No products in the cart.
जनामनातला चित्रकार
ज्येष्ठ स्वयंशिक्षित चित्रकार आणि कवी धनंजय गोवर्धने यांची आणि त्यांनी केलेल्या ‘कविता–चित्र’ सारख्या अनोख्या प्रयोगांची ओळख करून देत आहेत लेखक, कवी, संपादक राजू देसले. त्या निमित्ताने गोवर्धने यांच्या विचारांमध्ये महत्त्वाचे स्थान असलेले, – अभिव्यक्तीचे साधन म्हणून उपयुक्त असलेले चित्रकलेचे विविध आयाम आणि समाजासाठी चित्रकला शिक्षणाचे महत्त्व – या मुद्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
———
“सुंदर रेखाटने काढण्याचे कौशल्य लाभलेले हात पाहून मला खूप हेवा वाटतो आहे” – पु ल देशपांडे
“तुम्हाला माध्यमाविषयी असलेली आत्मीयता, कल्पनाशक्ती आणि त्यांचे दृश्य अंगाविषयी असलेले भान याने मी भारावून गेलो आहे” – विजय तेंडुलकर
चित्रकार धनंजय गोवर्धने यांच्याविषयीची ही दोन विधानं त्यांच्या चित्र प्रवासाविषयी पुरेशी बोलकी ठरावीत.
चित्र, चित्रपट, माहितीपट, रेखाटने, कविता, ललितलेखन अशा विविध माध्यमात काम करणाऱ्या गोवर्धनेंनी चित्रकलेचं कुठलंही औपचारिक शिक्षण घेतलं नाही. शाळेत असताना कुठल्यातरी चित्रकलेच्या परिक्षेत यश मिळालं बस्स एवढंच. आणि आपण चित्रातून जास्त जोरकसपणे व्यक्त होऊ शकतो हा विश्वास त्यातूनच त्यांना मिळाला.
“मुक्त रेखाटनं मी माझ्या मनावरील ताण कमी करण्यासाठी काढतो, अनेक रेखाटनांचा सलग अभ्यास केला तर कदाचित माझ्या मनाच्या भावस्थितीचा आलेख काढणंही शक्य होईल” हे त्यांचं चित्राविषयीचं म्हणणं.
मराठी व इतर भाषेतल्या वाङमयीन नियतकालिकांसाठी सुमारे दोन हजाराहून अधिक रेखाटने, पाचशेपेक्षा अधिक मुखपृष्ठ असा कामाचा प्रचंड बायोडेटा असलेल्या गोवर्धनेंचा खरंतर कविता आणि चित्र हा चिंतनाचा विषय याच जाणिवेतून त्यांनी ‘पोस्टर पोएट्रीचा’ मराठीतला पहिला रंग – शब्दाविष्कार पेश केला. १९७६ साली ‘काव्यरेखा’ या शीर्षकाने हा अभिनव प्रयोग, मुंबई, ठाणे, अकोला इ. शहरांमध्येही लोकप्रिय झाला. “कवितेची निर्मिती होतांना कवीच्या भौतिक, अध्यात्मिक परंपरेचा वा सांस्कृतिक पर्यावरणाचा प्रभाव त्याच्या जाणवतो का?” हा कविता आणि चित्रविषयीच्या परस्पर जाणीवांविषयी विचार करण्यासाठी महत्वाचा ठरला. याचाच परिपाक म्हणजे चित्रशिक्षणाची गरज म्हणून मुक्त विद्यापीठाने ‘चित्रकला’ या विषयाचा समावेश केला.
गोवर्धनेंच्या मते, “महाराष्ट्रात तरी दृक-अशिक्षिततेचं प्रमाण जास्त आहे. आपण शाळेत शिकवतांना, अ- अननसाचा, ब- बदकाचा, क- कमळाचा. हे चित्र काढून त्यावर अक्षर शिकवतो. पण ही एकदा ही अक्षरांची भाषा शिकली की आपण त्या चिन्हांचाच वापर करतो आणि चित्र तिथंच सोडून देतो. जशी पहिलीची, दहावीची आणि महाविद्यालयात वेगवेगळी कविता शिकवतो तशी चित्रकलाही टप्प्याटप्प्याने शिकवली पाहिजे. म्हणजे सर्वसामान्य दृक-साक्षरता वाढेल आणि चित्राची भाषा कळू लागेल आणि चित्राचा आस्वाद सर्वसामान्य माणसंही घेऊ शकतील.”
—
समकालीन विषयाला चित्रकलेत परावर्तित करण्याचा प्रयोग काही वर्षांपूर्वी गोवर्धनेंनी केला, मुंबई बॉम्बस्फोटानंतर ‘दंगलपुराण’ या शीर्षकाचं वीस कविता चित्रांचं प्रदर्शन भरवलं. खरं म्हणजे ‘समाजातल्या सत् आणि असत् प्रवृत्तीवर कलावंताने लक्ष ठेवलं पाहिजे, किती कलावंत दंगलीसारख्या अप्रवृत्तीबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात?’ हा विचार यामागे होता. हेही प्रदर्शन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये लावलं. नाशिकला पीटीसीत प्रशिक्षण घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांसाठी आयोजित प्रदर्शनात तर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्या. मुंबईत राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी दंगलीविषयी चीड व्यक्त केली नाही. तर मुंबईबाहेरच्या अधिकाऱ्यांनी चीड व्यक्त केली.
या वेगळ्या अनुभवाबरोबर, रिमांड होममधल्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकलेच्या कार्यशाळेत मुलांसमोर सर्व रंग असतांना बहुतेक मुलांनी चित्र काढण्यासाठी काळ्या रंगाचाच वापर केला आणि मानवी आकृतींचा कुठेच वापर केला नाही. “अशा विविध अनुभवांचा शोध घेण्यासाठी चित्र हे माध्यम काहीतरी सांगायचंय, हाच ठाशीव विचार घेऊन येतं आणि हे सारं आदिम आहे”, गोवर्धने म्हणतात.
चित्राबरोबर अभिव्यक्त होण्यासाठी गोवर्धनेंनी ललित लेखन केलं, कविता लिहिल्या, ‘निशब्द कोलाहल’ या ललित लेखांच्या पुस्तकात, चित्र, सूर, सामाजिक, राजकीय पर्यावरण अशा अनेकविध विषयांना स्पर्श केला. ‘दंगलपुराण’ या कविता चित्रांच्या प्रदर्शनात आपल्या ‘कवि’तीक वेगळेपणाचा वेगळा प्रत्ययही देतात.
“हाताच्या स्पर्शानेच होतात शस्त्रे सजीव”
किंवा,
“अर्धवट जळालेल्या
कुजक्या प्रेतांचा वास सर्वत्र
सारखाच कसा? का नसते
कुजक्या वासाला जात वा धर्म?
निदान वासावरुन तरी ओळखता
आली असती प्रेते ह्या जातीची किती त्या धर्मियांची किती?”
असं पुसणारे गोवर्धने रंग-रेषा-शब्द या माध्यमातून आपलं म्हणणं आणि जगणं पुन्हा-पुन्हा नव्याने समजून उमजून घेऊन अस्सलपणे व्यक्त होत राहतात हेच खरं.
– राजू देसले
Related
Please login to join discussion