडमिक शैलीतील कलाकृतीत आढळून येते. पौराणिक व प्रस्थापित विषयांसह गावातील सुतार, लोहार, शेतकरी, पूजा करणाऱ्या स्त्रिया, विविध जाती– पंथातील लोक – बाऊल, संथाल, मल्ल, मुस्लीम फकीर, वैष्णव गायक असे कितीतरी विषय जामिनी यांनी सहजतेने हाताळले होते. तर दुसऱ्या बाजूला बंगाली शैलीच्या प्रभावाखाली देखील ते चित्रनिर्मिती करीत होते. त्यांची ‘द प्लाऊ मॅन‘, ‘अ मोहमेडन ॲट सनसेट प्रेयर ‘ आणि ’शॅडो ऑफ डेथ‘ ही या शैलीवर आधारित काही चित्रे होत. परंतु इतिहासात रमणाऱ्या या शैली पासून जामिनी यांनी लवकरच फारकत घेतली.
1920 च्या दशकात भारतात सुरू झालेल्या राष्ट्रीय चळवळीमुळे एकात्मता,आत्मगौरवाची जाणीव भारतीयांमध्ये प्रकर्षाने बळावली होती. त्यावेळी भारतातील या विविध पंथांच्या–जमातींच्या अधिक अध्यापनाकरिता जामिनी यांना या विषयांची मदतच झाली. शिवाय या कालावधीत उच्च वर्गाचा या कष्टकरी वर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला होता. जामिनी यांनी साकारलेल्या या जमातीतील व्यक्तिचित्रणे कोण्या विशिष्ट व्यक्तीची नसून त्या जमातीचे वैशिष्ट्य दर्शवणारी आहेत. एखाद्या पंथाच्या अथवा जमातीच्या वैशिष्ट्यांना संवेदनशील रीतीने प्रतिक्रिया देण्याची जामिनींची ही कृती नक्कीच लक्षणीय ठरते. या कलाकृती पूर्वी देखील जामिनी यांनी सामाजिक भाष्य करणाऱ्या कलाकृती निर्माण केल्या होत्या. पहिल्या महायुद्धाच्या आधीच्या काळात त्यांनी केलेली उपहासात्मक चित्रे आणि व्यंगचित्रे ही त्याचीच उदाहरणे होत. या चित्रात त्यांनी सावकार, जमीनदार यांची शीर्षे हिंस्त्र पशूंच्या रूपात चित्रांकित केली असून त्यातून जमीनदारांची पशुवृत्तीच त्यांनी दर्शविली. या कलाकृतीतून जमीनदार व कष्टकरी वर्गातील संघर्ष आणि गरीब जनतेतील वाढता द्रोह याचे चित्रण सांकेतिकरित्या जामिनी यांनी साकारले आहे.
1920 च्या दशकाच्या सुरुवातीला जामिनी यांनी आदिवासी, संथाल स्त्रियांचे इंद्रिय सुखद चित्रण केले. शृंगारिकतेत रममाण होत चित्रण करीत असताना देखील रूपाला (फॉर्मला) जपत रूपप्रधान सहजतेच्या दिशेने त्यांच्या वाटचालीची प्रचिती आपल्याला ही चित्रे देतात. जामिनी यांची ही सशक्त रेखाटने म्हणजे तत्कालीन पौर्वात्य शैलीतील चित्रकारांच्या क्षीण व दुबळ्या रेखाटनाच्या तुलनेत दृक् मेजवानीच होती. शिवाय त्यांनी उत्तरदृक्- प्रत्ययवादी शैलीत अनेक प्रयोग करून निसर्ग चित्रणे सुद्धा केली आहेत.
व्यावसायिक चित्रकार म्हणून प्रतिष्ठा आणि आर्थिक सफलता मिळून देखील जामिनी समाधानी नव्हते आणि वयाच्या 34 व्या वर्षी 1921 मध्ये अखेरीस तो निर्णायक क्षण आला …आणि ज्या शैलीवर त्यांची हुकूमत होती, ज्यामुळे त्यांना व्यावसायिक यश व प्रसिद्धी मिळाली होती त्या युरोपीयन कलाशैलीला तिलांजली देण्याचे जामिनी यांनी ठरविले. त्यानंतर सुरुवातीला त्यांनी कालीघाट शैलीचे तंत्र आत्मसात केले. मात्र कालीघाटी चित्रकार आपली ग्रामीण पाळेमुळे सोडून शहरांकडे स्थलांतरित होत होते. आपल्या या शैलीत आधुनिक शहरी विषय साकारताना ते आपले मूलभूत आदर्श विसरत आहेत असे जामिनी यांच्या लक्षात आले आणि थोड्याच अवधीत या शैलीला त्यांनी रामराम ठोकला.
****
– पल्लवी पंडित
चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n
‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
Related
Please login to join discussion